आरशातलं प्रेम – भाग ३ – दुरावा
प्रेम व्यक्त होण्यापूर्वीच आलेला दुरावा आणि त्यातून निर्माण होत गेलेलं रहस्य म्हणजेच “आरशातलं प्रेम”. ही रहस्यकथा आपल्याला सध्याचं समाजातलं वास्तव दाखवते.
“आरशातलं प्रेम – दुरावा”
आणि आम्ही “जरा आज जाऊन मंदिरात वाचत बसणार आहोत “असं सांगून घरातल्यांना गंडवलेलं. मंदिराच्या कोपऱ्यावर उभा राहून मी देवीची वाट बघत होतो. सुखदरे तोंड मोठं करून करून जांभया देत होता. साडेसहाला बरोबर ती आली. दोघांनी ही एकमेकांकडे बघून स्माईल दिली.
मी तिची सुखदरेशी ओळख करून दिली. तसं तिला माहित होतंच पण आता एकत्र होतो तर सांगावं म्हटलं. बोलत-बोलत आम्ही निघालो.
“तू का जात नाहीस रिक्शाने तुझ्या मैत्रिणींसोबत ?” मी तिला विचारलं.
“असंच, मला चालत जायला आवडतं म्हणून.”
“अच्छा.”
“आणि तू ?”
“मला पण चालत मस्ती करत जायला आवडतं.”
“तुम्ही दोघंच जाता रोज एकत्र ?”
“नाही, असतात बाकीचे मित्र. पण आता आजपासून दोघंच.” मी तिच्याकडे बघून हसत सांगितलं.
बोलत-बोलत आम्ही शाळेत पोहोचलो. मुलींना एन्ट्री करण्यासाठी वेगळं गेट होतं आणि मुलांना वेगळं. ती तिच्या गेटवर जाऊन थांबली आणि जाता जाता मला म्हणाली,
“शाळा सुटल्यावर पण आपण एकत्रच जाऊ. चालेल ना ?”
“हो चालेल.”
आणि तशी ती मैत्रिणींच्या घोळक्यात गेली. मी आणि सुखदरे आमच्या नेहमीच्या कट्यावर जाऊन बोलत बसलो.
आमची मैत्री वाढत होती. रोज आम्ही एकत्र शाळेत जात होतो आणि एकत्र येत होतो. क्लासमध्ये आम्ही जास्त बोलत नव्हतो पण चोरी चोरी चुपके चुपके असं चालू होतं. आणि हे आम्हा दोघांनाही कळत होतं.
सुखदरेने मला एकदा सांगितलं की तू तिला आता प्रपोज कर म्हणून. पण माझी हिंमत होत नव्हती. मला भिती वाटत होती तिला जर ते नाही आवडलं तर आमची मैत्री पण राहायची नाही म्हणून.
म्हणून मी पुढाकार घेत नव्हतो. पण एका बाजूला वाटत होतं की ती सुद्धा आपल्यावर प्रेम करत असावी. आणि तिची सुद्धा माझ्यासारखीच परिस्थिती असावी.
मला काही घाई नव्हती आणि मी घाई का करावी म्हणून मी सुखदरेला विचारत होतो आणि सुखदरे मला समजावत होता एकदा विचारून तरी बघ ती तुला नाही बोलणार नाही. आणि मला ही तसंच वाटत होतं पण हिंमत होत नव्हती.
बघता बघता सहा महिने गेले. उन्हाळा सुरू झाला. वातावरणातलां गुलाबीपणा हळूहळू लाल होऊ लागला. थंड हवा गरम होऊ लागली. सुर्य देव त्याचं अधिराज्य गाजवत होता. गुलाबी थंडी आता जाणवत नव्हती. वार्षिक परिक्षा जवळ आली होती. आणि मुलं त्या गरम वातावरणात पुस्तकात डोकी घालून बसू लागली. परिक्षा देऊ लागली.
आमची भेट फक्त परिक्षेदिवशीच होत होती. त्या दिवशीच आम्ही एकत्र जात होतो. आणि क्लासमध्ये फक्त आरशातून चोरून चोरून पाहत होतो. आम्हांला खूप बोलायचं होतं पण अभ्यासामुळे जास्त बोलता येत नव्हतं. कधी एकदाची परिक्षा संपतेय असं झालेलं.
आम्ही सर्व जण त्या शेवटच्या दिवसाची वाट पाहत होतो. त्या दिवशी सर्वांच्या परिक्षा संपणार होत्या. सगळे मोकळे होणार होते. कोणी लगेच त्या दिवशी गावी जाणार होतं. कोणी फिरायला जाणार होतं. कोणी नवीनच काही तरी शिकणार होतं.
आला आला म्हणत तो परिक्षेचा शेवटचा दिवस आला. अखेर परिक्षा संपली. मी तीची वाट बघत नेहमीच्या ठिकाणी एकटाच थांबलेलो.
ती आली. हंसाच्या चालीने ती आली. मला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू तरळलं. तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा खुलला होता.
“कसा गेला पेपर ?” माझ्या डोळ्यात डोळे घालून तिने मला विचारलं.
“मस्त आणि तुला ?”
“छान.”
त्या दिवशी आम्ही दोघंच होतो. सुखदरेला मी पुढं जा म्हणून सांगितलेलं. आणि तो प्रामाणिक मित्र आमची नजर चुकवून पाठीमागून पाठलाग करत येत होता.
आम्ही चालू लागलो. मोरा बरोबर लांडोर चालावां तसं आम्ही जात होतो. ती जरा शांतच होती. मंद स्मित करत होती. बोलत-बोलत आम्ही एका वळणावर आलो.
“मला तुला काही तरी सांगायचं आहे.” इकडे तिकडे कोणी नाही असं पाहून ती म्हणाली.
“बोल.”
ती माझ्याकडे पाहत राहिली.
“काय बोल ?” मी तिला प्रश्नार्थक नजरेने पुन्हा विचारलं.
“नाही, काही नाही.”
“काय बोलायचंय ?”
“अं.. म्हणजे तू सुट्टीत कुठे जाणार आहेस ?”
“अजून तर काही ठरलेलं नाही.. का ?”
“काही नाही असंच.”
“तू जाणार आहेस कुठे ?” मी तिला विचारलं.
“गावी जाणार आहे पण ४-५ दिवसांत येणार लगेच.”
“अच्छा.”
“तुझं गावं कोणतं ?” मी तिला विचारलं.
“पुणे.”
“तुझं ?”
“कोल्हापूर.”
“आपला रिझल्ट ज्या दिवशी आहे तेव्हा तू येशील ना ?” मी विचारलं.
“हो त्याच्या आधीच मी गावावरून येईन.”
“ठिक आहे.”
“तू येशील ना ?” माझ्याकडे बघत ती मला विचारत होती.
“हो मीच येणार.”
“मला ना तुला काही तरी सांगायचं होत”, ती म्हणाली.
“सांग ना मग.”
“आज नको रिझल्टच्या दिवशी मी तुला सांगेन.”
“असं काय आहे की तू मला आज नाही सांगत ?”
“काही नाही मी तेव्हाच सांगेन.”
“चालेल.”
रस्ता संपत आलेला. घरं जवळ येत होती. ती तिच्या घरी गेली आणि मी माझ्या घरी जात होतो. तिला काय सांगायचंय याचाच मी विचार करत जात होतो. मला कळत होतं की तिला काय सांगायचं असणार. पण मी शांत होतो. तिच्या आधी आपणच तिला सांगावे असही वाटत होतं. पण मी शांत होतो. ती सांगेल तेव्हाच आपण सांगू असं मनाशी ठरवलं होतं.
पण..
अचानक काय झालं माहित नाही पण आम्ही त्याच दिवशी गावी गेलो.. चार दिवस गावी जाऊन येऊ म्हणून घरच्यांनी मला सांगितलं.. मी ही हसत हसत होकार दिला.. चार दिवस म्हणत म्हणत आम्ही संपूर्ण सुट्टी गावी घालवली.. रोज कुठे तरी फिरायचं नियोजन ठरत होत. वर्षभरानं कुटूंब एकत्र आल्याने सर्वचजण खुश होतो.
कोल्हापूरच्या अंबाबाईपासून सुरवात केलेली ते ज्योतिबा, पालीचा खंडोबा, नृसिंहवाडीतून दत्तांच्या चरणी नतमस्तक होत, कोपेश्वरातल्या महादेवाला माथा टेकवत, आदमापुरात बाळूमामांच दर्शन करत करत आम्ही पंढरपूर, तुळजापूर, अन् सौंदतीची रेणूकामाता करत करत संपूर्ण सुट्टी देवदर्शनात घालवली..
सुट्टीत मला तिची आठवण होत होती.. पण म्हणतात ना दूर गेल्यानं प्रेम वाढतं म्हणून.. ह्याची प्रचिती मला येत होती. आता सुट्टी संपत आलेली.. घरी जाण्याची वेळ आलेली.. एकदा वाईला मावशीला भेटून येऊ असं आई म्हणाली अन् आम्ही वाईला आलो.
तिथे येताच माझ्या डोळ्यासमोरच चित्र बदललं.. मावशी तर दूर दूर कुठे नव्हतीच.. माझ्यासमोर होत एक भलं मोठं वसतीगृह.. हॉस्टेल.. बोर्डिंग.. मी तर ते पाहतच राहिलो.. माझ्या नजरेसमोर अंधारीच आली.. काय चाललंय तेच मला कळेना.. माझं सामान खोलीत ठेवलं गेल.. हळूहळू दोन आकृत्या नजरेसमोरून अस्पष्ट होऊ लागल्या.. भरलेल्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.. किती वेळ तसा होतो हे त्या मला धरलेल्या शिपायालाच माहित..
शुद्धीवर आलो तेव्हा मला कळून चुकलं की, मी एका परिस्थितीच्या जाळ्यात अडकून पडलो होतो. माझ्यावर परिस्थितीने डाव टाकला होता. माझ्या आयुष्यात एक आडमोडी वळण आलं होतं. काळाने माझ्यावर असा वार केला होता की मी पुरता घायाळ झालो होतो. इच्छा नसताना मला तिथे राहण्यासाठी भाग पाडलं होतं.
तिकडे मुंबईत सर्व जण माझी वाट बघत होते. मी आल्यावर काय-काय करायचं याचं नियोजण करत होते.
आणि मी.
मी कोणालाही न सांगता आलेलो परत न जाण्यासाठी “कायमचं.”
अखेर एक दिवस ती बातमी त्यांना समजली. विश्वास न ठेवता येणाऱ्या गोष्टीवर त्यांना विश्वास ठेवावा लागला.
आणि ती.
ती तर फक्त वाट पाहत होती. निकाला दिवशी ती मला काही तरी सांगणार होती. ते आता कायमचंच तिच्या मनातच राहणार होतं. ते आता माझ्यापर्यंत कधीच ऐकू येणार नव्हतं. आणि मला जे सांगायचं होत ते देखील तिच्यापर्यंत ऐकू जाणार नव्हतं. त्या दिवशीच मी तिला सांगायला हवं होतं. खरंच. कदाचित आज वेळ वेगळी असती. चूक झाली माझ्याकडून. खूप मोठी चूक.
तरी सुखदरे मला सांगत होता. पण मी त्यांच ऐकलं नाही. आज मला त्याचा पश्चात्ताप होतोय. कधी-कधी मित्रांच ऐकावं. खरंच ऐकावं.
सुखदरे मला जीवाच्या आकांताने सांगत होता. जीव तोडून तोडून सांगत होता. पण मी ऐकलं नाही. आणि त्याचा आता काही उपयोग नव्हता. वेळ निघून गेली होती.
आणि मी स्वत:ला आरशात पाहत होतो. पण मला मी दिसतच नव्हतो. माझ्या डोळ्यांवर पानेरी पडदा उमटला होता आणि त्या पडद्यामागे ती उभी होती. स्तब्ध. शांत. मला फक्त ती दिसत होती. आरशात माझ्याऐवजी तिचंच प्रतिबिंब माझ्याकडे पाहत होतं. आणि मला विचारत होतं,
“अस का केलंस तू.. ? का.. ?”
मी तिला सांगू शकणार नव्हतो. माझं म्हणणं तिच्यापर्यंत पोचणार नव्हतं. माझा आवाज ती ऐकू शकणार नव्हती. मला पाहू शकणार नव्हती. सर्वांपासून लांब आलेलो मी.
मला तिला पाहायच होतं पण मी दृष्टीहीन झालेलो. मला तिच्याशी बोलायचं होतं पण माझी वाचा गेलेली. मला तिला ऐकायचं होतं पण मी बधिर झालेलो.
माझ्या अमर होणाऱ्या प्रेमात अक्षय दुरावा निर्माण झालेला. असा दुरावा जो कदाचित आता संपणारंच नव्हता.
ती माझ्यापासून “दूर” होती. तिला पाहण्यासाठी मन “आतूर” होतं. तिच्यासाठी मनात “काहूर” माजलं होतं. पण मी “मजबूर” होतो.
“ती मला आता फक्त आरशातच दिसणार होती”.
“फक्त आरशात”.
“माझं आरशातलं प्रेम आरशातच राहिलं”.
Amazon Link
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
हे देखील पहा :
वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!