शिक्षा
ग्रामीण भागात होणारी भ्रुणहत्या, मुलींचा होणारा बालविवाह यावर अजून आळा बसलेला नाही. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. महाराष्ट्रातील कित्येक ठिकाणी यासारख्या घटना अजूनही घडत आहेत. अशात या सारख्या लोकांना अंजूने दिलेली “शिक्षा” बरोबर होती की चुकीची होती ?
“शिक्षा – शिक्षणाची की बालविवाहाची ?”
डीएडची दोन वर्ष कधी पूर्ण झालीत कळालं देखील नाही. शिक्षणासाठी म्हणून कोल्हापूरात आले अन् या गावचीच झाले. दोन वर्षांपूर्वी कुठे ॲडमिशन मिळालंय, कशी राहशील खेडेगावात, मुंबईतपण आहेत चांगली चांगली कॉलेजं इथं ट्राय करूया म्हणून आईचं सतत बोलणं सुरू होतं. पण मी मुद्दामच खेडेगावात जाऊन शिकायचं असं ठरवलेलं. तसं पाहिलं तर लोकं शिक्षणासाठी, नोकरीसाठी खेड्यातून शहरी भागात येतात पण माझं नेमकं विरूद्ध होतं. याला कारणही तसं होतं. मला ग्रामीण भागात राहून तिथल्या शिक्षणाच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या. माझ्या शिक्षक पेशाची सुरवातच ग्रामीण भागात शिकून मला करायची होती. आता माझी विचारसणी सामाजिक आहे असं म्हणा किंवा स्वत:ची हयात समाजकार्यात वाहून घेतलेल्या वडिलांकडून आलेलं प्रबोधन विचारसरणीच रक्त म्हणा. माझा विचार समाज प्रबोधन हाच होता. वडिल तर नाही पण आई थोडी का होईना माझ्या या निर्णयाने नाराज होतीच.
मी आपली तयारी करून कोल्हापुरात येऊन स्थिरावले. बघता बघता इथल्या लोकांनी मला आपलसं केलं सुद्धा. माझं दोन वर्षांच डिएड केव्हा पूर्ण झालं हे मला कळालंसुद्धा नाही. आता इथल्या माणसांनी इतका लळा लावलाय की आता इथून जाऊ वाटेना. विशेषत: अंजूने. तिच्या नुसत्या हलक्याश्या आठवणीने ऊर भरून येतोय. किती जीव लावला पोरीने. अन् तिच्या नशिबी हे असं जिनं. जिनं कसलं मरणंच ते. पंधरा सोळा वर्षाची अंजू अन् तिनं असं करावं. अजून देखील विश्वास बसत नाही. एखादं वाईट स्वप्न असल्यासारखंच वाटतंय. पण हे स्वप्न नाही. हीच वास्तविकता आहे.
तिथं शहरी भागात आपल्याला मुलींची प्रगती होताना दिसते. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री चालताना दिसतेय. पण ग्रामीण भागात, इथं तर फारच वेगळी परिस्थिती आहे. अंजू सारखी हुशार पोर या कचाट्यात सापडावी ही फार दुर्दैवी गोष्ट. यात दोष तरी कुणाला द्यावा अंजूच्या नशिबाला, तिच्या दारिद्र्याला कि लोकांच्या कुजलेल्या बुद्धीला द्यावा हेच कळत नाहीय. आजही तो दिवस आठवतोय ज्या दिवशी मी पहिल्यांदा अंजूला पाहिलं.
ओढ्यातलं पाणी खळखळ आवाज करत वाहत होतं. सूर्याची किरणं पाण्यावर पडून पाण्याला सोनेरी चकाकी आली होती. पाण्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे तिचे डोळे चमकत होते. हातातला गणवेश दगडावर आपटून आपटून ती तिचा राग बाहेर काढत होती. अजून बादलीभर कपडे असूनसुद्धा ती बराच वेळ तिचा गणवेश दगडावर आपटण्यातच वेळ घालवत होती.
रविवार असूनदेखील ओढ्यावर आज म्हणावी तशी गर्दी नव्हतीच. नाहीतर एव्हाना यावेळी ओढ्यावर उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसायची. कपाळावर चिडलेल्या आठ्या आणत बडबडत बडबडतच ती तिचं धुणं धुत होती.
“कवा कळायचं आमच्या बाऽलाऽ ? दिसत कसं न्हाई त्याला. मागल्या एळेला म्हटला, “साळा सुरू झाली की घिवूया.” आता शाळंचा दिस पार उजडाय आला तरी कापडं घ्यायला न्हाईत अजून. आता काय मी बारकी ऱ्हायले ? कशी बसायची ही जुनी कापडं ? शी बाई मला नाय घालायचा ह्यो डिरेस.” तसं म्हणत तिनं हातातला गणवेश रागातच पाण्यात फेकला अन् तशीच एक हात डोक्याला लावत त्याच्याकडे पाहू लागली.
गणवेश तसाच पाण्यावर तरंगू लागला. दगडात अडकून राहिल्याने तो धड पुढं ही जाईना अन् मागही येईना. तो तसाच वाहत्या पाण्यावर तरंगू लागला. ती तशीच आक्रसलेल्या नजरेनं पाहू लागली अन् त्रागा करतच तिनं बादलीत हात घालून बाकीचं धुणं धुवायला सुरवात केली. तिची बडबड सुरूच होती. खरं तिचं ऐकणारं कोणी नव्हतं. वाहणाऱ्या पाण्यासोबतच तिच्या डोळ्यातून पडणारं पाणी एकरूप होऊन वाहत जात होतं.
सूर्य किरणं तिच्या मानेवर पडून तिची कांती उजळवत होते. तिच्या कपाळावर उमटलेले घर्मबिंदू गालावरून ओघळत तिच्या अंतवस्त्रात प्रवेशत होते. तिचं भिजलेलं कमरेइतकं शरीर तिच्या कामाची साक्ष देत होतं.
आधीच गोऱ्या वर्णाची त्यात सूर्यकिरणांनी उजळलेली तिची कांती पाण्यात मोहक दिसत होती. गोऱ्या वर्णाचं तिचं शरीर एखाद्या बाईला लाजवेल इतकं भरलेलं दिसत होतं. काळेभोर केस सूर्यप्रकाशात चमकत तिच्या मानेशी खेळत होते. त्यांचा अंबाडा बांधून जेव्हा ती धुणं धुत होती तेव्हा तिच्या शरीराची होणारी हालचाल मनाचा ठाव घेत होती.
“अंजेऽ झालं का न्हाई धुणं ?” कमरेवरची धुण्याची पाटी खाली ठेवत रूपालीने तिला आवाज दिला.
तिने मान वर करून सरळ माझ्याकडेच पाहिलं. चांगलं मिनिटभर तिच्या घाऱ्या डोळ्यांनी माझं नखशिखांत निरिक्षण केलं अन् काहीच न बोलता ती जोरातच हातातली विजार दगडावर आपटायला लागली. आम्ही दोघीही तिच्याकडे गोंधळून पाहत राहिलो.
“अशी का गं वैतागल्यास ?”
“तुला सांगून काय व्हणार रूपे.. माजं मलाच निस्तराया लागणार हाय.. य्यऽ अशी आत.. झालंय माझं आता..” तसं तिनं विजार पिळली अन् बादलीत टाकली.
“का गं बोल की नुसतंच मैतरीण म्हणायच अन् सांगायचं काय न्हाई. मग काय उपेग ?” रूपानं तिच्या हनुवटीला हात लावला अन् विचारलं, “अशी का उदास हायस सांग की ?”
“काय सांगायचं रूपे.” तिनं दगडात अडकलेला गणवेश उचलला अन् पिळत पिळतच बोलू लागली. “कवापासनं नानाला सांगालूय शाळंला कापडं घिवूया. जुनी कापडं आता न्हाई बसत मला. ताणून ताणून फाटाया आलीत पार. उद्या काय घालायचं म्या सांग बरं. ही फाटल्यालं कवा पातुर ठिगळं लावून वापरायचं.” तिनं हातातला गणवेश उल्टापाल्टा करत दाखवला.
“काय म्हणतूय नाना ?”
“घिवूयाच म्हणतोय निसता. आता कवा घिणार हाय कुणाला ठावं. उद्यापासनं तर श्याळा सुरू. कसं यायचं म्या ?”
रूपानं केविलवाण्या नजरेनं तिच्याकडं पाहिलं. तिचा कोमेजलेला चेहरा पाहून तिला कसंतरीच झालं. रूपा तिची जिवाभावाची मैत्रीण. बऱ्या-वाईट प्रसंगातली सोबतीण. तिच्या दारिद्र्याची तिला चांगलीच जाण होती. तिच्या वाढलेल्या शरीराकडं तिनं खालवर एकदा पाहिलं अन् म्हणाली,
“नको लय इचार करूस. अण्णानं घेतल्यात मला कापडं. जरा मोठीच हायत. तुला बसतील. मी वापरीन माजा जुना ड्रेस.”
“नको रूपे. माझ्यामुळं तुझ्या घरात भांडाण नको. आदीच काय कमी करत न्हाईस माझ्यासाठी.”
“गप बसतीस का. मी म्हटलंय न्हवं, माजा वापर म्हणून.”
“नको तरीबी. मला नाय बरं वाटणार ती. ऱ्हाऊ दे.”
“मग काय फाटल्याली कापडं घालून येणार हाईस. बग जरा सवताकडं कशी वाढल्यास ते.”
“माज्या आई-बाऽला दिसंना त्याला काय करणार म्या.”
“म्हणूनच म्हणालोय, तवर वापिर माजा ड्रेस. तुला कापडं घितली की दे माजा मला. मी काय न्हाय म्हणत नाय.”
“पर्रऽ”
“आता गप बसतीस का.” रूपानं तिचा दंड धरत तिला गप्प केलं. ती अपराधीपणाच्या भावनेनं तिच्याकडे पाहतच राहिली. शरमेनं दोन तीन आसवं गालावर आलीत अन् तिचा हुंदका दाटून आला. रूपाच्या गळ्यात पडून तिनं डोळ्यातला पाऊस ओढ्यात वाहू दिला. मन हलकं फुलकं झालं. हुंदकत हुंदकत तिनं डोळे पुसून घेतले.
“गप आता. कुणाला काय बोलू नगंस. काय मागू नगंस. मी गपचुप तुला कापडं आणून देते. गपगुमान घाल. कळलं का ?”
तिनं खाली बघून डोळे पुसतच मान डुलवली अन् माझ्याकडे बघत म्हणाली,
“मैतरीण कोण म्हणायची ”
“मैतरीण न्हाय. म्हंजी मैतरणीच, खरं मॅडम हायत ह्या.” रूपा जरा गोंधळूनच माझा परिचय करून देऊ लागली.
“असं का गं येडबाडल्यावानी.” गालावरची खळी खुलवत ती आम्हां दोघींकडे पाहू लागली.
“अगं म्हंजी जावडेकरमधी शिकत्यात मॅडम. प्रतिभा नाव हाय ह्यांच. पलीकडच्या गायकवाडांच्या खोलीवर ऱ्हात्यात. मॅडम हायत, खरं मैतरीणीवाणीच हायत मला. आज सुट्टी म्हणतानं चला म्हटलं मीच वड्यावनं कापडं धुन ईवू.”
“असं व्हय. ताई कंच्या गावची म्हणायची मग. चालल न्हवं ताई म्हटलेलं का मॅडमच म्हणायचं.” ती हसूनच माझ्याकडे पाहू लागली.
“चालेल की त्यात काय.” मीही हसूनच तिला प्रतिसाद दिला अन् म्हटलं, “मुंबईची आहे मी.”
“व्हय. मंबय सोडून इकडं बरं आलात शिकायला.”
“होय आले आता.”
“इकडं काय हाय ताई शिकण्यासारखं नुसतं खेडं हाय ही खानापूर. चांगलं शहरातच शिकशिला की नाय.”
मी गालावर हसू ठेवून शांतच राहिले, अन् म्हणाले “होय आले आता नशिबाने काय करणार.”
ती गालातच मंद स्मित करत राहिली अन् म्हणाली, “चालायचं.” तसं तिने कमरेला आवळलेली ओढणी सोडून अंगावर घेत पायजमा खाली केला अन् धुणं धुतलेली बादली उचलत ती घराकडं जायला निघाली.
“रूपे आवरलं कि आवाज दे गं.. ईवू का ताई घराकडं जाया पायजे कामं पडल्यात.” तशी ती भरभर निघूनही गेली. रूपा अन् मी तिची पाठमोरी आकृती पाहत तश्याच उभ्या राहिलो.
धुण्याची बादली खाली ठेवून पडवीत बांधलेल्या दोरीवर तिनं धुणं वाळत घातलं. म्हशीला दोन बादल्या पाणी दावलं. वैरणीची एक पेंड सोडून तिच्याम्होरं टाकली. चुलीम्होरं येऊन जळकांडं घातलं. शेणकुटं घालून चुलीतला जाळ वाढवून त्यावर तवा ठिवला. जर्मनच्या चेपलेल्या परातीत जुंदळ्याचं पीठ घिऊन भाकऱ्या थापायला घेतल्या. सा ऽ माणसांच्या भाकऱ्या थापल्या. तवा उतरवून घेतला. त्यावर भाताचं भगुणं ठिवलं. बुटीएवढ्या भगुण्यात वरण्याचं सार कराय घेतलं. कोरड्याला काय करायचं म्हणून घरभर नजर फिरवली. निराशनं मान हलवून चुलीतला जाळ बाजूला सारला. रानातनं आणलेली चार कणसं चुलीत भाजून काढली. स्वयंपाकतेन उरकला.
पाटीभर श्याण घेऊन सगळं घर सारवून घेतलं. उरलेल्या शेणाच्या शेणकूट्या थापायच्या म्हणून पाटी तशीच गोठ्यात ठिवली. वड्याकडं जाऊन ओढ्यातल्या पाण्यानं हातपाय चांगलं धुऊन घेतलत. येऊन घरासमोरच्या खाटंवर बसली. शांत. एक दिर्घ श्वास घेतला. तांब्याभर पाणी प्यायली अन् आई-बाऽ रानातनं कवा यायचीत म्हणून वाट बघत बसली. खाटंवर बसल्या बसल्या घराच्या पडलेल्या भिंतीवर एक नजर टाकली अन् शून्यात पाहत कुठच्या कुठं हरवून गेली.
दोन हजार पाच साली आलेल्या पुरात घर पडलेलं. कुणाकडनं तर कुणाकडनं मदत घेऊन, उसनं घेऊन कश्याबश्या भिंती उभारल्या होत्या. कच्याच. त्या आजपावेतो तश्याच. बापाला दारूतनं कधी वेळच मिळाला नाही. आईच्या भांगलणीचा पैसा सगळा पोरांच्या जेवणाखावणाला, शाळंला पुरता पुरला नाही. घरासाठी काय म्हणून करणार ! बाप कवातर पैसं कमवायचा अन् सगळच्या सगळं दारुत घालवायचा. पोटाला चार पोरं काढून ठेवल्यात त्याचं काय नाय. वाटणीचं रान म्हणून काय नाय. कुठंतर कुणाच्यात भांगलाय जायचं, लावणीला जायचं, फवारणी करायची. ह्येच्या तेच्या रानातनं जेवणाला काय तर म्हणून आणायचं. चार भाकरीचं आठ वाटं करायचं. कसं तर करून चार पैसं मिळवायच अन् नशिबाला आलेलं अठरा विश्व दारिद्र्य गपगुमान सोसत जगायचं. कुणाला काय बोलायचं नाय का विरंगुळा म्हणून काय करायचं नाय. विरंगुळा करणारा एकच विरंगुळ्या म्हणजे नाना.
नानाची ही मोठी पोर अंजना. पोराची आस लावून बसलेल्या नानाला नंतरही दोन मुलीचं जन्माला आल्या. कालांतरानं विरंगुळ्याला यश आलं. पदरी मुल आलं अन् भाकरीचं होणारं वाटं वाढलंत. भावंडाना सांभाळता सांभाळता अंजनाच्या वाट्याला मायेचं वात्सल्य अन् दुधातली माया कधी आलीच नाही.
अंजना तशी हुशार. नजरेनं तेज. बुद्धीनं चलाख. नाका-डोळ्यानं सुरेख. अंगकाठीनं भरलेल्या चवळीची शेंगच. स्वभावानं शांत पण गरज पडली तर तलवारच. धारधार, चमकदार, चपळदार अन् सरळ छातीत वार करणारी तळपदार तलवार. खरं दारिद्र्याच्या धुळीखाली ही धारधार तलवार नैराश्यातच पडून राहिली. मन भरून कधी चमकलीच नाही.
दिवसागणिक वाढणारं दारिद्र्य ढकलत ढकलत अंजना मोठी झाली. सोबतची भांवडं वाढवलीत. आई-बाच्या मागं सांभाळलीत. हवं नको ते सर्व बघितलं. घासातला घास दिला. वाटणीतला श्वास दिला. बालपण गमावलं. मोठं बनून जगणं राबवलं. स्वत:ला दारिद्र्यात हरवलं अन् स्वत:ला शून्यातच कुठं तरी गमावलं.
भावंडं नजरेसमोर हातात भाजलेली कणसं घेऊन नाचू लागलीत तेव्हा कुठे तिला शुद्ध आली. ती नुसतीच गालात हसली. “आक्के जेवाय ये की गं कुठं हरवल्यास कवाच्यानं” चुलीसमोर बसलेल्या आईनं आवाज दिला.
“आलो ऽ” म्हणत ती उठली. संगसंग दोन घास जेवायला बसली.
“जाणार हायसा ?” तिच्या आईनं नानाला विचारलं.
“व्हय तर. पाव्हणा आज याच्चं ऽ म्हटलाय. जातू. मोकळं काय ईत न्हाय.” तसं म्हणत नाना तांब्याभर पाणी प्याला अन् सदरा विजार बदलत एमएटीवरनं गेला.
“काय गं नाने. कसली जोडणी म्हणाल्त नाना ?”
नानीनं तिच्याकडं पाहिलं अन् काही न बोलताच भाताचा घास खाल्ला. तिनं मग काहीच विचारलं नाही. ती तशीच शांत चित्ताने समोर वाढलेलं जेऊ लागली.
संध्याकाळी नाना आला तो किलोभर मटण घेऊनच. सगळ्या घरात मटण शिजतेला वास घुमत होता. चिल्लि-पिल्ली आज भलतीच खुश होतीत. दोन वर्षाचं दाद्या जर्मणच्या बारक्या ताटलीत मटनाचं हाडूक चोकून चोकून खात होतं अन् मधनंच अळणी रश्याचा झुरका मारत होतं.
नाना नानी पण भलतीच खुश दिसत होतीत. आज नाना दारूची बाटली थेट घरात घेऊन आलेला अन् नानी काहीच बोलत नव्हती. एक चपटी मारून नानानं बाहेरल्या खाटंवर बस्तान ठोकलेलं. नानी गालातल्या गालातच हसत भाकऱ्या थापत होती. अंजना मात्र हे सर्व पाहून मूग गिळून गप्प होती. तिला काय चाललंय तेच कळत नव्हत.
सकाळपर्यंत घरात कोरड्याला काय नव्हतं. मटण फक्त गल्लीत मुसलमानांचा कार्यक्रम असल्यावरच नशिबात होतं. अन् आज घरी शिजतेलं किलोभर मटण, दारूची बाटली बघून ती जरा हैराणच होती. तिनं खाटंवर बसलेल्या नानाला जाऊन विचारलंच.
“नाना कुणी दिलं एवढ मटाण ?”
नाना नुसताच गालात हसू लागला. मान गोलगोल फिरवू लागला. भुवया नाचवू लागला अन् तोंडातनं देशी दारूचा वास सोडत म्हणाला, “दिलं पाव्हण्यानं.”
तोंडासमोर आलेल्या कुजमट वासाने ती मागे सरली अन् शंकेनच तिनं विचारलं, “कंच्या पाव्हण्यानं अन् का ते ?”
“खुश्श्श ऽ केलं म्या पाव्हण्याला खुश्श्श ऽ”. नाना तोंडाचा चंबू करत म्हणाला.
“पैसं पिन मिळालं ?”
“चिक्कार्रर्रर्र ऽ ऽ”
क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू तरळलं अन् आनंदाच्या भरात ती म्हणाली, “मंग मला श्याळंची कापडं घ्यायचीत उद्याला.”
नाना विषण्णपणे चेहऱ्यावर हसू ठेवत उठला अन् म्हणाला, “त्येची आता काय बी गरज न्हाय.” अन् हसत हसतच वड्याकडं गेला. ती नानाची पाठमोरी आकृती बघतच बसली. परिस्थितीनं तिच्यापुढं आता काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पना नव्हती. अंधारात बघत बघतच दारिद्र्याची लाट तिला अंध:कारात ढकलत निघून गेली.
अंगावर जवाणीचं मांस चढतच होतं तोवर शरीर पिवळं पडलं. हातापायाला मेंदीचं रंग रंगलं. डोक्यावर मुंडावळ्या चढल्या अन् गळ्यात डोरलं लटकलं. पाच हजार रोख अन् किलोभर मटणापरिस नानाणं पोरीचा सौदा केला. पोरीचं लगिण करून मोकळा झाला. साळंची कापडं घ्यायची कटकट कायमची मिटवून आला.
गावातल्या गावातच तिचं लग्न लावून दिलं होतं. तसं पाहिलं तर तिचं सासर चांगलं होतं पण खेडवळ बुद्धीचं होतं. नवराही चांगला होता. पण दूर्बुद्ध होता. बाप सांगेल तसं ऐकायचा, तो म्हणेल ते करायचां. तुळशीपुढं नारळाचं झाड उभं राहावं तसा त्यांचा जोडा होता.
तरीही बापानं केलेला सौदा तिच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. तिचं बालपण कायमस्वरूपी संपवून टाकलं होतं. शिक्षण बंद झालं होतं.
कालपर्यंत ती घरातली सर्व कामं करत होती. पण आता सासरी आल्यापासून रानातल्या कामाचा पण व्याप तिच्या मागे लागला होता. घरातली धुणीभांडी असू दे, जनावरांच श्यानघाण असू दे, स्वैपाकपाणी असू दे का बारकी सारकी कामं असू दे सर्व कामासाठी फक्त अंजूच होती. गरिबीत वाढलेली, दारिद्र्यात झिजलेली अंजना कोवळ्या वयात बाई बनून राबू लागली. कष्टाची कामं करू लागली.
इळभर मजूरी करून रातभर खाल्लेले झटके तिला सोसवत नव्हते. पण सांगून कोणाला कळणार होतं. बाईचं दु:खण होतं ते, तिचं तिलाच झेलायच होत.
दिवस जातील तसे तिला सर्व गोष्टींची सवय होऊ लागली. हळूहळू सर्व गोष्टी तिच्या सवयीच्या होऊ लागल्या. कामाचा व्याप थकवेचा सोबती झाला. आहे त्या सुखात ती समाधानाने जगू लागली.
एक दिवस दवाखान्यातून थेट माझ्याकडे आली.
“ताई ताई, आता मी पण आई हुणार हे घे पेढं. पहिलं तुलाच देत्या बघ. इसरू नको. अजून कुणाला सांगितलं बी नाय म्या.”
“अंजू काय गं हे एवढी मोठी झालीस.. पास होण्याचा पेढा द्यायचा सोडून सरळ गरोदरपणाचा पेढा घेऊन आलीस.”
“चालायचं ताई.. आमच्या नशिबात इथ हीचं व्हतं. आज ना उद्या ही व्हायचंच व्हतं.”
“होय खरं निदान दहावीची तरी परिक्षा द्यायची होतीस. बोलायचं होतंस घरी शिकायचंय म्हणून.”
“आमचा बा ऽ तुमच्या पप्पावानी असता तर मंग लय झालं असतं ताई. कुठलं काय घिवून बसतीस. गावाकडं नाय चालत शिकून. पोरीचं अंग वाढत्यालं दिसलं की तिचं हात पिवळं व्हत्यात. तिनं हातातली पेन्शिल टाकायची नी गळ्यात डोरलं घालायचं.”
“एकदा मला बोलली असतीस तर मी भेटले असते तुझ्या आईवडिलांना. लग्नानंतर एकदाही भेटायला आली नाहीस. अन् आता येतेस होय ते पण गरोदरपणाचा पेढा घेऊन.”
“कुठल्या तोंडानं येणार व्हते म्या. सांग की तूच तायडे ऽ, तुझ्याजवळ बसून शिक्षणाच्या बाता मारणारी मी, अधिकाऱ्याची स्वप्न बघणारी मी, काय म्हणून तुला तोंड दाखवणार व्हते.”
“तरी पण अंजू एकदा बोलायचं होतंस मला. मी केली असती तुझी मदत. तुझ्या आईवडिलांशी बोलले असते मी. तुझी अभ्यासूवृत्ती समजवून सांगितली असती मी त्यांना. शिक्षणासाठी तुम्हांला अजिबात खर्च आला नसता. अगं हल्ली सरकारच्या किती योजना येतात माहितेय तुला.”
“ऱ्हाऊ दे ताई. आता काय नाय व्हायचं. अन् तसं बी तुझं पुढारलेलं इचार माझ्या मागासलेल्या बाच्या कुजलेल्या बुद्धीला पटलं नसतं. चांगलं इचार फक्त ऐकाय चांगलं वाटत्यात प्रत्यक्षात तसं कोण बी वागत नाय. हाणून बदडवूनच समदं मिळवावं लागतंय.”
बोलता बोलता तिची शून्यात हरवलेली नजर मी शांतपणे पाहत तशीच उभी राहिले. नेमकं कोण बरोबर कोण चुकीचं यातलं मला काहीच कळत नव्हतं. पण अंजनानं आता आहे ती परिस्थिती स्वीकारलीय हे चांगलं कळून चुकलं होतं.
काही दिवसांनी रूपा धावत धावतच माझ्याकडे आली अन् मी एकदम सुन्नच झाले.
“ताई अंजीचं प्वॉट फाडलंय. दवाखान्यात नेल्या तिला. तिच्या नवऱ्याला अन् बापाला पोलिसांनं पकडून नेलंय.”
“काय.. ?” कडाडत्या विजेसारखी मी कोसळले. माझ्या पायाखालची जमीन सरकली अन् भोवळ येऊन मी पडले.
“ताई अगं ताई.. तायडे ऽ ए तायडे ऽ..” रूपाचा गोंधळ उडाला. मला शुद्धीवर आणण्याकरीता तिनं आकाशपातळ एक केलं.
“तायडे ऽ उठ की.. अशी का कराल्यास..?”
मिनिटभरात मी जागी झाले. मी जे ऐकलं याचा अजून मला विश्वास बसत नव्हता.
“रूपा असं झालं तरी काय..?” मी दम खातच बोलू लागले.
रूपानं मला सावरलं. पाणी प्यायला दिलं. “ताई आधी शांत हो. आदी स्वत:ला संभाळ तू.”
“आधी मला सांग काय झालं ते.”
“काय सांगू ताई.” रूपा रडवेल्या चेहऱ्याने बोलू लागली.
“अगं तिच्या नवऱ्यानं कुठल्या दवाखान्यात नेल्त म्हणं गिपचिप. डाक्टरीन म्हटली की, “पोरीच्या पोटाला पुरगीच जनमणार.” तवापासनं वाटतं तिच्या सासरकडची मागं लागल्यालीत, पाड म्हणून.”
“काय सांगत्येस.. मग..?”
“मंग काय.. अंजी काय तयार नव्हती. नवऱ्यानं तिला लय बदडली. रागारागात म्हटला की, “तुझ्या बा ऽ ला आनी एक पाच हजार, देशी दारू नी किलोभर मटाण दिवून त्येच्याकडनंच ही काम करून घेतो का नाय बघ. तरी बी ऐकत नश्शील तर तुझ्या भणीसंगच लगीन करतो.”
“अंजी तशीच बा ऽ कडं गेली अन् दारू-मटणापाई माझा सौदा केलास म्हणून बडवून घ्याय लागली. दिवळीतला इळा घिवून बग तायडे ऽ..” तशी ती रडूच लागली.
मी सुन्नच झाले. ऐकलं ते खरं की खोटं यावर अजूनही विश्वास बसेना. अन् त्याऊपरही आपल्या अंजू सोबत असं झालंय यावर तर बिलकूल नाही. पुढचे बरेच दिवस हे सर्व खोटं आहे अन् मी एक वाईट स्वप्न पाहिलंय असंच मला वाटत होतं.
अंगात बळ आणून मी अंजूला भेटायला दवाखान्यात गेले. ती चेहरा पाडून हरवून गेली होती. मला पाहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. ढसाढसा ती रडू लागली.
“अंजू काय झालं गं हे..?” मी भरलेल्या डोळ्यानेच तिला विचारलं.
हुंदके देत देत ती शांत झाली अन् इकडेतिकडे कोण नाही ते पाहून संथ आवाजात बोलू लागली,
“माझ्या बानं दारूपाई माझा सौदा केला. माझं शिक्षाण सुटलं. तरीबी मी समदं इसरून संसाराला लागले. मुल जन्मायच्या बी आदी माझ्या पोटाला पुरगीच जनमणार म्हणून माझा नवरा वटवट करू लागला. आज ना उद्या काय बी करून त्यानी मुल पाडलंच असतं. तसं झालं नसतं तर त्यानी, दुसरं लगीन केलं असतं. मला टाकून दिली असती. जिच्याशी लगिन करणार तिच्याबर बी हिच समदं झालं असतं. त्यांचा अडाणीपणा काय गेला नसता. पोरापाई पोरीचं दिलेलं बळी काय थांबणार नव्हतं. म्हणून मंग माझं मीच इळ्यानं प्वॉट फाडून घितलं. पोलिसांस्नी सांगितलं, बानं नी नवऱ्यानं छळून मारलंय म्हणूनश्यान.”
माझे डोळे भिरभिरू लागले. मी काय ऐकतेय ते काही क्षणासाठी माझं मलाच कळत नव्हतं. थक्क होऊनच मी अंजूला विचारलं,
“पण हे सगळं करून तुला काय मिळालं अंजू ?”
“शिक्षा. माझ्या बापाला मिळाली. माझ्या नवऱ्याला मिळाली. वंशाला दिवाच पायजे म्हणणाऱ्यांना मिळाली.”
“अन् तुला शिक्षा मिळाली ती ?”
“असं तुला वाटतं तायडे ऽ. मला मिळालेली शिक्षा न्हाय संधी हाय. शिक्षणाची.”
कुत्सित नजरेने तिला बोलताना पाहून मला तिची झिट येऊ लागली. मी तशीच रागात उठले अन् दवाखान्यातून बाहेर पडले. जाता जाता माझ्या डोक्यात एकच विचार येऊ लागला.
सरकारने इतकी जनजागृती करूनही ग्रामीण भागात होणारी भ्रुणहत्या, मुलींचा होणारा बालविवाह यावर अजून आळा बसलेला नाही. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. या लोकांना अंजूने दिलेली शिक्षा बरोबर होती की चुकीची होती. की अंजूने स्वत:ला दिलेली शिक्षा बरोबर आहे की चूकीची आहे.
माझ्या समाज प्रबोधनपर विचारांना लाथ मारत अंजूनं केलेली कृती माझ्या पुढच्या वाटचालीला आव्हान देणारी होती.
समाप्त
हे देखील वाचा 👇
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!
अप्रतिम कथा अक्षय ! 👌🏻💐
ही कथा मुलींच्या शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकते आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. मुलीला शिकवणे म्हणजे एक कुटुंब, समाज, आणि राष्ट्राचे भविष्य घडवणे होय. कथेतून आलेला संदेश प्रेरणादायी असून तो मुलींना स्वप्नांच्या वाटेवर चालण्याचा आत्मविश्वास देतो. कथेची मांडणी सुंदर, हृदयस्पर्शी आणि विचार प्रवर्तक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना स्वावलंबी बनवण्याचा हा दृष्टिकोन सर्वांसाठी प्रेरणा ठरावा. 🙏🏻