आपली माणसं – भाग ०२

    फक्त् नात्याने कोणी आपलं होत नसत. आपलं होण्यासाठी आपलेपणा द्यावा लागतो. प्रेम द्यावं लागत. चुका दुर्लक्ष कराव्या लागतात. ज्यांच कोणी नसतं त्यांना आपलं करावं लागत. “आपली माणसं” ही अशी कमवावी लागतात. ती सहजासहजी मिळत नसतात.

Aapli Manas is Image of a boy holding hand of a old women and helping her to reach to home.

“आपली माणसं”

    अंघोळ पाणी उरकून मी ऊंबऱ्यात नेलकटर घेऊन बसलो. बाहेर पाहिलं तर शारदा आज्जी समोरच्या घरातल्या ऊंबऱ्यात एका वृध्द बाई शेजारी बसली होती. ती वृध्द बाई दाराला टेकून बसली होती. ते घर बंद होत. दाराला कुलूप होतं. दिसण्यावरून ती ख्रिश्चन वाटत होती. अंगावर पांढरी साडी, रंग काळा अन् शरीर पूर्णतः थरथरत होत. माझ्या अंदाजाने त्यांचं वय नव्वदच्या आसपास तरी होतंच. शारदा आज्जीला ती बाई बरंच काय काय सांगत होती. शारदा आज्जी नुसतीच मान डोलावत होती. ती बाई तिच्या भाषेत बोलत होती. शारदा आज्जी मराठीत बोलत होती. तिथं भाषेचा संवाद होत नव्हता. तिथं भावनेचा संवाद सुरु होता. एकमेकांच बोलण समजण्याच माध्यम हे भाषा नसून भावना होती.

    मी अधून मधून त्यांचं बोलण ऐकत होतो. ती वृध्द बाई बोलताना डोळे पाण्याने भरत होती. तिला पाहताना आपसूकच डोळे पाणावत होते. मी आत जाऊन पेपर वाचत बसलो. काही वेळाने शारदा आज्जी दारात येऊन बोलवू लागली.

    “ए बाळा.”

    मी भरलेल्या डोळ्यांनी त्यांना आवाज दिला.

    “काय आज्जी..?”

    “माझं एक काम कर रं ऽ..”

    “बोला ना.” पेपर बाजूला टाकत मी त्यांच्या जवळ गेलो.

    “मागं इस्त्री वाल्याचं दुकान हाय का.”

    “हां आहे की.”

    “तिथंन समोर गल्ली गेल्या बघ.”

    “बर.”

    “गल्लीतनं आत गेला की ती म्हातारी नेत्या बघ तुला.. तिच्या संग जा फकस्त.. कुठं तर पडल लेका ती.. तिचा हात धरुन ने तेवढं तिला तिकडं.”

    “जातो की आज्जी.”

    “जा रं बाळा एवढं काम कर..”

    “जातो जातो काय काळजी करू नका.”

    मी मोबाईल खिशात घालत बाहेर पडलो. दार ओढून घेतलं अन् त्या वृद्ध बाईजवळ जाऊन उभा राहीलो.

    “आज्जी दार ओढून घेतलय फक्तं.”

    “मी हाय इथंच. तू ये सोडून.”

    “हां ऽ”

    त्या वृध्द बाईचा हात हातात घेत तिला उठायला मदत केली. तिला उठून उभं करेपर्यंत दीड दोन मिनिट गेली. उठता उठता माझ्याकडे पाहून तिनं चेहऱ्यावर हसू आणलं. माझ्या हाताला धरून ती एक एक पाऊल चालू लागली.

    आजींनी सांगितल्याप्रमाणे आम्हीं त्या गल्लीपर्यंत आलो. तिथून मला ती खुणावू लागली. तिच्या पावलासोबत मी पाऊल टाकू लागलो. पाच मिनिटांचा तो रस्ता तीस मिनिटांत पुर्ण झाला.

    गल्लीतून बाहेर पडताच एका घराजवळ त्यांनी खून केली आणि आपण इच्छित स्थळी पोहोचल्याच त्यांच्या नजरेने सांगितलं.

हे देखील वाचा :

    त्या घराला कुलूप होत. ती बाई तिथेच कट्ट्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागली. मला धरत धरत ती कशी बशी बसली. मला खाली बसण्याचा इशारा केला तसा मी गुडघा टेकून त्यांच्याजवळ बसलो.

    त्यांनी आपले डोळे बंद केले अन् तोंडातल्या तोंडातच काही तरी पुटपुटु लागल्या. मिनिट भराने डोळे उघडून माझ्या कपाळावर येशू ख्रिस्ताचा क्रॉस काढला अन् जगातलं सर्वोत्तम हास्य चेहऱ्यावर ठेऊन माझ्याकडे पाणावल्या डोळ्याने पाहू लागल्या.

    मी त्यांना हातानेच इशारा करत “इथे कोणी नाही इथे का बसताय ?” म्हणून विचारलं.

    त्या फक्त पाणावलेल्या डोळ्याने चेहऱ्यावर हसू ठेऊन माझ्याकडे पाहत होत्या. मी क्षणभर शांत राहीलो. काही वेळाने “मी जाऊ का ?” म्हणून त्यांना इशारा करत विचारलं.

    त्यांनी होकरात मान हलवून मला जायला सांगितलं.

    मी उठता उठता त्यांनी माझ्या डोक्यावरून पुन्हा एकदा हात फिरवला अन् फक्त पाहू लागल्या.

    मी येताना ज्या वेळेत इथे आलो होतो त्यापेक्षा जास्त वेळ मला जाताना लागला. मी विचारात हरवून गेलो होतो. थोडी थोडी परिस्थिति माझ्याही लक्षात आली होती.

    घराजवळ आलो तेव्हा शारदा आज्जी दारातच बसली होती. मी आल्या आल्याच त्यांना विचारलं.

    “आज्जी कोण आहे ती बाई..?” मी त्यांच्या शेजारी बसत विचारलं.

    “समोरची काळी हाय का.”

    “हां ऽ”

    “तिची आय हाय ही.”

    “मग ती इथ राहत नाही..?”

    शारदा आज्जी गालातच हसली अन् म्हणाली,

    “तिच्यासाठी यांच्या घरात जागा नाही.”

    मी समोरचं घर खालून वरपर्यंत पुन्हा पाहिलं. आसपासच्या घरांवर नजर फिरवली. सर्व घरांत ते घर जास्त उठावदार होतं. अर्थात घरावर केलेला खर्च दिसत होता.

    “जागा नाही म्हणजे.. कोण कोण राहत ईथे.. मला तर तो अण्णा एकटाच दिसतो..”

    “तशी माप माणसं हायत. दोन पोरं हायत. एक पोरगी हाय.”

    “मला कधी दिसले नाहीत.”

    “मोठं पोरग तिकड दुबईला असतय. ती कवा तर सुट्टीला येतंय. आता मागल्या वर्षी पोरीचं लगीन झालंय.. बारकं पोरग लागलंय कुठ तर कामाला.”

    “म्हणजे इथं आता तिघच राहतात. वर खाली चांगली मोठी खोली असून यांच्याकडे जागा नाही.”

    “ती कोपऱ्यातली खोली दिस्त्या का काळा डरम हाय बघ.”

    “हां ऽ”

    “ती बी यांचीच.. इकाय काढल्या आता एकवीस लाखाला.”

    “काय..?”

    “व्हय.”

    “आणि यांच्याकडे जागा नाही..?”

    “व्हय.. काय सांगायचं बाबा.. अशी तऱ्हा हाय या काळीची.. उगाच तिला मी काळी म्हणत नाय.. रंगानं तर ही काळी हाय खर मनानं पिन काळीच हाय.”

    “मी आता तिला कुठं सोडून आलो..?”

    “तिची दुसरी ल्येक तिथं राहत्या टवळी.. ती तर लय श्रीमंत हाय.. एका ओळीने तिची घरं हायत.. आता गेलतास का गल्लीत तिथं..”

    मी शांतच राहिलो.

    “पोरगा नाय तिला..?”

    “तेवढं देवानं उपकार केलं तीच्याव.. प्वाॅर नाय दिलं पोटाला.. नाय त्यानं आणि काय तर एगळ केलं असतं.”

    मी सुन्न होतो.

    “मग ती राहते कुठं आज्जी..?”

    “अशीच की इकडं जरा वाईच तिकडं जरा वाईच. घरात घीत नाईत हिला. जरा इकडं ऊंबऱ्यावर बस्त्या. इकडंन हाकललं की तिकडं जात्या. मी देतोय तिला कवातर खायला. मला बी नाय बघवत तिचं हाल.” आज्जीने डोळे पाणावले.

    मी शांतच होतो. काही वेळाने आज्जी पुन्हा बोलू लागली.

    “ती शिडी मोडल्यालं घर दिसतय का..?” आज्जीने घराकडे बोटाने इशारा करत मला विचारलं.

    “हो.”

    “तिथं पिन एक ख्रिश्चन बाय राहत्या. तीची आय नाय म्हटलं तर नव्वदच्या पुढची हाय. अंथरुणाला खिळून. खरं दोघं नवरा बायको तिचा सांभाळ करत्यात. घर बघ तिचं. वाटतय का बघुन, तिथं कोण ऱ्हात असंल म्हणून.”

    मी त्या घराचं निरीक्षण करू लागलो.

    “नुसता पैसा असून काय होत नाय बाळा.. जिनं तुम्हाला वाढवलं तिच्यासाठीच घरात जागा नाय म्हटल्यावर त्यो पैसा काय जाळायचा हाय का सांग बघू. आपली माणसं अशी वागायला लागल्यावर माणूस कसा जगंल..?”

    मला त्यांचं हे बोलण पटलेलं. नकळत माझेही डोळे पाणावले होते. शारदा आज्जी केव्हाच शून्यात हरवून गेली होती.

    गेल्या दोन महिन्यांत कधीतरी आई वडिलांची आठवण येत होती. पण त्या आठवणीत माया कमी अन् त्रासच जास्त जाणवत होता. कधी कधी माझंच मन मला खायला उठत होत. ऐन तारुण्यात मी घर सोडलं होतं. आई वडिलांना नाकारलं होतं पण पुढे जाऊन माझीच मुलं माझ्यासोबत अशी वागलीत तर माझं कसं होईल यासारखेच विचार माझ्या मनात येत होते.

    गेल्या दोन महिन्यांत यासारखं बरंच काही अनुभवलं होत. अन् दर वेळी मी जे केलं ते योग्य आहे की नाही, मी बरोबर वागलोय का हे विचार सतत पिच्छा करत होते. पण खरं सांगायचं तर मला एका बाजूला मी केलं ते बरोबर केलं असंच जाणवत होतं.

    असा काही गोंधळ झाला की शारदा आज्जी माझी समजूत काढत होती. कधी तरी ती “एकदा वाटल्यास आई वडिलांना भेटून बघ” असं ही सांगत होती. पण माझं मन नाही म्हणत होत.

हे देखील वाचा :

    आयुष्यात जसं कधी कोण येईल हे सांगता येत नाहीं तसंच आयुष्यातून कधी कोण जाईल हेही सांगता येत नाही. अन् अशी ही वेळ केव्हा येईल ते तर कधीच कळत नाही. आपल्याही नकळत गोष्टी इतक्या वेगवान घडून जातात की आपण सुन्न होऊन जातो.

    त्या दिवशी कामावरून घरी आलो तेव्हा सगळे दारातच उभे होते. काही तरी झालंय हे माझ्या लक्षात आलं होतं. शारदा आज्जीचं घर बंद होतं. प्रत्येकजण तिच्या घराशेजारीच घिरट्या घालत होता. मी समोरच्या अण्णाला विचारलं.

    “अण्णा क्या हुवा..?”

    “शारदा को लेके गया अस्पताल. एटॅक आया..”

    माझ्या काळजात चर्रऽ झालं. माझा अंदाज पुन्हा चुकला होता.

    “कोणसे अस्पताल..?” माझे डोळे भरले होते.

    “तिवारी को लेके गया. जाव जलदी तुम्हारा नाम ले रहा था.”

    मी तसाच दार न उघडताच मागे फिरलो. कधी एकदा मी आज्जीजवळ जाऊन उभा राहतोय असं मला होत होतं. गडबडीत रिक्षावाल्याचे पैसे देऊन मी पळत पळत दवाखान्यात गेलो. बाहेर आमच्या इकडचे बरेच लोक उभे होते. त्यांच्याकडून कळालं “अचानक छातीत दुखायला लागलं अन् एकाएकी खालीच पडल्या. सिरियस आहे.”

    मला काकी अन् पिंकी रडताना दिसल्या. काका कुठे नजरेला पडत नव्हते. काही वेळाने तेही डॉक्टरांसोबत दिसले. मला पाहताच ते माझ्याजवळ आले अन् पाहतच राहीले. क्षणभर त्यांची शुद्ध हरवली होती. माझे भरलेले डोळे त्यांना पाहू शकत नव्हते. काही वेळाने त्यांनी माझ्या खांद्याला धरत सरळ मला आयसीयूत नेलं.

    शारदा आज्जी सिरियस होती. काही क्षणापूर्वीचं ती शुद्धित आली होती. तिला पाहून मला रडू कोसळलं. मला तिथं उभ राहवेना. संतोष काकाने धीर दिला. त्यालाही भरून आलं होतं.

    मी स्वतःला सावरत आज्जीजवळ जाऊन उभा राहीलो. आज्जी मला पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य होतं. माझा हात हातात घेत ती माझ्याकडे फक्त पाहू लागली.

    मला रडू आवरत नव्हतं. काका माझ्या शेजारीच ऊभा होता. तिला काहीतरी बोलायचं होत. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. मी तिच्याजवळ गेलो. तिच्याजवळ जावून मी तिचं म्हणंन ऐकण्याचा प्रयत्न करु लागलो.

    तिचे उच्चार स्पष्ट नव्हते. ती माझा हात थोपटत होती. स्वतःच्या पोटावर ठेवत होती. तिच्या कृतीला शब्दांची गरज नव्हती. तिच्या भावना माझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या होत्या.

    मी रडत रडतच म्हणालो, “मी तुमचाच आहे.. तुम्हीं माझ्या आहात.. तुम्हाला काही नाही होणार.. तुम्ही लवकर बऱ्या व्हा.. तुम्ही मला हव्या आहात..”

    हात थोपटनं बंद झालं. पलिकडलं मशीन बंद झालं. श्वासोच्छवास बंद झाला. कानात फक्त एकच आवाज घुमू लागला. टीं ऽ टीं ऽ टी ऽ..

    मी आज्जीकडे पाहिलं. त्यांचे डोळे बंद होते. चेहरा निर्विकार होता. शरीर थंड पडलेलं.. शारदा आज्जी मला सोडून गेली होती.. मी सुन्न होऊन फक्त पाहत होतो.

    अंत्यविधीला सुरवात झाली होती. मी अजूनही थक्क होतो. मी ईथे आल्यापासूनच्या सर्व आठवणी माझ्या नजरेसमोर पळत होत्या. माझा अजूनही जे होतंय त्यावर विश्वास बसत नव्हता. अजूनही मन मानत नव्हतं. पण अंतिम सत्य स्वीकारण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता.

    संतोष काका तर पुरता गळून पडला होता. शारदा आज्जी गेल्यापासून त्याने माझा हात सोडला नव्हता. तो माझ्या गळ्यात पडून बरंच रडला होता. त्याला आधार देत मी त्याच्याच शेजारी उभा होतो. जवळ जवळ सगळे विधी झाले होते. आता तिरडी उचलण्याची वेळ आली होती. काका मला धरुनच उभा होता. त्याने मडके उचलले. उचलताच तो थरथरू लागला. मी लगेच त्याला आधार दिला. त्याच्या उजव्या हाताला धरून चालू लागलो.

    स्मशानभूमीपर्यंत आम्ही पोचलो. अग्नि देण्याची वेळ आली होती. संतोष काका पुरता गळून पडला होता. अग्नी देतानाही त्याला धरुनच मी उभा होतो.

    घरी आलो तरी डोळ्यासमोरून आजच्या दिवसाची चित्रं जात नव्हतीत. राहून राहून रडायला येत होत. मी शारदा आज्जीचा कोणीच नव्हतो. तरी तिने मला इतका जीव लावला होता. काकाची काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकत होतो. त्या रात्री झोप काही लागलीच नाही. घरी जसा जाऊन बसलो होतो तसाच रात्रभर बसून होतो.

    पहाटे काकाने दार वाजवलं तेव्हा कुठे शुद्धीत आलो. काका येऊन माझ्या समोरच बसला. एकटक माझ्याकडे पाहू लागला. काही वेळासाठी मला काही कळेनास झालं. “संग्रामचा‌ मुलगा आहेस तू..?”

    “हो.” मी डोळे मोठे करून त्यांना सांगितलं.

    “इथं कसा आलास..?”

    “का काय झालं.. तुम्हाला कसं कळालं..?”

    “आईने सांगितलं काल दवाखान्यात.”

    “मला काही कळालं नाही. आज्जीला कसं माहीत..?”

    “कसं माहीत.. तुला कळलेलं दिसत नाही वाटतं अजून..?”

    “कशाबद्दल बोलताय काका..?”

    “काल ती तुला काय सांगत होती. तु काय म्हणाला होतास..?”

    “म्हणजे मी समजलो नाही..?”

    “तु जाणून बुजून तसं म्हणाला नाहीस.. तुझ्या आत्म्याने ते तुझ्याकडून म्हणवून घेतलय.. ती तुझी खरी आज्जी होती तन्मय..”

    मी थक्क होतो..

    “होय.. संग्रामची आई होती ती.. तुझी आज्जी होती ती.. तिने तुला पाहिल्याक्षणीच ओळखल होतं.. पण तु तिला ओळखू शकला नाहीस.”

    मी सुन्न झालो होतो. काका काय बोलतायत यावर विश्वास ठेवणं अवघड होत.

    “काय बोलताय काका..?”

    “खरं तेच बोलतोय.. काल स्वतः आईने मला सांगितलं. तिला पहिल्यांदा शुद्ध आली तेव्हा मी होतो तिच्याजवळ. मला म्हणाली,

    “संतोष तनु संग्रामचा पोरगा हाय.. माझा नातू हाय..”

    “मला काही कळेनास झालं.”

    “इथं का आलाय तो आता.. काय हवंय त्याला..?”

    “त्या पोराला हे पण म्हाईत नाय त्याला कोणी आज्जी हाय म्हणून.. ती जिती हाय का मेली हाय.. ती कोण हाय.. ती मीच हाय.. त्याला काहीच म्हाईत नाय..”

    “आई बापाला सोडून आलंय ते.. बापानं जसं आईला टाकलं तसं पोराला बी रस्त्याव टाकलं.”

    “आपण काय करायचं मग..?”

    “त्याला सांग ही समद.. तवर मी जगल मरल..”

    “आई.. असं नको बोलूस.”

    “व्हय लेकरा.. हीच खरं हाय.. आता पातूर सांभाळलस.. पोटच्या पोरान केलं नाय तेवढं माझ्यासाठी केलंस..”

    “आई असं नको बोलूस.. मी रडूच लागलो..”

    “बोलू दे बाळा.. लय केलंस तुझं उपकार..”

    “आई.. माझा हुंदका दाटून आला..”

    “एक कर लेकरा.. एकदा शेवटचं भेटू दे मला.. मला त्याला सांगू दे मीच त्याची खरी आज्जी हाय.. त्यो एकटा नाय या जगात.. मी हाय त्याला.. तसे तिचे डोळे भरून आले.. तिची शुद्ध हरपली..”

    मी रडत होतो.. मला आणखी स्पष्टीकरणाची गरज नव्हती.. देवाने असं का केलं होतं माहीत नाही.. माझ्या सोबतच तो असं का वागला होता माहित नाही.. मी फक्त रडत होतो..

    ज्यांना ज्यांना मी जीव लावला त्या प्रत्येकाला त्याने माझ्यापासून हिरावलं होत. मी फक्त रडत होतो.. काका मला शांत करत होता. माझं हे दुःख संपणार नव्हतं.

    “खरं तर तुझ्याकडुनच सगळे विधी करायचे होते. खरं त्याला वेगळं वळण लागलं असत. भरपूर प्रश्न उपस्थित झाले असते. आणि त्या सगळ्याचं स्पष्टीकरण देण्याची काल वेळ नव्हती. म्हणून मग काल मी तुला सोबत घेऊनच सगळे विधी केले. आता तू सांग पुढं कसं करायचं..?”

    मी स्वतःला सावरलं अन् बोलू लागलो.

    “काका आज्जी तुमच्याजवळ.. तुम्ही कोण नेमकं..?”

    “कोणी नाही पोरा.. ती माझी कोणीच नव्हती.. रस्त्यावर राहत होतो आम्ही. आज ईकडं तर उद्या तिकडं.. मुंबईत कोणी नव्हत.. बाप गाडी खाली येऊन मेला. आई आजारानं मेली.. शारदा आईनं तवा साथ दिली.. ती एकटीच होती.. पुलाखाली झोपायची.. एकदा ताप येऊन तडफडत होतो.. तिनं जगवलं.. आपलं म्हणून कोण नव्हतं तवा फक्त ती होती.. तवापासून मी तिला आई मानतो.. ती मला मुलगा मानती..”

    “माझ्या वडलांबद्दल कधी काही बोलली नाही..?”

    “एकदा फुटपाथवर तुझ्या बापानं तिला झिडकारल्यालं.. मी विचारल्यावर बोलली माझा पोरगा हाय..”

    “मला लय राग आलता तवा.. वाटत होतं जाऊन तुझ्या बापाला मारावं. त्याचा पैशाचा माज उतरवावा.. आईन अडवल.. लय कष्ट घेतलं तिनं.. लोकांची धुनीभांडी करून पोट भरलं..”

    “नशिबानं मला टेंपोवर नोकरी लागली. चांगल दीस यायला सुरवात झाली.. तवापासून आम्हीं एकत्र हाय पोरा..”

    मी शांत होऊन आज्जीचा भूतकाळ ऐकत होतो. मला माझ्या वडलांचा भयंकर राग येत होता. मला स्वतःला विश्वास बसत नव्हता.

    “त्यांनी असं का केलं.. कधी सांगितलं नाही तिने..?”

    “नाय, एकदा मी विचारलेलं, खरं ती इतकंच म्हणाली, “पैसा जवळचा झाला की आपली माणसं आपोआप दूर होतात.” अन् लागली रडायला. ती रडत्यालं बघू वाटायचं नाय. परत मी कधीच तिला विचारलं नाय..”

    “आता तू सांग पोरा पुढं कसं कसं करायचं.. तुझा हक्क आहे तो..”

    मी डोळ्यात पाणी ठेवून सर्व काही ऐकत होतो.

    “नाही काका.. तुमचा हक्क आहे तो.. माझं नशीब मला इथं घेऊन आलं. आलो नसतो तर माझी अन् तिची भेटही झाली नसती. तुम्ही आई म्हणून सांभाळ केलात. तुम्हीच सर्व करा. तो तुमचा हक्क आहे. त्यातून पण तुम्ही कोणाला न कळता माझा ही हातभार काल लावलात.. मी खूप आभारी आहे तुमचा..” माझे डोळे पाण्याने भरले.

    “गप पोरा.. आता झालं ती झालं.. माझी आई समाधानानं गेली. मला म्हटली, “काय बी वाईट वाटून घेऊ नगं.. मी तुमच्यासंग आनंदात जगले.. आणि आनंदाने मरतेय.. आज ना उद्या कवा तर आपल्याला जावच लागणार.. ही येळ कवा तर येणार हुती..”

    “खरं अशी वेळ इतक्या लवकर यायला नको होती काका.. मला तिने सांगायला हवं होत..”

    “मुद्दाम सांगितलं नसणार तिनं. तिच्या जिवंतपणी हे सत्य तुला पचवल नसतं.. नको लय विचार करुस..”

    “हो.” मी शांत नजरेने म्हणालो..

    शारदा आज्जीचं कार्य पार पडलं. बघता बघता या गोष्टीला महिना झाला. मला या धक्क्यातून बाहेर यायला जरा वेळ लागला पण मी सावरलं.

    बाहेर नजर गेली तेव्हा आज्जीची मैत्रीण दारात बसली होती. तिची नजर आज्जीच्या घराकडेच होती.. तिच्या एका चाहूलीसाठी ती व्याकूळ दिसत होती. पाठीमागे तीची मुलगी घरातून बडबड करत होती. तिचं सर्व बोलणं माझ्या कानावर येत होतं.. माझी नजर त्या वृद्ध बाईवर स्थिरावली होती..

    तेवढ्यात मला हाक मारतच काका घरात आले. येऊन माझ्या समोरच बसले..

    “काय ते..?”

    “बरेच दिवस तुला सांगेन म्हणत होतो.”

    “बोला ना..”

    त्यांनी हातातलं पाकीट माझ्यासमोर ठेवलं अन् म्हणाले.

    “हे पैसे आईच्या खात्यावर होते.. साडेतीन लाख हायत.. अन् हे”, त्यांनी दुसरं पाकीट काढलं अन् म्हणाले, “पिंकीच्या नावावर एफडी केलेली एक आईनं .. तुझा हक्क हाय पोरा याव..” माझी नजर चुकवत ते बोलू लागले.

    “काका”, मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो,

    “एका क्षणात परकं केलं तुम्हीं तर.. ठेवा ते तुमच्याजवळ.. मला नाही गरज त्याची.. त्याच्यावर फक्त तुमचा हक्क आहे.’

    “असं कसं..?”

    “असंच.. मी नसतो तर ते तुम्हालाच मिळणार होत ना..?”

    “पण..”

    “नाही काका.. मी त्यासाठी आलो नाही.. त्यासाठी देवाने मला इथं पाठवलं नाही.. हे पैसे तुमचे आहेत.. यावर तुमचा हक्क आहे.. ते तुमच्याजवळच ठेवा..”

    “पोरा तुला आता पैशाची किंमत नसंल.. ठेव, तुझ्या भवितव्यासाठी कामाला येतील.. पुढं मागं उपयोगी येतील..”

    “नाही काका. मला पैशाची किंमत आहे. ते कसे कमवायचे तेही मला माहीत आहे. तेवढी हिंमत या मनगटात आहे.. कोटींची संपत्ती लाथाडून आलोय मी.. मला पैशापेक्षा जास्त माणसं महत्वाची आहेत. आयुष्यात काय उपयोगी पडतं याची शिकवण मिळावी हाच त्याचा हेतू होता. हेच त्यांचं उद्दिष्ट होतं.. मला आता कळून चुकलय.. त्याचा संकेत मला कळालाय..”

    मी तसाच उठलो अन् बाहेर पडलो. संतोष काका एकटक माझ्याकडे पाहत होता. सरळ जाऊन त्या वृद्ध बाई समोर उभा राहिलो. तिला उठण्यासाठी हात दिला. तिला हळूहळू घरात घेऊन आलो. तिला खाली बसवलं. एका ताटात चतकोर भाकरी गरम दुधात कुस्करली अन् तिला खायला दिलं.

हे देखील वाचा :

    “एवढं सोप्प नाही पोरा..”

    “तुमच्यासाठीही सोप्प नव्हतं काका.. आज्जीसाठी सोप्प नव्हतं.. आपला हेतू चांगला असेल तर तो सर्व निभावून घेतो.. तो मार्ग दाखवतो.. हा मार्ग त्यानेच दाखवलाय..”

    “नुसतं नात्याने कोणी आपलं होत नसतं.. ज्यांच कोणी नसतं त्यांना आपलं करायचं असतं.. आपली म्हणवणारी माणसं ही अशी कमवावी लागतात.. ती सहजासहजी मिळत नसतात..”

    संतोष काका एकटक माझ्याकडे पाहतच होता.

    माझी नजर त्या वृध्द बाईवर स्थिरावली होती. ती एक एक घास हळूहळू खाण्यात मग्न होती.

समाप्त

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

   नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment