अधुरी कहानी – भाग ११
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“अधुरी कहानी – नवा जोडीदार”
“स्ट्रेंज आहे ना सगळं.. वेगळं आहे किती..?”
“काय ?”
“हेच आपलं असं भेटणं.. आपली ओळख होणं.. हे असं इथं येणं..”
“व्हय ते हाय खरं.”
“कसं वाटतंय तुला.?”
“खरं सांगायचं तर तू जवा जायला निघालीस तवा लय वाईट वाटलं.. म्हटलं, ह्यो प्रवास काय थांबायला नगो पायजे.. देवा म्हटलं एवढी तरी इच्छा पुरी कर.”
ती गालातच हसली. “म्हणून एवढा वेळ आभार मानत होतास.. ?”
“आभारपण मानलं अन् बरंच काय काय मानलं.. थँक्यू.”
“हां ऽ..?”
“व्हय.. पयल्यांदा मी असं स्वतः ला बघालोय.. कधीच कुठल्या पुरगीबर बोलणं न्हाय.. मला वाटालतं मी लय फटकळ हाय.. पोरींसोबत काय जमायचं न्हाय..”
“खरं ते सगळं चुकीचं आहे. न्यूनगंड होता तुझा तो.”
“काय गंड काय ?”
तशी तीही हसली.
“चुकीचा समज.”
“काय समजू ?”
“अरे समज ?”
“व्हय खरं काय समजू.. सांगशील..?”
“अरे बाबा.. तुझा चुकीचा समज होता तो.. गैरसमज..”
“असं बोल की कसं कळायचं..” तसे दोघे ही एकमेकांना पाहून हसू लागले..
“मला वाटलं आणि कुठली सुशिक्षित शिवी आली का काय बाजारात..” अनिकाने हसतच त्याच्या खांद्यावर हात मारला.
“खूप चांगला आहेस तू अनिकेत.. खरंच मी सुद्धा कधी विचार केला नव्हता की मी कुणा मुलासोबत पुन्हा अशी बोलू शकेल म्हणून.. थँक्स.”
“तुला बी.. तू परत मागे फिरली नसतीस तर काय माहित काय झालं असतं.. कशी काय आलीस..?”
“वाटलं की आपण जो आनंद शोधतोय तो तर इथेच मिळतोय.. मग ठरलेल्या एका ठिकाणी काय शोधायचं.. कदाचित तिथे गेल्यावर मी इथल्या गोष्टींना मुकले असते.. मग म्हटलं हातचं सोडून पळत्याच्या मागे नको लागायला.. फिरले मागे..”
“बरं केलस.”
“व्हय.”
तिने कपाळावर हात मारला अन् म्हणाली, ”चल काहीतरी खाऊया.”
“इथं काय मिळंल..?”
“जे मिळेल ते. बघूया तरी फिरून..”
“चल.” त्याच्या चेहऱ्यासमोर नाथाभाऊंचा चेहरा आला. त्याने मनोमनच त्यांचे आभार मानले.
“मग अनिकेत काय काय आवडतं तुला खायला..?”
“आमचं तसं काय न्हाय.. ताटात जी वाढणार ती आम्ही खाणार..”
“हम्म्म ऽ.. तरीपण आवड म्हणून काहीतरी.. जे जिभेला चांगलं वाटत असेल असं काही..”
“तसं मग म्हणायचं तर, आमच्या भैय्याचा वडा हाय.. फाट्यावली मिसळ हाय.. अन् आमच्या आबाचं मटण हाय..”
“हम्म्म ऽ.. ती त्याच्याकडे पाहत हसत राहिली.. “भैय्याचा वडा.. आबाचं मटण.. चांगलंय चांगलंय.. हे तर कॉमन झालंय.. विशेष असं काही जे बघून तोंडाला पाणी सुटेल.. खावसं वाटेल.. पिझ्झा, बर्गर लाईक किंवा मग स्टारबक्स वगैरे.”
“गावाकडे असलं काय मिळत न्हाय.. अन् आम्हाला ती खाऊ बी वाटत न्हाय.. पिझ्झा बर्गरच्या पैशात आम्ही किलोभर मटण घेऊन तांबडा पांढरा वडू.. त्यातच आम्ही खुश..”
“हम्म्म ऽ..” तिने नुसतीच मान डोलावली.
“तुला सगळं असलंच आवडतं..?” तो हळूच म्हणाला.
“हां ऽ म्हणजे.. हे तर नॉर्मल झालं.. फ्राईज, बर्गर वगैरे.. असं खास काही आवडत असेल तर बघ.. मला ना मोमोज आवडतात.. स्टीम वाले नाही हां ऽ.. फ्राईड केलेले.. परत पोटॅटो ट्वीस्टर एक खूप आवडतो.. आणि आता नवीनच एक आलंय वाॅफल.. ते पण छान लागतं..” सांगता सांगता तिच्या तोंडाला पाणी सुटलं अन् ती एक एक पदार्थ हातवारे करत अनिकेतला सांगू लागली. अनिकेत पाहतच राहिला.
“बाप रे.. आम्ही नावं पिन ऐकाय नाय.. ती तू रोज खात्यास..”
ती नुसतीच हसली.. “रोज असं नाही रे.. कधी तरी आपलं.. माझ्या भाच्याला आवडतं बघ.. तो लागतो माझ्या मागे.. मावती वॉपल खायला तल.. वॉपल खायला तल..” ती प्रियांशची नक्कल करत म्हणाली.
“वाॅपल ती काय असतंय..?”
“वाॅफल होय.. काही नाही चॉकलेटचाच एक प्रकार असतो.. छान लागतो..”
तसा तो हसला अन् म्हणाला, “त्या पेक्षा भाज्या खाईत जावा वाफवून.. तेवढंच अंगाला लागल..”
ती नुसतीच हसली..
“मला तर वाटायचं पोरीसणी फक्त पाणी पूरीच आवडत्या..”
“ती तर ऑल टाईम फेवरेट आहे.. पण कधी कधी हे सर्व खायची पण ईच्छा होते.. तशी रोजचं होते म्हणा..” ती डोळे मिचकावतच म्हणाली.
“दिसालंय तब्येतीवरून.. शेलकं खाऊन खरं पोट कसं भरतं तुमचं..?”
“शेलकं काय ते म्हणजे..?”
“उघड्यावरचं..?”
“अच्छा फास्ट फूड.”
“तेच.”
“हम्म्म ऽ.. भरतं.. भरायला काय..”
“घरातलं काय आवडतंच न्हाय म्हणा..?”
“तसं नाही खाते.. पण आवडीचं असेल तरच.”
“जसं की.”
“वरण छान करते आई माझी.. बटाट्याची भाजी.. आवडतं मग खायला.. बाकी असं विशेष काही नाही..”
“बास.. नुसता डाळ भात.. आमच्याकडं नैवेद्याला करत्यात कवातर.. न्हायतर अंडी मटणा शिवाय काय न्हाय.. नॉनव्हेज आवडत न्हाय तुला..?”
“तसं नाही खाते मी.. पण एवढं नाही.. ऑईली ऑईली असते खूप चिकन ग्रेव्ही.. मी मग नुसतं पीस पीस खाते.. नाही तर मग सरळ तंदूर चिकन पिझ्झा मागवते..”
त्याने नुसतीच मान डोलावली..
“आणि एक.. मला ना ती तुमच्याकडे बघ खीर बनवतात ना.. ती खीर खूप आवडते.. लहानपणी खूप खायचे मी..”
“कोणती खीर..?”
“ती बघ अशी चॉकलेटी रंगाची असते अन् दूध असतं.. असे दाणे दाणे असतात.. पातळ असते..”
“गव्हाची..?”
“माहित नाही कशाची..”
“पंगतीत कवा खाल्लेलीस..?”
“होय होय.. लहान असताना..”
“मग तीच.”
“एक नंबर असते ती.. मी आज्जी सोबत असायचे ना तेव्हा मला आज्जी द्यायची बनवून.. आज्जी करायची माझ्यासाठी..”
“माझ्या आज्याला पिन लय आवडायची.. गव्हाची खीर.. एळवण्याची आमटी.. भात.. मन भरून खायचं.. मेलं खरं.. घासबी खिरीचाच शिवला..”
“आजोबांवर खूप प्रेम होतं..?”
“व्हय.. आज्जा लय जीव लावायचा. लहानपणापासनं कुठं जायचं झालं की मला घ्यायचं बरोबर.. मी आमचा आज्जा, नाथाभाऊ.. नुसतं फिरायचो, खायचो.. लय लाड पुरवला त्यानं.. लहानपणीची मजा औरच अस्ते..” तसा तो शांतच झाला..
“खरंय तुझं.. माझं पण असंच आहे.. आज्जी खूप लाड करायची.. गावाकडे आले की तिला काय करू काय नको असं व्हायचं. तुला माहितीये माझ्या आईने पण मला इतकं खायला करून घातलं नसेल तितकं आज्जी मला खाऊ घालायची. खूप लाड करायची. मी आले की, ती नुसती आनंदाने फुलून उठायची अन् आमची जायची वेळ झाली की पार कोमेजून जायची.. अनिकाचे डोळे हलकेसे पाण्याने भरले. माझं नाव पण माझ्या आज्जीनेच ठेवलं.. माहिती..”
“अर्थ काय खरं तुझ्या नावाचा..?”
“मीन्स गोड टाईप असंच काहीतरी..”
“ती तर हाय.”
तशी ती लाजली.
“फ्लर्ट ?”
“व्हय.”
तशी ती जोरात हसली अन् म्हणाली, “म्हणजे छेडतोयस मला.”
“नाय नाय नाय.. म्हंजी आपलं बरोबरच हाय.. नावाला शोभतेस..” अनिकेतचा गोंधळ उडाला. अनिका खळखळून हसू लागली..
“तुला माहितीये..?”
“न्हाय माहित..” तसा तोही हसला.
तिने त्याच्या हातावर हात मारला अन् म्हणाली, “ऐक मी काय सांगते ते..”
“बोला.”
“एकदा ना मी गावी आलेले काय.. मी खूप लहान होते. मला खूप आवडायचं आमच्या राजासोबत खेळायला..”
“दोस्त..?”
“दोस्तच पण मुका.”
“बोलाय येत नव्हतं..?”
“म्हणजे आमचा पेट रे..”
“व्हय.”
“कुत्रं म्हण की पेट पेट काय.”
“आमच्यात असंच बोलतात.”
“म्हणून आमच्या सारख्यांना लवकर कळंत न्हाय.”
“मग शिकून घ्यायचं.”
“त्याची गरज तुम्हास्नी.”
“एटीकेट्स बोलतात ह्याला.”
तो नुसताच तिच्याकडे पाहू लागला. तिने तिची एक भुवई वर उडवली अन् मान हलवु लागली.
“आम्ही मराठी माणसं.. मराठीतच बोलतो.. मराठीतच समजून घेतो..”
तिने नाकपुडी फुगवली अन् गाल उडवले. तो तिच्या फुगलेल्या नाकाकडे बघून हसू लागला.
“बर बाबा माझं चुकलं.. आता बोलू का मी..?”
“ऑबकर्स..”
“काय..?” तशी ती हसू लागली.
“सांग सांग.” त्याने हाताने इशारा केला.
“नाय नाय काय ते परत एकदा ऑबकर्स काय..”
तसा तोही हसू लागला. दोघांच्याही हसण्यात नटखट पणाचा रंग उतरला.
“बर ऐक. मला खूप आवडायचं प्राण्यांसोबत खेळायला. आमची जनावरं पण होती. दोन बैल, दोन म्हैशी अन् नवीनच म्हैशीला एक बाळ झालेलं..”
“बर.”
“मला ना आज्जी आमची म्हैशीची धार काढायची ना तर खूप आवडायचं.. मला ना ते करू वाटायचं.. मी ना टीव्हीत बघितलेलं. ते खाली बसून डायरेक्ट दुधाची धार कशी तोंडात घेतात तसं मला करायचं होतं..”
अनिकेतन हलकसं हसत मान डोलावली..
“मज्जा यायची खूप.. एकदा ना मी एकटीच तशी करायला गेले..”
“लाथ खाल्ली अश्शील..”
“होय तुला कसं कळालं..?”
“काय तर नख बिख लागलं असंल तुझं.. असाच अंदाज..”
“नाही तसं काही नाही.”
“मग.”
“मी म्हैशीच्या बाळाचं दूध काढायला गेले..”
“मग बरोबरच हाय की बावरली असणार..”
“मला म्हैशीने लाथ मारली.. मग सगळे पळत आले.. आज्जीने गप्प बसवलं मला.. विचारू लागली काय झालं म्हणून.. मी आपलं सांगितलं सगळं खरं खरं..”
“मग.”
“मग काय सगळेच्या सगळे हसायला लागले..”
“लाथ खाल्लीस म्हणून..?”
“नाही.”
“मग ..?”
“मी म्हैशीच्या बाळाचं दूध काढायला गेले.. खरं ती म्हैस नव्हती..”
तसा अनिकेत जोरात हसला अन् म्हणाला, “रेडकू व्हतं काय..?”
तिने शरमेने मान डोलावली. तसा तो जोरजोरात हसू लागला.
“आज्जी म्हणाली बाळ ते पांढर नाही पिवळ दूध देतंय.. त्याची कशाला धार काढायला निघालीस. सगळेच्या सगळे हसायला लागले.”
“तुला कळायला नाय..?”
“कसं कळणार लहान होते रे खूप.”
“ते जाऊ दे.. मला डोळ्यासमोर दिसालंय खरं.. तू हातातच घेतलं होतं ना की तोंडासमोर धरलं होतं..” तसा तो जोरजोरात हसायला लागला..
“ए ऽ छी.. घाणेरडा कुठला.. छी बाबा छी..” तसा तो आणखी जोरात हसू लागला.. “बापरे..” त्याने पोटाला हात लावला “मेलो..”
“छी बाबा..” ती सुद्धा शरमेने हसू लागली.
“सॉरी अनिका.. खरं म्हशीने उगाच लाथ माराय नाय.. मला आता समदं डोळ्यासमोर दिसायला लागलंय..” तसा तो आणखी जोर जोरात हसू लागला.. ती त्याच्या हातावर फटके मारू लागली अन् स्वतःही शरमेने लाल होऊ लागली..
“खरं सांग फक्त हातातच ना. तोंडात..” तसा तो आणखी मोठ्याने हसला.. ती त्याच्यावर हातांचा मारा करूच लागली..
“घाणेरडा आहेस एक नंबरचा.”
“मी घाणेरडा नाय तूच जोक सांगितलास मला.”
“होय.. खरं मला तसं सांगायचं नव्हतं.. तुझ्याच घाणेरड्या डोक्यात आलंय हे.. मी फक्त सांगत होते की..”
“मी रेडकाचं..” तसा तो आणखीनच मोठ्याने हसला.. त्याचा गडगडाटी हसण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागला.. तो पोटाला धरून उठला अन् इकडे तिकडे चालत हसू लागला.
“शी बाबा उगाच मी तुला माझा डार्क जोक सांगितला..” तो हळूहळू हसायचा शांत झाला अन् पुन्हा खुर्चीवर बसला.
“आई गं ऽ.. जन्मात कधी हसलो नसंल इतकं हसवलंस.”
“मला लाज वाटते त्याचं काय ?”
“आणी म्हशीला काय वाटलं असंल त्याच काय..” तसा तो पुन्हा जोरात हसू लागला..
“हस हस.. अजून हस.. जोर जोरात हस.. मी लहान होते ते बघू नकोस.. माझ्या घरातले पण असेच हसत होते तेव्हा.. तू पण हस..” तशी ती लटका राग धरू लागली अन् त्याच्याकडे पाहू लागली..
त्याने आपलं हसू दाबलं.. “सॉरी सॉरी.. तुला म्हंजी आता काय बोलू.. म्हंजी आपलं असं काय नाय..” तसा तो पुन्हा हसला.
ती शांतच झाली..
“हस हस.”
“नाय खरंच सॉरी.”
“नाही हस.. सगळे हसतात, चिडवतात तू पण हस..” तशी ती एकदमच गंभीर झाली.
“अनिका आता वेगळा अर्थ काढतेस.. तुला माहितीय आपण कशाबद्दल बोलत व्हतो..”
ती काहीच म्हणाली नाही. अनिकेतने तिच्या हातावर हात ठेवला.
“अनिका खरंच सॉरी.. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं.. तुमची विनोद सांगण्याची पद्धत अशी होती की.. खरंच सॉरी..”
तिने आपली नजर त्याच्यावर रोखून धरली अन् हलकसं स्मित करत म्हणाली, “आता आलास ना लाईनवर..”
तसं त्याने तिच्या हातावर चापटी मारली..
“कसली अश्शील गं ऽ.. किती घाबरलो मी.. मला वाटलं आता..”
“मैत्री तुटली.?”
“तर..”
तशी ती हसू लागली अन् त्याची नक्कल करत म्हणाली, “मला माफ करा.. तुम्हाला दुखवायचं नव्हतं..” अन् तशीच ती जोरजोरात हसू लागली.
अनिकेत तिच्याकडे पाहतच राहिला. तिला खळखळून हसताना पाहून तो तिच्यातच हरवून गेला. दोघांचेही एकमेकांत गुंतलेले हात नकळत घट्ट होऊ लागल्याची जाणीव होताच दोघेही गप्प झाले. एकमेकांपासून हात वेगळे केले अन् एकमेकांची नजर चुकवू लागले.
“निघूया.”
तिने मानेनीच होकार दिला अन् स्वतःची बॅग पाठीवर घेत तिने समोरच्या दिशेने पाहिलं. समोर पाहताच ती सुन्न झाली.. आहे तशीच शांत होत खाली बसली.. शून्यात हरवून एकटक समोरच्या दिशेने पाहू लागली.. अंगाला बारीकसा घाम फुटला.. कपाळावर आठ्या आल्या. हातपाय चळवळ करू लागले. अनिकेत तिच्याकडे गंभीरतेने पाहू लागला. अचानक अनिकाला काय झालं या विवंचनेत तो पडला.
तो तिच्या जवळ गेला. तिला हलवू लागला. आवाज देऊ लागला. ती तशीच समोर पाहू लागली. त्याने समोरच्या दिशेने पाहिलं. समोर काहीच असं घाबरण्यासारखं नव्हतं. एक पाच सहा मुलांचा ग्रुप सोडला तर समोर असं काहीच नव्हतं. त्याला काहीच सूचेना. अनिका पाठमोरी बसली. अनिकेत पुन्हा तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तिला विचारू लागला.
“काय झालं.. का घाबरलीस..?”
ती शांततेने त्याच्याकडे पाहू लागली. तिला तो काय बोलतोय तेच ऐकू येईना. तिच्या कानांना एकच शब्द ऐकू येत होता. ज्या शब्दाचा तिला त्रास होता. तोच शब्द तिच्या कानांना टोचत होता. अनिकेतने तीचा हात हातात घेतला. तिला शुद्धीवर आणलं.
“काय झालं अनिका कायतरी बोल..”
तिने डोळे पाण्याने भरले. “माझं काय चुकलं काय. सॉरी वाईट नगं वाटून घिऊस..”
तिने नकारार्थीच मान हलवली अन् त्या मुलांच्या घोळक्याकडे पाहू लागली. अनिकेतने त्या दिशेला पाहिलं अन् तिला विचारलं.
तिने होकारार्थी मान डोलावली.
“कोणी पहिला..?” अनिकेत शांततेत म्हणाला.
तिने नकारार्थी मान डोलावली ..
“मंग ?”
“माझ्या जुन्या ऑफिस मधली मुलं आहेत.”
अनिकेत शांतच होता.
“अनिकेत.”
“हा बोल.”
“मी एक गोष्ट लपवली तुझ्यापासून.”
अनिकेत सुन्नच झाला. मुळात त्याच्यापासून लपवावं अन् परत त्याला का सांगावं इतका तिच्यासाठी तो कोणी नव्हता परंतु नकळत निर्माण झालेल्या आपलेपणाने तो सुन्न झालेला..
“माझ्यापासून लपवण्यासाठी मी कोण म्हंजी ?”
“माहित नाही पण आपण अचानक इतके जवळ आलोय की मला असं वाटतंय तुला सांगायला हवं आता..”
तो शांतच राहिला. ती बोलू लागली.
“अनिकेत माझा साखरपुडा झालेला. लग्नाआधीच मला त्याचे अफेअर्स कळाले. आमचा पण प्रेम विवाह होता तरीसुद्धा त्यानी मला फसवलं..”
अनिकेत शांतपणे तीचं बोलणं ऐकत होता.
“हे त्याचेच मित्र आहेत. माझ्यासोबत खूप वाईट वागलेत. खूप छळलंय यांनी..”
“काही केलंय का ?”
“होय. तिने डोळे पाण्याने भरत उत्तर दिलं.. “बलात्कार केलाय माझा..”
अनिकेतचे डोळे पांढरे पडले.
“मानसिक बलात्कार केलाय.. नको नको तशा हाका मारल्यात. नको नको त्या वाईट शब्दांनी हिणवलंय मला. तू विचारत होतास ना पैसा असून पण नाराज आहेस. काहीतरी झालंय म्हणून. हेच ते.. यांच्यामुळेच मी माझी नोकरी सोडली. डिप्रेशनमध्ये गेले. स्वतःला मारायचा प्रयत्न केला. अन् त्यांच्यापासून दूर जाऊन पण ते पुन्हा माझ्याजवळ येत आहेत.”
अनिकेतला काय बोलावं तेच सूचेना. तो शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेऊ लागला. ती त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली..
“अनिका मानलं तुला लय जास्त त्रास झाला त्यांच्यामुळं. खरं असं किती दिस तू पळणार. तुला ईसरायला पायजे सगळं..”
“विसरू.. काय काय विसरू.. एका सुशिक्षित घरातली मुलगी असून रांड रांड म्हणून हिणवलेलं विसरू. माझी काही चूक नसताना मला इतका त्रास दिला तो विसरु. लोकांनी माझ्याकडे बघण्याची नजर विसरू. बोल ना काय काय म्हणून विसरू. जाऊ दे मला वाटलं तू तरी..”
“हे बघ मी तुला दोषी म्हटलोय का ?”
“पण तुझा टोन तसाच वाटतोय मला.”
“कुणी ठरवलं तुझं तूच..” अनिकेत जरा जोरातच बोलला.
“मग काय समजू ?”
“तुझी काय इच्छा हाय मी काय करू ?”
“मार.”
“हां ऽ..?” अनिकेत आश्चर्यचकित झाला.
“का हिमंत नाही तुझ्यात. पैलवानांच्या घरातला ना तू. घाबरतोयस मग..”
“असं कसं बोलतेस. मी कसं काय मारणार. ओळख ना पाळख. त्यांनी माझं काय बिघडवलं. असंच कोणाच्या पण अंगाव जाऊ काय..?”
“बरोबर. तू का मारशील. तुझं काय बिघडवलंय. आपलं काय नातं. दोन-चार तासांची ओळख. तुझा काय फायदा त्यात..?”
“हे बघ..”
तिने नकारार्थी मान डोलावली अन् म्हणाली,
“फायदा.. प्रत्येक जण फायद्यासाठी जवळ येतो. तू पण तसलाच.”
“तोंड सांभाळ पोरी मी तुझा फायदा उचलला न्हाय..”
“मग का आलास माझ्यासोबत. का वाढवलीस मैत्री. इथं काय करतोय आपण..?”
अनिकेत शांतच झाला. त्याला काय बोलावं ते सूचेना. त्याने रागारागातच आपल्या बॅगेत हात घातला अन् नाथाभाऊंनी दिलेल्या पाकिटातून एक पाकिट हळूच हातात घेतलं. अनिकाकडे पाहत तावातावातच तो त्या मुलांच्या दिशेने गेला. अनिका त्याची पाठमोरी आकृती पाहू लागली..
अनिका सर्व काही दुरून पाहत होती. तिला अनिकेत काय करतोय याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. ती नुसती त्यांच्या होणाऱ्या हालचाली बारकाईने टिपत होती.
“किती अन् कुठे..?” त्यातला एक जण पुढे येत म्हणाला.
अनिकेतनं सर्वत्र एक नजर फिरवली अन् दूरवर एका बाईकडे बघत तो म्हणाला “सगळी सोय”
त्या मुलाला इशारा कळाला. त्यानं अनिकेत सोबत हात मिळवला. अनिकेतने आपलं मधलं बोट त्याच्या तळ हातावर घासलं अन् म्हणाला, “पासवर्ड.”
तसा तो मुलगा हसला अन् त्यानं आपलं बोट नाकाला घासत विचारलं, “याची सोय होईल इथे..?”
अनिकेत हसला अन् त्यानं आसपास नजर फिरवली.
दूर उभ्या असणाऱ्या खाकी वर्दीतल्या एका माणसाकडे पाहिलं अन् समोरच्या मुलाला डोळ्यांनी इशारा केला.
तो मुलगा चकित होऊनच पाहू लागला.
“आपलाच माणूस हाय माल अन् पैसा समदं ती बगतंय.”
अनिकेत चालत अनिका जवळ आला..
“काय हात मिळवणी करून आलास..?” अनिकाने जरा रागातच विचारलं.
अनिकेत काहीच म्हणाला नाही. फक्त डोळ्यांनीच इशारा केला अन् तिला घेऊन गर्दीच्या ठिकाणी गेला.
“बोलशील काय झालं..?”
“जरा दम काढ.. नुसतं बग काय काय करत्यात..?”
दोघेजण त्या बाईच्या दिशेने गेले अन् दोघेजण त्या वर्दीतल्या माणसाकडे गेले.. एक दोन मिनिटं त्यांच्यात बातचीत झाली. अन् अचानकच तो माणूस आणि ती बाई त्यांच्यावर ओरडताना दिसू लागले. त्या बाईने आसपासच्या लोकांना जमा केलं. वर्दितल्या माणसाने त्या दोघांना धरलं अन् काठीने मारू लागला. गर्दी होऊ लागली म्हणून आणखी काही पोलीस तिथे आले अन् त्यांनी देखील त्यांना मारायला सुरुवात केली..
अनिका अनिकेत हसू लागले. अनिकेतन तिला चल म्हणत तिथून काढता पाय घेतला. हसत हसत ते तिथून पळ काढू लागले.
“बास की.. किती चालायचं.. आता तरी सांगशील..?” अनिका दम खात म्हणाली, “बास बाबा अजून नाय जमणार चालायला..”
“चल जराच राहिलंय.. एसटी चुकंल आपली न्हाय तर..”
“जाऊ दे गेली तर.. अजून नाही जमणार चालायला..” ती जोरजोरात श्वास घेत कमरेवर हात ठेवत म्हणाली ..
“शेलकं खाल्लं की असं हुतंय.. म्हणून आमच्या वाणी अंडी मटाण खायाचं..”
“असू दे मला नाही जमणार आता..” ती खालीच बसली.
“अगं अशी का कराल्यास बारक्या पुरीवानी. मदनं उठ न्हायतर एखादी म्हस ईल अंगाव.” तसा तो हसू लागला..
अनिकाने रागातच त्याच्याकडे बघितलं.
अनिका उठली अन् गालात हसत त्याला मारायला धावू लागली. अनिकेत रस्ता चुकवून मधल्या वाटेत शिरला. काट्याकुट्या चुकवून अनिका त्याचा पाठलाग करू लागली. अनिकेत हसत हसत तिला चिडवू लागला. ती थांबत थांबत श्वास घेत घेत त्याचा पाठलाग करू लागली. शेवटी ती दमली अन् एका दगडावर बसली.
अनिकेत थांबला. तिला खरंच दमलेलं पाहून तो ती बसलेल्या जागी येऊन बसला. बॅग मधली पाण्याची बॉटल घेऊन तिला पाणी प्यायला दिलं. तिने एका दमात पाणी प्यायलं अन् दम खाऊ लागली. अनिकेतन आपला रुमाल काढून तिला घाम पुसायला दिला. तिने तो रुमाल हसतच त्याच्या अंगावर पुन्हा फेकला अन् स्वतःच्या नॅपकिनने चेहरा पुसू लागली. अन् लटक्या रागाने त्याच्याकडे बघू लागली.
“आता तरी सांग बाबा काय केलंस ?”
“आधी सांग तुला कसं वाटलं ?”
अनिका आनंदाने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली अन् तिने हलकीशी मान डोलावली.. “असं वाटलं काहीतरी ओझं होतं मनावर.. हलकं झालं आता..”
“नाचू वाटालंय ना ?”
“होय..” तिने जोरजोरात मान हलवली. तसा अनिकेत हलगीच्या ठेक्यावर ताल धरावा तसा नाचू लागला. त्याला नाचताना पाहून तीही त्याला सामील झाली. शरीरातून निघणाऱ्या नृत्य लहरींनी पायांना ठेका दिला. चेहऱ्याला हावभाव दिलेत अन् मनातला आनंद चोहो बाजूंना पसरवला. मिरवणुकीत पाहिलेला, वरातीत अनुभवलेला, कधीतरी करायचा म्हणून राहिलेला नाच दोघांच्याही शरीरातून प्रकट होऊ लागला.
पाय दुखेपर्यंत, अंगाला घाम येईपर्यंत त्यांचा नाच सुरू होता. बराच वेळ मनसोक्त नाचून दमलेली, भागलेली शरीरं पुन्हा जमिनीवर स्थिरावली. अनिकाचे डोळे पाण्याने डबडबले होते. अनिकेतच्या डोळ्यातून अश्रू गालापर्यंत ओघळले होते. आयुष्यात प्रथमच इतकं मनसोक्त जगल्याने दोघांनाही स्वर्गाचा अनुभव होत होता. अनिकेतन पाण्याची बाटली पाहिली खरं पाणी संपलेलं होतं. अनिकाने तिच्या बॅगेतून बॉटल काढली. तीही रिकामीच होती.
“तहान लागलीय ?”
अनिकेतन मानेनच होकार दिला.
“खूप ?”
“हं ऽ..” त्यानं एक सुस्कारा सोडला.. तशी अनिका एकदम त्याच्या मांडीवर येऊन बसली. त्याच्या मानेभोवती हात फिरवून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले.. श्वासांची अदलाबदल झाली. घामात घाम मिसळला. लांब सडक केसांच्या बटा गालावर गुदगुल्या करू लागल्या. कमरेला मारलेला हाताचा विळखा घट्ट होऊ लागला. दम लागेपर्यंत ओठावर ओठांची चढाई सुरूच राहिली. अनिकेतनं तिला घट्ट मिठीत घेतलं अन् दोघेही तसेच जमिनीवर आडवे झाले..
“तहान मिटली..?” अनिकाने हसतच विचारलं..
“तहान भागली खरं भूक भागाय नाय..” तसं म्हणत त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं अन् तिचं दीर्घ चुंबन घेतलं.
हलक्याशा आवाजाने दोघेही बिथरले. इकडे तिकडे पाहू लागले.
“इथे नको कोणीतरी येईल..”
“खोली बघूया..?”
“चालेल..”
“चल मग.” तसे ते उठले.
“अनिकेत.”
“हां ऽ..”
“आपण परत जाऊ. इथे नको. इथे आता रिस्क वाटते..”
“मग कुठं..?”
“मला माहितीय एक जागा..”
काहीच न बोलता काहीच न ऐकता दोघांच्याही पायाने वेग घेतला.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!