आरशातलं प्रेम – भाग २ – मैत्रीण
प्रेम व्यक्त होण्यापूर्वीच आलेला दुरावा आणि त्यातून निर्माण होत गेलेलं रहस्य म्हणजेच “आरशातलं प्रेम”. ही रहस्यकथा आपल्याला सध्याचं समाजातलं वास्तव दाखवते.
“आरशातलं प्रेम – मैत्रीण”
आरशासमोर ऋषि कपूर सारखा गिटारच्या जागी कंगवा हातात घेऊन खुर्चीवर बसून मस्त गाणं गुणगुणत होतो. डोळ्यासमोरून ती नजर जातंच नव्हती. असं वाटत होतं की ती आरशातच आहे म्हणून.
“हां ऽऽ हां ऽऽ जायचंय जायचंय.”
“आरसा सुटतोय का नाय ऽऽ ? का तिथंच चिकटणार हाय ऽऽ ?”
“हां झालं की, जाणार आता.” केसावरनं हात फिरवत मी म्हणालो.
“काय मर्दाच्या आरदा तास झाला.. चिकटून हाऽऽयस.. कुटं जायचंय एवढा नट्टा-पट्टा करून ?” आज्जीने भलताच सुर लावला.
“नटापटा.. हां हां ऽऽ.. नटापटा कुठं आई मी काय मुलगी हाय काय नटायला ?” मी चेहऱ्यावर हसू आणत म्हणालो.
“आवर आवर दोन वाजाय आलं”.
“अरे बापरे..!” आरशाच्या नादात घड्याळाकडे लक्षच नाही गेलं.
“जातो जातो मी.”
“सावकाश सावकाश सांगितलं नसतं तर आरशात घुसलांच असतास.”
“हां असू दे आता, जातो मी.”
सॅक घेऊन, सँडल घालून, गडबड करत घराबाहेर पडलो.
आई माझ्या हालचालींकडे बघतच होती. तशी ती माझी आज्जी होती पण आम्ही सगळे तिला आईच म्हणायचो.
कधी एकदा क्लासला जातोय असं होत होतं मला. कालचा दिवस कसा गेला मलाच माहित. शाळेतून पळत-पळत घरी आलेलो लवकर आवरण्यासाठी पण आरशाच्या चक्करमध्ये वेळ झालाच. सुखदरेच्या घरी आलो तेव्हा सगळे वाटच बघत होते.
“अरे हो हो ! छावा दिसतोयस आज भावा.” सुखदरे डोक्यापासून पायापर्यंत मला न्याहळत म्हणाला अन् लगेच त्याने त्याच्याकडचा चायना मोबाईल काढून माझा फोटो काढला अन् मोबाईल खिशात घातला.
“बस काय…! चला जाऊया.” मी डोळा मारत म्हटलं.
“हां चल चल तुझीचं वाट बघत होतो आम्ही.” सर्वजण एका सुरात म्हणाले.
आम्ही सर्व क्लासमध्ये गेलो तेव्हा सर्व आलेले होते. ती सुद्धा होती. आणि ती तिथेच बसलेली जिथे ती काल बसलेली.
पहिल्या बाकावर.. कपाटासमोर आणि माझ्यासमोर सुद्धा..
मी खुश..
राहून राहून मला वाटत होतं की, माझी जागा तर फिक्स झाली. पण तीची ? ती बसेल का उद्या परत तिथे ? पण माझी काळजी मिटलेली. ती तिथेचं बसलेली. मी जाऊन माझ्या जागेवर बसलो. तिने एकदा आरशातून माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली. मला कालसारखं अटेंशन मिळालं.
तेवढ्यात मॅडम आल्या अन् म्हणाल्या, “चला काल दिलेलं पाठांतर काढा.. आज तुझ्यापासून.” मॅडमने माझ्याकडे बोट दाखवत मला इशारा केला.
तसा मी उभा राहिलो. प्रश्न वाचला आणि मॅडमकडे बघत जसंच्या तसं उत्तर दिलं. मॅडम सकट सगळे माझ्याकडे आ वासून बघत होते.
“अरे वा ! आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय ? अभ्यास केलेला दिसतोय..?”
“रोजच करतो मॅडम आज जरा जास्त केलाय.” मी छाती फुगवून म्हणालो.
मी हळूच सुखदरेकडे बघून डोळा मारला आणि “फर्स्ट इम्प्रेशन” असं म्हटलं.
सुखदरे डोळे वटारून तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता काय तरी. २-३ प्रश्न तर मी अगदी सहजच न बघताच सांगितले. पण रिकाम्या जागा, जोड्या लावा ते नेहमीप्रमाणे बघूनंच सांगितलं.
“शाब्बास.. शाब्बास..!” मॅडमांनी कौतुकाने बघितलं आणि म्हणाल्या, “असाच अभ्यास रोज केलास तर फटके बसणार नाहीत.” आणि गालातल्या गालात हसायला लागल्या.. तसे सर्व जण हसायला लागले. इज्जतचा भाजीपाला केला पार !
“फर्स्ट इम्प्रेशन” सुखदरे पुटपुटला आणि गालातल्या गालात हसायला लागला.
“हां चला सुखदरे तुमची पाळी आता.” मॅडम सुखदरेकडे हसू आवरत म्हणाल्या.
रोजच्या प्रमाणे सुखदरेने मोठ्या प्रश्नांना फटके खाल्ले आणि बाकीचं सर्व बघून सांगितलं. असं करत करत तिचा नंबर येईपर्यंत मी वाट बघत होतो आणि तिचा नंबर आला आणि ती उठून उभी राहिली आणि बोलू लागली.
चातकानं पावसाळ्याची आणि मोरानं थुईथुई करण्यासाठी पाऊस बरसण्याची वाट बघावी तसा मी तिच्या आवाजाची वाट बघत होतो आणि तिचा आवाज तिचे शब्द माझ्या कानावर पडले. पावसाळ्यातली ती कोकीळा कुहूकुहू करू लागली.
उन्हाळ्यात घशाला कोरड पडल्यावर एखादं थंड पेय प्यावं आणि आत्मा शांत व्हावा तसा तिचा आवाज माझ्या कानांना वाटत होता.
“थंड ! गारगार !” ऐकतचं राहांव असा.
या थंडित तर या थंड पणाची मला थंडिच भरणार होती आता.
“आहाहा ऽऽ ! हा ऽऽ !”
तशी ती हुशार दिसतंच होती पण तिच्या बोलण्यावरून आता खात्री पटली.
मी तिच्याकडे पाहत होतो पण एकदा बघितल्यानंतर तिने माझ्याकडे परत बघितलंच नव्हतं. सुखदरे मला सारखा डिवचत होता खरं माझं मन कोकिळेच्या सुरात रमलेलं.
पाठांतर घेऊन झालं. शिकवून झालं. क्लासची वेळ संपली.
आम्ही घरी जाण्यासाठी बाहेर पडलो. मला तिच्या मागे मागे तिचं घर बघायला जायचं होतं पण माझ्या आजच्या हुशारीमुळे मला सगळ्यांनी घोळक्यात घेऊन झापायला सुरवात केलेली. कशी-बशी सगळ्यांची समजूत घातली आणि तिला शोधायला नजर फिरवली पण ती निघून गेलेली.
“श्या ऽऽ !” आता उद्यापर्यंत वाट बघावी लागणार. मी स्वत:शीच म्हटलं.
आजच्या हुशारीची शिक्षा म्हणून मला घरी जाता जाता सर्वांना समोसा पाव खायला द्यावा लागला. आता मला उद्याच्या दिवसाची वाट पाहावी लागणार होती.
आज काहीही झालं तरी तिचा पत्ता शोधायचांच असा निश्चय करूनच मी घराबाहेर पडलेलो. आज मी आणि सुखदरे दोघंच होतो. रोजच्या प्रमाणे रोजच्या रस्त्याने रोजच्या सारखीच मस्ती सुरू होती. क्लासमध्ये आलो तेव्हा सगळीकडे सन्नाटा पसरलेला. स्मशान शांतता भासत होती. सव्वा दोन झाले तरी अजून कोणी आलं नव्हतं.
“काय हाय काय आज ?” मी सुखदरेला विचारलं.
“काय माहित ?”
“अजून कसं कोण आलं नाही ?”
“येतील.”
“असं तर कधी होत नाही. सुट्टी-बिट्टी हाय काय आज ?”
“सुट्टी आणि आपल्याला ? हां ऽऽ..” सुखदरे विषण्णपणे हसत म्हणाला.
“आपली पलटणपण आली नाही अजून.”
एवढ्यात कोणीतरी आल्याची हालचाल जाणवली. कोणीतरी म्हातारी व्यक्ती आत येताना दिसली. ते आमच्या सरांचे वडील होते. आम्हांला बघून ते म्हणाले,
“काय रे पोरांनो, आज सुट्टी आहे तुम्हांला माहित नाय काय ? “
“सुट्टी.. ? नाही आम्हांला नाही माहीत.”
“जावा जावा घरी जावा. दोन दिवस तास व्हणांर नाय. सर गेल्याती गावाला.”
“बरं बरं जातो आम्ही.”
“काय रे तुला माहित नव्हतं काय ?” मी सुखदरेला विचारलं.
“असतं तर इथं असतो काय ?”
“ते पण आहे म्हणा.”
“मग आपल्या दोघांनाच कसं माहित नाही ?”
“मला वाटतंय आपण काल बोलत होतो बघ तेवढ्यात सरानं गेम केली असणार.”
“हां कदाचित. तसं पण माझं लक्ष दुसरीकडेच होतं.” मी पुटपुटलो.
माझा चेहरा उतरला. आज तिला पाहता येणार नाही म्हणून माझं मन नाराज झालं. मी शांत होतो.
“कसला विचार करतोय ?”
“काही नाही.”
“चल आज जरा इकडून जाऊ या.”
नेहमीचा रस्ता सोडून सुखदरे मला दुसरीकडून नेत होता.
“का ?”
“चल जरा माझं काम आहे.”
“नको तू जा. मला पण एक काम आहे घरी.”
मी शांतपणे बोललो. माझी तर बोलायची इच्छाच नव्हती.
“चल ना. तुझ्याच फायद्याच आहे.”
“काय ?”
“सांगतो चल.”
“बरं चल.” मी मनात नसताना त्याच्या बरोबर चालू लागलो.
कसलं काम ? कसला फायदा ? कोठून नेतोय ? काय कळत नव्हतं. मी आपला त्याच्यापाठीमागून म्हशीनं लोढणा न्ह्यावा तसा जात होतो. गल्ली बोळातून रस्ता काढत आम्ही एका घरासमोर गेलो. तेव्हा सुखदरे म्हणाला,
“हे घर बघून ठेव.”
“कोणाच आहे ?”
“वहिनीच”.
“कोण वहिनी ?
“आमची वहिनी”
“कुठली वहिनी आणि ही कधी आली ?”
“ही आमची आरशातली वहिनी, परवा आली”.
“काय ?”
“काय ! काय ! काय !”
“म्हणजे ?”
“म्हणजे ! काय, म्हणजे !”
“काय बोलतोय ?”
“हां चल चल लय ओव्हरॲक्टिंग करू नको. तुला काय वाटतं मला कळत नाय काय. कसा काल डोळं फाडून आरशात बघत होता ? मला सगळं समजतयं भावा.”
“काय समजतंय तुला ?”
“हेच की, आमची वहिनी आरशातनं लाईन देते म्हणून.”
“कोणाला मला, चल नाय रे काय पण काय.” आम्ही त्या गावचंच नाही असा साजूक चेहरा करून मी म्हणालो.
“लय भोळेपणाचा आव आणू नको. तुला काय वाटतं ? डोळे बंद करून दूध पिशिल आणि मला कळणार नाय. घुबडाची नजर हाय माझी.” सुखदरे हाताची तर्जनी आणि डोळे गोल गोल फिरवत म्हणाला.
मी चेहऱ्यावरच हसू लपवण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडे पाहत होतो आणि सुखदरे भुवया उडवून हसत हसत माझा खांदा हलवत होता. त्याने माझी चोरी पकडली होती. मांजराला रेड हँड पकडलेल. मी लाजत होतो. आता काही लपवण्यात अर्थ नव्हता.
“भावा तूच.. तूच मला ओळखू शकतोस. थँक्स भावा थँक्स.”
“बस काय ! मी तर कालच तिचं घर शोधून काढलेलं तुझ्यासाठी.”
मी सुखदरेकडे अभिमानाने बघत होतो. सुखदरे छाती फुगवून त्याची कर्तबगारी मोठ्या तोंडाने सांगत होता. माझ्याकडे बघत स्मित करत होता. बोलत बोलत आम्ही तिकडून बाहेर पडलो. मी जाम आनंदात होतो. सुखदरेची आज चैनी होती. मनात येईल ते आम्ही खात-खात जात होतो. भावाने मला आज खुश केलेलं. सुखदरेच माझा सच्चा दोस्त होता. माझ्या मनातलं ओळखंत होता. माझा खरा मित्र होता.
पुढे काय होणार ? कशी ओळख वाढवायची ? कशी मैत्री करायची ? याचाच विचार करत मी आमच्या दारात बसलेलो. सोबत अर्थात सुखदरे होता. एका महत्वाच्या विषयावर आमची मसलत सुरू होती.
जादुगार कसा त्याच्या खिशातून अजिबोगरीब वस्तू एक एक करून काढत असतो आणि आपण आश्चर्याने पाहत असतो. तसा सुखदरे त्याच्या डोक्यातून एक-एक युक्त्या काढत होता. आणि मी त्याच्याकडे पाहत होतो. डायरेक्ट प्रपोज करायच्या धाडसी योजना मला पटत नव्हत्या. मी माझ्या कलाने जाण्याचाच विचार करत होतो. सुखदरे आणि माझी तू तू – में में चालू होती.
एवढ्यात मला ती दिसली. मी लगेच जाऊन बाहेर बघितलं. ती पुढे जाऊन एका गल्लीत थांबलेली आणि मला हात करत होती. मी तर चक्रावूनच गेलेलो. हे काय अचानकच. सुखदरे आणि मी आम्ही एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होतो. ती माझ्याकडे बघून मला तिकडे येण्याचा इशारा करत होती. तसा मी गेलो.
“हाऽय इकडे कुठे ?” मी तिला चेहऱ्यावर हसु ठेवत विचारलं.
“असंच फिरत-फिरत आलेले.”
मी तिच्या डोळ्यांत बघत होतो ती माझ्याकडे पाहत होती. दोघांच्याही चेहऱ्यावर मंद स्मित होतं.
“काय करतोयस ?” तिने बारीक हसू चेहऱ्यावर ठेवत विचारलं.
“काही नाही असंच गप्पा मारत बसलेलो.” मी तसंच तिच्यासारखं हसत म्हणालो.
“अच्छा.. माझं ना तुझ्याकडे एक काम होतं.” बोलता बोलता तिची नजर जमिनीवर गेली.
“हां बोल ना.”
“तू शाळेत किती वाजता जातोस ?” तिने माझ्या नजरेला नजर देत विचारलं.
“सात-सव्वा सातला.”
“सव्वा सातला तर शाळा भरते, इतक्या उशिरा ?”
“हो म्हणजे आवरता आवरता होतो तेवढा वेळ.”
“उद्यापासून, साडेसहाला निघशील ?”
“साडेसहाला, इतक्या लवकर ?”
“हो.. माझ्या सोबत कोणी नाही उद्यापासून शाळेत जायला. माझ्या मैत्रिणी होत्या त्या आता रिक्शाने जातात म्हणून.”
“म्हणजे आपण एकत्र जायचं का ?” मी आश्चर्याने विचारलं.
“हो.”
“म्हणजे तू आणि मी एकत्र शाळेत जायचं का ?”
“हो.”
“म्हणजे तू-मी, मी-तू, आपण दोघंच सकाळी साडेसहा वाजता एकत्र शाळेत जायचं का ?” मी गोंधळलेल्या अवस्थेत हातवारे करत म्हणालो.
“हो.” ती हसतच माझ्या गोंधळलेल्या नजरेला नजर देत म्हणाली.
मी पार गोंधळून गेलेलो. माझा तर विश्वासच बसत नव्हता.
“चालेल ना ?”
“हो-हो चालेल काय धावेल धावेल” मी पुटपुटलो. माझ्या मनात लाडू फुटत होते.
“काय ?”
“काही नाही. उद्या सकाळी साडेसहा.” मी हाताचा अंगठा वरच्या दिशेनं करत म्हणालो.
“हां.” तशी ती माझ्या डोळ्यात बघून हसली.
“पण कुठे येऊन थांबू ?” मी तिला विचारलं.
“नाक्यावर बघ, मारूतीचं मंदिर आहे ना तिथं.”
“चालेल थांबतो उद्या.”
“थँक्यू.”
“जय बजरंगबली.”
“काय ?”
“ते आपलं, वेलकम-वेलकम.”
ती नुसतीच हसली अन् बाय म्हणत हळूवार पाठमोरी होत आपल्या गालावर आलेली केसाची बट कानामागे सारत गेली. मी मंद स्मित करत तिची पाठमोरी आकृती पाहत होतो. ती जाईपर्यंत मी तिच्याकडे पाहत होतो.
“गेली ती.” सुखदरे माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मी तसाच तिची पाठमोरी आकृती अदृश्य होईपर्यंत पाहत होतो.
“भावा गेली ती..” सुखदरे माझा खांदा गदागदा हलवत म्हणाला.
“जय बजरंगबली.”
“काय ?”
“हां.. काय नाय, काय नाय.. भावा बजरंगबलीच पावलाय मला.”
माझ्या चेहऱ्यावर हास्याच्या विजा चमकत होत्या. मिरॅकल झाल्यासारखं मी हातवारे करत होतो. मी आकाशात कोलांट्या उड्या मारत होतो. आभाळात तरंगत होतो. पाण्यावर तेलाचा थेंब पडावा आणि त्याचा तरंग पसरत जावा तसा मी आभाळभर पसरत होतो. माझा आनंद गगनात मावत नव्हता.
सुखदरे मला वेड लागल्यासारखं माझ्याकडे पाहत होता. आणि मला खरंच वेड लागल्याची वेळ आलेली. मी आनंदाने वेडाच झालेलो. इतके दिवस ओळख नाही. बोलणं नाही. आणि आज डायरेक्ट उद्या सकाळी साडेसहाला थांबशील का ?
“अरे का नाय थांबणार ? मी आज मारूतीच्या मंदिरातच जाऊन राहतो.” मी मनातल्या मनातच पुटपुटू लागलो.
सुखदरे माझा खांदा गदागदा हलवून मला विचारत होता,
“अरे काय म्हणत होती ती ?”
“अरे भावा, उद्यापासून आपण एकत्र शाळेत जाऊ या का ? असं विचारत होती.”
“काय बोलतोय ?”
“होय.”
सुखदरे आश्चर्याने बघत होता. मी मस्करी करतोय किंवा खोटं बोलतोय असं माझ्याकडे बघून त्याला अजिबात वाटत नव्हतं.
“आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन.” अशी गत झालेली माझी.
आम्ही दोघेही हसत होतो.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
हे देखील पहा :
वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!