आपली माणसं – भाग ०१
फक्त् नात्याने कोणी आपलं होत नसत. आपलं होण्यासाठी आपलेपणा द्यावा लागतो. प्रेम द्यावं लागत. चुका दुर्लक्ष कराव्या लागतात. ज्यांच कोणी नसतं त्यांना आपलं करावं लागत. “आपली माणसं” ही अशी कमवावी लागतात. ती सहजासहजी मिळत नसतात.
“आपली माणसं”
आपलं दुःख आपल्या माणसांना न कळणं हेच एक मोठं दुःख आहे. अन् जर का ते कळत असूनही आपली विचारपूस न करणं यासारखी वेदना असह्य आहे. या वेदना घेऊन जिणं अशक्य आहे.
माणूस किती जरी दाखवत असला मी माझ्या कामात व्यस्थ आहे, मला कोण असलं नसलं तरी फरक पडत नाही तरी ते तसं नसतं.
आपल्याला फरक पडत असतो. आपलं मन जळत असतं. आपल्या लोकांसाठी, आपल्या माणसांसाठी. आपल्या माणसांनी आपली विचारपूस करावी. आपल्याला मायेने जवळ घ्यावं. आपल्यावर प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटत असतं.
पण जर आपल्याच माणसांना या गोष्टीचा फरक पडत नसेल तर आपण तरी का जगावं हा प्रश्न सतावत राहतो. याचं उत्तर आपल्याला मिळत नसतं पण हे दुःख रोज काळीज चिरून ते शोधण्याचा प्रयत्न करत राहतं. माझंही असंच काळीज चिरलं जातंय. रोज. नित्यनियमाने.
एकुलता एक होतो मी. कशाची कमी नव्हती मला. मला हवं ते मिळत होतं. मला पाहिजे ते मिळवता येत होतं. पण अशा भौतिक सोयी सुविधांची मला गरज नव्हती. मला गरज होती ती प्रेमाची. मला हवा होता वेळ माझ्या आई-वडिलांचा. मला हवी होती एक हॅप्पी फॅमिली. पण आपल्याला जे हवंय ते सहजासहजी मिळणं म्हणजे आयुष्य कसलं.
जी गोष्ट इतकी सोप्पी होती तिच नेमकी अवघड होऊन बसली होती. जे सहज देता येऊ शकत होत तेच नेमकं मिळत नव्हतं.
आई वडिलांची वाढणारी भांडण रोज काळजाचे तुकडे करत होतीत. माझ्या परीने मी दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांचा अहंकार ते पटवून घेत नव्हता. अहंकारापुढे सगळी नाती फिकी पडत होतीत.
नवरा, बायको, मुलगा, परिवार यांना काडीची किंमत राहिली नव्हती. आणि शेवटी जे होऊ नये तेच झालं. एकच स्फोट झाला, असा स्फोट ज्याने पुर्ण परिवाराचे तुकडे तुकडे केले.. घटस्फोट..
स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये जम बसवलेल्या संग्राम राजवाडे या इसमाचा त्याच्या जन्मजात श्रीमंत बायकोशी झालेला घटस्फोट..
तशी ही गोष्ट श्रीमंतांसाठी काही मोठी नव्हती. अंगावरच्या कपड्याचा उसवलेला धागा तोडावा इतकी ही साधी गोष्ट होती. त्यांना हवं ते करण्याचं, वागण्याचं स्वातंत्र्य होतं.
तसं स्वातंत्र्य मलाही देण्यात आलं होतं. निवडीच. काहीही निवडण्याचं. कोणालाही निवडण्याचं. स्वातंत्र्य होतं कुठेही जाण्याचं. अन् मी तेच केलं जे मला योग्य वाटलं. स्वतंत्र झालो मी दोघांपासून.
आईही नको आणि बापही नको. त्यांनाच जर मी नको असेन तर मी तरी का त्यांच्या मागे जावं. मला नको होता दोघांचाही पैसा. नको होती त्यांची प्रॉपर्टी. ज्यांना कधी वेळ देता आला नाही त्यांचा पैसा तरी कसा घेणार होतो मी. त्यांनी मला सोडलं नाही मीच त्यांना सोडून आलो. घर सोडलं मी. कायमचचं.
अपेक्षेप्रमाणे त्यांनीही विचारपूस केली नाही. त्यांना जे समजून घ्यायचं होतं ते त्यांनी घेतलं असेल. मी आता त्याचा विचारही करत नाही. कारण मला माहीत होतं त्यांना याचा काही फरक पडणार नाही.
त्यांच्या मते, २१ वर्ष माझ्यात पैश्याची जेवढी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली त्याच्या बळावर मी काही ना काही करू शकणार होतो. बाकी मन, नाती, आपली माणसं या संकल्पना टुकार असतात. त्यांना आयुष्यात स्थान नसतं.
खरं तर आपण आयुष्यात कोणाला स्थान द्यावं हे आपणच ठरवायचं असतं. आपल्या मनाने ते ठरवायचं असतं. जसं माझ्या आई वडिलांनी ठरवलेलं.
हे देखील वाचा :
- वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी
- एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
एखाद्या व्यक्तीचा विचार करायचा नाही असं आपण कितीही ठरवलं तरी त्याचेच विचार आपल्या मनात येत असतात. माझ्यावरूनच घ्या, मी किती तरी वेळा माझ्या भूतकाळाचा विचार करणार नाहीं असं ठरवलं होतं तरी आज पुन्हा मी त्याच गोष्टींचा विचार करत होतो.
आज ही कितवी वेळ होती कोण जाणे. पण तरीही विचार येत होते. येत आहेत. पूर्वी माझी चिडचिड व्हायची. भयंकर चिडचिड. काय करून बसलोय हे गोंधळ घातल्यावर लक्षात यायचं. पण आता तसं होत नाही. शारदा आज्जीने तसं सांगितल्यापासून तरी होत नाही.
ती म्हणते, “विचार येतात तर येऊ दे. आपण शांत राहायचं. त्यांना या म्हणायचं. ते येतील आणि जातील. येणाऱ्याला आपण अडवून ठेवलं तर तो हटून बसतो. त्याला यायचं तर येऊ दे जायचंय तर जाऊ दे. आपण कोण ठरवणारं, आपण कोण अडवणारं. येणारा येतो जाणारा जातो. आपण शांत राहायचं.”
आणि हे खरंच होतं. तिचं ऐकल्यापासून माझ्यात बराच बदल झाला. खरं तर शारदा आज्जी माझ्या आयुष्यात आल्यापासूनच मला माझ्यातले बदल जाणवू लागले.
शारदा आज्जी खरं तर ती माझी कोणी नव्हती. तरी सुद्धा ती मला आपलीशी वाटत होती. खरंच, कधी कधी आपलीच माणसं इतकी वर्ष एकत्र राहून कधी आपली होऊ शकत नाहीत पण एखादा परका माणूस काही तासांच्या भेटीतच आपलासा होऊन जातो. शारदा आज्जी तशीच एक.
पुण्यातून मुंबईत आलो तेव्हा राहण्याची अडचण होती. मित्राच्या ओळखीने कामाची व्यवस्था झाली होती पण मनासारखं घर कुठे मिळत नव्हत. काही ठिकाणचं भाडं मला परवडणारं नव्हतं. काही खोल्या माझ्या मनासारख्या नव्हत्या तर काही कामाच्या ठिकाणापासून बऱ्याच लांब लांब होत्या.
मित्राच्या रूमवर जास्त दिवस राहू शकत नव्हतो. तिथून माझ्या कामाचं ठिकाण बरंच लांब होतं. पनवेल ते मरोळ प्रवास दगदगीचा होता. मी जवळपासच रूम बघत होतो. पण काहीच मनासारखं होत नव्हत.
एका मित्राच्या ओळखीने गोरेगावात एक खोली मिळाली. मला ती आवडली. गोरेगाव ते मरोळ प्रवासही तसा गर्दीचा होता. पण आधीपेक्षा तरी बरा होता. पुढे मागे जवळ कुठे तरी खोली मिळेल या आशेने मी गोरेगावात राहायला आलो.
आलो त्या दिवशीच शेजारच्या माणसांसोबत तु-तु मे-मे झालं. त्यांचं झालं असं की, बरेच दिवस कोणी भाडोत्री नसल्याने रूम मालकाने त्याच्या खोलीवर काही लक्ष दिलं नव्हत. मी रूम पाहिली त्या दिवशीच त्याने मला सांगून ठेवलं, “तुम्हीं राहायला या थोड रीपेरिंग काम मी करून घेतो अर्थात तुमची परवानगी असेल तर..”
मलाही गरज असल्याने मी काही त्याला नकार दिला नाही. आणि तसंही घरात ठेवण्या इतपत माझं काही सामान नव्हतही. मी दुसऱ्या दिवशी कामाला गेलो आणि संध्याकाळी आलो.
आलो तर शेजारच्याची आणि माझ्या कामगाराची जोरात भांडण सुरू होती. दोघंही मी येण्याची वाटच बघत होते. मी आलो तसा शेजारचा पुढ्यात येऊन भांडू लागला.
“क्या रे तेरे को आदमी देखके काम देणे को होता नही क्या.. इतना पैसा बचानेका है तो रेहते क्यू इधर. जाव ना अपने गाव में जा के काम करो.. इधर क्या है तुम लोगो का..” दात ओठ खात तो माझ्यावर अरेरावी करू लागला. मला नेमकं काय झालंय याची कल्पना नव्हती.
“हे बघा हे असं ओरडून बोलू नका. आधी काय झालंय सांगा.”
“मराठी आहेस..?”
“होय.”
“काय रे तुला माणूस बघून काम देता येत नाही. काम चाललंय तर थांबून बघायचं. लक्ष ठेवायचं. तुझ्यावर आई बापाच लक्ष असत की नाही. मग तुला कामावर ठेवता येत नाही.. कुठाय तुझा बाप..” त्याने तसं बोलताच माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली.
“ओ काका नीट बोला.. एवढं बोलायची गरज नाही..” मी ही त्याला तसंच उत्तर दिलं.
“वा रे.. बोलायचं नाही.. तुम्हीं वाट्टेल ते करा.. आणि आम्हीं शांत रहायचं.. ए ऽ, तुझ्याशी बोलायचं नाही मला.. बापाला बोलाव तुझ्या..”
“एकटा राहतो मी इथे.. आणि तुमचं काय नुकसान झालं असेल ना तर देतो भरून.. काय पळून गेलो नाहीये.. राहतोय मी इथे अजून..”
“काय नुकसान भरून देणार रे माझं.. मोठ्या बापाचा.. जीव गेल्यावर भरून देशील काय..” तो तसं म्हणताच मी शांत झालो. माझ्या काळजातली धडधड वाढली. मी माझ्या कामगाराकडे बघत त्याच्या दिशेने गेलो.
“क्या किया रे तुने..?”
“मैं कुछ नहीं किया साब.. ये दिवार पेहेलेसे खराब था.. मैं प्लास्टर लगाने गया तो दो चार इट का टूकडा उनकी ओर गिरा.. जान बुझ के थोडी कोई करता है ऐसा..”
मी खोलीत जाऊन पाहिलं तर भिंतीला चांगला डबरा पडला होता. जाणून बुजून नाही पण चुक झाली होती. शेजारच्याचं चिडणं स्वाभाविक होत. मी त्याच्या दिशेने जात म्हणालो.
“काका मी देतो नुकसान भरपाई.. सॉ..”
“तुझ्या सॉरीने, पैशाने काय होणारे..” मला अडवत ते बोलू लागले.. “कोणाला लागलं असतं तर.. अरे आई झोपते माझी तिथे.. आमचं नशीब चांगलं आज ती नव्हती तिथं.. काय झालं असतं मग.. कसं भरलं असतंस माझं नुकसान..”
त्यांनी तसं बोलताच माझे डोळे भरले. माझ्या मनाला कळून चुकलं. ते पैशासाठी भांडत नव्हते. ते त्यांच्या आईसाठी भांडत होते. तिच्या जीवासाठी भांडत होते. आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं बरोबरच होतं.
चूकून भलत काहीं झालं असतं तर त्याची नुकसान भरपाई मी करू शकलो नसतो. माझ्या भरलेल्या डोळ्यांना काही दिसेनासं झालं. मी तसाच शांतपणे उभा राहिलो.
“संतोष इकडं ये..” कदाचित त्यांच्या आईने त्यांना आवाज दिला. ते चार पावलं मागे सरकले. पडद्याआड त्यांची कुजबुज सुरू झाली. माझा कामगार माझ्याकडे तोंड पाडून बघत होता.
“साब मैं जानबुझ् के नहीं किया. कोण ऐसां काम करेगा. आप एक काम करो राजू भाई को बुलाव.” मी शांतच उभा राहीलो. मला काहीच कळत नव्हत.
पडदा बाजूला सारून काका पुन्हा माझ्यासमोर आले.
“रूम मालकाचा नंबर हाय का रे..?”
“राजू भाई का है साब.” मांजराच्या आवाजात माझा कामगार बोलला.
“तेरे को पूछा में..?” त्यांनी वाघाच्या नजरेने उत्तर दिलं.
मी मोबाईल काढून नंबर दिला. काही वेळाने राजू भाईच तिथे आला. त्याने कामगाराला थोडं बोल लावल्यासारखं केलं. शेजारच्याची माफी मागितली. काही वेळाने प्रकरण थंडावलं.
शेजारी थोड्या रागातच माझ्याकडे बघत त्याच्या घरात गेला. राजू भाईने येऊन माझीही माफी मागितली.
“कैसा है भाय छोटा मोटा होते रेहता है दिल पे नहीं लेने का.. वो क्या है बौथ दिन से घर बंद हैं ना इसलिये.. बाकी सब मस्त है इधर. बस दोन तीन दीन में काम हो जायगा. अंकल को में सॉरी बोला. उनका भी काम करके देगा में. आपको कूच तकलीफ नहीं होगा.. ठीक है.. जाऊ क्या में..?”
मी शांततेनेच मान हलविली. त्या दिवशीचं प्रकरण मिटलं. पण माझं मन नाराज होत. शेजारच्या काकांचा राग आला होता असं नाही. त्यांची त्यांच्या आईच्या प्रती असणारी काळजी मला रडवत होती. मला कुठे तरी वाटत होत ही काळजी, हे प्रेम मला हवं होत पण मला ते मिळत नव्हत.
जे प्रेम दहा बाय बाराच्या घरात मिळत होतं ते प्रेम मला थ्री बीएचकेच्या घरात मिळत नव्हत. मी तसाच बसून राहिलो. रात्री जेवलोही नाही. रडत रडत झोपी गेल्याच सकाळी उठल्यावर लक्षात आलं.
हे देखील वाचा :
- बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
- भुकेल्या आईची कथा : चतकोर भाकरी
माझी कामावर जायची घाई सुरु होती. मी माझं आवरत होतो. माझा कामगार अजून आला नव्हता. त्याला फोनवरच मी “कुछ गडबड मत करना भाय” म्हणून सांगितलं होत.
बाहेर पाय टाकणार तोच शेजारची मुलगी माझ्या दारात आली.
“ए दादा आमची आई बोलवतेय तुला.”
मी क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिलो. खरं तर काका बोलवत आहेत असं काहीतरी ती बोलेल असा माझा अंदाज होता. मी येतो म्हणालो अन् ती हसतच आली तशी गेली. कालच्या प्रसंगाला धरून बरेच विचार मनात येत होते. त्यातला कोणता खरा ठरेल याचा अंदाज बांधत बांधत मी शेजारच्या घरात गेलो.
एक ऐंशीच्या वयातली आज्जी दाराकडे तोंड करून बसली होती. जणू काही ती माझी वाटच बघत होती. मी आत जाताच तिचा चेहरा खुलला.
माझी नजर घरभर फिरली. घर अगदी नेटनेटकं होतं. अजिबात पसारा नव्हता. सगळ्या वस्तू अगदी जिथंल्या तिथे होत्या. किचन पुर्णपणे स्वच्छ होतं. बेसिनमध्ये एकही खरकटं भांडं नव्हत. चहाचा अन् दुधाचा टोप तेवढा गॅसवर होता.
दहा बाय बाराची खोली होती पण अगदी नेटनेटकी होती. वर जाण्यासाठी बाहेरुन जिना होता. वर एक खोली, खाली एक खोली असं एकंदरीत ते घर होत.
“बोलवलत.” मी शांत नजरेने विचारलं.
“ये ये.” मला हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी आत बोलावलं.
“बस..” मी त्यांच्या समोरच बसलो.
एकटक मला त्या पारखून बघत होत्या. मला कुठून सुरवात करावी ते कळत नव्हतं.
“आज्जी कालसाठी सॉरी.” मी त्यांच्या नजरेला नजर देत बोलू लागलो. “मला माहीत नव्हत असं काही होईल ते. त्याने पण काही मुद्दाम नाही केलं. माफ करा मला.”
त्या फक्त माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच असं पाहणं मला उमजत नव्हतं. कोणाची तर आठवण व्हावी, कोणीतरी ओळखीचा भेटावा असं ते पाहणं होतं.
“आज्जी..” मी त्यांना आवाज दिला.
“काय खाल्लंस का बाळा.” त्यांच्या आपुलकीच्या आवाजाने माझे डोळे भरले. मी ते लपवत म्हणालो, “हो चहा घेतला आता.. कामावरच निघत होतो.. तुम्ही बोलावलंत म्हणून आलो.. म्हंटल आधी तुम्हाला भेटू या.. कालसाठी सॉरी बोलू या..”
“असू दे.. त्याचं काही नाही.. बस तुला खायला देते..”
“नाही नको आज्जी.. कामावर जायचंय.. उशीर होतोय..”
“असू दे बस.. जरा वाईच खाऊन जा.. उपाशी पोटी नगो जाऊस..” तसं म्हणत त्या उठल्या. त्यांच्याकडे पाहून त्यांचा अशक्तपणा जाणवत होता. त्यांना पुन्हा अडवत मी म्हणालो,
“आज्जी खरंच नको.. खरंच उशीर होतोय..”
“बस पटकन होतोय.. उपमा आवडतोय ना तुला.. का पव्हं करू..”
“आज्जी खरंच नको.. तुम्हीं आजारी आहात.. आराम करा.. वाटल्यास संध्याकाळी मी येतो तुम्हाला भेटायला..”
“असू दे.. संध्याकाळनं पिन ये.. आता जरा वाईच खा.. पिंके ऽ..” त्यांनी तिच्या नातीला आवाज दिला. एका हाकेतच ती जिन्यावरून पळत पळत खाली आली.
“काय गं ऽ..?”
“रवा आण जा पावशेर.” आपल्या पाकिटातले पैसे देत त्या म्हणाल्या.
“मला कुरकुरे पण.” पिंकीने लाडाने विचारलं.
“घे जा काय घ्यायचाय ती.” तशी ती पळत दुकानात गेली. ती येईपर्यंत आज्जीने बाकीची तयारी केली. तयारी करत करतच त्यांनी माझी विचारपुस केली.
“एकटाच राहतोस..?”
“होय.”
“कामाला कुठं जातोस..?”
“अंधेरीला.”
“आणि जेवणाच कसं..?”
“बाहेरच.. तिथं आहे एक हॉटेल.. येताना तिथूनच आणतो.”
काही वेळ त्या शांतच राहिल्या. मग म्हणाल्या,
“लगीन केलं नायस..?”
मी हसतच नाही म्हटलं. तश्या त्याही हसल्या.
“पोरगी बघितली हाय का नाय एकादी..?”
मी लाजलो. मी हसतच त्यांच्याकडे पाहू लागलो. तश्या त्याही मन भरून हसल्या.
“आताच्या पोरासणी सांगाय लागत नाय हाय का नाय..?” तश्या त्या आणखी हसायला लागल्या.
“नाही आज्जी तसं काही नाही.. अजून नाही बघितली.. नोकरीच पक्क झालं की बघायचं.” मी चेहऱ्यावर हसू ठेवत उत्तर दिलं.
“बर.. असू दे चालायचं.. राग येत नाहीं ना..?”
“नाही नाही अजिबात नाही. तसं काही नाही..”
तश्या त्या हसऱ्या नजरेने पाहू लागल्या.
“आई हे घे..” पिंकीने रवा आणून किचनवर ठेवला. उरलेले पैसे मोजून दिले. कुरकुरेच पाकीट घेऊन ती पुन्हा वरच्या खोलीत पळत गेली. आज्जीने बोलत बोलत पुन्हा तयारी सुरु केली.
“मम्मी पप्पा काय करतात..?”
मी शांत झालो. मला क्षणभरासाठी काय बोलायचं ते कळालं नाही. त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं.
“काही नाही गावी असतात.”
“शेती हाय का..?”
“हो आहे की.. शेतीच बघतात..”
“चांगलय.”
“इथं नोकरीसाठी आला होय..?”
“होय.” मी पुन्हा नजर चुकवत हसत हसत उत्तर दिलं.
गरम गरम उपमा त्यांनी एका प्लेटमधे काढला अन् मला दिला. मी शरमेने पाहत होतो. खरं तर मला कसं तरी वाटतं होत.
“घे.. लाजतोस होय..?” त्यांनी हसत विचारलं.
“नाही तसं नाही..”
“घे घे.. उपाशी पोटी कामाला जाऊन कसं चालल.. कामं करायला ताकद नको का..?”
माझे डोळे भरले होते. मी पुन्हा नजर चुकवायचा प्रयत्न करू लागलो. माझ्या हातात प्लेट देऊन त्या किचनच्या दिशेने वळल्या अन् किचन साफ करू लागल्या.
त्या मागे वळताच माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मला ही अपेक्षा नव्हती. इथे येण्यापूर्वीचे माझे सगळे अंदाज चुकीचे ठरले होते.
मला ज्या प्रेमाची गरज होती ते प्रेम इथे मिळालं होत. मला ज्या आपुलकीची गरज होती ती आपुलकी इथे मिळाली होती. मी रडत रडत आवाज न करता खात होतो. आज्जी त्यांच काम करतच होत्या.
मी डोळे पुसले. उपमा फस्त केला. आज्जी म्हणुन त्यांना हाक दिली.
“जरा वाईच घे बाळ.”
“नको खरंच नको.. पोठ भरलं माझं.. खरंच.. निघू मी आज्जी.. मला उशिर होतोय..”
“बर.. सावकाश जा.. आमच्या संतोषचा काय राग मानू नगंस..”
“नाही नाही तसं अजिबात नाही.. तुम्हीच मला माफ करा.. माझं काय चुकलं असेल तर..”
त्या नुसत्याच त्यांच्या पाणीदार डोळ्याने हसल्या.
मी चेहऱ्यावर हसू ठेऊन त्यांचा निरोप घेतला. दारा बाहेर पाऊल ठेवलं अन् पुन्हा माझे डोळे भरून आले. कामावर जाईपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी होतं अन् नजरेसमोर शारदा आजींचा चेहरा होता. त्यांच वागणं त्यांचं बोलण सतत माझ्या नजरेसमोर येत होतं.
तो संपुर्ण दिवस मी लोकांच्या नजरा चुकवून चुकवून रडत होतो. माझं कशात लक्ष नव्हतं. प्रवासात, कामात कशातच. का कुणास ठाऊक पण ही अनोळखी व्यक्ती काही मिनिटांच्या भेटीत आपलीशी वाटत होती. हवी हवीशी वाटत होती. माझं मन कळवळून आलं होतं.
मला ही माया हवी होती. हा आपलेपणा हवा होता. हे प्रेम हवं होत. मी मनोमन देवा जवळ मला हे मिळू दे म्हणून प्रार्थना करत होतो अन् बऱ्याच संघर्षानंतर आज त्याने हे देऊ केलेलं. पण मला त्याचा पुरता आनंद घेता आला नव्हता.
मला ज्या व्यक्तींकडून हे प्रेम हवं होत त्या व्यक्ती इथे नव्हत्या. ज्यांना मी ओळखतही नव्हतो अशा व्यक्तीकडून मला हे प्रेम मिळत होत. या मागे त्याचा काय हेतू होता, हे असं का होतंय हे मला कळत नव्हत. या आधीही कळालं नव्हत. जे होतंय ते शांतपणे मी स्वीकारत होतो.
हे देखील वाचा :
घराचं रीपेरींग काम चार पाच दिवसात पुर्ण झालं होत. प्लास्टर आणि रंगकाम पुर्ण झाल्याने घर आता पुर्ण नवीन दिसत होत. घरात म्हणाव्या तितक्या वस्तू नव्हत्या त्यामुळे घर रिकामं अन् मोठं वाटत होत. दिवस जात राहीले तसं मीही तिथे रुळलो.
प्रवासाचा शीण असायचा. पण घरी आलो की निवांत वाटायचं. मी आलो की शारदा आज्जी काही ना काही खायला द्यायचीच. मला ते घ्यायला कसं तरी वाटायचं पण नाही सुद्धा म्हणता येत नव्हतं.
त्या दिवसानंतर संतोष काका पुन्हा माझ्याशी जास्त कधी बोलला नव्हता. काकी कधी समोर आल्या की थोड फार बोलायच्या. पिंकी तर माझी छोटी मैत्रीण झाली होती.
संध्याकाळी काही ना काही अभ्यासाच्या निमित्ताने ती माझ्याजवळ येऊन बसायची. माझ्याशी गप्पा मारायची. मलाही ते खूप बरं वाटायचं.
मला स्वतःची बहिण नव्हती. पण असं वाटायचं जर असती तर ती पिंकी सारखी बोलकी असती. ती बोलता बोलता इतकी हसवायची की मी माझं दुःख विसरून जायचो.
त्यातले बरेच किस्से ती शारदा आज्जीचे सांगत होती. ते ऐकताना हसूही यायचं अन् हसता हसता रडूही यायचं. पिंकीची अन् माझी चांगली गट्टी जमली होती.
एकदा पिंकीने येत्या शनिवारी वाढदिवस असल्याचं सांगितलं. संतोष काकाही आदल्या दिवशी घरी येऊन सांगून गेला. मला म्हणाला, “पोरा वाढदिवसाला ये लेकीच्या.. आणि जेवण आहे.. उद्या बाहेर जेवायचं नाही.. इथ जेवला पाहिजेस..” एवढं बोलून तो हसत हसत गेला होता. मला फार बर वाटलं.
त्या दिवसानंतर आज पहिल्यांदाच तो माझ्याशी बोलला होता. त्याची माझी जास्त भेट होत नव्हती. तो नजरेलाही जास्त दिसत नव्हता. काही का असेना पण त्याने स्वतःहून बोलावलेलं मला आवडलं होतं.
पिंकीचा वाढदिवस जोशात साजरा केला. पिंकी आज भलतीच खूश होती. तिला मिळणारे गिफ्ट ती मला दाखवत दाखवत एका बाजूला ठेवत होती. मी दिलेलं गिफ्ट काय आहे हे सतत मला नजरेने विचारत होती. अन् मी तिला तुझं तु बघ म्हणून सांगत होतो.
तिला पाहताना मला माझ्या बालपणीचे वाढदिवस आठवत होते. तिला मिळणाऱ्या गिफ्टपेक्षाही जास्त माझ्याकडे गिफ्ट होते. पण तिला मिळणार प्रेम मला मिळणाऱ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं.
माझा वाढदिवस हा वाढदिवस कमी आणि दिखाऊपणा जास्त वाटत होता. किंबहुना तो फक्त दिखाऊपणाच होता. पण पिंकिचा वाढदिवस हा वाढदिवस कमी आणि फॅमिली गेट-टुगेदर जास्त वाटत होता.
काकाने कशाची हयगय केली नव्हती. जवळपासच्या सर्वांना त्याने जेवायला बोलावलं होत. बरेचसे पाहुणे आले होते. इतके की बसायला जागा कमी पडत होती. ते ओळखून मी स्वतःच काकांना माझी खोली वापरण्यासाठी त्यांना सुचवलं होतं. त्यांनाही ते बर वाटलं. पाहुणे येत होते. बसत होते.
जेवणाच्या पंगती पडत होत्या. काहीजण माझ्या घरी बसत होते. काहीजण आणखी कोणाच्यात बसत होते. कोणाला ऍडजस्ट करण्याची गरज लागत नव्हती. जो तो आपोआप त्या वातावरणात ऍडजस्ट होत होता. पिंकीचा वाढदिवस हा मला नंतर फॅमिली फंक्शन कमी आणि सोशल इव्हेंट जास्त वाटू लागला.
रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालला. भरलेलं घर हळूहळू रिकामं झालं. काही पाहुणे होते ते राहणार होते. मी त्यांना माझ्या खोलीत झोपण्यासाठी सुचवलं होतं. काकांनी तेव्हा हसून पाहिलं होतं. माझ्या बाबतीतल त्यांचं मत बदलत चाललं आहे हे त्यांच्या हसण्यावरून मला जाणवलं होत.
मी खोली पुन्हा झाडून घेतली. आवणार तोच शारदा आज्जी अन् पिंकी घरात आल्या. मी त्यांना बसायला दिलं.
“दादा ड्रेस छान आहे.. थँक्यू..” पिंकी हसत हसत म्हणाली.
“आवडला ना..?”
“खूप.. सगळ्यात आधी मी तुझं गिफ्ट उघडून बघितलं.”
“होय..?”
“हां ऽ.”
“मग काय काय गिफ्ट्स मिळालीत आज..?”
“बघायचं उद्या.. मी फक्त तुझंच गिफ्ट बघितलं.. आता लय कंटाळा आलाय मला.. मी आणि आई इथंच झोपतो..” तशी ती फरशीवर झोपली देखील.
“ए पोरी अंथरूण आण जा.. हाय का आता..”
“मम्मी इल घेऊन.” तेवढ्यात काकी आल्याही.
“येऊ का..?”
“या ना काकी..”
“नाही म्हंटल, भाऊ येणार होता इथे खरं तो झोपला तिथेच.. वेळ झाला ना.. आई म्हटल्या मीच जाते मग तिकडे म्हणून मग..”
“असु दे की.. त्यात काय..”
“थँक्यू हां..”
“काकी लाजवताय आता..”
त्या नुसत्याच हसल्या. त्यांनी अंथरूण दिलं अन् पिंकीला प्रेमाने डीवचून गेल्या.
“जेवलास ना पोट भरून.. ?” आज्जीने डोळ्यात डोळे घालून मला विचारलं.
“हो जेवलो की.”
“लय करतो संतोष पोरीसाठी. दरवर्षी वाढदिवसाला जेवान देतो. लय पावनं येतात.”
“होय बघितल मी. मला नंतर वाटलं काय तरी वेगळाच कार्यक्रम आहे आज. वाढदिवस वाटतच नव्हता.” मी पिंकीकडे बघून म्हणालो. ती केव्हाच झोपली होती.
“गावाला जात नाहीस कवा..?”
मी शांत झालो. काय बोलावं हे मला सुचेना. काय तरी बोलायचं म्हणून मी उत्तर दिलं, “सुट्टी असली की.”
“गमत नसंल ना एकट्याला..?”
“नाही तसं काही नाही. सवय झाली आता. तसं पण दिवस सगळा कामात जातो. तुमचं गाव कोणत आज्जी..?” मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला.
“माझं व्हय.. आम्ही मूळचं कोल्हापूरचं.. नवरा आमचा पोलादाच्या कारखान्यात कामाला हुता पुण्यात. रक्ताचा कसला रोग झाला त्यात तो सपला.”
“कधी ते..?”
“झाली त्याला लय वरसं.”
“मग.”
“मग काय काम शोधत शोधत मंबई पातूर आलो. लय हाल काढलत. धुनीभांडी करून दिवस काढलंत. आता गेलं ती दिस.. आता नाय काय वाटत.”
“संतोष काका काय करतात..?”
“त्यो व्हय.. डायवर हाय.. सायबाच्या गाडीवर.. सायब वकील हाय त्येचा..”
“काका एकटेच आहेत..?”
“व्हय..” आज्जीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं.
“किती हाय शेती..?”
“आम्हांला होय..?”
“हां ऽ..?”
“आहे की, म्हणजे भरपूर आहे तशी.” मी गोंधळलो.
“एकटाच हायस का भईन-भाव..?”
“नाही मी एकटाच.”
“तुला आवडत न्हाय व्हय शेती कराय..?”
“नाही तसं नाही. आवडते. पण मला नोकरी करायची आहे.”
“नोकरी बी चांगली हाय लेका खरं शेती सारखं सुख नाय. तुझ्या मागं बाऽ न कुणाला द्यायचं ही समद..” त्यांनी तसं म्हणताच माझे डोळे भरले. इतक्या दिवसांचा दाटलेला हुंदका फुटला. न राहवून मी रडू लागलो.
शारदा आज्जी शांत बसली होती. मी हमसून हमसून रडू लागलो.
“काय झालं पोरा..?”
मी मानेनेच नकार देत काही नाही म्हणू लागलो.
“भांडून आलायस घरातनं..?”
माझी मान नकळत होकारार्थी हलली.
“गप नगो रडूस. तरुण वयात हुत्यात अशी भांडणं. तरी मला वाटत हुतच. गप गप असतूस. नक्की काय तर बिनसलं असणार..”
मी डोळे पुसू लागलो.
“कशावरन बिनसलं नेमकं. नोकरीवरन..?”
“नाही.” मी मानेने नकार देत पेपरांचा गठ्ठा जवळ केला आणि एक एक पेपर चाळू लागलो. अन् मला हवा तो पेपर मिळाला. तो पेपर त्यांच्या समोर ठेवत मी म्हणालो.
“मम्मी-पप्पा आहेत हे माझे. बाप उद्योगपती आहे. गडगंज संपती आहे. पण प्रेम नाही.” तसा माझा हुंदका पुन्हा दाटून आला. हुंदके देत देत मी रडू लागलो. शारदा आज्जी पेपरातल्या फोटोकडे निर्विकारपणे पाहत राहिली.
“घटस्फोट झालाय यांचा आत्ता. मी खुप प्रयत्न केला. पण यांना गरज नाही एकमेकांची अन् माझीही.” तसा मी पुन्हा रडू लागलो. शारदा आज्जी माझी पाठ थोपटू लागली. माझं सांत्वन करू लागली. बऱ्याच वेळाने मी शांत झालो.
“परत कधी भेट न्हाय..?”
“अं हं ऽ..” मी मानेनेच नकार दिला.
“असू दे.. नको वाईट वाटून घेऊस.. हुईल समद यवस्थित.”
मी तसाच काही न बोलता जमिनीवर पडून राहिलो. सकाळी उठलो तेव्हा अंगावर चादर होती. दार बंद होत. मी आजूबाजूला पाहिलं. कोनी नव्हतं. घड्याळात अकरा वाजले होते. मी अंथरून दूर केलं अन् स्वतःच आवरायला घेतलं.
क्रमश :
आपली माणसं – भाग ०२
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ॲप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!
Chan lihil aahes
Thank you..😊