अधुरी कहानी – भाग १२

“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

“अधुरी कहानी – जुनी जखम”

 

    एसटी डेपोतून मागे वळत बाहेर पडणारी एसटी त्यांनी धावत पळत पकडली. दोघेही उजवीकडच्या दुसऱ्या सीटवरच बसले. अनिकेतने नवीनच घेतलेली पाण्याची बाटली बॅगेतून काढली अन् एका दमात पाणी प्यायला.
 

    “तहान भागली नाही वाटतं अजून..?”

    त्याने हसूनच मानेने नकार दिला.. दोघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडले अन् तिने त्याच्या खांद्यावर मान टाकली. त्याच्या जीन्स वरती बोटाने काही तरी लिहू लागली अन् एक भुवई वर करून त्याला “ओळख काय लिहिलंय” असं विचारू लागली.

    त्याने काही न कळाल्यासारखं ओठ पाडले. तिने त्याच हाताने त्याला चिमटा घेतला..

    “दावतो तुला चल” असं तो म्हणताच ती लाजली. लाजत लाजतच ती खिडकितून बाहेर पाहू लागली. कशाची तरी आठवण होताच ती क्षणभर विचारात गेली. “गरज नाही आता त्याची” ती मनातच बोलून गेली. लगेचच तिने खिशातून आपला मोबाईल काढला अन् त्याला “कॅन्सल” असा मेसेज पाठवला. मेसेज गेला नाही. ती मोबाईल वर-खाली करू लागली.

    “काय झालं..?”

    “काही नाही रेंज नाही वाटतं. तुला आहे..?”

    “फुल्ल..” तसा तो गालातच हसू लागला.

    ती तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसू लागली.

    “मोबाईलला म्हणते मी..”

    “व्हय काय.. मला वाटलं..”

    “काय वाटलं..?” तिने त्याच्या पोटाला चिमटा काढत विचारलं..

    “काय नाय..”

    “तुझा मोबाईल दे की जरा..” तशी ती त्याचे खिसे तपासू लागली.

    “तुझ्याकडे मोबाईल नाही..?”
 

    “हाय की.”

    “कुठे आहे मग..?”

    “बंद करून ठिवलाय.. पिशवीत..”

    “का..?”

    “उगाच पावसापाण्याचं भिजाय नको.”

    तशी ती हसू लागली.

    “का.. आणि कुणाचा फोन आला तर..?”

    “मला कुणाचं फोन येणार.. आणि तसं पिन आजच्या दिस मी मोबाईल बंदच ठेवायचं ठरवलंय..”

    ती हसतच त्याच्याकडे बघू लागली.

    “का खरं.. आणि काय इमरजन्सी आली तर..?”

    “माझ्यापेक्षा महत्वाचं काय नाय आज.. आजचा दिस माझा..”

    “होय काय.. आणि मी पण महत्त्वाची नाही काय आज..?”

    “आत्ता फकस्त तुच महत्त्वाची..” तशी ती लाजली..

    “आज कुणाला फोन नको.. कुणी भेटाय नको.. आणि काय नको.. मुद्दामच बंद केलाय.. आणणार पिन नव्हतो.. खरं भाव म्हटला, अडी अडचणीला गरज पडंल वाटल्यास बंद करून ठिव खरं फोन सोबत ने.. मग बंद करूनच ठिवला.. आज फकस्त मी आणि तू.. बाकी समदे गेले तेल लावत..” तो नटखटी हास्यात बोलून गेला.

    तशी ती ही क्षणभर त्याच्याकडे हसत पाहू लागली अन् मान हलवू लागली.. “आज मला पण कुणाचा डिस्टर्ब नको..” तसं म्हणत तिने आपला मोबाईल बंद करूनच बॅगेत टाकला. अन् आपल्या वाक्यावर जोर देतच म्हणाली, “सगळे गेले तेल लावत.” तसा तोही हसला. तिने लगेच त्याच्या पोटाला पुन्हा चिमटा घेतला.

    “आई गं ऽ.. दावतो तुला.. जरा कड काढ”

    तशी ती हसत हसतच खिडकीतून बाहेर डोकाऊ लागली. अचानक घाटातली गर्दी पाहून दोघेही बावरले. एसटी थांबली अन् जो तो बाहेर बघू लागला.

    “काय तरी झालंय वाटतं.”

    “व्हय वाटतं..” त्यांन बाहेर बघत आवाज दिला. “भावड्या, काय भानगड..?”

    “गाडी पडल्या खाली.. ॲक्सिडंट झालांय..” गाडीवरच्या तरूण मुलानं ओरडून सांगितलं.

    “कोण हाय..?”

    “काय की.. कोण हाय काय कळंना.. एर्टिका चेमाटल्या पार.. भुगा झालाय पार डोस्क्याचा..” तसा तो पुन्हा जागेवर बसला..

    “आता..” ती जरा चिंतेत गेल्यासारखीच झाली..

    “तू का घाबरलीस.. तुला काय झालं..?”

    “बघ ना.. कोण असेल..?”

    “असंल कोण तर.. पिऊन-बिऊन गाडी चालवत असंल.. घाटात कशाला आय घालाय जीवाशी खेळायचं..” तो मान हलवतच म्हणाला.

    ती तशीच चिंतेने बाहेर पाहू लागली. हळूहळू रस्ता रिकामा झाला अन् एसटी धावू लागली.

    एक दोन गावं मागे गेलीत तशी गाडी हळूहळू भरू लागली. दोघेही एैसपैस बसले.

    “आता कुठलं टेन्शन न्हाय ना..?” त्यानं हळूच विचारलं.

    तिने हसतच डोळ्यांनी उत्तर दिलं. “सांगितलं नाहीस मला अजून..?”

    “काय नाय त्यांच्या कर्मानच त्यांनी मार खाल्ला.. मी फक्त त्यास्नी जरा चुचकावलं एवढंच..”

    “नक्की केलंस तरी काय..?”

    अनिकेत जरा गोंधळलाच. आता नेमकं काय सांगायचं म्हणून विचारात गेला अन् म्हणाला,

    “काय नाय पावडरीची पुडी दावली त्याला.. त्येला कळलं काय हाय ती..”

    “ड्रग्स..” तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

    “व्हय.”

    “पटलं त्यांना..?”

    “तुझ्यासमोरच झालं समदं.”

    “कसं काय खरं.. त्याला शंका नाही आली.. त्याने चेक कसं केलं नाही..?”

    अनिकेत शांततेनेच तिच्याकडे पाहू लागला अन् क्षणभर विचार करून म्हणाला,

    “पोरींना जसं पोरींच कळतं तसंच पोरांना पोरांच कळत..” अनिकाने भुवई नाचवत त्याचं कौतुक केलं.

    “पैलवान हुशार आहे म्हणायचा.”

    “कोल्हापूरचाय..” त्यानं भारदस्त आवाजात उत्तर दिलं.
 

    तिने त्याची पाठ थोपाटली.

    “मग ते त्या बाईकडे का गेलते..?”

    “हौशी पोरं मला विचारत व्हते. बाई मिळंल का म्हणून. असंच कुणाकडं तरी ब्वॉट दावायच म्हणून तिच्याकड दावलं अन् ती घावलीत. करा म्हणाव हवस पुरी आता..”

    तशी ती मंद स्मित करू लागली.

    “अनिकेत थँक्यू व्हेरी मच. डोक्यावरचा, मनावरचा संपूर्ण तणाव निघून गेला. वाटलं नव्हतं असं काय होईल ते.”

    “चालायचं.. आता मैतरीण म्हटल्याव एवढं तर कराय लागतंय..”

    “मैत्रीण.. नुसती मैत्रीण..?”

    “आतापातुर तर मैतरीणच.. पुढ बघू आता..?”

    “असं काय चल दाखवते तुला मी पण..” तशी ती त्याच्या पोटाला चिमटे काढू लागली.

    “अनिका.”

    “हां ऽ..”

    “तुला खरंच मी आवडतोय की मी तुझी मदत केली म्हणून..?”

    “खरंच मला तू आवडतोस. मला नाही माहित का. पण मी तुझ्याकडे अट्रॅक्ट होतेय. मी नाही ओळखत तुला पण तुला जाणून घ्यावसं वाटतंय. मला मदत केली नसतीस तरी मी माझा राग शांत झाल्यावर तुझ्या जवळच आले असते खरंच.”

    तो शांतच होता.

    “काय झालं..?”

    “तसं न्हाय म्हंजी विश्वास ठेवणं जरा कठीणच व्हायलंय..?”

    “म्हणजे..?” ती जरा अस्वस्थ झाली.

    “नाय नाय.. तसं न्हाय.. म्हंजी बघ की कालपर्यंत काय नव्हतं अन् आज अचानक सगळं असं.. म्हंजी.. काय सुचनां..”

    ती नुसतीच गालात हसली अन् म्हणाली.. “पोचल्या भावना.. माझंही असंच झालंय.. कालपर्यंत मी मरत होते खरं आज पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतंय.. नवीन काहीतरी आयुष्यात मिळाल्यासारखं वाटतंय.. बघ ना आपण दोघे टोटली अपोजिट.. तरी पण आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो..”

    “तेच तर.. तू एवढी हुशार.. अन् मी..”

    “शू ऽ ऽ.. आता नको त्याच त्याच गोष्टी.. सगळं विसरून जाऊया.. भूतकाळ नको आता पुन्हा.. आता नवीन सुरुवात करूया.. माझ्या नाहीयेत आता कोणत्याच अपेक्षा.. माझी आता एकच अपेक्षा आहे. फक्त तूच असावास माझ्यासोबत.. फक्त तू.. पैसा नको.. प्रॉपर्टी नको.. जमीन नको.. सरकारी नोकरी नको.. नको ते चाळीस पन्नास लाखांच पॅकेज.. नको पुण्या मुंबईत घर.. नको.. काही काही नको.. फक्त तू हवा आहेस..” ती भावूक नजरेने सर्व काही बोलून गेली..

    “तुला माहितीये अनिकेत” त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत ती म्हणाली.. “मी खूप नकार पचवलेत अन् तितकेच नकार दिले सुद्धा आहेत. नुसतेच नकार नाही एकेकाला मी त्यांची लायकी दाखवली आहे. तू समजू शकतोस माझ्यासारख्या मुलीचे कसे विचार असतील ते. अन् आता बघ.. शिक्षा म्हणत नाही अन् तुझा कमीपणा पण दाखवत नाही. पण बघ ना देवाने आपल्यालाच एकत्र आणलं. मी चुकीचा विचार करायचे खूप.. खरंच आय एम सॉरी अनिकेत..”

    “मला कशाला सॉरी बोलतेस अन् आता जाऊ दे.. कसंय नशिबात जे असतं तेच होतं आपण काय करू शकत न्हाय..”

    “खरंय मी आत्तापर्यंत स्वतःला खूप शहाणी समजत होते पण कधी कधी आपलंच कर्म आपल्यावर उलटतं. आजचं उदाहरण बघ ना.. तू ज्या लोकांना मारलं ती लोकं मला खूप हिणवायचे. माझा जो प्रियकर होता ना ज्याच्यासोबत माझं लग्न मोडलं. त्याच्या नावावरून मला नको नको ते बोलायचे. आमच्याबद्दल खूप अफवा उठवल्या. नंतर नंतर तर मला त्यांनी तो शब्द बोलायला सुरुवात केली. मला वाईट वाटायचं. मी कधी कोणाला वाईट बोलले नव्हते. मग माझ्यासोबतच असं का.. असा खूप विचार करायचे. मग असंच अचानक माझ्या ध्यानीमनी नसताना एक आठवण मनात आली. माझ्याकडून चुकून एका मुलाचा अपमान झाला होता. काही चूक नव्हती त्याची. खरं मी जे बोलत होते ते डायरेक्टली त्याच्या मनाला लागलं असावं कदाचित.. मला त्यावेळी काही वाटलं नव्हतं पण जेव्हा मला लोक घाण शिवी देऊन हाक मारू लागले.. तेव्हा मला कळालं की आपणच दिलेली शिवी आपल्याला ऐकू येतेय.. मी खूप नाराज झाले.. त्या मुलाची माफी मागावीशी वाटली पण मला त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं.. ना त्याचा नंबर लागत होता.. ना त्याचा पत्ता होता.. अनोळखीच होता तो..”
 

    “काय शिवी घातलेलीस..?” अनिकेतनं तिला विचारलं..

    “जाऊ दे नको.. शिव्या किती मनाला लागतात याची जाणीव आहे मला..”

    “सांग तरी..”

    “इंग्रजीत होती ॲसहोल्स म्हणून..”

    “नुसती शिवी घातलेलीस..?”

    “नाही बरंच काय काय बोलून गेलेले मी रागाच्या भरात..”

    अनिकेत शांतच झाला.. तो शून्यातच हरवून गेला.

    “तेव्हापासून मला खूप वाईट वाटायचं. माझंच कर्म माझ्यावर उलटलं.. जसं आज त्या मुलांचं कर्म त्यांच्यावर उलटलं..”

    “त्यांना शिक्षा मिळाली म्हणून तुझं मन हलकं झालं ना..?”

    “होय.”

    “त्या आधी तुला सतत त्या शब्दाचा त्रास व्हीत व्हता..?”

    “होय.. मला वाटायचं त्यांना धरावं अन् मारावं..”

    “अन् आज ते बी पुरं झालं..”

    “होय तुझ्यामुळे .”

    “अन् माझ्या मनाला त्रास झाला त्याचं काय..?”

    “म्हणजे..?”

    स्टॉप वर गाडी थांबली अन् बायकांचा लोंढाच्या लोंढा गाडीत चढला. आरडाओरडा करत बायकांची तुडुंब गर्दी झाली. देवीची यात्रा असल्याने जवळच्याच गावातल्या बायका गावी आलेल्या. अनिका थोडी बावरली. तिने खिडकीतून बाहेर बघितलं. बरीच गर्दी होती. कंडक्टरने दार ओढलं अन् गाडी पुढे सरकली.. कंडक्टरने दोन-तीनदा आवाज दिला खरं गाडीतला आरडाओरडा कमी होईना. दोन बायकांची लागलेली भांडणं प्रेक्षकांसाठी मोफत मनोरंजनाचा आस्वाद होता.
 

    कानात कोणीतरी गरम केलेलं थंड तेल ओतावं अन् हास्याच्या उकळ्या फुटाव्या तशा त्या बायकांच्या शिव्या ऐकून अनिकाला उकळ्या फुटत होत्या..

    अनिका त्यांच्याकडे पाहून गालातल्या गालातच हसू लागली. त्यातल्या एका बाईची नजर अनिकावर गेली. तिने रागाने बघताच अनिका शांत झाली.

    अनिकेतचा काहीच प्रतिसाद नव्हता. अचानक अनिकेतची शांतता तिला अस्वस्थ करू लागली. तिने त्याचा हात हातात घेतला. त्याने आपला हात बाजूला केला.. तिला कसं तरीच झालं.

    “अनिकेत..”

    त्याने काहीच उत्तर दिलं नाही.

    “काय झालं अनिकेत..?”

    “तुला किती त्रास झाला एका शिविचा..?”

    “काय..?”

    “तुला किती त्रास झाला एका शिवीचा..?”

    “खूप..”

    “मला बी..”

    “मला नाही कळालं.”

    “मला सुद्धा कळंना.. कायच कळंना.. असं वाटतंय सपान होतं अन् आता जागा झालो.. तुटलं समदं..”

    “काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये..”

    “डुकराच्या गुवावानी तोंड हाय.. ब्लडी ॲसहोल्स.. असंच म्हणालीस न्हवं..”

    अनिका सुन्न झाली. तिचे डोळे पांढरे फट पडले. आजूबाजूचा आवाज तिला ऐकू येईनासा झाला. योगायोग होता की आणखी काही हेच तिला कळत नव्हतं..

    “अनिकेत..”

    “काय नगो बोलूस. जसं तुला वाटायचं तसंच मला बी वाटायचं.. जसं तू सहन केलंस तसं मी बी सहन केलं.. आज त्या पोरांना मार खात्यालं बघून तुला बरं वाटलं. माझी बी हीच इच्छा व्हती..” तसा तो रागाच्या भरातच उठला.. अनिका ही उठली.. स्टॉप वर गाडी थांबली. अनिका त्याला समजावू लागली. तो तिला झिडकारू लागला..

    भांडण करणाऱ्या बायकांची सीट साठी धडपड सुरू झाली. अनिकाच्या बॅगवरच ती बाई पटकन बसली.

    “अहो ऽ माझी बॅग.”

    तशी त्या बाईने रागातच तिची बॅग फेकली.

    “ओ ऽ काय करताय..” ती जरा रागातच बोलली.

    “काय बघतीयास.. लय हसू फुटाल्त न्हवं.. जा की गप टवळे..”

    तिने तसं म्हणताच अनिका तोंडातच पुटपुटली.. “ब्लडी बीच..” अनिका आपली बॅग सावरू लागली.

    “ए ऽ टवळे पुटपुटू नकोस..”

    अनिकेत जागीच पलटला अन् त्या बाईकडे बघत म्हणाला..

    “कुत्री.. बीच म्हंजी इंग्रजीत कुत्री..” त्याने रागातच अनिकाकडे पाहिलं अन् तो रागारागात खाली उतरला..

    गाडी सुरू झाली.. त्या बाईने शिव्या देतच अनिकाच्या केसांना धरलं. पैलवानांच्या कुस्त्या व्हाव्या तशा त्या बायका अनिकावर आडव्या झाल्या..

    काहींनी मध्यस्थी केली अन् कसंबसं अनिकाला त्यांच्या घेऱ्यातून बाहेर काढलं. कंडक्टरने मध्येच गाडी थांबवली. “ए पोरी उतर बाई.. या बायका जीव घेतील नायतर तुझा..” असं म्हणत त्यानं तिला गाडीतून बाहेर काढलं.

    केस विस्कटलेली अनिका आपले डोळे पाण्याने भरून जागीच स्तब्ध झाली. तिच्या हाता पायातली आग मस्तकात गेली होती. झालेल्या अपमानाने तिचे हात पाय शिवशिवू लागले होते. डोळे पाण्याने भरले अन् ती रडू लागली. रस्त्यावरची माणसं तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागलीत. तिने स्वतःला सावरलं अन् वाऱ्याच्या वेगात ती मागे फिरली.

 
    बाव नदीच्या पुलावरून जाणारी अनिकेतची पाठमोरी आकृती पाहून ती चवताळली अन् वाऱ्याच्या वेगात त्याच्या दिशेने धावू लागली.. त्याच्याजवळ पोहोचताच त्याला हिसका देत तिने त्याच्या कानाखाली लगावली.. पाण्याने भरलेल्या डोळ्यांनीच म्हणाली, “असं करायला नको होतस तू..”
 

    त्याने रागातच तिच्याकडे पाहिलं.

    “मी न्हाय कर्म तुझं..”

    “माझं कर्म ?”

    “व्हय..”

    “तुझ्यामुळे.. तुझ्यामुळे त्या बायकांनी मला मारलं.. किती घाण घाण शिव्या घातल्या.. किती अपमान केला माझा.. हेच बघायचं होतं तुला..?”

    “तुला बघायचं नव्हतं.. तुला शिव्या देणाऱ्यांची मारहाण.. तुला बघायची नव्हती.. बोल.. बघ जो त्रास तुला झाला तोच मला बी झाला.. ज्याच्यामुळं तुला बरं वाटलं मला बी त्याच्यामुळेच बरं वाटलं. योगायोग म्हण न्हाय तर काय म्हणायचं ती म्हण.”

    “अनिकेत” ती शांततेतच बोलू लागली.. “बघ मला माहिती आहे.. माझ्याकडून चुकून तुझा अपमान झाला. माझं ऐकून घे. खरं बोलतेय मी.. तो फक्त ॲक्सीडेंट होता. लेट मी एक्सप्लेन..”

    “काय नगो बोलूस..”

    “तुझा राग समजू शकते मी. मला मार खाताना बघायचंय ना तुला.. मग तू मार ना मला..”

    “तू का मारलं न्हायस मग त्या पोरांना.. मलाच पाठवलं ना.. तुम्ही समद्या अशाच. बरोबरच व्हतो मी. आधी आम्हासनी वापरून घ्यायचं. मग आम्ही चुकून माखून काय बोललो की तेवड्याच गोष्टीचा बाव करायचा.”

    “अनिकेत जास्त बोलतोयस तू आता.. लिमिटमध्ये राहा.”

    “तू राहिलेलीस.. किती बोललीस मला..”

    “बघ मी माफी मागते त्यासाठी. मला समजावू दे काय झालेलं ते.”

    “न्हाय समजून घ्यायचं मला. जा ऽ त्या पोरास्नी जाऊन समजून घे. मला तर वाटालंय ती पोरं खरंच काय तर एगळं बुलली असतील अन् तू काहीतर एगळा गैरसमज करून घितला अश्शील. न्हायतर मग तू हायस तशी.”

    “अनिकेत ऽ..” तिने रागातच त्याच्या कानाखाली मारली. पुलाच्या काठावरून त्याचे पाय अडखळले.. तो मागे झाला.. अन् वाऱ्याने आपल्या सोबत खेचून घ्यावं तसा तो हवेत तरंगत तरंगत पाण्यात खोलवर पडला.

    ती सुन्न होऊन तशीच स्तब्ध उभी राहिली. तिचे डोळे पांढरे पडले.. काय झालं हे तिला कळेना.. तिने आसपास पाहिलं. मदतीला कोणीच नव्हतं.. पाण्यातून वर येत हातपाय मारणाऱ्या अनिकेतला बघून ती तशीच रागारागात निघून गेली.. 

 क्रमश:
 

अधुरी कहानी – भाग १३

नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे देखील पहा :

एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम

बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना

चतकोर भाकरी

शिक्षा

    नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment