अदृश्य वेदना

      मनातलं दु:ख लपवून चेहऱ्यावर हसू ठेवण अवघड असत. कितीतरी वेदना मनातल्या मनातच सहन कराव्या लागतात. या वेदना प्रत्येकाला दिसणार नाहीत, जाणवणार नाहीत परंतु अशा “अदृश्य वेदना” बापमनाला नक्की स्पर्श करतील.

“बापमनाची अदृश्य वेदना

    हातातल्या भाजीच्या पिशव्या त्याने स्वयंपाकघरात जाऊन ठेवल्या. तांब्याभर पाणी घेऊन सोफ्यावर बसला. गट्ऽ गट्ऽ आवाजात एका दमात पाणी पिलं. चार माळे चढून चांगलाच दमला होता तो. दमलेल्या नजरेनेच घरभर नजर फिरवली. नजरेला दिसत होता तो नुसता पसारा अस्थाव्यस्थ पडलेला ! थोडा श्वास घेतला अन् घर आवरू लागला. पोरीची पडलेली खेळणी, तिच्या बाहुल्या व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवल्या. धुवायची कपडे गोळा करून वॉशिंग मशिनमध्ये टाकलीत. मशिन चालू करून बाकीचं काम उरकायला घेतलं. बेसिनमध्ये पडलेली खरकटी भांडी धुतली. गॅस आणि किचनकट्यावरून फडकं फिरवलं. हॉलमधलं अस्थाव्यस्थ पडलेलं सामान जागोजागी ठेवलं. बिछाना व्यवस्थित केला. कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवल्या. खिडकित ठेवलेल्या फुलझाडांना पाणी घातलं. सगळं घर चांगलं झाडून घेतलं. फिनेलच्या पाण्यानं चांगला पोथा मारून घेतला अन् तसाच मोठमोठे श्वास घेत जमिनीवरच पडून राहिला.

    आज सकाळीच तो गावावरून आला. तो आला अन् ती घाईतच कामावर निघून गेली. धड नीट भेटताही आलं नाही अन् बोलताही आलं नाही. आल्या आल्याच मोठ्या मुलीची शाळेला जाण्याची तयारी सुरू झाली. घाई-गडबडीत पोरीचं उरकलं. तिची वेणी बांधत बांधंत तिला नाष्टा करून दिला. रात्रीच दोन चपात्यांच मळून ठेवलेलं पीठ फ्रिजमधून काढलं अन् दोन चपात्या करून घेतल्या. रात्रीची भाजी गरम करून भाजी-चपाती डब्यात भरली.

    मुलीला घेऊन पळत पळतच गेटसमोर जाऊन उभा राहिला. शाळेची बस वेळेत मिळाली अन् त्यानं नि:श्वास सोडला. तिसऱ्या माळ्यावर पोचताच बारकीचा रडण्याचा आवाज कानावर आला अन् त्यानं धूम ठोकली. पळत पळत जाऊन धडपडत दरवाजा उघडला अन् तिला मिठित घेतलं.

    घड्याळाकडे नजर टाकली अन् तिची नर्सरीला जाण्याची तयारी सुरू केली. बाथरूमच्या दारापासून ते नर्सरी शाळेच्या दारापर्यंत होणारी सर्व तयारी झाली. खाऊनं अन् फळांनी भरलेली तिची बॅग घेऊन जवळच्याच नर्सरी शाळेत तिला सोडून आला. पुन्हा फेरी नको म्हणून येता येता बाजार करतच आला. दम टाकत टाकतच इमारतीचे चार मजले चढला अन् ‘मिरामुकूंद’ ची पाटी असेलेलं दार उघडलं.

    आयुष्यानं त्याच्या वाट्याला दु:खच जास्त आणलं होतं. न कळणाऱ्या वयात आजारपणानं सोडून गेलेल्या आईचं दु:ख. घर सांभाळण्याच्या देखरेखीत गमावलेलं हसण्याखेळण्याचं दु:ख. अर्ध्यापोटी राहून केलेल्या मजुरीचं दु:ख. वाढत्या वयातल्या जबाबदारीनं हिसकावलेलं शिक्षणाचं दु:ख. गरीबीच्या दिवसांनी आणि दारिद्र्याच्या रात्रींनी सट् सट् चाबकाचे फटके मारत मोठं केल्याचं दु:ख.

    शिक्षण कमी असल्यानं मुकूंदला चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं अवघड गेलं. पण कुठंतरी पुण्य कमावलं होतं म्हणूनच की काय वडिलांच्या ओळखीनं कारखान्यातली सुपरवायजरची नोकरी मिळवणं सोप्प गेलं.

    आत्तापर्यंत लग्नाचं वय झालं होतं खरं लग्न करण्यासाठी सोबत कोण नव्हतं. अपेक्षांच्या किंमतीपुढे चारित्र्याची किंमत मेळ घालत नव्हती. वाढत जाणाऱ्या वयामुळे नैराश्याची दरी रात्रंदिवस आत-आत ओढतच होती. पण म्हणतात ना कुणासाठी कोणतरी बनलेलचं असतं ! तसंच काहीसं झालं अन् ‍मिरा नावाच्या समुद्रानं नैराश्याची लाट परतवून लावली.

    काहीतरी देण्याच्या बदल्यात काहीतरी हिसकावून न घेणारं ते आयुष्य कसलं ! लग्न तर झालं परंतु बायकोच्या सरकारी नोकरीमुळं त्याला कारखान्यातली नोकरी सोडून, वडिलांना भावंडांना सोडून, गावापासून दूर मुंबईत यावं लागलं.

    जुन्या स्पर्धेला नावं ठेवलीत म्हणूनच की काय आयुष्यानं नव्या स्पर्धेत उतरवलं. अन् लग्न नावाच्या चाबकाचा एक प्रेमळ फटका मारत नव्या जोखमीपुढं उभं केलं.

    मोबाईलची रिंग वाजू लागली अन् त्यानं डोळे उघडले. अर्धवट झोपलेल्या अवस्थेतच मोबाईल कानाला लावून बोलू लागला.

    “हां ऽ”

    “झोपलायस ?”

    “ह्म्म्म ऽ”

    “काही नाही. पिऊला मी घेऊन येते. तेच सांगायला फोन केलेला.”

    किती वाजले बघायला म्हणून त्याने डोळे पूर्ण उघडले अन् ताडकन उठूनच बसला. अंघोळपाणी उरकून रात्रीचं राहिलेलं जेवण गरम केलं अन् जेवायला बसला. भूक होती खरं जेवण जात नव्हतं. दोन दिवसापासून सतत छळत असलेली वेदना घास घश्याखाली जाऊ देत नव्हती. त्यानं तसंच ताट स्वयंपाकघरात जाऊन ठेवलं अन् पुन्हा झोपी गेला.

    संध्याकाळी मुलींच्या आवाजानेच त्याला जाग आली. दोन दिवसानंतर आलेल्या आपल्या बाबाला पाहून दोन्हीही मुली खुशीतच होत्या.

    तिने पोरींचा “बाबा-बाबा” म्हणून चाललेला गोंधळ ऐकला अन् स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारलं, “झाली झोप ?”

    “ह्म्म्म ऽ” त्यानं नुसतीच हसून मान डोलावली.

    “तरी तुला सांगत होते मुकूंदा, नको त्या एसटीने येऊस. धड बसायलाही नीट मिळणार नाही.”

    तो काहीच बोलला नाही. मुलींसोबतच खेळू लागला.

    “जेवला नाहीस सकाळी. चल उठ आवर. आधी जेऊन घेऊया.”

    तिने पटपट गरम गरम जेवण वाढायला घेतलं. फ्रेश होऊन तोही बसला. मुलींसोबत हसत-खेळत, एकमेकांना घास भरवत जेवणं पार पडलीत. मुलींची इच्छा नसताना सकाळच्या शाळेची आठवण करून देत देत त्यांना झोपवलं अन् स्वत:ही अंथरूणात पडला. त्याचा शांत झालेला स्वभाव पाहून तरी तिने हळू विचारलंच,

    “काही झालंय का मुकूंद ?”

    “नाही काही नाही.” म्हणत त्यानं डोळे झाकले.

    शाळेतल्या मित्रांनी ठरवलेल्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमात खरं तर त्याला जायचंच नव्हतं. पण तिनेच आग्रह केला म्हणाली, “जा अश्या वेळीच जुन्या मित्रांची भेट होते. जुन्या आठवणी ताज्या होतात. तसंही मला सुट्टी आहे. मुलींचीही काही काळजी नाही. जा तू.”

    तिच्या आग्रहापुढे त्याचं काही चाललं नाही. इतक्या वर्षानंतर जेव्हा सर्व मित्र भेटले तेव्हा त्यालाही सुरवातीला आनंद झाला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. वर्गातले किस्से नव्याने खुलले. पण जेव्हा प्रत्येकानं आपली कहाणी सांगायला सुरवात केली तसा हा शांतच झाला. प्रत्येकजण आज कोणत्या ना कोणत्या पदावर कार्यरत होता. कोणी सरकारी नोकर होतं, कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये उच्च पदावर होत, कोणी आयटीत चांगल्या पगारावर होत, तर कोणी यशस्वी व्यावसायिक होत. वर्गातला तो-तो मित्र आता कुठे असतो, काय करतो ह्या सर्व गोष्टींची खोदून खोदून चौकशी झाली.

    हा आपला शांतच होता. काय बोलणार होता तो तरी. बरेचसे मित्र आयुष्यात यशस्वी झालेले तर काही वयाच्या चाळीशीतही धडपडत होते. अन् त्या काहींत हा अग्रभागी होता. मित्रांसोबत जास्त काही मनातलं न बोलताच तो घरी परतलेला.

    आयुष्यात अपयशीच राहिल्याची भावना त्यालाही सतत बाभळीच्या काट्यासारखी टोचत होती. तोच सल मनात घर करून बसलेला. मनातले विचार झटकत तो उठला अन् सरळ बाहेर जिन्यावर येऊन बसला. शांत.

    त्याला असं बाहेर गेल्याचं बघून तिही गेली. अलगद त्याच्या शेजारी जाऊन बसली.

    “असं बाहेर येऊन का बसलास ?”

    “काही नाही असंच. का उठलीस ? उद्या जायचंय ना कामावर.”

    “ह्म्म्म ऽ जायचंय.. तुमचं गेट टुगेदर कसं झालं ?”

    “झालं चांगलं.”

    “काही झालंय का असं शांत शांत का आहेस ?”

    “कुठे काय. काहीच नाही.”

    “आज ओळखत नाही तुला मी मुकूंदा. सांग काय झालंय ते.”

    “काय सांगणार.. काय कळतच नाहीय.. आयुष्यात काय चालंलय ते.. जे करायचं होत ते जबाबदारीने केव्हाच मागे राहिलय.”

    “असं का बोलतोयस आणि कशाबद्दल.. तू खुश नाहियेस का माझ्यासोबत.” ती डोळे बारीक करत सौम्य आवाजात म्हणाली.

    “नाही तसं नाहीय. तुझ्या बाबतीत नाही बोलत मी. उलट तु आहेस म्हणूनच सर्व सुरूय. पण मी स्वत:ला कुठेतरी गमावून बसलोय. मला मी दिसतच नाहीय. आयुष्यात एका पाठोपाठ एक प्रसंग असे येत गेले अन् मी कुठच्या कुठे हरवलो काही कळतच नाही.”

    “काल जेव्हा मित्रांना भेटलो तेव्हा बरं वाटलं. पण क्षणभरासाठीच. प्रत्येकजण आज यशस्वी झालाय. कोणत्या ना कोणत्या पदावर काम करतोय. कुठेतरी व्यवसाय करतोय. काही तरी करून पैसे कमावतोय आणि मी.. मी काय करतोय.. मी कालही अपयशी होतो अन् आजही तसाच आहे.” तो विषण्णपणेच बोलून गेला अन् शांतच झाला.

    “तसं काही नाही मुकूंदा. तू चुकीचा विचार करतोयस. कोणी सांगितल तुला तु अपयशी आहेस म्हणून. मला सांग तुझ्यासारखे कितीजण आहेत जे आज घर सांभाळतात, घरातली कामं करतात, स्वयंपाक करतात, धुणीभांडी करतात, मुलांना सांभाळतात आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक राहून निर्व्यसनी आयुष्य जगतात. फारच थोडी. मुकूंदा मी सुद्धा घरात इतकं काम करत नाही जितकं तू करतोस अन् ते ही एक पुरूष असून. तू पैसा कमावत नाहीस ह्याचा अर्थ तू अपयशी आहेस असं नाही.”

    “असतील तुझे मित्र भरमसाठ पैसा कमावणारे पण ते सर्वच निर्व्यसनी आहेत का.. प्रामाणिक आहेत का.. तुझ्यासारखं घरातलं एखादं काम तरी करतात का..?”

    “संसार एकट्यानेच चालत नसतो ना मुकूंदा. दोघांची साथ लागते. आणि तुझी साथ आहे मला. उलट तु आहेस म्हणूनच मी नोकरी करू शकतेय. तु घरातली जबाबदारी घेतली नसतीस तर काय झालं असतं. मुलांना कसं वाढवलं असतं आपण.?”

    “तु तुझं सर्व घरदार सोडून माझ्यासोबत मुंबईत आलास. मिळेल ते काम केलस. नोकरी करत असूनही घर सांभाळलस. आपल्याला मुलं झाल्यावर त्यांचा सांभाळ केलास. मुलांना पाळणाघरात ठेवायचं नाही म्हणून नोकरी सोडलीस. पुर्ण वेळ मुलांना दिलास. ही काही सोपी गोष्ट नाही मुकूंदा.”

    “असेल.. पण तरीही तुझी नोकरी होती म्हणूनच सर्व व्यवस्थित पार पडलं. खर्च पुरवता आला. मला तसं काहीच जमलं नाही. आज माझ्याकडे स्वत:च असं काहीच नाही.”

    “तु घरातली जबाबदारी उचलीस म्हणूनच मी नोकरी करू शकले ना.. आणि मी काय हे सर्व माझ्या एकटीसाठीच करतेय. हे सगळं आपलंच आहे ना..”

    “तरी सुद्धा तुझा वाटा मोठा आहे. उद्या जेव्हा मुलं मोठी होतील. तेव्हा त्यांना समजेलच. आपण मोठं आपल्या आईमुळे झालोय. आईने कमवून घातलय. आपण ज्या घरात राहतोय ते सुद्धा आईनेच घेतलय. आपल्या शिक्षणाचा खर्च, खाण्या-पिण्याचा खर्च सर्व आईनेच केलाय. आणि उद्या जेव्हा त्यांची लग्न होतील तो खर्च सुद्धा आपली आईच करणार आहे. बाप काही नाही. बापानी कधी काही केलंच नाही. मी जे करतोय ना ते आजही कोणाला दिसत नाही अन् उद्याही कोणाला दिसणार नाही. लोकांना कमावणारे, नोकरी-व्यवसाय करणारेच बाप दिसत असतात. माझ्यासारखे बाप कायम अदृश्यच राहतात. ह्या अदृश्य वेदना कोणाला जाणवणारच नाहीत. अन् कोणी जाणून घेणारही नाही. माझं बापमन कधी कोणीच समजून घेणार नाही.”

    “मुळात आम्हा पुरूषांना कोणी लवकर समजूच शकत नाही. कितीही आनंदाचा क्षण असू दे किंवा दु:खाचा आम्ही शांतपणे ते पाहत असतो. आई मरू दे बाप मरू दे आम्ही शांतच असतो. मुलीचं लग्न असूदे किंवा मग मुलाचं यश असूदे आम्ही आमचे आनंदाश्रू डोळ्यातच ठेवतो. आमच्या भावना आम्ही आतल्या आतच ठेवतो. आमचं सुख, आमचं दु:ख, आमच्या वेदना, आमचा त्रास, आमचं कर्तव्य, आमची जबाबदारी हे सर्व कायम अदृश्यच राहतं. ते कोणालाच दिसत नाही. अन् आम्हीसुद्धा ह्या गोष्टींचा कधी दिखावा करत नाही.”

    “नाही येत आम्हांला लवकर भावना व्यक्त करता. तुमचं बरं असतं तुम्ही मनमोकळेपणाने दुसऱ्यासमोर रडता. पण आम्हांला नाही येत तसं रडता. याचा अर्थ असा नसतो कि आम्ही भावनाशून्य आहोत. पुरूष म्हणून एक जबाबदारी असते अंगावर. रडत बसून निभावता नाही येत ती. त्यासाठी खंबीरच राहावं लागतं. आमचे अश्रू एकाकीपणातच त्सुनामी होऊन वाहतात.”

    “अवघड असतं गं खूप पुरूष होण. बरेच त्याग करावे लागतात. जबाबदारी सांभाळावी लागते. घर सांभाळावं लागत. अन् इतकं सर्व करून पण आम्हांला शेवटी एकच ऐकावं लागतं “तुम्ही काय केलंत आमच्यासाठी.”

    “आज कळतंय मला. बाप होणं सोप्प नसतं. मी जेव्हा बाप होऊन ह्या सर्व गोष्टी बघतोय तर मला माझ्या बापाची आठवण येतेय. कसा सांभाळ केला असेल त्यानं आमचा. मला निदान तुझी साथ तर आहे. माझ्या बापाला कोणी केली असेल मदत. कसं वाढवलं असेल त्यानं आम्हांला. माझं लग्न जुळवण्यासाठी काय काय केलं त्यानं. पण यश नाही आलं त्याला. माझंच नशिब चांगलं म्हणूनच की काय तु आलीस माझ्या आयुष्यात. एका क्षणाचीही पर्वा न करता माझा बाप मला काय बोलला माहितीय, “जा पोरा, मंबईत जाऊन संसार थाट. पोरगी चांगली हाय. तिला साथ दे. इथ आमी सांभाळून घेऊ. नको परवा करूस.”

    “माझ्या बापाला जसं मी समजून घेतलं तसं माझी मुलं घेतील का मला समजून. त्यांनी जर मला उद्या विचारलं, “बाबा काय केलंत तुम्ही आमच्यासाठी” तर काय सांगणार आहे मी त्यांना.”

    “नाही मिळाला वेळ जबाबदारीतून. तुम्हांला मोठं करता करता माझ्या इच्छा-आकांक्षा, माझी स्वप्न मारून टाकलीत मी. नाही मिळाला वेळ शिक्षणाला.. पैसे कमवायला.. छंद जोपासायला.. व्यवसाय करायला.. लहान असतानाच मोठा झालो. तरूणपणीच जबाबदार झालो. नाही होता आलं यशस्वी. वाटलं आज ना उद्या येईल आपल्या मनासारखं जगता. पण नाही. माणूस एकदा बाप झाला ना की त्याला त्याच्या मनासारखं नाही येत जगता. स्वत: आधी तो मुलांचा विचार करतो. त्यांच्या भविष्यासाठी चार पैसे राखून ठेवतो. स्वत: गरीबीत जगतो. फक्त मुलांसाठी. कुटूंबासाठी. कोण समजून घेईल ह्या गोष्टी. कुणाला कळेल हे बापमन.”

    “असं का बोलतोयस मुकूंदा. आपल्या मुली समजून घेतील तुला. मला सांग त्यांच्या जवळ जास्त वेळ कोण असतं मी का तू. अरे मी आई असून माझं कधी कधी ऐकत नाहीत पण तुझ्यासाठी वाट्टेल ते करतात. तू नसलास की वेड्या होतात पार. मी नसले तर माझी किती आठवण काढतात सांग बघू. तू दोन दिवस नव्हतास तर नुसतं बाबा बाबा करत होत्या. अजून लहान आहेत तर एवढं. मग बघ.”

    “लहान आहेत म्हणून त्यांना काही कळत नाही. उद्या कळू लागलं की त्या सुद्धा इतर मुलांसारखंच वागतील. मी काय केलं म्हणून विचारतील. तेव्हा मी काय सांगणार त्यांना. ह्या छोट्या छोट्या गोष्टींच काय मोल राहणार भविष्यात.”

    “ह्या छोट्या गोष्टी नाहीत मुकूंदा.. आपल्या मुलांचा सांभाळ करणं.. घर सांभाळण.. एक पुरूष असून बाईपेक्षा जास्त काम करणं.. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणं.. कोणत्याच प्रकारचं वाईट व्यसण नसणं.. आजच्या काळात ह्या छोट्या गोष्टी नाहीत.”

    “इतर लोकांची मुलं काय बोलतात मला माहित नाही पण आपल्या मुली तुझ्याबद्दल कधीच असं बोलणार नाहीत बघ तू. स्वत:ला असं अपयशी नको समजूस. माझ्या नजरेत तू एक यशस्वी पुरूष आहेस. पैशानेच माणसाची श्रीमंती मोजता येत नाही मुकूंदा.. चारित्र्यानेच त्याची खरी श्रीमंती कळते. पैशाने यशस्वी असलेल्या माणसासोबत स्वत:ला तोलू नकोस. तुझी श्रीमंती तुझ्यात असलेल्या बापपणात आहे. तुझ्यातल्या खऱ्या माणूसपणात आहे. तुझ्या चारित्र्यात आहे.”

    “मला सांग मी कधी दुखावलंय का तुला.. माझ्यामुळे तर नाही ना.. तसं असेल तर मी सोडते माझी नोकरी.. सांभाळीण मी मुलींना.. पण तू असं नाराज होऊ नकोस.”

    “तुझी काहीच चूक नाही ह्यात. तु नको वाईट वाटून घेऊस. मी स्वत:च्या भविष्याबद्दलच चिंतेत आहे.”

    “नको करूस चिंता. अन् लोकांना काय वाटेल ह्याचा ही विचार करू नकोस. ते माझं घर सांभाळायला येत नाहीत.”

    तो काहीच बोलला नाही. शांतच राहिला. जसा याआधी राहिला होता तसा. मोठा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, नवरा म्हणून, अन् आता बाप म्हणून. ती त्याच्या खांद्यावर मान टाकून शून्यात पाहू लागली. तो भूतकाळातल्या वेदनेत हरवून गेला. अश्या वेदना ज्या फक्त तोच पाहू शकत होता. इतरांसाठी त्या अदृश्यच होत्या.

    रात्र धिम्या गतीनं पहाटेच्या रूपात आली. नवा दिवस नव्या आव्हानांसह नवी स्पर्धा घेऊन उजाडला.

    गरम गरम चपाती अन् भाजी करून दोन्ही पोरींचा डबा तिनं भरला. त्यांच्या दप्तरात खाऊ अन् फळं भरलीत. दोघींना घेऊन गेटवर जाऊन उभी राहिली. शाळेची बस मिळताच तिने नि:श्वास सोडला. पोरींना बाय-बाय करत ती घरात आली.

    “काही करू मी मुकूंद ?” स्वयंपाकघरात जात तिने विचारलं.

    “झालंय आता. जरा टेस्ट करून बघ एक.” परातीतला एक गरम समोसा तिला देत तो म्हणाला.

    “ह्म्म ऽ टेस्टी झालाय आता. कधी पर्यंत घेऊन जायची आहे ऑर्डर.”

    “दहा पर्यंत या म्हणालाय. पोचेन आरामात.”

    “मी पण येते.”

    “नको. मला उशीर होईल यायला. अजून एक दोन ऑर्डर कन्फर्म करायला जायचंय. तुझी इव्हिनिंग आहे ना. तु जेऊन आवरून जा. मी जाईन सावकाश.” तो चेहऱ्यावर मंद स्मित ठेवत म्हणाला.

    “चालेल.” ती गालातच हसली अन् समोसे पॅकिंग करू लागली. दोन बॉक्स पॅक करून ते गाडीत ठेवायला तिने मदत केली.

    “सावकाश जा. पोचलास की फोन कर आणि गाडी सावकाश चालव.”

    “हो.” तो मंद स्मित करत म्हणाला अन् निघालाही.

    ती शांत नजरेनेच जाणाऱ्या गाडीकडे पाहत राहिली. गाडीच्या मागच्या काचेवर लिहिलेलं “आराध्या केटरर्स” नजरेआड होईपर्यंत ती तशीच मंद स्मित करत उभी राहिली.

समाप्त.

      बाप होणं अवघड नाही बाप म्हणून जगणं अवघड आहे. असे कित्येक “बाप” आज आपल्या समाजात आहेत हे कदाचित आपल्या डोळस नजरेला दिसणार नाही. परंतु बाप मनाला नक्कीच दिसतील. अश्याच बाप माणसांना ही कथा शेअर करा. आपल्याला ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया कंमेंट करा.

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे देखील पहा :

वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी

एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम

चतकोर भाकरी

शिक्षा

     नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
     धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment