अधुरी कहानी – भाग १३
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“अधुरी कहानी – प्रेम की यातना”
थंडीमुळे कुडकुडणाऱ्या अंगाला घासून घासून उबदार करण्याचा तो प्रयत्न करत होता. आपली ओली कपडे त्याने चांगली पिळून दगडावर वाळत घातली होती. तीच थोडीफार सुकण्याची तो वाट पाहत होता. रागा रागातच अनिकाच्या नावाने एक एक दगड पाण्यात दूरवर फेकत होता.
अनिका एवढं धाडस करू शकेल याची त्याला कल्पना नव्हती. तो स्वतः चकित होता. आजच्या दिवसभरात घडलेल्या अनपेक्षित घटना वेगाने त्याच्या नजरेसमोरून जाऊ लागल्या. आपण काय करायला निघालेलो अन् आपल्या सोबत काय काय घडलं याचा त्याला ताळमेळ बसत नव्हता. आयुष्यात आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याला ओळखीचा झटका दिला होता. याचा नेमका काय अर्थ घ्यावा हेच त्याच्या लक्षात येत नव्हतं.
“दुनिया खरंच गोल हाय.. आज जाणवलं..” तो स्वतःशीच पुटपुटला.
प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला मोबाईल त्यांन बाहेर काढला.
“जी खराब हुईल असं वाटलं ते तेवढं वाचलं.. नशीब इथं तरी साथ हाय देवाची.”
मोबाईलची बॅटरी शेवटच्या घटका मोजत होती.. मोबाईलवर आलेला मेसेज त्याने ओपन केला.
“कॅन्सल.”
मेसेज येऊन बराच वेळ झाला होता. त्यानं रागातच एक दगड पाण्यात फेकला.. दोन्हीकडून त्याला निराशा मिळालेली.. अचानक प्लॅन कॅन्सल का केला हे त्याला कळत नव्हतं. दिवसभरात त्याला जरा सुद्धा आपण काय करायला निघालेलो या गोष्टीची आठवण झाली नव्हती. अनिकाकडे तो इतका आकर्षित झालेला की त्याला आपण सेक्स प्लॅन केलाय याची सुद्धा जाणीव नव्हती. अनोळख्या व्यक्ती सोबत संबंध जोडण्यापेक्षा प्रेम होऊ घातलेल्या व्यक्तीसोबत संबंध जोडू असाच त्याचा विचार होता. त्याने स्वतःहून कोणतीही कल्पना तिला दिली नव्हती अन् त्याची त्याला गरजही नव्हती. कारण संबंध जोडणारी व्यक्ती अनोळखी होती.
खरं आता त्याच व्यक्तीने स्वतःहून कॅन्सल म्हणून पाठवलेला मेसेज त्याला टोचत होता.
“बिस्किट पिन गेलं अन् कॅडबरी पिन गेली..” तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने एकदा पुन्हा आपल्या कपड्यांवर नजर फिरवली अन् घरी जाण्याची तयारी करू लागला.. आवरता आवरता मोबाईल पुन्हा वाजला. त्याने मेसेज ओपन केला.
“लेट्स सेक्स..”
तो काही क्षण गोंधळात पडला. नेमका काय विचार त्या मुलीच्या डोक्यात सुरू आहे याचा तो विचार करू लागला. तिचा विचार पुन्हा बदलायच्या आत तिला रिप्लाय देऊ या भावनेने त्याने सर्व विचार झटकले अन् लगेचच “ओके” म्हणून रिप्लाय दिला. मोबाईलने अंतिम श्वास घेतला मेसेज गेला की नाही या विवंचनेतच तो राहिला..
“एक काम कर.. दगड घे अन् घाल डोक्यात.. मारून टाक एकदाचं.”
“खरं सांग.. तू का आलास माझ्यापाठी..?”
“जीव घ्यायला तुझा..”
“तुला माझा पत्ता कसा मिळाला..?”
“तुझ्या भुताने ईऊन दिला..”
“काय केलंस त्याच्यासोबत..?”
“गळा आवळून मारलं.. काय करायचं ते कर जा..”
अनिका भांबवलेल्या नजरेनेच पाहू लागली. तो नुसताच कण्हत होता. तिने उठून पुन्हा चादर स्वतःभोवती आवळली. तिच्या पायातली पॅन्ट त्याच्या अंगावर फेकली. त्याने तिची नजर चुकवतच आपली पॅन्ट घातली.
पाण्याची बॉटल तिने त्याच्या अंगावर फेकली. त्याने रागात बघतच पाणी पिलं.
“खरंच मारलंस त्याला. मला पण मारशील ना आता..?”
“ए बाई.. मी काय खुनी न्हाय.. दिसंल त्याला मारत सुटायला.. जरा भानावर ये.. लय योगायोग करालतीस नव्ह.. बघ जरा डोळं उघडून..”
“खोटं बोलतोयस तू..?”
“समज तुला काय समजायचं ते..” तसा तो पुन्हा कन्हू लागला.
अनिका शांतच बसून राहिली. तिला काय झालंय, काय होतंय तेच कळेना. तिने मोबाईल घेऊन अमृताला फोन लावला.
“आम्रे नाव काय होतं त्या मुलाचं..?”
“काय..?”
“नाव..”
“काय झालं दिदे..?”
“काही नाही.. परत सांगते.. मला आधी नाव सांग..”
“अनिकेत.. खरं झालं काय..?”
“मला सांगितलं का नाहीस..?”
अमृता हसली अन् म्हणाली, “दीदे तुला नाव सुदिक जाणून घ्यायचं नव्हतं.. आटिव जरा.. काय झालं सांग की..?”
“सांगते येऊन.. ठीक आहे मी.. बाय..” तिने अनिकेतकडे बघतच फोन खाली ठेवला.
“झाला आत्मा शांत.. पटली खात्री.. मी कोणाला माराय न्हाय.. मी तुझा पाठलाग करायला न्हाय.. आपण दोघं भेटणार व्हतो इथंच.. खरं पयली भेट घडली एसटीत अन् सगळं बिघडलं.. कळतंय का..?” अनिकेत हात वारे करत सांगू लागला.
“तुला तरी माझं नाव माहित होतं का नव्हतं..?”
“गरज नव्हती मला तुझ्या नावाची.. मला फक्त एक शरीर पायजे व्हतं.. अन् तुला बी तेच पायजे हुतं म्हणून आपण भेटणार व्हतो..”
“अन् अगोदर मी जेव्हा तुझा अपमान केला तेव्हा पण..?”
“चूक झाली माझी तुला फोन करून.. कुठनं माती खाल्ली अन् तुला फोन केला. जिनं हैराण केलतंस तवापासून..”
“म्हणजे तुला पण काहीच माहित नव्हतं..?”
“आता कुठल्या भाषेत सांगालोय.. हे बघ बाई तुला जसा झटका बसला तसा मला बी बसलाय.. डोकं काम करायचं बंद झालंय.. त्यात तू डोक्यात फुलदानी घातलीस.. काही वेळापूर्वी पुलावरून ढकललंस मला.. अन् मला खुनी म्हणत्यास.. तू खुनी हायस..”
अनिका शांतच झाली. ती शांत नजरेनेच त्याच्याकडे पाहू लागली. त्या दिवसापासून आतापर्यंतच्या सर्व घटना तिच्या डोळ्यासमोरून दौडू लागल्या. गोल गोल फिरून ती पुन्हा त्याच ठिकाणी आलेली. तिचे डोळे पाण्याने डबडबले अन् ती रडूच लागली.
तिला रडताना पाहून अनिकेत तिच्याकडे स्थिर नजरेने पाहू लागला. त्यालाही आता कुठे तिच्या मनस्थितीची जाणीव होऊ लागली. तिला हमसून हमसून रडताना पाहून त्यालाही वाईट वाटू लागलं. तो डोकं धरतच उठला अन् तिच्याजवळ जाऊन बसला. तिला आणखीच रडू कोसळलं..
“बघ वाईट नको मानू. आता जी झालं ती झालं. आपण जाणून-बुजून न्हाय केलं. तुला बी गरज हुती.. मला बी गरज हुती. मी कुणाला काय बोलणार न्हाय. मला माहित हाय तुला माझ्याबर करून बरं वाटलं नसंल. खरं आता काय बी होऊ शकत न्हाय. मी फकस्त तुला विश्वास देऊ शकतो. मी कुठं याची वाच्चता करणार न्हाय..”
तिने नकारार्थीच मान डोलवली..
“मी मुद्दाम तुझा अपमान केला नव्हता. मी तुला शिव्या घातल्या नव्हत्या.” ती रडत रडतच बोलू लागली.
“माझ्या आज्जीने तुझा नंबर दिला. मी नंतर पुन्हा फोन केलेला. खरंच. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती..”
“असू दे आता..”
अनिकेत शांत चित्ताने तिचं सर्व ऐकत होता. तिला शांत करत तो म्हणाला, “अनिका गप नको रडूस. बास आता. मला पटालंय तुझं. विश्वास हाय तुझ्यावर. आता मला माफ कर. मी तुझ्या संगट असं वागायला न्हाय पाहिजे व्हतं. खरं मला बी लय राग आल्ता. मला बी माफ कर. गप आता..”
ती शांत झाली. दोन्ही हाताने तिने डोळे पुसले..
“तुझ्या लक्षात येत नाही अनिकेत त्याने आपल्याला केव्हाच जवळ आणलं होतं पण आपल्याला ते कळालं नव्हतं. आज त्यानेच आपली पुन्हा अपघाताने भेट जुळवून दिलीय. आता तरी आपल्याला कळायला हवं..”
अनिकेतने नकारार्थी मान डोलावली.
“तुला समजलं न्हाय असं समज अन् समदं ईसर. तु जो ईचार करालीस ती शक्य न्हाय..”
“का..?”
त्याने पुन्हा नकारार्थीच मान डोलावली. तिने त्याचा हात खाली खेचत त्याला पुन्हा खाली बसवलं.. “का सांग आधी..?”
“तुला पण चांगलंच माहित हाय नको असं वागू..”
“मला नाही माहित तू कशाबद्दल बोलतोयस अन् मला आता नाही जाणून घ्यायचं.. मला आता इतकंच माहिती आहे की मी आज एका अनिकेत वर प्रेम केलंय.” तिने डोळे पाण्याने भरले. “अन् मला आता माझं संपूर्ण आयुष्य याच अनिकेत सोबत घालवायचंय.”
त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली. “अनिका हे न्हाय व्हणार शक्य. नको सपनात जगूस. बघ जरा तू कुठं हायस अन् मी कुठाय. लय फरक हाय आपल्यात. भानावर ये.”
“बघ मला तू आवडल्यालीस.. माझं बी तुझ्यावं प्रेम जडलं.. खरं आपण एक होऊ शकत न्हाय म्हणूनच त्यानं आपल्याला पुन्हा वेगळं केलं.. शुद्धीत ये जरा अन् बघ.. आपल्यात जी झालं ती अनोळखी म्हणून झालं..”
“कालच सर्व विसरून जा अनिकेत.. अपमान, मार सर्वच्या सर्व.. मी सुध्दा विसरते.. आता पूर्ण शुद्धीत आली आहे मी अनिकेत. तुलाच अजून कळत नाहीये. तुला काय वाटतं मला फरक दिसत नाही तुझ्यात आणि माझ्यात. आतापर्यंत हाच फरक मी खूप जणांत बघितला. म्हणूनच मी अशी राहिली आहे. पण मला आता चांगलंच कळून चुकलंय. तुला पण ते कळतंय पण तू नाकारतोयस.”
“कारण मला वास्तवाची जाण हाय. पुढे जाऊन कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागंल याची मला कल्पना हाय. म्हणून मी नाकारालोय.”
“असं काय होणार आहे सांग मला..?”
तो शांतच राहिला.
“घाबरतोयस तू स्वतःच्या कमीपणाला घेऊन. लाज वाटतेय तुला.. मी चांगल्या शिकलेल्या घरची.. तू अशिक्षित गरिबीत जगलेला.. मला लाखोंचा पगार अन् तू.. कधीही नोकरी जाईल अशी तुझी अवस्था.. घाबरतोयस तू लोकांच्या टोमण्यांना..”
“असं समज हवं तर.”
अनिकाने त्याला जोरात आपल्याजवळ ओढलं अन् त्याच्या चेहऱ्याला धरत ओठावर ओठ टेकवले. दीर्घ चुंबन घेऊन त्याला तसंच मागे ढकललं..
“अनिकेत टोमणे मी पण खाल्लेत माझ्या प्रेमा वरून.. लाज माझी सुद्धा निघाली आहे माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन.. कुठल्या लोकांचा विचार करतोयस तू.. कोणाला घाबरतोयस..”
“तू जसा आहेस तसं मी तुला स्वीकारायला तयार आहे. मला नाही दिसत तुझी गरिबी.. तुझं शिक्षण.. तुझी जमीन.. तुझी जात.. तुझा रंग.. मला फक्त अनिकेत दिसतोय ज्याच्यावर मी आज मनापासून प्रेम केलंय.. तो अनिकेत जो मला खळखळून हसवतोय.. तो अनिकेत जो माझी मस्करी उडवतोय.. तो अनिकेत जो माझ्याशी मन भरून बोलतोय.. तो अनिकेत जो मला नाचवतोय.. तो अनिकेत जो माझ्यासाठी भांडायला तयार होतोय.. तो अनिकेत ज्याच्याकडे मी आकर्षित झाले.. मला फक्त तोच अनिकेत दिसतोय.. अन् मला आता त्याच्यासोबत जगायचंय मरेपर्यंत..” अनिका एका श्वासात सगळं बोलून गेली..
“तू आहेस तयार एका शिकलेल्या मुली सोबत लग्न करायला.. एका पैसेवाल्या, जातीत नसलेल्या मुलीशी लग्न करायला.. आहेस तयार ज्या मुलीने फक्त तुझ्या स्वभावावर प्रेम केलं त्या मुलीशी लग्न करायला.. आहेस तयार ज्या मुलीने कधी सायकल चालवण्याचं धाडस केलं नाही, त्या मुलीने तुला पुलावरून ढकलण्याचं धाडस केलं अशा वेड्या मुली सोबत लग्न करायला.. आहेस तयार ज्या मुलीने तुझा अपमान केला, तुला शिव्या घातल्या.. तीच मुलगी आज तुझ्या प्रेमात वेडी झालीये.. करशील तिला आपलंसं.. ज्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, किती जणांबरोबर झोपली असेल म्हणून जिला हिणवलं गेलं.. एका वेश्ये सोबत जिची तुलना केली त्या मुली सोबत लग्न करायला आहेस तयार.. एक मुलगी जिच्यावर तू सुद्धा खूप प्रेम करतोयस.. तिच्याशी लग्न करायचं आहे.. आहे तुझ्यात हिंमत.. बोल..” ती त्याच्या नजरेला नजर देत बोलत राहिली..
अनिकेत तिच्याकडे गोंधळलेल्या मनस्थितीत पाहू लागला. तिच्या डोळ्यात डोळे घालून वास्तवतेला स्वीकारण्याचं धाडस शोधू लागला. तिच्या पाणावलेल्या डोळ्यात प्रश्नाची उत्तरं शोधण्यात गुंग होऊन गेला. तिचं निरीक्षण करता करता त्याची नजर तिने शरीराभोवती गुंडाळलेल्या चादरीवरच खिळून राहिली..
अधुरी कहानी – भाग १४
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!