आरशातलं प्रेम – भाग १ – स्वप्न

प्रेम व्यक्त होण्यापूर्वीच आलेला दुरावा आणि त्यातून निर्माण होत गेलेलं रहस्य म्हणजेच “आरशातलं प्रेम”. ही रहस्यकथा आपल्याला सध्याचं समाजातलं वास्तव दाखवते.

“आरशातलं प्रेम – स्वप्न”

 

धक-धक धक-धक    धक-धक धक-धक
 
धक-धक धक-धक    धक-धक धक-धक
 
धक-धक-धक-धक    धक-धक-धक-धक
 
धक-धक-धक-धक    धक-धक-धक-धक
 

    AK – 47 ने फायरींग करावं तसं ह्रदय धडधडत होतं. अरबी घोड्याच्या रफ्तारीने काळजाचे ठोके पळत होते. परिस्थितीच तशी होती. काही दिसत नव्हतं. काही कळत नव्हतं. ह्रदयाचं धडधडनं सोडून काही ऐकू येत नव्हतं. मी फक्त आकर्षित होत होतो.

    ती माझ्या समोर दहा एक पावलांवर उभी होती.

    स्तब्ध. शांत.

    मी तिच्या जवळ चालत जात होतो. चुंबकाने खेचल्याप्रमाणे खेचला जात होतो. चुंबक जसं एखाद्या लोखंडी वस्तूला आपल्याजवळ ओढतं अगदी तसांच.

    मी तिच्या समोर उभा ती माझ्या समोर उभी. दोघांमधलं अंतर दोन पावलांएवढं. दोघंही शांत. कोणी काहीच बोलत नव्हतं. डोळ्यांचंच काय ते बोलणं सुरू होतं.

    दोघांच्याही चेहऱ्यावर हलकंस स्मित. शेवटी तिने लाजत तिची लाल ओढणी सावरत मान डोलावली तसा मी पुढे गेलो.

    ती दबक्या पावलाने मागे गेली.

    “नको.”

    मी पुढे गेलो. ती हसतच “नको नको.”

    मी तिच्या जवळ जात राहिलो.

    “एकदा एकदा प्लीज.”

    ती नको नको करत लाजत लाजत मागे जात राहिली.

    मी पुढे पुढे होतोय तशी ती मागे मागे.

    मी थांबलो. ती मागे मागे जातच राहिली.

    मी जाग्यावरच थांबलो. ती बरीच मागे गेली अन् थांबली.

    चेहऱ्यावर एक मादकसं हसू आणून मला इशारा केला तसा मी जोरात तिच्याजवळ गेलो आणि तिला धरणार एवढ्यात.

 
    धाऽऽड…
 
    “आई गं ऽऽ.. आई ऽऽ आई ऽऽ आ ऽऽ”
 

    “आरं ऽऽ आरं ऽऽ आरं ऽऽ.. पडला ऽऽ पडला ऽऽ..”

    “आरं काय झालं काय ? कसा पडला ? लागलं काय” ? आज्जी भांबाऊनच गेली. अचानक झालं काय ह्याला ?

    मी गुडघा चोळत म्हटलं, “काही नाही, काही नाही तोल गेला.”

    “काय करालतास काय झोपेत तोल जायला ?”

    “काही नाही ते आपलं झोपेत”, जाऊ दे झोप तू.

    “लागलं का बघू ?”

    “नाय नाय, काय लागलं नाय झोप तू.”

    “बर-बर. नशीब. पण सांभाळ बाबा. तोल बिल जाणं बर न्हाई आतापासनंच. तरी नशीब गुडघ्यावर पडलांस.”

    “हा ऽ हा ऽ सांभाळतो सांभाळतो तोल. झोप झोप. एवढं काही लागलं नाही.”

    मी आपलं काही नाही झालं म्हणत आजीला झोपावलं आणि परत बेडवर जाऊन झोपलो. पडल्यावर आवाज आला जोरात पण गुडघ्याला काही जास्त मार लागला नाही. मार लागला होता तो मनाला.

    “श्या ऽऽ… परत स्वप्न !”

    “कधी खरं होणार हे ?”

    “कधी पर्यंत आपण असं एकटच राहायचं ?”

    “कधी आपली वेळ येणार ? की आपण असचं झुरत राहायचं ? की, आपल्या नशिबातच प्रेम नाही ?”

    असंख्य प्रश्न मनात येत होते पण उत्तरं मात्र मिळत नव्हती. जाऊ दे म्हणत झोपायचा प्रयत्न केला. सकाळी उठून शाळेला जायचं होतं. गुडघा चोळत, मन सावरत-सावरत झोपलो.

    सकाळ सकाळचा थंडगार वारा अंगाला गुदगूल्या करून जात होता. सर्वत्र असं मस्त धुकं पसरलेलं होतं. वातावरण अगदी गुलाबी गुलाबी झालेलं. एकदम रोमँटिक. पण हे वातावरण कपल लोकांसाठीच चांगलं. आमच्या सारख्या गुडघे फोडणाऱ्यांसाठी नाही.

    थंडीत साधं खरचटलं तरी किती ठणकत राहतं. माझा तर गुडघा चांगलाच दुखत होता. तरी पण सकाळी लवकर उठून शाळेसाठी निघालेलो. वाटेत मित्र वगैरे भेटले. गप्पा गोष्टी करत, दंगा मस्ती करत शाळेत पोचलो. मित्रांच्यात असलं की दु:ख बरोबर नसतं.

    “दु:खावर औषध मस्त म्हणजे आपले दोस्त”.

    एकांतातच दु:ख जाणवतं. सकाळचा वेळ मित्रांबरोबर शाळेत गेला. रोजच्या सारख सगळं घडत होतं. विशेष असं काही नाही. आता परत शाळा सुटली की घरी जायचं. जेवून क्लासला जायचं. क्लासवरून घरी. घरातून मैदानात, मैदानातून घरी. “शाळा-मित्र-अभ्यास-क्लास-स्वप्न” एवढंच आयुष्यात सुरू होतं.

    “काय भावा, आज येणार की नाही क्लासला ?” माझ्या मित्राने सुखदरेने माझ्या पाठीवर थाप मारत मला विचारलं. तसं त्याचं नाव सिद्धेश होतं खरं आम्ही सगळे त्याला त्याच्या आडनावानेच बोलवायचो. का कुणास ठाऊक खरं “सुखदरे” म्हणून हाक मारायलाच भारी वाटायचं.

    “येणार ना, किती दोन वाजता ना ?”

    “हां रे तेच रोजचं टाईम”.

    “हां सव्वा दोनला येतो घरी जाऊ मग”.

    “सव्वा दोनला ?”

    “मग ?”

    “भावा पंधरा-विस मिनिटं आधी ये. लवकर जाऊन जागा धरली पाहिजे. ॲडम‍िशन वाढलीत आता.”

    “होय काय बरं बरं पावणेदोनला येतो”.

    “हां चालेल”.

    “जाऊ नकोस मी आल्याशिवाय.”

    “हां रे, गेलोय का कधी ?”

    मी हलकसं हसलो.

    सुर्य डोक्यावर आला तेव्हा शाळा सुटलेली. मित्रांबरोबर बोलत-बोलत, दंगा-मस्ती करत घरापर्यंत पोचलो. आता लवकर आवरून, जेवून क्लाससाठी निघायच होतं. तसा मी रोज दोन वाजताच घरातून निघायचो पण आज पंधरा मिनिटं आधीच जायचं होतं. जागा धरायला.

    कारण की जागा धरणे ही फार महत्वाची गोष्ट होती आमच्यासाठी. नाही तर फार मार खावा लागायचा. त्याचं असं होतं की,

    आमचा क्लास होता छोटासा. ४ मोठे बँचेस आणि बसायला बाकडे. त्या छोट्याश्या खोलीत ८-९ जण तरी होतो आम्ही. त्यात व्हायचं असं की, आम्हांला घरचा अभ्यास म्हणून काही ना काही पाठ करायला दिलेलं असायचं. ते आम्ही नेहमीप्रमाणे करायचो नाही. मोठे प्रश्न असले की १-२ फटके बसायचे. पण रिकाम्या जागा, जोड्या लावा असे छोटे प्रश्न असले की जरा जास्तच बसायचे. “एवढं पण करता येत नाही का तुम्हांला ?” असं म्हणत म्हणत मॅडम लाकडी पट्टी दाखवायच्या.

    मॅडम काय करायच्या, प्रत्येकाला उठवून काल दिलेलं पाठांतर बोलायला लावायच्या. गाईडमध्ये बघून प्रश्न वाचायचा आणि मॅडमकडे बघून उत्तर द्यायचं. मोठ्या प्रश्नांची उत्तरं तर आम्हाला देता यायची नाहीत पण रिकाम्या जागा, जोड्या लावा सांगताना आम्ही उत्तरांवर हातच झाकायचो नाही. जिथे उत्तरं खाली दिलेली असायची त्याच्या खाली आम्ही हात ठेवायचो. मॅडमला वाटायचं की आम्ही उत्तरांवर हात ठेवलाय. आम्ही शेवटच्या बाकावर असल्यामुळे त्या काय एवढं उठून बघायच्या नाहीत. आमचं असं मॅनेजमेंट असायचं.

    मोठ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही मोडून तोडून द्यायचो. पण छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं सरळ सरळ बघूनच सांगायचो. तेवढा मार आम्हांला कमी बसायचा. कमी मुलं होतो तेव्हा बसायचा काही प्रॉब्लेम नव्हता. आपली जागा फिक्स होती. पण आता नवीन ॲडमिशन आलीत म्हटल्यावर लवकर जाऊन जागा पकडणं भागच होतं नाही तर आमची बोंबच होती.

    घरी आल्याबरोबर पटापट माझं हात-पाय धुणे, जेवण वगैरे सगळ्या गोष्टी मी उरकल्या. कोपऱ्यात पडलेली कपडे अंगावर घातली आणि निघालो क्लाससाठी. क्लासला जाताना आम्ही ४-५ जण मित्र मंडळी सुखदरेच्या घरूनच जायचो. क्लास काय तसां लांब नव्हता घरापासून पण मित्रांसोबत एकत्र जाण्याची मस्ती करण्याची मजाच वेगळी होती.

    सुखदरेच्या घरी बरोबर पावणेदोनला पोचलो. तिथून आम्ही क्लासकडे निघालो. क्लासमध्ये आलो तेव्हा मॅडमनी माझ्याकडे एकदा आणि घड्याळाकडे एकदा बघितलं आणि म्हणाल्या,

    “आज लवकर कसं काय ? की घड्याळ पुढे आहे ?”

    “नाही. आज आम्हीच लवकर यायचं ठरवलं.”

    “बर-बर, थांबा बाहेर अजून १० मिनिटं आहेत २ ला आत या.” विकतचं हसू तोंडावर आणत मान हलवत आम्हाला उद्देशून म्हणाल्या.

    “बरं.”

    आम्ही बाहेर येऊन थांबलो.

    “काय रे तू तर म्हणालास की नवीन ॲडमिशन वाढलीएत. कुठ कोण आलंय आपणच आहोत फक्त.” मी सुखदरेला म्हणालो.

    “येतील रे अजुन दहा मिनिटं आहेत. आज आपण लवकर आलोय. येतील येतील.”

 
    दोन वाजता क्लासमध्ये ठरलेल्या जागी शेवटच्या बाकावर जाऊन जागा फिक्स केली. आता कोणी जरी आलं तरी आम्ही बसलेल्या जागा बघून तिथे कोणी बसणार नव्हतं.
 

    एक-एक करून रोजचेच चेहरे येत होते. नवीन कोण येतच नव्हतं. नवीन ॲडमिशन कोणाचं आहे याची मला फार उत्सुकता होती. थोड्या वेळाने एक दोन सावल्या आत आल्या. त्यापैकी पहिली सावली एकदम आत आली. ती तर एक बाई होती. कदाचित कोणाची तरी आई आली असावी असा मी विचार केला. आतमधून सर आले आणि त्यांच्याशी बोलायला लागले.

    माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. मी त्या दुसऱ्या सावलीकडे बघत होतो. ती कोणीतरी मुलगी होती. जी थोडी बाहेर थांबलेली. तिचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता पण तिची लाल ओढणी वाऱ्याने हलत होती. मी इकडे तिकडे सरकून बघण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आड असल्यामुळे मुखदर्शन काय झालं नाही. फार वेळ कसरत करावी लागली नाही मला.

    सरांनी तिला, “बाळा बाहेर का थांबलीस ये ना आत ये” म्हणत हाक मारली. ती दबक्या पावलाने आत आली. तिचा चालतानाचा आवाज मला ओळखीचा वाटू लागला. ती आत येऊन तिच्या आईशेजारी आणि आम्हां सर्वांना दिसेल अशी उभी राहिली.

    मध्यम उंचीची, सडपातळ देहाची, रेखीव भुवया, लांब केस, पांढऱ्या रंगाचा ड्रेस, लाल रंगाची ओढणी, पाठीवर सॅक, नजर चपळ आणि नाजूक ओठ.

    तिची आणि माझी एका क्षणासाठी नजरानजर झाली. नजरेला नजर मिळाली. काळजाला काळीज भिडलं. क्षणात जिगर घायाळ झालं.

    आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो. काळ तिथेच थबकला. वातावरणात गुलाबी छटा पसरली. अंगावर रोमांचकारी काटा शहारला. वारा मंदपणे वाहू लागला. कानात व्हायोलिनचा सुर निनादू लागला. हृदयाची धडधड वाढू लागली. आकाशातला चंद्र जमिनीवर प्रकटला. स्वप्नसुंदरीच जणू प्रत्यक्षात समोर अवतरली आहे असं वाटू लागलं. स्वप्नात पाहिलेला चेहरा हळूहळू स्पष्ट होऊ लागला.

    तिने परत माझ्याकडे पाहिलं नाही. तिला जाणवत असावं की मी तिच्याकडे पाहतोय म्हणून. सुखदरेच्या लक्षात आलं. त्याने त्याचा गुडघा माझ्या गुडघ्याला मारून मला हलवलं. तसा मी इवळत त्याच्याकडे मान फिरवली.

    “काय ?” मी तोंड वाकडं करून विचारलं.

    “नवीन ॲडमिशन.”

    “ही आहे ती ?”

    “होय.. अजून दोन मुलं आणि ही एक मुलगी आहे.”

    “तुला सांगता येत नव्हतं एका मुलीचं ॲडमिशन आहे म्हणून.”

    “का ? काय झालं ?”

    “काय झालं ? अरे कालचेच कपडे घातलेत मी.”

    “त्याला काय होतय माझे २ दिवसाचेत. ती थोडी विचारणार आहे कधीचे कपडे आहेत म्हणून.”

    “अरे पण वास तर येतोय ना.”

    “मला तर येत नाही वास तिला कसा जाईल ?”

    “तुला कसा येईल ? तुला सवय झालीय.”

    “जाऊ दे रे एवढं काय नाय.”

    “तसं नसतं भावा.. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन”.

    “काय-काय ?”

    “काय नाय तुला नाय कळणार.. तुला इंग्लिश पण नाय कळणार आणि प्रेमपण नाय कळणार.” मी हळूच पुटपुटत म्हटलं.

    “काय इंग्लिश आणि काय ?”

    “काही-नाही, काही-नाही.. बघ समोर बघ.”

    “सरांच बोलणं संपलेलं. सरांनी तिला, “अंकिता बस बाळ” म्हणताच ती पहिल्या बाकावर येऊन बसली. तिच्या आईने तिला हसत हसत बाय केलं. “अंकिता नवीनच गावावरून आली आहे अन् आदर्शलाच आहे” असं बरंच काय काय सर बोलत होते. पण माझं फक्त तिच्याकडेच लक्ष होतं. कुठंतरी हिला पाहिलय असंच वाटत होतं. मी मनातल्या मनातच तिचं नाव पुन्हा उच्चारलं.

    मॅडमांनी पाचवीचं इतिहासांच पुस्तक घेतलं आणि धडा समजवायला सुरवात केली. धडा संपेपर्यंत माझं धड कशातच लक्ष नव्हतं. माझं धड तिच्याकडेच वळत होतं. मला फक्त परत एकदा अटेंशन हवं होतं.

    “नजरेचं”.

    मी तिला पाहतोय हे तिला माहित होतं. म्हणूनच कदाचित ती वर बघत नव्हती. तिची पाठ जरी माझ्याकडे असली तरी तिचा चेहरा बरोबर माझ्यासमोर होता. होय बरोबर समोर.

    कारण,

    ती जिथे बसलेली, तिच्यासमोर कपाट होतं आणि कपाटाला वनसाईट आरसा होता.

    “आरसा”.

    आणि तिचा चेहरा बरोबर माझ्यासमोर होता.

क्रमश:
 
 
    या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 

हे देखील पहा :

वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी

एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम

बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना

चतकोर भाकरी

शिक्षा

     नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
     धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment