अधुरी कहानी – भाग १४

“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

“अधुरी कहानी – अंतिम सत्य”

 
   रंकाळ्यावरचा गारवा वातावरणात शितलता भरत होता. तलावात बुडू पाहणारा सूर्य जाता जाता आपल्या पिवळसर सोनेरी रंगाच्या छटा वातावरणात पसरवत होता.
 

    नेहमीच्या ओळखीच्या बाकड्यावर दोन जिवलगांच्या गप्पा रंगात आलेल्या. हळूच मागून ओळखीच्या पावलांचा आवाज आला अन् गप्पा बंद झाल्या..

    “अक्का सावकाश.. बसा तुम्ही बोलत.. मी आहे ईथंच.. आवाज द्या मला झालं की..” त्या वयस्कर स्त्रीला बाकड्यावर बसवत तिने स्वतःची साडी सावरली.. तिने आपली गंभीर नजर जमिनीच्या दिशेत ठेवली अन् पलीकडच्या बाकड्यावर जाऊन बसली..

    “मी हाय इथंच झालं की हाक द्या..” त्या वयस्कर माणसाच्या पायथ्याशी बसलेला तो माणूस उठला अन् पलिकडच्या बाकड्यावर तिच्या शेजारीच अंतर ठेऊन बसला..

    “छान दिसताय..” तो आपल्या भारदस्त आवाजात म्हणाला..

    “..”

    “जशा आधी दिसत होता तश्याच.. सुंदर..”

    तिनं तिची गंभीर नजर जमिनीवरच स्थिरावली..

    त्याने एकदा ओठ चुचकारले अन् म्हणाला..

    “आज्जा आमचा लय साधा माणूस.. अगदी भोळासांब.. आज्जीचा आमच्या आज्जावर लय जीव.. आज्जाला जरा कमीच ऐकू यायचं.. आज्जी आमची मंग इशाऱ्यातच बोलायची..”
 

    तसा तिने जोरात त्याला ऐकू जाईल असा दीर्घ श्वास घेतला.. तो गालातच हसला अन् म्हणाला..

    “आज्जा एकदा लय आजारी पडला.. सर्दी, ताप, खोकला कमीच होईना.. आज्जीनं दवाखाना नी दवाखाना, डॉक्टर नी डॉक्टर समंद पालथं घातलंत. आज्याची सर्दी काय बरी हुईना..”

    “नावाजलेला डॉक्टर म्हणून कोल्हापुरात आणलं. डॉक्टरनं औषध गोळ्या दिल्या. सोबत झंडू बामची एक छोटी डबी दिली.. म्हटला जरा वाईच ह्यो मलम आदनंमदनं लावा. तेवढंच नाक हलकं हुईल. आज्जीनं आपली मान डुलवली..”

    “संध्याकाळच्यानं आज्याची सर्दी लयच वाढली.. औषध घेतलं.. गोळ्या खाल्या.. नाक शिकरून शिकरून नाकपुड्या दुखाय लागल्या.. आज्जीला काय बघवना.. आज्जीनं झंडू बामची डबी घेतली. जामच्या बाटलीत बोट घालून पायजे तेवढा जाम काढावा अन् तोंडात बोट घालावं तसा झंडू बाम बोटावर घेतला अन् आज्याच्या दोन्ही नाकपुड्यात बोट घालूनश्यान बोट गरागरा फिरवलं. आज्जा आमचा उडालाच. सगळ्या रस्त्यावरनं नाचायला लागला. आज्जी त्याच्या मागणं पळत सुटली.”

    तिनं ओठांत दाबून ठेवलंल हसू फुटू लागलं. तिनं आपलं नियंत्रण सोडलं अन् जोर जोरात हसू लागली. दोघांच्याही हसण्याचा आवाज वातावरणात आनंद लहरी निर्माण करू लागला..

    त्या दोघांना हसताना बघून दोन वयस्करांची नजरा नजर झाली.

    “कवा पातुर अशी गप गुमान बसणार हायस.. तवा पण अशीच बसलीस मूग गिळून..”

    “तुमास्नी बघूनच गप बसले म्या.”

    “मी म्हणतो कशापाई पर.. काय भ्याचं काम व्हतं.. मी व्हतो न्हवं खंबीर..”

    “तुम्हास्नी न्हाय कळायचं बाईचं दुखणं..”

    “सांगायचं व्हतंस मग.. कुणी अडवल्यालं.. तुझ्या बाऽनं.. ?”

    “आता काय उपेग न्हाय त्याचा.. मला का बुलिवलासा आता..?”

    “कंच्या जलमात तुझ्या मनचं कळायचं कुणास ठाव.. बुलिवलं तुला.. बघू वाटलं.. मराण दिसाय लागलं.. म्हटलं एकदा बघावं तुला शेवटचं..”

    तसं त्या वयस्कर स्त्रीच्या डोळ्यातून एक थेंब गालापर्यंत ओघळला.

    “आता रडून काय उपेग अनु.. सपलं ही आयुश.. काय ऱ्हायलं न्हाय..” त्यांनी एक सुस्कारा सोडला..

    हसता हसताच आपल्या जुन्या आठवणी नजरेसमोर येताच त्या स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.. तोही शांतच बसला.

    “मी तुम्हाला भेटायला आले असं अजिबात समजू नका..”

    “माहित हाय मला..”

    “अक्कानी गळ घातली म्हणून मी तिला घेऊन आले नाही तर मला तुमचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नव्हती.” ती गंभीर नजरेनेच म्हणाली ..

    “कशी असंल.. रेड हँड पकडलं नवस मला.. का हुईल इच्छा.. तुझं खरंच हाय.. तुझा त्यात काय बी दोष न्हाय.. दोष माझाच.. मीच तुला समजून घ्यायला कमी पडलो..”

    “मला एकही शब्द ऐकायचा नाही, बोलायचा नाही तुम्ही दुसरीकडे जा..”

    “माझी शेवटची इच्छा म्हणून बोलू दे..” तशी ती त्याच्याकडे गंभीर नजरेनेच पाहू लागली. त्यानं आपल्या खिशातला एक कागद तिच्याजवळ सरकावला..

    तिने कागदाची घडी उघडली अन् बघतच राहिली. तिने रागातच कागद त्याच्या दिशेने फेकला अन् रागाने त्याच्याकडे पाहू लागली..

    “लाज कशी वाटली नाही मला सांगायला..”

    “तुझ्यापासून काय लपवायचं.”

    “का मी कोण आहे तुमची सगळं मला सांगायला..”

    “तूच होतीस फकस्त.”

    “तरीपण फसवलंच ना तुम्ही मला..”

    “तुझा गैरसमज व्हता तो.”

    “तुमच्या अय्याशीला माझा गैरसमज बनवू नका.”

    “एकदा फकस्त सांगू दे. आता पातुर तू तुझ्या मनानुसार वागलीस मला सोडून गेलीस.”

    “मग काय तुमची रखेल म्हणून राहायचं होतं मी.” ती त्याचं वाक्य मध्येच तोडत म्हणाली.

    “मला तुला सगळं सांगायचं व्हतं.”

    “माझा कंटाळा आल्यावर. मनासारखा माझ्या शरीराचा फायदा घेऊन झाल्यावर..”

    “एकदा.. फकस्त एकदा मला खरं काय ते सांगू दे.. रागवू नगो.. हाच राग अंगाशी आलाय..”

    “माझा राग अंगाशी आलाय.. तुम्ही झोपा बायकांसोबत.. आणि माझा राग काढा. मला नाही जाणून घ्यायचं.. अन् त्यानं काय होणार आहे आता. तुमच्या आयुष्याची सजा तुम्हाला मिळतेय.. काय खरं समजायचं तुमचं.. काही जाणून घ्यायचं नाही मला.. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे.. देवाच्या कृपेने चांगला नवरा मिळालाय.. चांगली मुलगी आहे.. बस.. मला आता खरं काय खोटं काय नाही जाणायचं..”

    “जाणून काय करणार तुम्ही..” ती वयस्कर स्त्री आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाली.. वर्षानुवर्ष हीच होत आलंय अन् पुढं बी हीच व्हणार हाय.. त्याला काय बी इलाज न्हाय.. या जगाला पिरेम मान्य न्हाय.. देवाला बी ते बघवणार न्हाय.. ह्यो समदा त्यानंच रचलेला ख्योळ. त्यानचं आपल्याला अपघातानं जवळ आणलं, पिरमात पाडलं आन जातीत इभागलं..”

    “कशापाई देवाच्या नावानं खोटं बोलतीयास.. मी आलतो नव्ह तुझ्या बा ऽ पुढं बंदूक घिऊन.. का आली न्हायस मग.. यायचं व्हतंस.”

    “कसं येणार..?” ती वयस्कर स्त्री रडूच लागली.

    “का..?”

    “समद्यासनी ईष घालून मारतू म्हटल्यावं.. कशी येणार सांगा की तुम्ही अण्णासाब..?”

    “विषाची बाटली तोंडाला लावल्यावर माणूस काय करणार..?”

    ती रागाने उठलेली तशीच त्याच्याकडे गंभीरतेने पाहू लागली.. अन् खाली बसली..

    “जितेश.. माझा मित्र.. खानावळ चालवायचा.. त्येच्याकडंच जेवाय व्हतो म्या.. जिगरी व्हता माझा.. तुला कॉलेजमदनं घरी सोडलं की मी त्येच्या संगच असायचो.. घरात पिन चांगलं संबंध.. एकदा त्येच्या खानावळीला आग लागली अन् पारंपारिक चाललेला धंदा बुडाला.. आई-बा जळून मेलंत.. अन् माझ्या दोस्ताला लकव्याचा एटॅक मारला.”

    “त्येच्या मागं दोन भणी.. हुतं नव्हतं ती समदं गेलं.. पै पाहुण्यांनी कसं बस त्यांचं घर उभं केलं.. खरं पोरींचं घर बसवण काय जमलं न्हाय..”

    “मग तुम्ही देव बनून गेलात..?”

    त्यानं नकारार्थी मान डोलावली.

    “तरण्याताट्या पुरी.. लग्नाला आलेल्या.. खरं कोण त्येंच्यासंग लगिनच करंना.. अंगान जाडच्या जाड.. दिसायला बी दगडावानी.. खरं मनानं पुरी फुलावानी कोमल.. कळी वानी नाजूक.. दगडाला बी मायेन पाझर फोडणाऱ्या मायाळू पुरी.. चांगलं असता असता त्येंच्याव ही येळ..”
 

    “कोमेजून गेल्या पार.. घरदार गेलं.. समदं जळून खाक झालं.. तरणाताटा भाऊ असा पडलेला बघवना.. माझ्याच्यानं जी हुईत हुतं ती समदं म्या केलं.. जी हुतं ती समदं दिलं.. दोघींना पुन्हा जितं केलं. माझ्या मदतीला त्येंनी उपकार समजलं.. वरिसभर समदं सुरळित सुरू व्हतं.. खरं काय झालं कुणास ठाऊक.. दोघीबी मला बिलगू लागल्या.. माझ्याशी लगोलग करू लागल्या.. अंगाशी झटू लागल्या..”

    “आणि तुम्ही आयत्या संधीचा फायदा घेतला.”

    त्यानं पुन्हा नकारार्थी मान डोलावली अन् म्हणाला.

    “त्या आल्त्या माझ्याकडं. मला एक दिशी म्हटल्या तुमची पोटाची भूक आम्ही भागिवली आमची तेवढी शरीराची भूक भागवा..”

    “अन् तुम्ही गेलात देवदुत बनून..”

    “इथंच गल्लत करालीस.. मी न्हाई म्हणाल्तो. माझ्यासमोर विषाची बाटली घिऊन उभं ऱ्हायल्यावर म्या काय करणार. जीव गमवण्या परीस भूक मिटवलेली काय वाईट..”

    “म्हणून तुम्ही मला फसवलत..?”

    “मी अजून सांगालोय मी काहीच करायला न्हाय..”

    “एवढं सगळं होऊन पण असं म्हणता..”

    “मी फकस्त होकार दिला खरं आमच्यात तसं काहीच झालं न्हाय.. आटिव.. तू आलीस तवा मी फकस्त उघडा व्हतो..”

    “बंद करा तुमची खोटी बडबड..”

    “खरंच सांगालोय.. तू मला त्या अवस्थेत बघून रागात गेलीस.. मी तसंच तुझ्या मागं आलो.. मी तसं काय बी करायला नाय..”

    “पण विचार तर तुमचा तोच होता ना माझ्या पाठीमागे.. तुमच्या बोलण्यावर माझा अजिबात विश्वास नाही.. हा जो तुम्हाला एड्स झालाय ना ही तुमचीच कर्म आहेत.. तुम्ही काय काय केलं ते सांगतायत..”

    “तू मला तसलंच समजायला लागल्यावर मी तर काय करायला पायजे व्हतं.. तुला मी किती समजावण्याचा प्रयत्न केला.. तू माझं एक बी काय ऐकाय न्हाईस.. किती दिस मी असं तडफडायचं..?”

    “म्हणून पन्नाशीत दुसरं लगीन केलंसा..?”

    “आईबाप नसताना, बायको नसताना, एकुलतं एक पोरगं घर सोडून गेल्यावर म्या कुणाकडं बघायचं विभा..?”

 “बघितलं असता म्या.. एकदा बुलायचं व्हतंस.. बा ऽ नं धमकी दिल्या.. जिताच गाढला असता त्येला.”
 

    “असं नसतंय अण्णासाब.. तुमच्या एकट्या परीस समद्या परिवाराचा जीव घिणारी अवदसा व्हायचं नव्हतं मला..” तसे दोघेही शांत झाले.

    त्या वयस्कर स्त्रीने एक सुस्कारा सोडला अन् आपल्या सोबत आणलेला डबा त्यांच्यासमोर ठेवला..

    “ही काय..?”

    “तुमास्नी आवडती न्हवं म्हणून आणलीया..”

    “नगो आता साकर हाय..”

    “साकर टाकाय न्हाय..”

    “मग काय टाकलंस..”

    “इश टाकलंय..”

    “बा ऽ दमला म्हणून तू माराय आलीस व्हय..”

    “व्हय. लवकीर वळखलसा..”

    मग खाया पायजे.. तसं त्यांनी डबा उघडला अन् गरम असलेली गार होत चाललेली खीर चमच्याने खाल्ली.

    “ग्वॉड कशी साकर न्हाय तर..?”

    “माझ्या व्हटाचा गोडवा घातलाय.. तुम्हास्नी आवडतोय न्हवं..?” तशी ती वयस्कर स्त्री हमसून हमसून रडू लागली. इतका वेळ मनात दाबून ठेवलेला हुंदका फुटला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.. रडत रडतच त्यांनी त्या स्त्रीला जवळ घेतलं.

    “अनुसये ऽ, या जलमात न्हाय मग कंच्या जलमात..?”

    तसे ते आणखीच रडू लागले. रडत रडतच दोघांनी एकमेकांना खीर चारली. एकमेकांचे अश्रू पुसले अन् एकमेकांच्या मिठीत जुन्या आठवणींसह हरवून गेले..

 
    “कुठं कुठं शोधलं मी तुला.. कुठं हरवलेलीस तुलाच ठावं.. समोर आलीस ती नवऱ्याला घिऊनच.. काय करणार म्या.. तुझ्याशी लगिन करायचं म्हणून मी गाव सोडलं.. घर सोडलं.. तू अशी गैरसमज करून गेलीस.. कुणाकडं जाणार म्या.. आमच्या अण्णाची साथ म्हणून निभावलं.. तू तुझ्या बाजूने तेवढा ईचार केलास.. मला उंडगाच जाहीर केलंस काय करणार म्या..?”
 

    “विभा, एखाद्याला व्हणारा त्रास कमी न्हाय झाला ना मग त्यो तसाच वागतो..” तो गंभीर झाला.. ती स्त्री तशीच शांतपणे ऐकू लागली..

    “मला चांगलं माहित हाय मी काय केलं काय न्हाय. मला फकस्त तुला एकदा भेटायचं व्हतं. तुला समदं सांगायचं व्हतं.. तुझा विश्वास असू दे किंवा नसू दे मरणारं माणूस खोटं बोलत नसतो ध्यानात ठेव..”

    “ध्यानीमानी नसताना समदं झालं.. वाटलं आता आपलं लगीन हुईल.. खरं त्येच्या मनात काय एगळच..”

    “त्येच्या मनातलं कोणाला उमगलंय का या जलमात..” त्या वयस्कर स्त्रीने त्यांच्या हातावर हात ठेवला. “आपला जलम आपण सोसला.. पोरा बाळांचं तेवढं मनासारखं जमू दे.. या जातीचा, गरिबीचा फटका आताच्या पोरास्नी तेवढा नगो आता..”

    “काय बी बदल न्हाय.. आता बी तीच गत हाय.. आपल्या एळंला जातीत लगिन जमित हुतं.. मंग पैसा अडका बघत हुतीत.. आता समदं पालटलंय.. आदी पैसाअडका बघत्यात अन् मंग जात.. तीबी पैश्याम्होर टिकित नाय.. आता पैका बघून पोरी लगिन करत्यात.. नातू माझा वन वन हिंडालाय.. खरं कोण लगीन करंना.. पुरगी दिना..”

    “किती कमावतू..?”

    “पोट चालंल इतपत..”

    “मग कसं जमंल.. आत्ताच्या पोरीस्नी न्हाय चालत.. माझी नात लाखात कमावती तरी तिला पोरगं घावना..”

    “माझा नातू चालंल का तिला.. आपलं न्हाय निदान त्येंच तर जमू दे..”

    “न्हाय जमायचं.. पुरी हुशारल्यात.. त्यांना चांगला पगारवाला परवडना तुमचा नातू कसा टिकायचा..?”

    “का टिकणार न्हाय.. पैलवानाचा नातू हाय टिकंल.. तू बोल की..”

    “नाय बाबा आपण काय भाग घेणार न्हाय.. कोण डोस्क आपीटनार त्येंच्या म्होरं..?”

    “माझी झाली न्हायस.. आपल्या नातवांना तरी एक होऊ दे.. त्यांचं ते बघतील कसं जुळवायचं.. तू का नगो म्हणाल्यास..?” त्यांनी जवळ जात तिच्या गालाचा एक मुका घेतला. ती वयस्कर स्त्री नुसतीच गालात हसली.

    “आत्ता ऽ..”

    “ईश्कात मरणाऱ्याला न्हाय म्हणू ने.. ईश बी खाल्लंय आता.. मरणार हाय म्या..” तसे ते दोघेही हसले.

    “पिरमाचं ईश म्या बी खाल्लय तुमच्या संगट.. तुमास्नी एकट्याला मरू द्याची न्हाय म्या.. एकत्र जगलो न्हाय.. खरं तुमास्नी एकट्याला कुठं सोडणार न्हाय म्या..”

    “कोण कोणाला सोडणार नाही अण्णा..?” ते दोघेही हसत त्यांच्याजवळ आले.
 

    “इभा बाळा कशी हायस.. पुरगी बरी हाय का..?”

    “होय अण्णा..”

    “काय करत्या..?”

    “नर्सिंगला आहे अण्णा..”

    “आदिनाथा तुझं काय चाललंय..?”

    “चाललंय वयनीसाब.” तसा तो त्यांच्या पायाजवळंच बसला.

    “नाथा लय जीव लावलास बाबा आम्हासनी.. तुमची संगत कशी ईसरायची.. ह्या जल्मात साथ दिलीसा पुढल्या जल्मात बी आम्हाला सोडू नगासा..”

    “वयनीसाब काय ही.. कशाला मरणाच्या गोष्टी.. आवं तुम्हास्नी अजून लय जगायचं हाय..”

    “खुटी सपनं दावू नगो नाथा.. हीच खरं हाय आता.. लय दिस काय आम्ही जगत न्हाय.. आमच्या मागं आमच्या लेकरास्नी तेवढं जपा बाबांनू..”

    “अण्णा उगा नका तुम्ही बी मरणाच्या बाता मारू.. तुम्ही बसा बोलत.. मी खायाला आणतो..”

    “नाही नको अक्का निघायला हवं..” तशी ती लगबग करू लागली.

    “नाथा पुढल्या वक्ताला गाठभेट झाली तर..” तसा तो त्यांच्या गळ्यात पडला अन् रडू लागला..

    “असं का बोलता वयनीसाब.”

    “शेवटाला हीच खरं हाय लेकरा.. लेकरा – बाळांकडं लक्ष असू द्या..” तसं म्हणत ते दोघेही उठले.

    “नाथा दवाखान्यात जायाचं व्हतं नव्ह.. त्येच काय झालं..?”

    “नाय अण्णा अजून काय रिपोर्ट तयार न्हाय.. बघू उद्या जातो..” नाथाभाऊ डोळे पुसत म्हणाले.

    “बर बघू उद्याच्याला..” तसं म्हणत ती दोघं वयस्कर शरीरं एकमेकांचा आत्मा घट्ट धरत वाट चालू लागले..

    तिने बाकड्यावरचा डबा उचलला. डब्यावरची चिठ्ठी खाली पडली. ती उघडून तिने बघितली. एक मोबाईल नंबर होता. त्या वयस्कर स्त्रीच्या पिशवीत डबा अन् ती चिठ्ठी ठेवून ती त्याच्याशी गंभीरतेने म्हणाली,

    “आज ना उद्या लोकांना कळणारंच आहे.. किती दिवस लपवून ठेवाल..?”

    “असं मरण्या परीस मी जीव दीन..”

    “त्यानं तुमची वास्तविकता लपून राहिल.. कधी ना कधी कळणारंच ती..”

    “का तुझी न्हाय का लपून ऱ्हायली..”

    तिनं गंभीरतेनेच त्याच्याकडे पाहिलं.. “कशाबद्दल बोलताय तुम्हीं..?”

    “तुला काय वाटतं मला कळत नाय.. माझं कोण परकं कोण.. मला सोडून गेलीस.. वरसाच्या आत बाळ अन् नवरा घिऊन समोर आलीस.. मला काय मूर्ख समजालीस काय..?”

    “आदीनाथ तोंड सांभाळून बोला..”

    “विभा, आता तर खरं बोल की ती माझीच ल्येक हाय न्हवं..?”

    तसं तिने पुढे येत एक जोरात कानाखाली लगावली.. “ती फक्त माझी मुलगी आहे.. तुमचा अन् तिचा दुर दुर पर्यंत संबंध नाही.. तेव्हा हि हेच सांगितलेलं आता ही हेचं सांगतेय..”

    “लय दिस न्हाईत विभा.. फकस्त एकदा खरं बोल..”

    तसं तिने पुन्हा एक जोरात कानशिलात लगावली.. ती त्याच्याकडे तशीच आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी रागात पाहत उभी राहिली..

    “मी प्रेम केलंय तुझ्यावं.. तुला बी म्हाईत हाय.. माझ्या इतकं कोण बी तुला वळखु शकणार नाय.. तुझ्या चेहऱ्यावर जी असतंय ती मनात नसतंय.. अन् मनात जी असतंय ती तुझ्या डोळ्यात दिसतंय.. मिळालं तुझं उत्तर..” तसा तो भरलेल्या डोळ्यांनीच पाठमोरा फिरला..

    ती तशीच खाली बाकड्यावर बसली.. तिच्या मनातला आक्रोश आसवांवाटे बाहेर पडू लागला.. ती हुंदके देत देत जोर जोरात रडु लागली.. गजबजलेल्या वातावरणात ती एकटी पडली.. तिची वास्तविकता जशी अदृश्य होती तशीच ती सुद्धा काळाच्या अंधारात अदृश्य झाली.. तिला पाहणारं कोणी नव्हतं.. तिला ऐकणारं कोणी नव्हतं.. होता फक्त काळा कुट्ट अंधार अन् त्या अंधारात प्रवास करणारा काळ.. तिला फक्त तोच दिसत होता.. जो ओरडून ओरडून सांगत होता, “काळाच्या प्रवाहात माणसं बदलतात.. चेहरे बदलतात.. स्वभाव बदलतात.. एक पिढी बदलते.. वेळही निघून जाते.. पण वास्तविकता कायम तशीच राहते.. ती बदलत नाही.. बदलता येत नाही.. ती लपत नाही.. लपवता येत नाही.. जे काल होतं तेच आजही आहे.. आणि ते उद्याही होत राहणार..”

    सूर्याचा केव्हाच अंत झाला होता. अंधाराची चादर पसरवून चांदण्या लुकलुकीचा खेळ खेळण्यात दंग होत्या. सर्व गोष्टीचा साक्षीदार असणारा चंद्र त्याच्या करुणामय डोळ्यात आणखी दोन कहाण्या सामावून घेत होता. वारा मंद वाहू लागला. काळ त्याच्या गतीने पुन्हा चालू लागला. एक चक्र पूर्ण करून त्याच्या पुनरावृत्ती साठी दौडू लागला..

 
समाप्त

 

नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे देखील पहा :

एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम

बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना

चतकोर भाकरी

शिक्षा

    नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment