मरणाची घाई

    घाई असावी म्हणजे किती घाई असावी. एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी आपण घाई करतो. पण एखाद्याला स्मशानात पोचविण्याची घाई म्हणजे कसली घाई म्हणायची ही. मरणाची घाई का जाळण्याची घाई ?

Marnachi Ghai is the image of a man standing in the river and dropping something in the river.

“मरणाची घाई”

    विमला काकी म्हणजे माझी चुलत चुलत काकी ( सख्खी नाही ). जेमतेम बत्तीस वर्षांची. काकाचं आणि तिचं लवकरच लग्न झालं होत. तेव्हा काका पंचवीसचा अन् काकी अठराची. लग्नाचा संसार तरी चौदा वर्षांचा. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर पिंट्या जन्मला.

    काकी उंचीन मध्यम बांध्याची पण दिसायला सुंदर. अगदी गोरी गोमटी. पांढऱ्या जास्वंदासारखी. तब्येतीनं चांगली धडधाकट. आवाज अगदी नाजूक कोकीळेसारखा पण भांडताना मात्र गिरणीचा पट्टाच.

    काका त्यामानाने अंगाने काटकच. उंचीला चांगला ताडासारखा उंच. काकाच्या सुरवातीच्या दिवसात म्हणे तो काकीला शोभून दिसायचा नाही. पण आता पाहिलं तर परिस्थिती नेमकी उलटी.

    आता काकीच काकाला शोभून दिसेना अशी गत. ( लाईफ इज अ सर्कल )

    काकाचं सायकल पंक्चरच दुकान. दिवसाला आठ दहा मोटर सायकली पंक्चर करणार म्हणजे करणारच. ( होय पंक्चरच ) त्याशिवाय धंदा व्हायचा नाही. खरं काका मेहनती फार. सतत कुठल्या ना कुठल्या दौऱ्यावर असायचा. कधी तरी कडकी असायची पण काकीच्या रोजंदारीवरच्या कमाईवर सर्व निभवून जायचं.

    सोबत हमखास शंभू तात्या. काकाचा सोबती. ( लंगोटी यार ) काकी म्हणायची, “शंभू म्हणजे माझी सवतच. बायको संग न्हाई पण मित्राबर जग फिरून येणार.” काका कधी कधी हसण्यावारी न्यायचा. तसा तो ही शातीर.

    कधी म्हेवणी गावी आली की तो ही म्हणायचा, “रेखा विमलीबर लगीन करुन घाईच केली म्या. तुझ्यासाठी जरा थांबाय पायजे हुतं.”

    काकीचा चेहरा मग लालभडक व्हायचा. काका काय मग लवकर घरात यायचाच नाही. यायचा तो सरळ मोगऱ्याचा गजरा घेवूनच. काकी मग गुलाबासारखी लाल लाल व्हायची. तसं दोंघाच्यात प्रेमही फार होत. असं काहीसं हसरं खेळतं वातावरण होतं.

हे देखील वाचा :

    माझं जास्त गावात येणं जाणं व्हायचं नाही. काकी राहायला जुन्या गावात. आमचं घर नव्या गावात. अंतर जेमतेम दोन किलोमीटरचं. माझं कधीतरीच जुन्या गावात जाणं येणं. त्यात इंजिनिअरिंगला इस्लामपुरात असल्यानं माझं राहणं हॉस्टेलवरच. त्यामुळं गावात फारच कमी येणंजाणं.

    मागच्या यात्रेला गावात गेलो होतो तेव्हा तिला पाहिलं होतं. तिला पाहून धक्काच बसला. एकदम हाडकुळी झाली होती. हीच आमची विमला काकी यावर विश्र्वास बसत नव्हता.

    मी पाहतो आहे तेव्हापासून काकी अंगान चांगली जाडजूड. तिला कधी आजार म्हणून कुठला नाही.. साधं सर्दी पडसंही काकीपासून चार हात लांब.

    तिला असं पाहून मी तर चक्रावलोच. चौकशी केल्यावर कळालं की सतत आजारी असते. काहीं ना काहीं होतच असतं.

    मला फार वाईट वाटलं. काकी चांगली होती. मनमिळावू होती. कधी गावात गेलो की मन भरून बोलायची. चौकशी करायची. काही ना काही खायला करायचीच. काका सारखी नव्हती. ( चेंगाट )

    काकाला एकदा गावातला डॉक्टर सोडून चांगल्या दवाखान्यात दाखव असं मी म्हणालो होतो.

    “तिला काय होतंय, एका गोळीत ती बरी होत्या.” कोणी विचारेल त्याला काका इतकंच म्हणत होता.

    आजाराच निदान कधी झालंच नाहीं. अन् एके दिवशी आजार बळवला अन् काकी गेली.

हे देखील वाचा :

    मी तेव्हा कॉलेजवर होतो. त्या दिवशी माझी युनिट टेस्ट होती. मला चांगलंच आठवतंय, बॅग बाहेर ठेवायला म्हणून बाहेर गेलो तेवढ्यात बहिणीचा फोन आला, “भावड्या अरे काकी गेली.”

    मी ऐकून सुन्न झालो. काय करावं ते कळेना. काकीचा चेहरा नजरेसमोर येऊ लागला. आता पाच मिनिटांत तर युनिट टेस्ट सुरु होणार होती. नाही म्हटलं तरी पुढचे दोन तास इथेच जाणार होते. त्यात मला लवकर सांगून पण मी गेलो नाही तर ते बरं दिसल नसतं. ( खरं तर युनिटला हजर राहण्यापेक्षा मयताला हजेरी लावण जास्त महत्वाचं होतं – “लोक काय म्हणतील याची भीती” )

    मी युनिट टेस्टचा विचार सोडला. ( तसा ही अभ्यास काहीच केला नव्हता म्हणा ) एवढं कोणी विचारणारं नव्हतं. सध्याच्या घडीला काकी महत्वाची होती. तिचं अंतिम दर्शन घेणं महत्वाचं होतं.

    मी मित्राची गाडी घेतली अन् सरळ घर गाठलं. मोजून पाऊण तासात मी जुन्या गावात होतो. जाऊन बघतो तर सगळं उरकून झालं होत. एक माणूस कोण गल्लीत उभा दिसत नव्हता. मी चकीत झालो.

    इतक्या जलद कोणाचा अंतिम विधी झाल्याचं माझ्या पाहण्यात नव्हतं. ऐकण्यात नव्हतं. माझ्या अठरा वर्षांच्या आयुष्यात असं कधी झालं नव्हतं.

    मी पुन्हा दिदीला विचारून मस्करी करत नसल्याची खात्री केली. तिचा चिडका चेहरा आपसूक माझ्या नजरेसमोर आला. मी फोन तसाच ठेवला.

    गाडी गल्लीतच एका बाजूला लावली. सगळया गल्लीत पाणी पाणी झालं होतं. बायका घरा समोरचा रस्ता धुवून निवांत झालेल्या. मला अजूनही विश्र्वास बसत नव्हता.

    इतकी चपळता मी अठरा वर्षात कधीच पाहिली नव्हती. काकाच्या घरासमोर आलो. घर रिकामं रिकामं वाटत होतं. काही बायका आतल्या खोलीत होत्या. मला आमची दीदी तेवढी नजरेस आली.

    काका बाहेर सोप्यातच बसला होता. एकटाच.

    मला पाहून त्यानं रडवेला चेहरा केला. मी जाऊन काकाच्या गळ्यात पडलो. मला आलेलं पाहून गल्लीतली दोघंचौघ येऊन बसलीत. शंभू तात्याही होताच.

    काका जरा स्थिर झाल्यावर मी चौकशी केली.

    “अचानक.”

    “व्हय न्हवं का. रातच्याला म्हटली काय बरं वाटंना. म्हटलं सकाळ पारी जाऊ चव्हाणाच्यात.. परसाकडनं आलो अन् जाऊ या म्हटलं.. गाडी काढतोय न्हव का मी.. तवर ती पडलीच खाली.. खाली पडली ती..”

    “सपलीच जाग्याव..” शंभु तात्यानं नाक अन् तोंड एक करुन सांगितलं. काकाचं वाक्य त्यानं पूर्ण केलं. मी त्याच्याकडं बघतच राहीलो.

    डॉक्टर काय म्हणाले.

    “दवाखान्यात कुठं नेली तवा..”

    “काय..?” माझ्या चक्कीत जाळ झाला.

    “जाग्यावच सपली रं ती.. कशाला न्यायची मग..” शंभू तात्या पुन्हा डोळे मिचकावून तोंड वाकडं करुन बोलला.

    काका शांतच होता. तो बोलायलाच मागे ना.

    “तरी पण काका एकदा बघायचं होत ना नेऊन.. काय झालेलं त्यांचं निदान तर कळालं असत..”

    “अटॅक रं..” शंभू तात्या.

    मी तात्याकडं नजर फिरवली. तात्या बोलू लागला.

हे देखील वाचा :

    “इष्ण्या कसा गेला तसंच झालं म्हणायचं ही. अटॅक आल्यावर माणूस जगतंय व्हय.. बरं झालं दवाखान्यात नाय नेली ती. उगा जा जा ये ये..” ( डॉक्टर उगाच असतात नाही का )

    मी बघतच होतो. मला वयाचा मान ठेवून जास्त बोलता येत नव्हत. (काका ही तसा शांतच होता. तोच बोलत नाही तर आपण काय बोलणार)

    काही वेळ शांतच बसलो. कोणी काही बोललं नाही मग. काही वेळ बसून मी नंतर काकाचा निरोप घेतला.

    निघताना एकच विचार मनात येत होता. यांना इतकी कसली घाई होती. काही जरी झालं तरी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने एक गोळी सुद्धा खात नाही. अन् इथं यांनी सरळ एका व्यक्तीला स्मशानात नेलं होतं.

    तिला काय झालं, ती कशानं मेली हे सर्व स्वतःच ठरवून तिला अग्नीच्या स्वाधीन केलं होतं.

    बर असं कोणी वारलं तर आपण नातेवाईकांना कळवतो. किमान आई-वडील-भाऊ-बहीण असतील तर त्यांना अंतिम दर्शन मिळावं म्हणून वाट पाहतो.

    पण इथं नेमकं सर्व उल्ट झालं होतं. काकीची बातमी कळाली तेव्हा तिला जाऊन दहाच मिनिटे झाली होतीत. मला घरी पोहचायला साधारण एक तास लागला असता. तरी मी पाऊण तासात पोहोचलो होतो.

    मी हाच विचार करत होतो की, इतक्या जलद अंतिम कार्य कसं काय होऊ शकत. इतकी मरणाची घाई नेमकी कोणाला होती. ( त्याची गरजच काय होती )

    “हे देवा ऽ..” मला तर काहीच कळत नव्हत.

    कार्य होईपर्यंत गावात येत जात होतो. खरं सांगायचं तर काकाला एवढं दुःख झालंय असं मला तरी मनापासून वाटत नव्हतं.

    काळ त्याच्या गतीने पुढे सरकला. बघता बघता काकीला जाऊन सहा महिने झाले.

    दुसऱ्या सेमीस्टरची युनिट टेस्ट आली होती. वर्गातच बसलो होतो. पुन्हा दीदीचा फोन आला.

    मला देजा वू चा साक्षात्कार झाला. सारखीच वेळ. युनिट टेस्ट. दिदीचा फोन. पुन्हा वाईट बातमी मिळतेय की काय. मी घाबरत घाबरतच फोन उचलला.

    “बोल की दिदे..”

    “भावड्या अरे काका..”

    “काय झालं..?” ( होय माझ्या मनातही तेच आलं )

    “काकानं अरे लग्न केलं.”

    “काय..?” ( माझ्या चक्कित पुन्हा जाळ )

    “होय अरे.”

    “कधी..?”

    “कधी केलंय कुणास ठाऊक अरे. कुणालाच सांगितलं नाय का काय नाय.”

    “पप्पा कुठायत..?”

    “गावात गेल्यात दोघं पण..”

    “कुणी सांगितलं कुणी..?”

    “कमळा आज्जी आलती सांगत म्हणत होती, “काकीची भन करून आणल्या विलश्यान. शंभ्या बर कवा गेला अन् तिला घिवूनच आला.”

    “खरंच काय..?”

    “होय अरे.. बघ की.. अजून वर्ष पण झालं नाय आणि..”

    मी गालात हसत होतो. माझ्या मनात भलतेच विचार येत होते. ( होय तेच विचार )

    “बर दीदे मी करतो तुला फोन.. वर्गात आहे मी आता..”

    “बर बर.. ठेवते.. काळजी घे.. नाश्ता केलायस ना..?”

    “होय होय.. बोलू परत चल..”

हे देखील वाचा :

    फोन कट झाला. माझं विचारचक्र सुरू झालं. टेस्ट मधले प्रश्न सुटत नव्हते पण मनात सुरु असलेले प्रश्न हळूहळू सुटत होते.

    वर्षभर काकीन आजार अंगावर काढला. काकान ही लक्ष दिलं नाही. ( का ते आता कळत होतं )

    एकाएकी ती गेली असं काका म्हणतो पण तीचं हे जाणं असं एकाएकी नव्हतं. ( घडवून आणलं होतं )

    काय खरं काय खोटं हे देवालाच माहीत होत. पण जो तो आता हेच बोलत होता. “विलश्यानच, “ ”. ( नाही मी नाही बोलू शकत )

    “विलश्यान मुद्दाम लक्ष नाही दिलं.. सारखं आपलं ही गोळी खा बरी हुत्यास, ती गोळी खा बरी हुत्यास..”

    एकदा चांगल्या दवाखान्यात जाऊन इलाज केला असता तर कदाचित काकी बरी झाली असती. ( कदाचित त्याला हेच नको होत )

    मला आता नेमकं हेच कळत नव्हत की,

    “मरणाची घाई नेमकी कोणाला होती.”

    तुम्हाला कळालं तर फक्त मलाच सांगा. (कमेंट करुन)

समाप्त

( चॅनल जॉईन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच नाव किंवा नंबर ऍडमिनला किंवा इतर सभासदांना दिसत नाही. )

कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

    नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment