अधुरी कहानी – भाग १०
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“अधुरी कहानी – फ्रेंड्स”
अनिकाने काळा धूर मागे सोडत येणाऱ्या लालपरीकडे पाहिलं अन् समोरच्या दुकानात बसलेल्या माणसाला आवाज दिला.
त्यानं “व्हय व्हय, जात्या जात्या” असा इशारा केला. तिने एक नि:श्वास सोडला.. अर्ध्या रस्त्यातच बंद पडलेल्या गाडीमुळे ती बराच वेळ रस्त्याच्या कडेला एसटीची वाट पाहत होती. अन् बऱ्याच वेळानंतर तिच्या प्रवासातली साथीदार धुरळा उडवत येत होती.
मुला मुलींचा घोळका दंगामस्ती करत खाली उतरला अन् ती लगबगीत वर चढली. खचाखच भरलेल्या गर्दीवर नजर फिरवली अन् हताश होत उभी राहिली. प्रत्येक पाच सात-मिनिटांनी जितकी माणसं रिकामी होत होती तितकीच चढत होती. मागे सरकत सरकत ती मागच्या सीट पर्यंत कधी आली तिला कळालं देखील नाही. खांबाला धरून ती टाचा वर-खाली, वर-खाली करत उभी होती. बराच वेळ उभी असल्या कारणाने तिच्या पोटऱ्यांमध्ये आता गोळे येऊ लागले होते. टाचा ठणकू लागल्या होत्या.
मधूनच शेजारच्या सीटवर बसलेल्या मुलाकडे रागात नजर टाकत होती. तिला वाटलं होतं मुलगी म्हणून तिला बसायला कोणीतरी जागा देईल खरं तसं काहीच घडलं नव्हतं.
ती आपल्याकडे अधून मधून रागात बघत आहे हे अनिकेतच्या लक्षात आलं होतं. खरं तो मान मागे टाकून डोळे बंद करून झोपी गेलेला. त्याच्या ही मनात आलं होतं थोडा वेळ उठून त्या मुलीला बसायला द्यावं म्हणून. खरं गाडीतली गर्दी पाहता परत त्याला बसायला जागा मिळेल की नाही याची शाश्वती त्यालाही नव्हती. त्यामुळे तो मुकाट डोळे बंद करून झोपी गेला होता.
गर्दीतून रस्ता काढत एक आज्जीबाई अनिकेतच्या सीट पर्यंत आली अन् त्याच्या मांडीला हात लावून त्याला सरकवू लागली.
अनिकेत दचकन उठला. “आज्जे ऽ मांडीव बसतेस का..?” म्हणत तिच्याशी बोलू लागला. त्याला न जुमानता आज्जीबाई तशीच तिच्या एका मांडीवर बसली.. “जरा वाईच सरक बाळ.. गोळं आलंत पायाला. उभं ऱ्हावना आता..” तो काही न बोलता सरकला..
अनिका त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहू लागली. तिला वाटलं आता तरी तो उठेल परंतु त्याला तसंच बसलेलं पाहून ती विषण्णपणे हसली. दोघांची नजरा नजर झाली. अनिकेतला ही कळालं खरं तो पुन्हा नजर चुकवू लागला. अनिका गालातच हसू लागली.
“ऐकू ईत न्हाय मला.. मोठ्यानं..” आज्जी कानाला हात लावत म्हणाली.
अनिकेत गालातच हसू लागला. अनिकाला कसंतरीच झालं अन् ती शांत होऊन आज्जीकडे पाहू लागली.
“कुणीकडं निघाली बाळा.. सासरला का माह्यारला..?”
अनिका चकीत होऊन आज्जीकडे बघू लागली अन् शांतच राहिली.. तिने नकारार्थी मान हलवली.
“आं ऽ”
“फिरायला..” तिने हात वर करत सांगितलं.
“लगीन कराय न्हायस..?”
तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.. आज्जीने केलेल्या मदतीमुळे तिला ती चांगली वाटत होती पण तिच्या प्रश्नांमुळे आता तिला राग येत होता. अनिकेत चोरट्या नजरेने तिच्या उत्तराची आस लावून पाहत होता. ती शांतच राहिली.
“भण माझी..” आज्जी तिच्या मांडीवर हात ठेवून बोलू लागली..
“लय शिकली.. मास्तरीन व्हती. रग्गड पैसा कमीवला. खरं लय माणूस घाण.. एकाला जवळ कराय नाय.. जवानी शिकण्यात घालवली.. म्हातारपण दुसऱ्यासनी मदत करण्यात घालावलं.. आता जवळ कोण नाय.. पैसा कवर पुरतोय.. बसल्या आता वाट बघत..”
“कुठे..?” तिने हात हलवत विचारलं..
“तिरडीवं”
अनिकेत आज्जीकडे बघू लागला. अनिकाला काहीच कळालं नाही. ती नुसतीच शांत राहिली.
“सकाळनंच निरोप धाडलाय. कवाशी मेल्या कुणास ठावं. लगबगीनं बुलवून घिटलंय मला.. काय करायचं सांग..?”
“मेल्या” शब्द कानावर पडताच तिला वस्तुस्थितीची जाणीव झाली.
“वारली.” तिने विचारलं.
“वारली का..?” तिने जोरातच विचारलं.
“मेली नव्हं का काय ऐकालीस मग.. वाट बघत बसल्या माझी भण..”
ती शांत झाली.
“पोरी कोण नसलं तरी चालंल खरं नवरा पायजे बघ. न्हायतर असं वणवण फिराय लागतंय.. पोटची पोरं बसल्यात पैसा कमवत.. एक बी यायला मागं ना.. माझ्या हाताव पैसं ठिवून जा म्हटलीत..”
“एखादा पोरगा बघून लगीन कर.. आता काय वय तुझं..?” आज्जी अनिकाचा खांदा गदा गदा हलवत जोरजोरात विचारू लागली.
अनिका शांतच राहिली. तिला काय बोलावं तेच कळेना.
“आज्जे कुठल्या गावात हाय तुझी भण..?” अनिकेत आज्जीला आपल्याकडे वळवत जोरात विचारू लागला.
“हाय तिकडं शेलारवाडीत..”
“आज्जे वाडी गेली उश्शर मागं.”
“मागं.. कंडक्टरनं आवाज का द्यायला नाय..”
“आता तुला ऐकाय येतंय व्हय.. जा जा भन थांबल्या तुझी..” ती ऊठली अन कंडक्टरच्या नावाने ओरडत पळाली..
अनिकाने नि:श्वास सोडला. तिने हलकसं अनिकेतकडे पाहिलं. दोघांची नजरा नजर झाली. दोघेही एैसपैस बसले.
आज्जी तिथेच दाराजवळ थांबली. कंडक्टरनं वाडी यायला अजून पाच दहा मिनिटे आहेत म्हणून सांगितलं. कशीबशी तिची समजूत घातली अन् खाली बसवलं.
अनिकानं ते सर्व पाहिलं अन् अनिकेतकडे बघत म्हणाली,
“अजून वाडी आली नाही तुम्ही.”
“उगाच डोस्क उठवलं म्हातारीनं लग्न लग्न करून.”अनिकेत गालात हसत म्हणाला. अनिकालाही हसू आलं.
“बहिण मेल्याच काय न्हाय दुसऱ्याच लगिन होईना याचं तिला टेन्शन.”
अनिका आणखीनच हसली अन् म्हणाली,
“तुम्ही मुद्दाम.”
अनिकेतने हसतच डोकं वर खाली केलं अन् दोघेही हसू लागले.
“थँक्यू.” अनिका अनिकेतकडे हसत म्हणाली.
“चालायचं.. म्हाताऱ्या माणसास्नी लग्न म्हटल्यावर लय बोलू वाटतं तुम्ही काय वाईट मानून घेऊ नका.”
“एवढं काही नाही..” अनिका चेहऱ्यावर मंद हसू ठेवत म्हणाली .
“तुमचं पण नाही झालंय का लग्न.. सॉरी म्हणजे तुम्हाला कसं कळालं..?”
“भावना..” अनिकेत पटकन बोलून गेला.. “भावना ओळखायला कितीसा वेळ लागतोय.”
तसे दोघेही हसू लागले.
“थँक्यू.”
अनिकेतन नुसतीच मान डोलावली. वाडी येताच आज्जी उतरली. तिला उतरताना बघून दोघे पुन्हा हसले.
“भेट म्हणावं आता कडकडून.” अनिका हलकसं हसली.
“तुम्ही इथलेच..?”
“व्हय.. पण तुम्ही इथल्या वाटत न्हाय..?”
“होय.. बरोबर.. पुण्याची आहे मी.”
“इकडं मग फिरायला..?”
“होय.. म्हणजे थोडा निवांत वेळ होता म्हणून मग..”
“चांगलय चांगलय.. प्रवासाने थोडा का होईना आनंद मिळतोय.. अन् एसटीचा प्रवास करताय तर आणखीनच मजा.. हे असे नमुने भेटतात.”
“नाही म्हणजे ॲक्च्युली मी कारनेच निघालेले पण मध्येच बंद पडली कार. किती वेळ सुरूच होईना. मग लावली एके ठिकाणी अन् आता करतेय एसटीने प्रवास.”
“म्हंजी देवाने सुरुवात केली हाय तुम्हाला मार्गावर आणायला.” अनिकेत हसतच म्हणाला.
“होय वाटतं..” ती हसतच म्हणाली, “तुम्ही इकडे..?”
“तुमच्यासारखंच.. रोज रोज तीच तीच बघून, करून कंटाळा आला व्हता. म्हटलं फिरून यावं जरा. गाडी काढली.. खरं सुरू होईना. मग धरली एसटी.”
“कोइन्सिडन्स.”
अनिकेत शांतच राहिला अन् न कळणाऱ्या नजरेने पाहू लागला.
“योगायोग.” त्याची नजर ओळखून ती बोलली.
“हां ऽ व्हय..”
“तुम्हाला काय वाटलं शिवी..?”
“नाय नाय तसं न्हाय.. तुम्ही मला ओळखत न्हाय.. तर मग शिवी कशाला द्याल.. कळलं न्हाय एवढंच..”
तशी ती हसतच म्हणाली.. “म्हणजे देवाने तुम्हालाही मार्गावर आणायचं ठरवलं तर..” तसे दोघेही पुन्हा हसले.
“अनिका..” अनिकाने स्वतःचा हात पुढे केला.
अनिकेत क्षणभर पाहतच राहीला. अनिकाने पुन्हा हसून हात आणखी पुढे केला. अनिकेतने चेहऱ्यावर हसू आणून हात मिळवला..
“अनिकेत”
“काय करतोस तू.. मी तुला तू म्हटलं तर चालेल ना..?”
“त्यात काय म्हणा की.”
“तुला चालणार असेल तर मलाही तू म्हटलेलं चालेल..” तसं ती मंद हसू चेहऱ्यावर ठेवत म्हणाली, “काय करतोस अनिकेत..?”
“एमआयडीसीत हाय.”
“अच्छा ओके.. मॅनेजर म्हणून..?”
“न्हाय.. एवढं कुठलं शिक्षण.. वर्कर म्हणून.”
“ओके.”
“तुम्ही आयटीत असाल..?”
“बरं ओळखलं.”
“पुण्यातल्या निम्म्या आयटीतच असत्यात.”
“तेही खरंच आहे म्हणा. अनिकाने मान हलवत उत्तर दिलं अन् म्हणाली, “माझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अनिकेत ?”
“कोणत्या ?”त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.
“लग्नाच्या ?”
“मला वाटलं माझ्या रागानं ओळखलं असंल तुम्ही.. ?”
“तू..” ती मंद स्मित करत म्हणाली.
“व्हय.. म्हंजी मला वाटलं ओळखलं असंल तू ?”
तिने नुसतीच मान हलवली.
“तुमचं पण न्हायच ना..”
तिने एकटक पाहत डोळे मिचकावत उत्तर दिल.
“तुमच्या शांततेनेच उत्तर दिलं म्हणून मग म्हातारीला..”
“बरं केलंस.. घरातून वैताग आला म्हणून बाहेर पडले तर बाहेर पण तसंच.”
“सगळीकडे तेच हाय कुठं पण जा.. एखादा पुरगा पुरगी दिसली की.. लग्न झालं का.. कवा करणार.. वय वाढालय.. आता तुम्हास्नी काय करायचं.. आमचं वय वाढालय तर.. तुमचं तुम्ही बघा की..”
“एक्झॅक्टली तेच म्हणते मी..” अनिका एकदम जोशात येत बोलू लागली.. “तुमचं तुम्ही बघा ना.. ज्याला करायचं तेव्हा करेल तो.. तुमची का घाई..?”
“आपल्या नाकातला शेंबूड तोंडात जायलाय अन् ह्यो दुसऱ्याचं नाक पुसायला निघालाय. आरं तुझं तू बघ की..” अनिकेत भावनेच्या भरात बोलून गेला.. त्याच्या बोलण्याचा टोन बघून अनिकाला हसू आलं. ती खळखळून हसली. तिला हसताना पाहून तोही हसू लागला..
“फ्रस्ट्रेशन..?”
तो पाहतच राहिला.
“राग.”
“आता कळंलं.”
तसे दोघेही हसू लागले.
“बापरे मला वाटलेला माझा प्रवास आता कसा होईल काय माहित.”
“मग.”
“बट गॉड हॅज बेस्ट प्लॅन.”
“हा ऽ .” त्याने नुसतीच मान हलवली.
“सॉरी म्हणजे देव आपल्याबद्दल चांगला विचार करतो.”
“ते तर हाय.. फकस्त जरा वेळ लावतो..”
“हे पण खरं..”
“हा ऽ.” तो नुसताच पाहत राहिला.
“ओह नो सॉरी.. म्हणजे तू फार विनोदी आहेस..”
“मला बी आत्ताच कळालं.” तसा तोही खळखळून हसला.
“म्हणजे ?”
“म्हंजी पहिल्यांदाच कुठल्या पुरगीबर असं बोलायलोय.”
“बापरे म्हणजे.. आय ॲम द लकी वन.. सॉरी सॉरी म्हणजे नशीबवान म्हणायचे मी.. असं का खरं ?”
“कुठली पुरगी बोलायलाच तयार न्हाय. डायरेक्ट नकार” तसा तोही जोरात हसला अन् तीही हसली.
“चला म्हणजे या प्रवासात काहीतरी चांगलं झालं.. तुझ्यासाठी ही.. अन् माझ्यासाठी ही..
“तुमच्यासाठी.. म्हंजी आपलं. तुझ्यासाठी म्हंजी..?”
“माझी पण तीच अवस्थाय.”
“छ्या ऽ मला न्हाय पटत.”
“होय तर.”
“शक्यच न्हाय.. एवढी सुंदर, हुशार पोरगी अन् ती पोरा संग बोलली नाय.. शहरातली असून.. शक्यच न्हाय..”
“बोलली नाही असं नाही पण खूप दिवसानंतर, खरंतर वर्षानंतर असं एखाद्या अनोळखी मुलासोबत मनमोकळेपणाने आज बोलतेय.”
“हां ऽ हे असू शकतं.. तेवढ मी समजू शकतो..”
“काय ?”
“खरं आहे तुझं.. बघ ना आपल्या दोघांत किती सिमिलॅरिटीज आहेत. अन् महत्त्वाचं म्हणजे आपण भांडत नसून याचा आनंद घेतोय..”
“व्हय. आज पातुर मी नुसता वैतागल्यालो.. खरं आज याच गोष्टीचं हसू यायलय..”
“अन् हेच जर का आपण जोडीदार म्हणून भेटलो असतो तर विचार कर काय झाल असत.”
“मला न्हाय वाटत आपण भेटलो असतो.”
“का ?”
“तुम्हाला राग येणार नसंल तर बोलू.”
तिनं नुसतच डोळे बारीक करून पाहिलं.
त्याने डोळे मिचकावले अन् म्हणाला,
“तुला राग येणार नसंल तर बोलू ?”
“बोल.”
“तुम्ही.. तू भेटलीच नसतीस मला.”
“का ?”
“बायोडेटा बघूनच नकार दिला असतास ?”
तसे अनिकाने डोळे बंद केले अन् ओठ चुचकारले..
“खरं हाय का न्हाय ?”
तिने नुसतंच डोकं वर खाली केलं अन् म्हणाली, “खरंच अनुभवी आहेस याबाबतीत डायरेक्ट चेकमेट केलंस मला.”
“व्हय का न्हाय ?”
“होय दुर्दैवाने.”
“माहित हाय ओ ऽ मला.. असं लय नकार पचवलं.”
“तरी किती ?”
“गिनती करायचं बंद केलं एका टायमा नंतर.”
“समजू शकते.. मी सुद्धा असंच केलं.. काय माहित किती जणांना नकार दिलाय अन् म्हणूनच की काय..”
“तुम्हाला पण नकार यायलाय.. तुला नकार मिळालाय..” तो तिच वाक्य पूर्ण करत म्हणाला..
“होय.” तिने हाताश होत मान वर खाली केली..
“चालायचं तुमची.. सॉरी, तुझी पिन तिच व्यथा माझी पिन तीच व्यथा.”
“अवघड वाटतंय ना खूप तू बोलायला..?”
“सवय न्हाय ना पहिल्यांदाच हाय.”
“समजू शकते. चालेल तरी पण.. होईल तुला सवय निदान आपला प्रवास संपेपर्यंत तरी..”
“बघूया की.”
“मग काय प्लॅन आहे तुझा ?”
तो जरा विचारतच गेल्या सारखा झाला.. “प्लॅन म्हंजी हेच की गाडीत बसायचं अन् मग पुढचं पुढं.”
“मस्त.”
“तुमचा.. तुझा ?”
“ओळख.”
“योगायोग.”
तसे दोघेही हसले.
“एक ईचारू ?”
“विचार.”
“राग येणार नसंल तर.”
“विचार रे.”
“म्हंजी हुशार, सुंदर, नोकरी..” अनिकेत प्रत्येक शब्द बोटावर मोजत आपली मान हलवू लागला.. “खंबीर, चांगला पगार, तरीपण म्हंजी कसं काय..?”
“शेवटचं म्हणालास ना चांगला पगार.. कदाचित टोचतो तो मुलांना.. माझ्यापेक्षा जास्त पगार वाली म्हणून.”
“ती असलंच.. खरं कारण काहीतरी वेगळंच वाटतंय मला..”
“ती शांतच राहिली..” त्याने विषय बदलत पुन्हा सुरुवात केली.
“त्यांचं राहू दे.. तुमच्या.. तुझ्या काय अपेक्षा हायत जास्त पगारवाला की आणि काय..?”
“खरं सांगायचं तर आधी मी पण अशीच होते जसे तुला नकार देणाऱ्या मुली होत्या ना तशीच.. मला तू त्यातलीच समज..” ती हसतच म्हणाली ..
“अन् मग आता कशी हायस ?”
“आता मी नशिबावर सोडलंय.. जे होईल ते होईल.. तुझं सांग.”
“असं समज की तू ज्या गोष्टींना नकार दिलास त्या सगळ्या गोष्टी माझ्यात हायत.” त्याने खोटं हसू चेहऱ्यावर ठेवत सांगितल.
“सॉरी..”
“तू कशाला सॉरी..?”
“मी पण त्यातलीच एक ना म्हणून.. राग येत असेल ना खूप आम्हा मुलींचा..”
“खूप लय.. म्हंजी एवढा की काय सांगायचं.. खरं आता काय बी वाटत न्हाय सगळं सोडून दिलं.. किती दिवस असं जगायचं..”
“खरंय तुझं. आपण दोघे पण एकाच कंडीशनमध्ये आहोत जसं की दोघांची नाव..”
“एकाच दर्यात.. एकाच मार्गावर” त्याने तिच वाक्य पूर्ण केल..
दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं अन् शांत झाले. क्षणभराने मग तिनेच बोलायला सुरुवात केली.
“मग घरी कोण कोण असतं..?”
“आई-बाबा, एक बहीण, बहिणीचा मुलगा अन् मी..”
“पुण्यात ?”
“होय.”
“मग आता सुट्टीवर हायस की..?”
“खरं तर सुट्टीवरच आहे.. त्याचं काय आहे जॉब चेंज केलाय मी.. आता पुढच्या आठवड्यात जॉइनिंग आहे.. मग म्हटलं त्या आधी जरा माईंड फ्रेश करून यावं..”
“चांगलय चांगलय..”
“तुझं कसं काय..?”
“माझं कसं काय.. कसं असणार.. तीच तीच नोकरी, तीच तीच कामं, तीच तीच तोंड, तेच तेच नकार वैताग आलेला निसता.. मंग म्हटलं सगळं जाऊ दे गाढवाच्या.. तसा तो थांबलाच अन् श्वास घेत म्हणाला, “मग म्हटलं जरा फिरून येऊ बरं वाटेल जिवाला..”
“नाही वाटणार.”
“काय म्हंजी ?”
“आधी वाक्य पूर्ण कर त्याशिवाय नाही वाटणार.”
तसा तो हसऱ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला.
“कर कर”
“कशाला लाजवालीस समजलं की तुला.”
“खरं ऐकू वाटतंय बोल की..”
“काय ऽ ?” तो जरा आश्चर्यानेच म्हणाला.
“खूप दिवस झाले गावठी शिव्या ऐकून. माझी आज्जी द्यायची खूप. फनी बोलायची. मी खूप हसायचे. आता ते हसूच गेलं कुठच्या कुठे काय माहित..”
तसा तो बावरूनच पाहू लागला. क्षणभर थांबून तिच्या काना जवळ जाऊन त्यानं वाक्य पूर्ण केलं. तशी ती खळखळून हसली. तोही हसला.
“वेडी हायस तू.. पहिल्यांदा मी अशी पोरगी बघालोय.”
“तुला पण भारी वाटतंय ना ?”
तो काहीच बोलला नाही. हसतच तिच्याकडे पाहू लागला.
“तुझे डोळेच सांगतायत बघ.. बापरे लाजतोयस तू..” तशी ती जोर जोरात हसू लागली. तो बाहेर बघू लागला..
“फर्स्ट टाइम इन माय लाईफ एक मुलगा लाजताना पाहतेय मी.” ती त्याची टर उडवू लागली. तो तिची नजर चुकवू लागला. ती नुसतीच हसत सुटली..
कंडक्टरने घंटी वाजवत “ओ ऽ ताई.. उतरणार न्हवं..” म्हणत अनिकाच्या दिशेने पाहिलं. अनिका एकदमच शांत झाली. ती अनिकेतकडे पाहू लागली..
“कदाचित आपला प्रवास इथपर्यंतच..” तोही शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.
“ग्रेट टू मीट यू अनिकेत.” ती मंद स्मित करत म्हणाली.
त्याने खोटं हसू चेहऱ्यावर ठेवलं अन् तो तिच्याकडे पाहतच राहिला..
ती तशीच आपली बॅग घेऊन दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागली. अनिकेत तिची पाठमोरी आकृती पाहू लागला.. का कुणास ठाऊक खरं आज पहिल्यांदा कुणा मुलीसाठी तो हळवा झालेला. अनपेक्षितपणे प्रवासात भेटलेल्या या मैत्रिणीचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला.
बाहेर नजर जाताच तो शुद्धीत आला आणि आपल्याला पण इथेच उतरायचं आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याची गडबड सूरू झाली. बॅग घेण्यासाठी तो उठला अन् अनिका थांबलेली त्याला दिसू लागली..
ती दारातच थांबलेली.. तिने क्षणभर डोळे मिटले अन् पुन्हा वर आली…
कंडक्टरच्या दिशेने नोट करत म्हणाली “लास्ट स्टॉप..” कंडक्टरने बेल वाजवताच गाडी सुटली..
ती गेली तशी पुन्हा जागेवर येऊन बसली. अनिकेत आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला.. ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली, “मैत्री वाढवण्यासाठी प्रवास वाढवणं महत्त्वाचं.. गणपती पुळ्याला जाऊया..?”
अनिकेतच्या हास्याने तिला होकार दिला.. नवीन मैत्रीचे संबंध फुलवून लाल परी धुरळा उडवत धावू लागली..
अधुरी कहानी – भाग ११
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!