अधुरी कहानी – भाग २
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“अधुरी कहानी – अनिकाचा अतीत”
शट डाऊन बटनावर क्लिक करून तिने लॅपटॉप बंद केला. डोळ्यावरचा चष्मा काढून डोळे चोळले अन् जांभई देत खुर्चीवर मान मागे टाकून शांत पडून राहिली. मंद श्वास घेत ती मनातल्या मनातच हॉलमध्ये घडू शकणाऱ्या परिस्थितीची चित्रफीत बनवू लागली. खरं तर तिला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अजिबात जायचं नव्हतं. लहान मुलांच्या वाढदिवसाला हजेरी लावण्या इतपत तिचं ते वयही नव्हतं. परंतु आईच्या हट्टा पुढे तिचं काही चालतही नव्हतं.. हट्ट.. हट्ट कसला.. इमोशनल ब्लॅकमेलच बाकी काही नाही. अन् तोही वाढदिवसासाठी नाही तर वाढदिवसात हजेरी लावणाऱ्या बर्थडे बॉयच्या मामासाठी. कोण कुठला शेजारच्या इमारती मधला बारका मुलगा अद्वैत. त्याचा कोणतरी मामा सिद्धेश. जो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला होता. त्याच्यासोबत ओळख व्हावी, एक नातं तयार व्हावं म्हणून चाललेली ही आईची धडपड.
तिने कपाळावर आठ्या आणत जोरजोरात नकारार्थी मान हलवली अन् खुर्चीवरून उठली. बॅगेत लपवलेलं सिगरेटचं पाकीट काढलं अन् खिडकीत पडद्याआड बसून बाहेर हळूहळू डोकावू लागली. कोणी नसल्याची खात्री केली अन् सिगरेट ओढू लागली. भूतकाळातल्या जळालेल्या आठवणींचा धूर ती सिगरेटच्या प्रत्येक फुरक्या सोबत बाहेर सोडू लागली.
“आवरलं का..” आईचा आवाज येताच तिने सिगरेटचा शेवटचा फुरका ओढला अन् थोटुक खिडकीबाहेर फेकलं. रागा रागात लॅपटॉप सुरू केला अन् कॅमेरा ऑन करून बसली.
“अनिका आवरलं का..?” तिची आई तिच्या खोलीत येत विचारू लागली.
“हाफ डे कॅन्सल केलाय माझा आत्ताच.. अर्जंट मीटिंग ठेवली आहे.. नालायक आहे माझा बॉस.. नोटीस पिरियड वर आहे म्हणून सतावतोय खूप.. आता काही बोलू नकोस.. आधीच डोकं फिरलय खूप माझं.. तुझं तू जा वाढदिवसाला.. परत भेटू त्याला..” ती एका दमात बोलून गेली अन् कानात एअरपॉड्स घालून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहू लागली.
अनिकाची आई काही न बोलताच मान हलवत निघून गेली. आईला आवरून बाहेर जाताना पाहून अनिकाने एक नि:श्वास सोडला अन् बेडवर तशीच शांत पडून राहिली. गोल फिरणाऱ्या पंख्यासोबत तिची नजर शून्यात गोल गोल फिरू लागली.
काही काळ गेला. मानसिक स्थिती सुधारू लागली अन् नव्या स्थळांची पाहणी सुरू झाली. परंतु अगोदरच्या बातमीमुळे मुलगी हुशार अन् सुंदर असून सुद्धा नकारच मिळू लागला. नकार कशासाठी तर, “मुलीचं लव्ह अफेअर असून लग्न मोडलं.. आता कसं लग्न जुळवायचं.. त्यांच्यात काही झालं नसेल कशावरून..”
नकारा पर्यंत सर्व ठीक होतं परंतु समाजातल्या अन् नातेवाईकांच्या नजरेने तिचं जगणं अवघड करून ठेवलं होतं. चारित्र्यावर उडणाऱ्या चिखलामुळे अनिकाने लग्नाचा विचार सोडून दिला. आई वडिलांची धडपड सुरूच होती. घरच्यांच्या हो ला हो द्यायचा अन् जे होईल ते स्वीकारायचं एवढंच तिच्या आयुष्यात सुरू होतं. सुंदर, सुसंस्कृत अन् कमावती मुलगी असून मिळणाऱ्या नकारामुळे अनिकाचं मन दुखावलं गेलं. तिने समाजात जाणं टाळलं. नातेवाईकांपासून संपर्क तोडला. मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यातून स्वतःला दूर ठेवलं. एकांतात राहणं स्वीकारलं. मानसिक त्रास पुन्हा जडावला अन् दारू सिगरेटच व्यसन जडलं. गोल गोल फिरणाऱ्या आयुष्यात नजर शून्यातच हरवून गेली.
समाजापासून संपर्क मोडला म्हणूनच की काय देवाने आवडत्या व्यक्तीचाही संपर्क कायमचा तोडला. एके दिवशी अचानक अनिकाच्या आज्जीच्या मृत्यूची बातमी घरी आली. अन् संपूर्ण कुटुंब तात्काळ आपल्या मूळ गावी कोल्हापूरला पोहोचलं. अनिकासाठी ही घटना हृदय द्रावक होती. तिचं मन रिकामं करण्याची जी जागा होती ती जागाच कायमची निकामी झाली होती. पाठोपाठ येणाऱ्या दुःखामुळे अनिका आणखीनच खचत गेली.
आज्जीचं कार्य वगैरे पार पडलं. घरात बैठकी बसू लागल्या. इकडून तिकडून विषय अनिकावरच येत होता. आई-वडिलांनी बऱ्याचदा विषयांतर करण्याचा प्रयत्न केला. परंतु एखादा कलाकार नातेवाईक अनिकावरच नेम धरत होता.
अनिका सर्वांपासून दूर होऊ लागली. एकटी फिरू लागली. माळावरच्या शेतातल्या बांधावर ती त्यादिवशी एकटीच बसली होती. रानातली कामं उरकून घराकडे जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करत होती. पक्षांचा थवा मन भरून पाहत होती. सुटलेल्या गार वाऱ्यासोबत वाहून जाण्याचा प्रयत्न करत होती.
“दीदे, इथं बसल्यास व्हय.. समदं गाव हुडकलं की..” मागून येणाऱ्या अमृताने आवाज दिला. ती नुसतीच हसली अन् म्हणाली, “ये की बस..” अमृता तिच्या शेजारी जाऊन बसली.
“अशी एकटी का बसल्यास.”
“असंच.” तिने ओठ चुचकारत उत्तर दिलं.
तिचं बोलणं ऐकून अनिका गालातच हसली.
“आज्जी लय आटवण काढाल्ती तुझी.. खरं तुम्ही येईस्तोवर नाय जगली ती..” अमृता हताश होऊन बोलून गेली.
“काय म्हणत होती.. ?”
“काय म्हणणार.. अनुला बघू वाटतंय.. आली का नाय.. आली का नाय..”
अनिकाने डोळे पाण्याने भरले. अमृताने तिच्या हातावर हात ठेवताच तिच्या डोळ्यातून एक एक थेंब अमृताच्या हातावर पडू लागले.
“गप दीदे आता..” अमृता तिला शांत करत म्हणाली.
अनिकाने आपले डोळे पुसले अन् म्हणाली,
“आणि काय म्हणत होती आई..?”
“लय काय नाय. तिची तब्येत लयच नाजूक झाल्ती शेवट शेवट.. तुझी तेवढी आठवण काढायची. बोलायची नाय.. पर अनु अनु करायची.. कायपिन म्हण दीदे, तुझ्याव लय जीव व्हता..”
अनिका शांतच राहिली. शून्यात नजर हरवल्यासारखी एकटक समोरच पाहत राहिली.
“नको लय जीवाला लावून घिवूस दिदे.. म्हातारं माणूस हुतं.. कवा ना कवा हुणारच हुतं हे..”
“ह्म्म ऽ.. एकदा भेट झाली असती तर बरं झालं असतं..”
“ते हाय म्हणा.. खरं काय करणार..?”
अनिकाने एक दिर्घ श्वास घेतला.
“ते समदं जाऊ दे आता.. तू सांग आणि काय काय चाललंय. लयच नाराज नाराज अस्त्यास.. ऐकाय यायलंय..” अमृता अनिकाच्या खांद्याला धरत म्हणाली..
“कशामुळे ते पण माहित असेलच की तुला..?”
“वर वर म्हाईत हाय.. खरं तुझ्याकडनंच ऐकायचय.. तुला सांगू वाटलं तर.. नाय तर आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाय..”
“मग राहु दे.. त्याच त्याच गोष्टी नको उगळायला..”
“सांग..” अमृता अनिकाच्या हातावर हात ठेवत म्हणाली. “मन हलकं कर.. जितकं मनात ठिवशील तितकी खचत जाशील.”.
“काय सांगू अमृता तुला.. नको वाटतंय आता आयुष्य.. कंटाळा आलाय सगळ्याचा. असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावं.. सगळ्यांपासून दूर.. रोज रोजच्या कटकटी, ऑफिसमधलं पॉलिटिक्स, हे नातेवाईकांचे टोमणे.. प्रत्येक जण संशयाच्या नजरेने बघणार.. संशय घेणार.. आपआपसात कुजबूजणार.. हे सगळं कमी म्हणून घरच्यांचा लग्नासाठी दबाव.. वाढत चाललेलं वय.. वैताग आलाय या सगळ्या गोष्टींचा.. कधी कधी तर वाटतं सरळ टेरेसवर जावं अन् खाली उडी मारावी..”
“असं नको बोलूस दिदे..”
“नाहीतर काय अमृता.. रस्त्यावरून चालताना पण मला किती लाज वाटते माहितीय.. दोन बायका दिसल्या की त्यांची कुजबूज झालीच सुरू.. खालीवर नुसतं माझ्याकडे बघणार.. तोंड वाकडं करून माना हलवणार.. अन् माझ्या पाठीमागे नको नको ते बोलणार.. कोणाला आवडणार हे..”
“फसले अमृता मि त्याच्या प्रेमात.. मला नव्हतं वाटलं इतका चीप निघेल तो.. माझं नशीब चांगलं म्हणून लग्ना अगोदरच त्याचे अफेअर्स कळाले.. लग्नानंतर काय झालं असतं.. ताई सारखीच अवस्था झाली असती ना.. ताईचं बघितलंस ना.. एक मुलगी असून तिच्या नवऱ्याने बाहेर लफडं केलं.. ताई मध्ये काय वाईट होतं.. कोणत्या गोष्टीचा त्रास होता.. तरी पण तिची ही अवस्था..”
“निदान मी तरी या गोष्टींपासून वाचले.. अमृता मला थोडे दिवस वाईट वाटलं.. मी यातून बाहेर पण आले.. पण या लोकांनी ना बोलून बोलून माझ्यावर मानसिक बलात्कार केलाय.. नको नको ते ऐकलंय मी माझ्या बद्दल माहितीय तुला..”
“ऑफिसमधल्या हिजड्यांनी तर मारून टाकलंय मला.. नाही जाऊ वाटत ऑफिसमध्ये.. मी आले की काय बोलतात माहितीय तुला अमृता.. ती बघ रांड आली रांड.. फुकटात देणारी..” तशी ती रडूच लागली. तिचा हुंदका दाटून आला अन् ती ओंजळीत तोंड धरून जोरजोरात रडू लागली. अमृताने तिला सावरलं.
“दीदे गप..” नकळत अमृताच्याही डोळ्यात पाणी आलं.
जोरजोरात श्वास घेत ती बोलू लागली.
“रांड आहे का मी अमृता.. एवढ्या खालच्या पातळीवर मला बोलणार ही शिकलेली माणसं.. त्यांची काय लायकी आहे..” तिने डोळे पुसले अन् जोर जोरात श्वास घेऊ लागली.
“दीदे, तू मग कंप्लेंट का केली नायस..”
“मी काय शांत बसली असेल असं वाटतं तुला.. मी सरळ जाऊन माझ्या बॉसला सांगितलं.. सगळ्यांना त्यांनी केबिनमध्ये बोलावलं.”
“मग..?”
“बॉसला बोलतात खूप मोठा गैरसमज झालाय अनिका मॅमचा.. आम्ही असं कसं बोलू शकतो.. आम्ही तर कोडींगबद्दल डिस्कस करत होतो न्यू जॉईनी सोबत.. वाटल्यास विचारू शकता तुम्ही.. लुप्स वापरण्याऐवजी रॅंड वापरा इतकचं म्हणालो आम्ही.. ह्यांनी गैरसमज करून घेण्याचं काही काम नव्हतं.. बॉस तरी काय बोलणार मग..”
“काय कळाय नाय मला दिदे..”
“आमच्या कोडींग मध्ये एक फंक्शन आहे. आर ए एन डी रॅंड म्हणून.. रेअरली वापरणारं फंक्शन ते.. पण माझ्यासाठी ही लोकं रोज वापरतात.. त्याचं कनेक्शन लावलं या लोकांनी.. न्यू जॉईनीला सांगत होतो म्हणे.. न्यू जॉईनी काय दूध पितं बाळ आहे.. त्याला माहित नाही ते फंक्शन.. सहा लाख काय झक मारायचे घेतो न्यू जॉईनी.. नॉन सेन्स कुठले.. वाट्टेल ते बोलतात हरामी कुठले..”
“कोडींग मध्ये छळतायत तर.. बॉसने काहीच केलं नाय मग..?”
“त्याने माझीच समजूत घातली.. तो तरी काय करणार.. मला म्हणाला, अनिका यू कॅन गेट वर्क फ्रॉम होम इफ यु वॉन्ट.. त्याला पण माहिती आहे माझा छळ करतात म्हणून.. पण काही करता नाही येत.. माझ्याविरुद्ध एकी आहे ना सगळ्यांची..”
“दीदे दुसरीकडं काम कर मग..”
“हम्म्म ऽ.. पेपर्स टाकलेत मी.. नोटीस पिरियड वर आहे.. एक गोष्ट माझ्या बॉसने चांगली केली.. नोटीस पिरियड कमी केला माझ्यासाठी. काय जुगाड केला काय माहित त्याने.. पण निदान एवढी तरी मदत केली..”
“जाऊ दे दीदे.. त्या लोकांमुळे नको त्रास करून घिऊस आता..”
“मला हौस नाही अमृता त्रास करून घ्यायची.. पण मी जिथे जाईल तिथे मला माझ्याबद्दल वाईट ऐकून घ्यावं लागतं.. माझ्या स्वभावापर्यंत ठीक आहे.. मी फटकळ आहे.. समोरच्याचं ऐकून घेत नाही.. त्याबद्दल माझ्यावर टीका करा.. पण सरळ माझ्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेताय.. संशय पण नाही.. सरळ सरळ तुमच्या मनानेच सगळं ठरवताय.. मी काय केलं असेल, कसं केलं असेल, किती वेळा केलं असेल.. याला काय अर्थ आहे..”
“या लोकांना काय माहितीय माझ्याबद्दल.. किती ओळखतात हे मला.. त्यांना कुठला आला हक्क मला बोलायचा..”
“असं का..?”
अनिकाने अमृता कडे पाहिलं.
“म्हंजी तुला काही शंका वगैरे हुती का आधीच..?”
“आधी आधी नव्हती.. सुरुवातीचे पाच सहा महिने तर आमचं बोलणंच होत होतं.. साखरपुड्यानंतर तो चवताळला होता.. आता तरी आपण करू शकतो.. सारखं सारखं मला विचारत होता.. मला नंतर नंतर त्याच्यावर डाऊट यायचा.. त्याचा टच वेगळा होता मुलींसाठी.. माझं नशीब चांगलं म्हणून बरं नाहीतर वापरून सोडलं असतं त्याने मला..”
काही क्षण शांततेत गेले. कोणी काहीच बोललं नाही.
“दिदे मूव्ह ऑन हो या सगळ्यांपासून..”
“कधीच झालेय अमृता.. पण आमच्या घरच्यांना कोण समजावणार.. लग्न लग्न लग्न. एकच ठेका घेऊन बसलेत. जवाण पोरगी घरात आहे.. जवाण पोरगी घरात आहे.. आता मी काय करू घरात आहे तर.. रिकामी तर नाही ना.. कामच करतेय ना.. दिसत नाही का तुम्हाला.. नाही कोण लग्नाला तयार माझ्यासोबत.. मग आता काय जबरदस्ती करू काय..”
“आता मला काय वाटतं माहितीय अमृता, आई ऐवजी मी मेली असते ना तर बरं झालं असतं..”
“असं नको बोलूस दिदे. मरणाची भाषा करत जाऊ नकोस..”
“माझं जगणंच मरण झालंय.. असं जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट मग..?”
“खरं तर अमृता ही माझीच कर्म आहेत.. माझ्या चुकीच्या प्रेमाची शिक्षा मिळतेय मला.. ज्या ज्या लोकांना मी नकार दिलाय ना, त्या लोकांची हाय लागली आहे मला.. मी दिलेले नकाराच मला परत मिळतायत.. मी पण खूप केलं त्यावेळी.. एक हुशार मुलगी होते मी.. कमी वयात लाखोंच पॅकेज घेणारी एक सुंदर इंडिपेंडेंट मुलगी.. स्थळं अशी पालथी पडत होतीत एकमेकांवर.. मी काडीची किंमत दिली नाही कोणाला.. फक्त बायोडेटा बघून नकार दिलेत.. तोंड बघून एकेकाला जज केलंय. इतकंच काय अमृता एकेकाची लायकी काढली आहे मी अक्षरशः.. माझ्या पॅकेज सोबत कम्पेअर केलंय..”
“तुला माहितीये, आपण मठात गेलेलो मागे एकदा आई असताना.. आता हल्लीच..”
“आठवतंय की.. आइनं बोलावल्यालं म्हणून आल्तीस..”
“हां बरोबर.. तिथं काही मुलं होतीत.. माझ्यावर लाईन मारत होतीत.. तू मला विचारत होतीस बघ.. दीदे काय केलं सांगना असे का पळाले ते.. आठवतंय..?”
“हां ऽ हां ऽ.. रामाच्या मठात.. माहिताय की.. आता तर सांग त्यो किस्सा..”
“आई लय मागे लागलेली अमृता.. एकदा पोरासोबत बोलकी बोलकी म्हणून..”
“बर ..”
“खूप मागे लागली माझ्या.. कुठून स्थळ आणलेलं काय माहित.. कोण होतं काय माहित.. पण इतकी मागे लागली की विचारू नकोस..”
“मग..?”
“बर म्हटलं.. भेटायला नाही जमणार.. आधी फोनवर बोलते मग ठरवते..”
“काय म्हटली मग म्हातारी..?”
अनिकाने अमृताकडे पाहिलं..
“म्हंजी काय म्हटली मग आई..?”
अनिका डोळे तिरपे करून गालातच हसली. अमृता ही तिच्याकडे पाहत शरमेने लाजली. अमृताकडे पाहून मग आनिकाही हसू लागली. अनिकाला हसताना पाहून मग अमृताने ही तिला साथ दिली. तणावातलं वातावरण कमी झालं. अनिका मनमोकळी झालेली दिसू लागली.
“दिदे इथं असंच बोलत्यात गं.. रागान नाय.. खरं यातच आमचं प्रेम हाय..”
अनिका नुसतीच हसली.
“माहित आहे तुमचं प्रेम.. त्याविषयी कधीच शंका घेऊ शकणार नाही..”
“सांग सांग आता गमजा वाटालिया..”
“बर म्हणाली मग आई.. थोडी नाराज झाली पण एवढं काही नाही.. मग म्हणाली इथे नको बोलायला आपण मठात जाऊ..”
“आपण जाताना बघ तो मुलांचा ग्रुप पण मागे येऊ लागला होता.. आठवतंय तुला..?”
“व्हय चांगलंच..”
“त्या मुलांची चेष्टा मस्करी सुरू होती.. आधी आधी मी पण मस्करीत घेतलं.. पण नंतर नंतर त्यांचं पण ओव्हर झालं.. त्यातलं कोणीतरी म्हणालं की, “जमलंय लका.. हसतीया बघून.. तुझं भारीय आता.. तुला आता बाहेरलं बी गोरं घावल.. अन् आतलं बी गोरं घावल..”
“किती कमावतोस..?”
“ती मुलं एकदमच शांत झालीत.. नेमकं मी कोणाशी बोलतेय ते त्यांनाही कळत नव्हतं.. माझ्या कानावर फोन होता अन् नजर त्यांच्यावरती होती..”
“का शांत झालास.. बोल ना किती कमावतोस.. कमवायचं राहू दे तोंड बघितलं आहेस आरशात.. तो तर आहे का घरी.. आरसा घ्यायची तरी लायकी आहे का.. माझ्या रंगावर बोलतोस.. तुझं कसं आहे रे.. गोरंतर नसणारच.. तोंडच डुकराच्या गुवा सारखं काळं आहे.. ढुंगण पण काळच असणार.. लायकी आहे का तुझी.. आई बापाला राहू दे स्वतःला पोसायची तरी लायकी आहे का तुझी.. ब्लडी ॲसहोल्स..”
“कायतरी गैरसमज झालाय तुमचा.. फोनवरचा तो मुलगा बोलत होता.. रागाच्या भरात मी फोनवर बोलतेय हे सुद्धा माझ्या ध्यानीमनी आलं नाही..”
“ए चल निघ.. मी रागातच बोलले तशी समोरची सगळी मुलं एकमेकांकडे बघून पळून गेलीत..”
“माफ करा मी तुमच्याशी बोलत नव्हते.. ऍक्च्युली.. हॅलो.. हॅलो.. ऐकू येतंय का.. हॅलो..” फोन कट झाला होता..
“मी पुन्हा फोन केला.. उचलला नाही.. मी फोन करत राहिले.. मग कदाचित त्याने फोन स्विच ऑफ केला वाटतं.. आई मला विचारत होती.. ती पोरं काय बोलत होती म्हणून.. मी काही नाही म्हटलं.. फोनच विचारायला लागली मग.. मी सांगितलं तिला, फोन लागला पण तो मुलगा काहीतरी कामात आहे नंतर बोलूया बोलत होता म्हणून..”
“खोटं..?”
“काय दिदे, त्या पोरावर उगाच चिडलीस..”
“अगं मला पण कळालं नाही फोन कधी लागला अन् त्याने कधी उचलला.. मला इतका राग आलेला की विचारू नकोस..”
“नंतर तरी बोललीस का..?”
“कुठलं गं.. आईने मोबाईलच फेकला..”
“का..?” अमृता आश्चर्यचकित होऊन पाहू लागली.
“मी तिच्यासमोर एकदा परत फोन लावला.. नेटवर्क मध्ये नव्हता.. मी म्हटलं मग.. अगं रेंजमध्ये नाही वाटतं तो.. आईने मग मोबाईलच फेकला टॉवरच्या दिशेने..”
अमृता हसायला लागली. आनिका ही हसायला लागली.
“अगं खरंच.. मला सुद्धा खूप हसू येत होतं.. मी म्हटलं अगं आई रेंजमध्ये नाही वाटतं.. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे.. आईने इकडे तिकडे न पाहता सरळ मोबाईल फेकला गं टॉवरच्या दिशेने.. मी बघतच राहिले..”
“मग..?”
“मग काय.. मी शॉक मध्येच हसत होते.. आई बडबडत राहीली..”
“भाड्या बसं म्हणावं रींजमध्यी आता.. कुठं गु खाया गेला.. मुडदा बसिवला या टॉवरचा..” तशी अनिका हसायलाच लागली.. “आईच्या शिव्या माहिती आहेत ना तुला..?”
“चांगल्याच.. ए ऽ झडग्या ऽ.. ए ऽ खज्जाळीच्या.. येड्या गांडीच्या.. अगं ऽ टवळे.. ए ऽ काळ्या बोंड्या.. आरं ऽ हागतूस का आता..” तशी ती अनिकाच्या आज्जीची नक्कल करत तिच्या आवाजातच बोलू लागली.
“अगं अगं..” अनिका अमृताकडे बघून तिला थांबवत हसू लागली.
अमृता आज्जीच्या न ऐकू वाटणाऱ्या शिव्या हसत हसत तिच्या चालीत बोलू लागली. तिला बोलताना पाहून अनिका मन भरून हसू लागली. अमृता तिला आणखीनच हसवू लागली. काही वेळाने दोघीही शांत झाल्या. जोर जोरात हसणं हळूहळू कमी होऊ लागलं.
“आई गं.. बास आता आम्रे..”
“हन्न ऽ बघ.. आता कशी मनापासून हाक मारलीस..”
“काय..?”
“परत म्हण बगू..?”
“काय ते..?”
“आम्रे..”
अनिका तिच्याकडे हसून पाहू लागली.
“काय अमृता अमृता लावालीस आल्यापासनं.. परकं वाटालंय.. आम्रे कसं जीवाभावाचं असल्यावानी वाटतंय.. म्हन बघू..”
अनिकाचे डोळे पाण्याने भरले. अमृताने तिच्या हातावर हात ठेवला अन् म्हणाली, “म्हण की दिदे..”
“आम्रे..” अनिका भरलेल्या डोळ्यांनीच बोलून गेली. अमृता नुसतीच गालात हसली अन् तिचा हात थोपटू लागली. अनिकाने आपले डोळे पुसले.
“मग दिदे पुढे काय विचार केलायस..?”
“काहीच नाही.. जे होईल ते होईल आता.. मी आता फक्त माझं काम भलं नी आपण भलं असंच वागते..”
“हम्म्म ऽ.. चांगलंय.. खरं दीदे, सिगरेटचा नाद सोड.. लय बेकार हाय ते..” अनिका आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली.
अमृताने आपल्या खिशातून सिगरेटचं पाकीट तिच्यासमोर ठेवलं. अनिकाला लाजल्यासारखं झालं.
“मम्मीला सापडलं असतं तुमच्या.. मीच तुझी बॅग उचलली अन् काढून घेतलं..”
अनिका शांतच राहिली काहीच बोलली नाही.
“बघ दिदे मला माहिताय तू काय मजा म्हणून पीत नश्शील.. खरं तू अशी न्हायस एवढं मला ठाऊक हाय..”
“स्ट्रेस आहे खूप..”
“व्हय बरोबर हाय.. खरं फुकट का जीव घालवायचा..”
“असा पण जीव जातोयच ना..”
“म्हणून मग दुसऱ्यासाठी आपण का मरायचं..?”
“काय करू मग मी तूच सांग..?”
अनिका शांत मुद्रेने अमृताकडे पाहू लागली. अमृता ही तिच्याकडे पाहून मंद स्मित करू लागली.
“आम्रे एवढी मोठी कधी झालीस गं..?”
अमृता नुसतीच हसली.
“काय दिदे..”
“हम्म्म ऽ.. म्हणजे कोणीतरी आहे..” अनिका अमृताला चिडवत म्हणाली. अमृता गालातल्या गालातच लाजू लागली.
“कोण आहे..?”
“कुठं कोण..?”
“सांग की..”
“काय दिदे.. तू पण उगीच काय पण..”
“दीदी म्हणतेस ना.. मग आपल्यात चालतंय की.. तोच ना.. पुण्यात भेटलेला..
“कोण ते..?”
“ट्रेकिंगला एकदा भेटलेला तो.. बोलत होता ना तुम्ही..?”
“कधी ते..?”
“आता सगळं विसरलीस..?” ती तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहू लागली..
“पुण्यात व्हय..?”
“होय.. सांगत होतीस ना एकदा..”
“कुठलं काय दिदे.. मुंबईच्या पोरास्नी गावाकडल्या पोरी आवडत्यात व्हयं.. उगं टाईमपास म्हणून बोलत होतं बेनं..”
“खरंच की उगीच माझ्यापासून लपवायच म्हणून..?”
“अगं खरंच दिदे.. तसं काय न्हाय.. त्याव पुन्हा आम्ही बोलाय बी नाय..”
“बरं बाई नसेल सांगायचं तर राहू दे.. चालेल.. ठेव सिक्रेट..”
“अगं दिदे, गावाकडची साधी माणसं आम्ही.. खरंच तसं कोण न्हाय..” अमृता गालात हसत हसतच म्हणाली. अनिकाने नुसतीच तिच्याकडे तिरप्या नजरेनं पाहत मान खालीवर केली.
“आधी तुलाच सांगेन.. आता तर पटलं..?” अमृता तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली.
“ठीक आहे..” अनिका नाराजीच्या सुरात जमिनीकडे पाहत म्हणाली.
“दिदे असं काय गं..?”
“बरं बाई ठीक आहे.. पटलं तुझं.. नाही होत नाराज..” अनिका तिचे दोन्ही खांदे धरत म्हणाली. दोघीही गालातल्या गालात हसू लागल्या.
वारा सोबत गारवा आणू लागला. सूर्यास्त होऊन गेलेला त्यांना कळालं सुद्धा नाही. चंद्राच्या सावलीत दोघीही एकमेकांच्या अंगावर पडून पडून हसू लागल्या. त्यांचा उत्साह वारा स्वतःसोबत घेऊन वाहू लागला.
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!