अधुरी कहानी – भाग ०९

“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

“अधुरी कहानी – वाटचाल”

 

 
    दुसऱ्या दिवशी अमरने सकाळी सकाळीच अनिकेतला फोन केला.. अन् सेक्ससाठी तरी तयार आहेस का म्हणून विचारलं. त्याने हां हूं करत शेवटी मुलगी स्वतःहून तयार असेल तर चालेल म्हणून उत्तर दिलं. अमृताने ही तिची कामगिरी बजावली. सेक्स पार्टनर शोधल्याबद्दल अनिकालाही अमृताचं आश्चर्य वाटू लागलं.
 

    शरीर सुखाच्या शोधात असणाऱ्या दोन आत्म्यांना एकत्र आणण्यात अमर अमृताच्या प्रयत्नांना यश आलं होतं. रात्र रात्र होणारी आपली तडफड आता कमी होईल असा विश्वास अनिकेतला वाटत होता. शरीर उपभोगाच्या सुखाने मानसिक त्रासाला आळा बसेल अशी आशा अनिकाच्या मनात निर्माण झाली होती. दोघेही एकमेकांना अनभिज्ञ. ना नावाची ओळख ना मनाची ओळख. मनशांती मिळवण्यासाठी संभोग क्रियेत येऊ पाहणारे दोन अनभिज्ञ शरीरं.

    अमरच्या बाजूने सर्व तयारी झालेली. आता फक्त वेळ, दिवस अन् ठिकाण ठरवायचं बाकी होतं. दोघांच्या वेळेनुसार सर्व गोष्टी अवलंबून होत्या.. दोघांनाही आसपास कुठेही जायचं नव्हतं. तिला पुण्यातलं ठिकाण नको होतं.. याला कोल्हापुरातलं ठिकाण नको होतं..

    अमरने बरीच ठिकाणं सुचवली पण काही अनिकेतला पसंत नव्हती तर काही अनिकाला.. कोणी ना कोणी पाहुणा आसपास होता.. अमर अमृताला हेच कळत नव्हतं की पाहुणे काय त्या दोघांना रंगे हात पकडायला तिथेच बसलेले असणार आहेत की काय.. यांना गरज असल्यासारखं ही दोघं सर्व काही करत होते.

    अमर म्हणालाच, “मला वाटतंय की मी आता दलाल झालोय..” अमृता त्यावर खळखळून हसली. “या दोघांना काहीच पडली नाही. त्यांची ओळख आपण केली. जागा पण आपणच शोधतोय.. हे आपले निवांत..”

    अमृता हसूच लागली..

    “तुला माहिती आहे, मला काही सुद्धा विचारलं नाही त्याने मुलीबद्दल”
 

    “हे काय सांगालास.. तो तरी मुलगा हाय.. आमच्या दीदीला नाव सुद्धा जाणून घ्यायचं नाय.. कोण हाय, कुठला हाय, कसा दिसतो ते तरी.. आपण सेक्स कोणाबर करणार निदान त्याचा फोटो तरी बघाय पायजे का नको..?”

    “त्यांना ना फक्त शरीराची गरज आहे बाकी काही नाही..”

    “न्हायतर काय.. मला म्हणते काय करायचं जाणून. अनोळखी असलेलंच चांगलं.. मी म्हटलं दिदे, करताना तरी तोंड बघावं लागणारच की.. तर म्हणते, शक्यतो अंधारातच सर्व करणार..

    अमरला हसू आलं अन् तो म्हणाला, “काय यांची मेंटॅलिटी झाली आहे.. थोबाड तर दिसलंच ना एकमेकांना..”

    तर काय म्हणते माहितीय, “ झाल्यानंतर बघू.. तेव्हा थोडी काय होऊ शकणार हाय.. झालं ते झालं.. आता गरज एकच हाय भुकेची..”

    “एखाद्या हाय प्रोटेक्शन मध्ये असणाऱ्या खजिन्याची सुरक्षा कशी करतात तसं चाललंय दोघांचं.. फुल सिक्युरिटी मध्ये.. पासवर्ड प्रोटेक्शन.. एक सोडून तीन तीन पासवर्ड..”

    दोघेही हसू लागले.

    “काय करायचं ते लवकर कर बाबा शोध एखादं ठिकाण लवकर. त्यांची भूक तेवढी मिटू दे.. हवस तेवढी पुरी होऊ दे..”

    “आता किती ठिकाणं बघायची.. याला कोल्हापूर नको तिला पुणे नको. दोघांना पण मुंबई नको.. कुठून आणणार ह्यांना हाय प्रोटेक्शन विला..”

    अमृता चिंतेत पडली अन् म्हणाली, “अवघड तर हाय..’

    “तुझ्या दीदीला विचार एखादा बंगला चालेल काय फार्म हाऊस टाईप..?”

    “कुणाचा..?”

    “एका मित्राचा आहे शूटिंगसाठी वगैरे वापरतो..?”

    “फुकट दिल काय..?”

    “तर आपल्या बापाचाय.. पैसे घिल.”

    तशी ती हलकंस हसत म्हणाली, “तरी किती..?”

    “विचारायला पाहिजे.”

    “विचार की.”

    “नको तू आधी तिला विचार.. म्हणावं कोल्हापूर पासून लांब आहे घाटात..”

    “कुठं ते..?”

    “आंबा घाटात.. रस्त्यापासून जवळच.. पाच दहा मिनिटे तेवढं चालावं लागतं.. खरं वस्ती नाय आसपास..”

    “आपण का गेलो न्हाय अजून.” ती लाजतच म्हणाली ..

    “तुला जायचंय..?” त्याने ही हसत विचारलं..

    “जाऊ या की.”

    “बघू.. त्यांचा होऊ दे सेक्स सक्सेस मग करू प्लॅन..” तसे दोघेही हसले..

    “ती दोघं तिथं मजे करणार अन् आपण तेवढी मेहनत घेणार.. आपण काय त्यांच इमॅजिन करत बसायचं व्हय..?”

    अमर हसू लागला. “काय करायचंय तुला..?”

    “तुला माहितच न्हाय जनु..?”

    “बर.” तसा तो शांत झाला क्षणभर थांबून म्हणाला, “करूया प्लॅन.. तसं पण पावसाळ्याची गार हवा सोसना आता.. असं वाटालय तुझ्या जवळच बसून राहाव..”

    “आणि, नुस्त बसून..?”

    “तू नुसतं बसून देणार आहेस..?”

    तशी ती लाजली. तो नुसताच हसू लागला.

    अमृताने अनिकाला बंगल्याबद्दल विचारलं. ती तयार झाली. पैशांबद्दल तिची काही तक्रार नव्हती. एकदाचं ठिकाण ठरलं. ९ जूनचा दिवस ठरला. तिने दोन दिवसासाठी बंगला भाड्याने घेतला. अमृताने तिला गावी येण्याचा सल्ला दिला अन् तिथूनच एकत्र जाऊ असं सुचवल. परंतु अनिकाने नकार दिला.
 

    “नको मला एकटीलाच करू दे प्रवास..” ती इतकंच म्हणाली ..

    “दिदे मी येते वाटल्यास.. तिकडं दुसरीकडे कुठेतरी राहते..”

    “नको चुकून कोणी ओळखीचं निघालं तर तू नको यात अडकायला.”

    “कोण ओळखीचं भेटणार आहे तिथे..?”

    “अशा ठिकाणीच कोण ना कोण टपकतं अमू.. नको काळजी करू अन् तसंही मला जरा एकटीला प्रवासाची गरज आहे.”

    “बर तुला पटेल तसं..”

    “फक्त एका गाडीची सोय कर..”

    “चालतंय..”

    “घरी काय सांगणार आहेस..?”

    “काही नाही.. जॉइन व्हायच्या आधी जरा फिरून येते म्हणून सांगते.. तिकडची जबाबदारी खरं तुझी. कोणाला कळता कामा नये मी तिकडे आले म्हणून..”

    “त्याची चिंता सोड.. तू फक्त सावकाश ये..”

    “हो..”

    “चालतंय.. करते मी फोन तुला.”

    कोल्हापुरातून अमृताने गाडीची व्यवस्था केली. ठरलेला दिवस उजाडला. अमृताने हसतच अनिकाला सावकाश जा अन् ऑल द बेस्टचा इशारा केला. संथ वाहणाऱ्या वाऱ्यासोबत अनिकाची गाडी मंद गतीने चालू लागली.

    दिवसाच्या उजेडासोबतच अनिकेतच्या मनाची धाकधूक वाढू लागली.. अमरने त्याची पूर्ण तयारी करून घेतली होती. ठरलेल्या नियोजनानुसार अनिकेत घरातून बाहेर पडला. स्प्लेंडरला किक मारली. गाडी काही सुरू झाली नाही.. त्यानं दोन-तीनदा प्रयत्न केले. एकदा पेट्रोल चेक केलं. परंतु गाडी सुरू होईना. त्याने रागातच गाडी पुन्हा घरात लावली.. बाहेरचा रस्ता धरला.. कोल्हापुरापर्यंत लवकरात लवकर एसटी मिळवण्यासाठी तो मोठी मोठी पावलं टाकत चालू लागला.. मागून सलग वाजणाऱ्या हॉर्नकडे त्यानं मान फिरवली अन् जागीच थांबला..

    “चालत आज..” गाडीतून एक भारदस्त आवाज आला.

    “व्हय जरा गाडी बंद पडली.. काय दौरा नाथाभाऊ..” तो गाडीच दार उघडत गाडीत बसला.

    “लवकर निघालास.”

    “व्हय जरा काम निघालं म्हटलं लवकर जायाचं.”

    “पाटनर न्हाय म्हणा आज..?”

    “नाय कामावर न्हाय आज.. जरा काम निघाल एक. म्हटलं आजच उरकून टाकावं..”

    “पुरगी बघायला वाटतं.. कुणीकडचा दौरा म्हणायचा मग आज..”

    “नाय.. पुरगी कुठली.. या जन्मात काय आमच्या नशिबात न्हाय.” अनिकेत बारीक आवाजात पुटपुटत म्हणाला.

    “मग काय खाजगी काम काढलं वाटतं..?”

    “नाय खाजगी असं न्हाय..”

    “अन्या, अशी लय खाजगी कामं केल्यात मी.. माझ्यापासून लपवालास..?”

    “कुठं गरीबाची चेष्टा करता नाथाभाऊ.. तसं काय न्हाय..” तो लाजतच म्हणाला..

    “चालायचं चालायचं.. तरुण पोरगं म्हटल्यावर चालायचं..”

    “आज मोठी गाडी काढलीसा नाथाभाऊ.. दौरा लांबचा हाय म्हणा..” तो विषय बदलत म्हणाला..

    “व्हय जरा पैसं भागवायचं हुतत.. म्हटलं सगळीच कामं आज निप्टवायची काढली एर्टिका..”

    “तुला सोडतो वाटल्यास कुठं जायाचं सांग..?”

    “मला तेवढं सीबीएस वर सोडा.. वाटलं.. आता काय वडाप घावत न्हाय.. तवर तुम्ही आलासा..”

    नाथाभाऊ गालातच हसले. “बाकी काय मग अन्या म्हातारी काय म्हणते..?”

    “हाय बरी आता.. जरा कणकणल्या वाणी झाली व्हती..”

    “म्हातारीकडे बघा बाबा.. तुझा बाप जाऊन बसला तिकड.. तो काय यायला मागत न्हाय.. तू तेवढा दुर्लक्ष करू नको..”

    “न्हाय मी कशाला करतोय..”

    “अण्णा हुतं तर समदं बरं हुतं.. इथनं पुढं जरा हालच हायत म्हातारीच..”
 

    “हाय की मी..”

    “तुम्ही हाय ओ ऽ.. खरं नवरा तो नवरा.. काय म्हणायचं..?”

    “ते बी खरंच म्हणा..”

    “तुमचं अण्णाचं लय पटायचं का न्हाय नाथाभाऊ..?”

    “पटायचं म्हंजी काय सांगायचं तुला.. अण्णा म्हंजी आपला जिवलग.. माझा गुरु.. खरं मराण काय चुकलं न्हाय कोणाला.. गेला माझा दोस्त..” नाथाभाऊंनी डोळे पानावले..

    “एक ईचारू नाथाभाऊ..?”

    “ईचार की..”

    “अण्णाकडं तुमचं काय हुतं काय म्हंजी..?”

    नाथाभाऊ गालात हसले अन् म्हणाले, “पैसं व्हय..?”

    “व्हय म्हंजी..”

    “अन्या लय बारकं हायस तू.. तुला काय कोणालाच कधी उमजायच न्हाय.. पैशाच्या पलिकडलं नातं हुतं आमचं.. अण्णा कडं माझं काय न्हायच म्हणा.. तसा त्यो इमानी माणूस.. खरं मी कितीबी केलं तरी अण्णानं माझ्यासाठी जी केलंय त्येची परतफेड नाय करू शकणार म्या.. तुम्ही अजून लय लहान.. तुम्हाला न्हाय कळायचं एगळं हाय समदं.”

    अनिकेत शांतच राहिला..

    “पैशावरनं आठवलं.. तुझं माझ्याकडं काय हाय का..?”
 

    “काय चेष्टा करालासा नाथाभाऊ..”

    “आरं चेष्टा नाय खरंच ईचारालोय..”

    “नाय नाय मीच तुमचं देणं हाय..”

    “ती राहू दे गा ऽ.. त्याचं काय न्हाय.. माझं काय असंल ती सांग.. आटीव वाटल्यास..”

    “नाय नाय तुमचं काय न्हाय.. महत्त्वाच्या कामाला निघालाय नाथाभाऊ..?”

    “व्हय बी अन् नाय बी.. काय सांगायचं तुला..”

    “मी ईऊ का संगं..?”

    “तू ईऊन काय करणार.. माझं मलाच निपटाया पायजे.. तू तुझं तेवढं निपट.. यंदा टाक उरकून ..”

    “आता काय हुतंय आशा सोडल्या म्या..”

    “अन्या आशा तेवढी सोडायची न्हाय बघ.. व्हणार.. कवा ना कवा तर व्हणारच. अन्या मर्दा, लगीन काय कुणा संगबी हुतंय.. आपली आवडती व्यक्ती सोडून कोणीबी आपल्याशी लगीन करतंय.. त्येचं काय नाय.. आपल्याला जशी पोरींची गरज हाय तशी त्यास्नी बी हाय. अन् मर्दा लग्नाचं काय घिऊन बसलास. काय खरं न्हाय. माझं बघालास न्हवं. काय राहिलं सांग माझ्या जिंदगीत. त्यामुळं टेन्शन घ्यायचं न्हाय निवांत राह्याचं..”

    “नाथाभाऊ काहीच पत्ता लागायला नाय..?”

    “तिचा व्हय..?”

    “व्हय.”

    “कुठलं मर्दाच्या खऱ्या लवड्याची हुती व्हय ती.. तिच्या बी सतराशे साठ लडतडी. उगा आपल्यालाच गरज म्हणून करून आणली तिला.. अन् झक मारली..”

    “तरी कितीला गंडा घातला..?”

    “तरी गेले की दोन-तीन.”

    “मग आता..?”

    “आता काय गेलं ती गेलं म्हणायचं.. टाकलं ववाळून. लई ऽ ईचार करायचा न्हाय पैशाचा. पैसा काय आज नाय उद्या हाय..”

    अनिकेत शांत झाला..

    “मुंबईची काय खबरबात बोलणं व्हतं का नाय..?”

    “व्हतंय की.. दुसरं कोण हाय मला तर.. असतोय रोज फोन.. नाथाभाऊ काय पिन म्हणा आमऱ्या तुमच्या वाणीच हाय..”

    “आता माझं म्हटल्यावर माझ्यावंच जाणार का न्हाय..”

    “नाथाभाऊ तुम्ही मोठं हायसा.. तुम्ही तर..” अनिकेत घाबरत घाबरतच म्हणाला..

    “कळतंय मला अन्या.. खरं कसंय.. हुतं ती चांगल्यासाठीच हुतंय म्हणायचं.. कळंल तुला आज ना उद्या.. तुम्ही तेवढ चांगलं ऱ्हावा बाबा.. दुसरा कोण साथ देत न्हाय बघ .. एक जिवलग सोडला तर बाकी सगळे सापच बघ.. मी अन् अण्णा जसं तसं तुम्ही दोघं ऱ्हावा बाबा..”

    अनिकेतन नुसतीच मान डोलावली.

    “माझ एक काम करणार का अन्या..?”

    “बोला की नाथा भाऊ..”

    “तुला तर माहीतच हाय देवानं मरोस्तवर पुरंल एवढ दिलंय..”

    “बरोबर हाय की.”

    “आता कसं.. तुला तर माहीतच हाय आपल्या मालकीचं आपल्या जवळच ऱ्हायाला पायजे.. व्हय का न्हाय..?”

    “बरोबर हाय की.”

    “फकस्त एकच करायचं..”

    “बोला की..”

    “ज्याच्या हक्काचं जी हाय त्याला ती मिळाय पायजे..”

    “काय कळंना नाथा भाऊ..”

    “नाय नाय गोंधळून जायाचं नाय.. आताचं म्हणत नाय मी.. आता तुला कळायचं बी न्हाय अन् मला बी ती काय सांगायला जमायचं न्हाय.. फकस्त आमऱ्या संग रहा.. एवढं एकच काम हाय.. जमल न्हवं..?”

    “तुम्ही काय बोलायलायसा, कशाबद्दल बोलायलायसा आता तुम्हालाच ठावं.. राहिलं अमऱ्याचं, तर आमची दोस्ती काय तुटत न्हाय..”

    “हीच ऐकायचं हुतं मला बास..” त्यांनी समोरच्या दिशेने पाहतच मान हलवली..

    एर्टिगा कावळ्या नाक्यावरनं सीबीएसच्या‌ दिशेने गेली.. “बर अन्या, सोडतो वाटल्यास तुला. कुठं एसटीने जायालास..?”

    “नको जातो माझं मी..”
 

    “बर बाबा..”

    तसा तो गाडीतून उतरू लागला.

    “थांब थांब.. त्यांनी त्याला अडवत आपल्या खिशात हात घातला..” अन् त्याच्यासमोर धरला.

    “हि काय..?”

    “असू दे ठिव.”

    “नाय नाय मला नगो..”

    “आता ऽ..”

    “कशापाई खरं.. हायत माझ्याजवळ..”

    “ठिव की..” त्यांनी त्याच्या खिशात बळे बळेच हात घातला..

    “नको नाथा भाऊ.. आवो ऽ हक्कानं मागून घेतो मी..”

    “माहित हाय मला खरं आता ही ठिव..”

    तो नुसताच त्यांच्याकडे शांत चित्ताने पाहू लागला.. दोन – दोन हजाराच्या पाच सहा नोटा त्याने घडी घालून खिशात ठेवल्या अन् म्हणाला.. “आता ठिवतो.. खरं संध्याकाळनं तुमास्नी देणार बगा.. आता नाय भांडत तुमच्यासंग..” तसा तो गाडीतून उतरू लागला..

    “आणि एक.. त्यांनी गाडीच्या ड्रॉवरमध्ये हात घातला अन् एक पाकीट त्याच्या हातावर ठेवलं..” अनिकेतचे डोळे पांढरे झाले. ते त्याची मांडी थोपटत म्हणाले,

    “कधी बी ध्यानात ठिवायचं, कितीबी मन झालं तरी ही वापरल्याशिवाय अं हं ऽ..” तसे ते नटखटी आवाजात हसू लागले..

    अनिकेतला लाजल्यासारखं झालं आणि तो खिडकीतून बाहेर गालात हसत पाहू लागला..

    “तुम्हासनी आता कसं सांगायचं.. भेटू नाथा भाऊ संध्याकाळनं..” तसा तो हसत हसतच गाडीतून उतरला..

    “समदं कळतंय मला अन्या.. अन् एैक कधी बी मानेपासनं सुरवात करायची बघ..”

    अनिकेत हसत हसतच चालु लागला. नाथा भाऊंची एर्टिगा वारा मागे सारत पळू लागली..

 
क्रमश:
 

अधुरी कहानी – भाग १०

नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे देखील पहा :

एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम

बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना

चतकोर भाकरी

शिक्षा

    नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment