अधुरी कहानी – भाग ३
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“अधुरी कहानी – अनिकेतची व्यथा”
“आधीच रातभर झोप नाय. त्यात आवरून त्या राजाच्या लग्नाला जायचं व्हय. इच्या भणं, लोकाचीच लग्न बघायची आमी. आमचं कवा व्हायचं. इळभर निसतं राब राब राबायचं. रातभर जागायचं. कुतूस्तवर काम करायचं. जवानी समदी यातच जायालिया. कसलं मायला नशीब. जरासुदीक मनासारखं म्हणून काय नाय या जिंदगीत. वैताग आलाय निसता. ही रोजचं मराण आता नको झालंय.”
रागातच साळुता कोपऱ्यात टाकून घरातनं जाऊन तांब्या अन् किटली आणली अन् धारंला बसला. त्याला आलेलं पाहून म्हशीनं एक हंबरडा फोडला. वैरणीची एक पेंड सोडून पुन्हा म्हशीपुढं टाकली अन् धार काढतच बडबडू लागला.
“तुझं भारीय मर्दिचे. इथच खायाचं. इथच झोपायचं. इथच बसायचं. मालक येतोय. खायाला घालतोय. श्यान काढतोय. कवातर फिराय नेतोय. आपण निसतं आर्डर द्याची. इथं मालकाचा पिट्टा पडतोय त्याचं काय नाय. चांगलंय तुमचं. वडा तुमी पेंड्या. आमचा काय इचार करू नगासा.”
फेसाळत्या दुधानं किटली भरली. हात झटकतच उठला अन् किटलीवर तांब्या उलटा टाकून ती शेगडीजवळ ठेवली.
अंघोळपाणी आवरून चांगलं दोन कप च्याचं पिऊन सोप्यातच पडून राहिला. मंद श्वास. नजर शून्यात. डोक्यात फक्त एकंच विचार. लग्नाचा. कधी होणार, कसं होणार अन् त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कोण करणार.
लग्न लावायचं म्हणून मुलगी शोधायला गावं फिरलीत. पाहुणेमंडळींना आर्जवं करून झालीत. विवाहसंस्थेत फेऱ्या मारून पायतानं झिजलित. एक अन् एक गल्ली पालथी घातली. पण फक्त नकारंच. गेली सात वर्ष फक्त नकारच.
नकार द्यावा तरी कशाबद्दल. घर नाही म्हणून. का दिसायला बरा नाही म्हणून. का व्यसन होतं म्हणून.
नाही. नकार फक्त एवढ्यासाठीच की पोरींच्या अपेक्षेप्रमाणं नसलेली परिस्थिती.
घराबद्दल बोलायचं तर दोघं भाऊ अन् आई-बाप. सोबत असलेले आज्जा-आज्जी. मोठ्या भावाचं लग्न होऊन दहा वर्ष झालेलीत. त्याला मुल नाही ते नाही त्यात बायकोनं आता घटस्फोट मागितलेला. आई कुठं काम मिळेल तिथं काम करते. बापाची पण तिच अवस्था.
गावातलं घर म्हणाल तर तसं चांगलं मोठं. इथून तिथून मोठाच्या मोठा सोपा. आत चांगल्या दोन खोल्या. घरासमोरंच असलेला एका म्हशीसाठी गोठा.
रूपानं म्हणावं तसा सावळाच. अंगानं चांगला धिप्पाड. तब्येतीनं चांगला पैलवान. पिळदार दंड. भरलेली छाती. रूबाबदार मिश्या. भरीव दाढी.
व्यसन म्हटलं तर एकच. भरतीचं. खरं आता ती पण सुटलं. सलग तीन वेळा नशिबानं लाथ मारली. कशाना कशात तर घोळ व्हायचाच. दोन वेळा मैदानी मारली खरं लेखीत गेला. कालांतरानं सरकरचा निर्णय बदलला. अगोदर लेखी घ्यायची अन् मग मैदानी चाचणी घ्यायची असा नियम झाला. मेहनतीनं ह्या वेळी लेखी निघाली खरं मैदानी चाचणीच्या वेळी नशिबानं पुन्हा लाथाडलं. धावण्याच्या चाचणीत एकाचा पाय लागला म्हणून जो पडला तो कायमचा मनानं सुद्धा पडला. मनावर अशी लाथ बसली की भरतीचं व्यसनंच सुटलं.
सोबत लग्नाचं चालूच होतं. “पोराची बारावी झालीया. आयटीया झालाय. भरतीची तयारी चालू हाय. नोकरीचं पण हुईल. बघा कोण पोरगी हाय का” असा आईबापाचा सगळ्या पाहुण्यांना निरोप होता. खरं कोणी पोरगी लग्नासाठी तयार होत नव्हती.
मुश्किलीनं एमआयडीसीत नोकरी मिळाली. तेरा हजार तसे कमी होते पण गावाकडच्या भागात घर चालवण्यापुरतं बरे होते. पुढे-मागे पगार वाढलंच की ह्या आशेनं आयुष्य चालत राहिलं. आशेची एक किरण मनाच्या अंध:कारात कुठे तरी पडली. नव्या जोशानं नवरीची शोधाशोध सुरू झाली.
ह्या वेळी कुणी तरी मध्यस्थीच करू असं ठरवलं. मध्यस्थीची किंमत ऐकून उरात धडकी भरली. खरं लग्न जमवायचं म्हटल्यावर ही पाऊल उचलायलाच हवं असं ठरलं. गावचं सावकार म्हणवणाऱ्यांकडनं पाच-पन्नास हजाराचं कर्ज घेतलं. मध्यस्थाला एखादी पोरगी शोधून आन म्हणून दिलं. तो पोरगी शोधायला म्हणून जो गेला तो अजून काय आलाच नाही. इतक्या जिकिरीनं कोण काम करतं बरं !
वर्ष गेलं कर्ज फिटायला. थोडं थोडं करून इकडनं तिकडनं उसणं घिऊन कर्ज फेडलं. खरं हाती काहीच आलं नाही. मनस्ताप झाला तो वेगळाच.
नोकरी असून सुद्धा मिळणारा नकार फार त्रासदायक होता. असल्या कसल्या पोरींच्या अपेक्षा आहेत हेच त्याला कळत नव्हतं.
गेली दोन वर्ष एकटाच स्थळं बघतोय. घरातले लग्नाचं काय म्हणून विचारत सुद्धा नाहीत. नातलगातलं कोणी बोलायला मागत नाही. सोबतच्या मित्रांची लग्न होऊन त्यांना पोरं झालीत. आपल्या पेक्षा लहान सख्ख्या चुलत भावंडांची लग्न झालीत. वयानं लहान असणारी बारकी बारकी गल्लीतली शेंबडी पोरं आता इतकी मोठी झालीत की पळून जाऊन लग्न करायला लागलीत.
ना धड शिक्षण झालं. ना भरती झाली. ना धड नोकरी मिळाली. ना मित्रपरिवार राहिला. ना कोणी नातलग राहिलत. आयुष्य असं एकटं एकटंच राहिलं. जोश कुठच्या कुठं गेला. शरीरानं तब्येत गमावली. परिस्थितीनं लाचारी पत्करली. मन नैराश्यात बुडालं. दारू गुटख्याचं व्यसन जडलं. नजर कायमची शून्यात हरवून गेली.
सोप्यात जमिनीवर पडल्या पडल्या श्वास आतबाहेर व्हावा एवढीच शरीराची हालचाल होत होती. लग्नाच्या विचाराने दुसरं काही सुदरत नव्हतं.
वाढत चाललेलं वय लग्न कधी होणार म्हणून विचारत होतं. मुलींच्या अपेक्षा ऐकून आपलं कसं होणार असं वाटत होतं. घरची बेताची परिस्थिती, बिघडत चाललेली मनस्थिती लग्न कोण करणार म्हणून सतत डिवचत होती.
“असं मुडद्यावानी का पडलास रं ” बाहेरून आलेल्या आज्जीनं त्याला विचारलं “आवरजा गाडीवाला आलाया. लगीच निघायचं म्हणतो.”
“मला नाय जमणार. तुमचं तुमी जावा.” तसं म्हणत हा आपला रागातच उठला. स्प्लेंडरला किक मारली अन् निघून गेला. आज्जीनं बाहेर येऊन “आनू रं ऽऽ” अशी हाक दिली. खरं अनिकेतनं केव्हाच बाहेरचा रस्ता धरला होता.
दुसरा दिवस उजाडला तोच एका अनपेक्षित घटनेनं. अनिकेतच्या आजोबांची तब्येत खालावली म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं गेलं. वयोमानानुसार त्यांची तब्येत अधूनमधून बिघडत असायचीच. खरं यावेळी डॉक्टरांनीही शक्यता तशी कमीच सांगितली. दिवस संपता संपता आजोबांनी सर्वांचा निरोप घेतला अन् नातलगांचा हुंदका दाटून आला.
बघता बघता आजोबांचं सर्व कार्य पार पडलं. तेराव्याचा कार्यक्रम आला. रातीची जेवणं पार पडलीत. पाहुणेमंडळींनी भरलेलं घर एकदाचं रिकाम झालं. आज्जा बसत असलेल्या जागेवर तो तिथंच बसलेला दिसू लागला. मोकळं घर खायला उठलं म्हणून स्प्लेंडर काढली अन् किक मारणार एवढ्यात एकानं आवाज दिला.
“भावा कुणीकडं ?”
त्यांन मागं वळून पाहिलं अन् म्हणाला, “माळावनं जाऊन येतो .”
“आलो थांब.”
“भावा असं गप गप का ?”
“काय करायचं अमऱ्या. कायबी कळंना आता. आज्जा गेलं मर्दा. कालपरवा पातुर चांगलं व्हतं. आदल्या राती माझ्यासंग बोललं न्हवं का. “उद्या तेवढी कोलगेटची टूब आणजा” म्हणून माझी चेष्टा केली न्हवं का अन् सकाळी.” तसं म्हणत तो शांतच झाला.
“आपण काय करणार आता भावा. प्रत्येकाचीच वेळ कधी ना कधी येतेच. थकलेलं शरीर कधी ना कधी जाणारच भावा.”
“आज्जा मर्दा सारखं मला म्हणायचा ‘आन्या तुझं लगिन बघितल्याबिगर मी काय जात नाय’. खरं मर्दा ती बी त्येच्या नशिबात नव्हतं. वाट बघून बघूनच गेलं ती आता.”
क्षणभर कोणी काहीच बोललं नाही.
“जाऊ दे नको वाईट वाटून घेऊस. होईल काय तर.”
“काय हुईल अमऱ्या अन् कवा हुईल. किती दिस असं ऱ्हायाचं. अमऱ्या मर्दा आता जर का ह्या वर्षी लगिन नाय झालं ना तर तीन वर्ष मला लगिन करता येणार नाय. आता एवढाच मौका. नाय तर मग आली माझी पस्तीशी. काय ऱ्हाईल रं तवर. आज्याची शेवटची इच्छा इच्छाच राहिली लका. काय करायचं म्या. हारलोय रं पाक आता. आता असं वाटालंय मी मेलो असतो तर बरं झालं असतं. निदान मी तर सुटलो असतो.”
“असं का बोलतोस भावा. एवढं कशाला निगेटिव्ह विचार करतोस. तुझी काहीही चुक नाही ह्यात. उगाच स्वत:ला दोष देऊ नकोस.”
“असंच असंल तर काय उपेग जगून मंग. कशाला असं इळइळभर राबून रातरातचं जागून दिस काढायचं. नाय हुईत आता अमऱ्या. थकलोय आता पार मी. वैताग आलाय ह्या आयुष्याचा. नको वाटालंय समदं. ही जीवनंच नकोसं झालंय. आज्ज्या ऐवजी मी गेलो असतो तर खरंच बरं झालं असतं लका.”
काय राहिलं नाय मर्दा ह्या शरीरात. टेंशननं तब्येत झिजली पाक. आता केसं पीन गळाय लागलीत. जवाणीतच मर्दा म्हातारं व्हायालोय. धड जवाणी पण जगता आली नाय. मन तर कवाच मेलंय. कुणासाठीच काय वाटंना. एवढा चांगला आज्जा गेला खरं कायच वाटंना मला. भावनाच मेल्यात माझ्या समद्या. कुणासाठी प्रेम येईना. कुणावर दयामया करू वाटंना. पाहुण्यांच्यात जाऊ वाटंना. अमऱ्या मर्दा कुणाशी बोलू पण वाटंना झालंय आता. असंच निसतं गप बसून ऱ्हावावं. आपलं काम करावं. कुणाच्या अद्यात नको नी मद्यात नको. लयंच एकटं एकटं वाटालंय अमऱ्या. लयंच एकटं. गेल्या दोन एक वर्षात एवढा एकटा पडलोय का ऽ.” तसं म्हणत त्यानं डोळ्यालाच हात लावला अन् घडाघडा रडूच लागला.
अनिकेतला रडताना पाहून अमरच्याही डोळ्यात पाणी आल.. तो त्याचं सांत्वन करू लागला.. बऱ्याच वेळानं मग तो थांबला अन् बोलू लागला.
“तुला माहिताय अमऱ्या, आता स्थळं बगाय बी जात नाय मी. बायोडाटा बघूनच माझं मी ठरवतो ही मला काय बोलल ते.”
“बीएससी झालेली पोरगी असंल तर तिला एमएस्सी झालेला, कमीत कमी साठ-सत्तर हजार पगार असलेला, मुंबई-पुण्यात स्वत:च घर असलेला किंवा मग निदान गावाकडं बंगला अन् चांगली तीन चार एकर शेती असलेला नवरा हवा असतोय.”
शिकलेली राहू दे म्हटलं. जरा कमी शिकलेली बगू. तर त्यांच्यापिन अश्याच अपेक्षा. चांगला पगार, घर, शेती ही पायजेच. नसंल तर बगतपिन नायत आपल्याकडं.
“ही काय नाय अमऱ्या. आता तर एकादी लग्न मोडलेली, घटस्फोट घेतलेली किंवा मग विधवा असलेली अशी स्थळं बगायची येळ आलीया. खरं तिथंपिन तिच बोंब. एक अपेक्षांचा डोंगर हाय जो चढायला मी असमर्थ हाय. काय करायचं सांग तू.”
“मर्दा माझ्यापेक्षा लहान असणारी, बरोबरची सगळ्यांची लग्न झालीत. माझ्याचसंग का असं ? मर्दा मदी आपल्या राजाचं पिन लगिन झालं. सच्चा मैतर माझा. त्याच्या लग्नाला नाय गेलो मी. मला स्वत:साठीच वाईट वाटायला लागलं. वाटलं आपली नजर नको लागायला कुणाच्या संसाराला.”
“काय सांगायचं अमऱ्या लय वाईट दिस आल्यात. सांगल तेवढं कमी अन् ऐकंल तेवढं जास्त. आदी मर्दा बरं होतं. पोरींच्या अपेक्षा लय नसायच्या. चांगला पोरगा बघून माणसं बघून लग्न जमायचित. धनदौलती आदी स्वभाव बघितला जायचा. ईचार बघितला जायचा. आता मर्दा ह्यो ईचारंच पाक पेटवून दिलाय. सगळ्यांची मेंदवं पैश्यासाठी नासलीयत पार. पैसा ऽ.. फकस्त पैसा पायजे. आपण माप धावी नापास असंल खरं नवरा पैसंवाला पायजे.” रागारागात त्यानं बाजूला पडलेला दगड जोरात समोरच्या दिशेनं फेकला अन् रागानं त्याची छाती वरखाली होऊ लागली.
“शांत हो भावा. नको लय त्रास करून घेवूस.”
तसा अमर त्याच्या कडे हसत हसत आश्चर्याने पाहू लागला.. आणि म्हणाला, “भावा काय हे..?”
“व्हय तर अमऱ्या.. तुला सांगतो बघ.. माणसानं काय नाय शिकलं तरी चाललं.. खरं शिव्या तेवढ्या शिकाय पायजे बघ.. समोरचा आपल्या संग कुठल्या भाषेत कसा बोलायलाय ती आपल्याला कळाय पायजे बग..”
“म्हणून तू इंग्रजीत शिव्या शिकतोयस.. काय भानगड..?”
“भानगड काय नाय..” तो जरा गोंधळल्या सारखाच बोलू लागला. “खरं म्हाईत पायजे लका.. कसाय कधी कोण कसं बोललं ती म्हाईत पायजे अन् आपल्याला बी उत्तर देता आलं पायजे म्हणून.. बाकी काय नाय..”
तो नुसताच त्याच्या कडे पाहून हसू लागला अन् म्हणाला..
“भावा बग. हे काय फक्त तुझ्यासोबतच सुरूय असं काही नाही. सध्या सगळीकडे हीच परिस्थिती आहे. तु एकटाच बिनलग्नाचा राहिलायंस असं नाहीय. अरे चांगली शिकलेली, चांगल्या घरची एवढंच काय चांगल्या पगाराची मुलं सुद्धा अजून बिनलग्नाची आहेत. मुंबई-पुण्याचं काय सांगतोस. तिथंही अशीच परिस्थिती आहे. तुझ्या एकट्यासोबतच असं होतय म्हणून स्वत:ला किंवा दुसऱ्या कोणाला दोष नको देऊस. भावा अरे एक लाख पगार असलेली मुलं सुद्धा आहेत, ज्यांची लग्न जमत नाहियेत. कारण माहितीय ?
“दुसरं काय असणार.. अपेक्षा..” त्यानं अजून एक दगड समोर फेकला.
“बरोबर. जेवढं पुढ्यात आलंय त्यापेक्षा जास्तच पाहिजे आताच्या पोरींना. पण भावा ह्याचा अर्थ असा पण नाहीय की त्यांची लग्न होतायत. त्यांच्या मनासारखा मुलगा मिळेपर्यंत त्यांची वयं वाढतायत अन् मोठ्या वयाच्या मुली पोरांना नकोयत. काहींची लग्न होतायत खरं वर्षभरातच त्यांचा घटस्फोट होतोय. प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा आहे. अन् ह्याला कारण माहितीय काय आहे. माणसाची बदलत असलेली जीवनशैली. बदलत असलेले विचार. बदलत जाणारी स्वभावं. ह्याला मुलं पण तितकीच जबाबदार आहेत अन् मुलीही तितक्याच जबाबदार आहेत.
“अमऱ्या पोरांची काय अपेक्षा असत्या रं. चांगली घर सांभाळणारी बायको मिळावी बास. आणि काय पायजे असतंय रं आम्हांला.”
“तसं नसतं भावा. मन प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही त्याच्या मनासारखं असावं असं वाटत असतं. भावा पोरींच्या अपेक्षा आहेत त्यांच्या मागण्या आहेत यात काही चूक नाही. प्रत्येक मुलीला वाटतं की आपण चांगल्या घरात जावं. प्रत्येक आईबापाला वाटत असतं आपल्या पोरींचं चांगलं व्हावं. ह्यात काहीच गैर नाही. शेवटी त्या मुलाला अन् मुलीला एकत्र आयुष्य घालवायचं आहे. त्यामुळे अश्या गोष्टी बघाव्याच लागतात. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की एखादा मुलगा किंवा मुलगी चांगला आहे का, चांगली आहे का हे ज्या गोष्टीवरून ठरवलं जातंय ती गोष्ट चुकीची आहे.”
“माणसाच्या स्वभावाला, त्याच्या विचाराला अन् सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चारित्र्याला काहीच किंमत न ठेवता फक्त धनदौलत, शेतीवाडी, नोकरी-व्यवसाय, चांगलं शहरातलं घर या गोष्टी बघूनच एखाद्याचा विचार करायचा. कसं ठरवणार मुलगा चांगला आहे की नाही.”
“अन् तोच एके ठिकाणी, एक गरीब मुलगा असेल पण चारित्र्यवान असेल तर एवढी गोष्ट नाही का पुरेशी सुखी संसारासाठी.”
“भावा यशस्वी बरेच होतात. पण सगळेच लक्षात राहत नाहीत. लक्षात तेच राहतात जे चारित्र्यवान म्हणून जगलेले असतात.”
“आणि बघ भावा लग्नाची समस्या काय तुझ्या पुरतीच आहे असं काही नाही.. पूर्वी पासून असंच सुरू आहे..”
अनिकेत शांत चित्ताने अमरचं म्हणणं ऐकून घेत होता..
“बघ पूर्वी कसं असायचं.. सर्वात जास्त महत्त्व जातीला दिलं जायचं.. म्हणजे पैसा वगेरे पण बघायचीत पण आधी जात महत्वाची.. मग धन दौलत, पैसा अडका, जमीन जुमला.. आत्ता कसं आहे..”
“आत्ता फकस्त पैसा.. निस्ता पैसा..” अनिकेत विषण्णपणे मान हलवत म्हणाला..
“बरोबर.. सर्वात जास्त महत्त्व पैशाला.. मग एखादा मुलगा जातीत असू दे किंवा नसुदे..”
“पैका असला की मंग जात कशाला बघतोय पोरीचा बाप..”
“बाप पण आणि पोरगी पण.. बघ कसंय.. हल्ली सर्व निर्णय मुलं मुलीच घेतात.. कमावते असल्याने घरातल्यांचा पण नकार नसतो.. त्यात जातीत असला तर चांगलच.. नाही तर मग बापाला का असेना थोडी फार अडचण असतेच.. पण शेवटी होतं ते मुलीच्या मना सारखंच..”
“तीच तर..”
“सांगायचा उद्देश इतकाच की.. प्रॉब्लेम्स आहेत.. होते.. पूर्वी पण आणि आता पण.. फक्त त्यांची पद्धत बदलली आहे.. पण वास्तविकता तशीच आहे..”
“कसली वास्तविकता..?”
“पोरगा किती कमवतो..?” तो पुन्हा मान रागात हलवत म्हणाला..
“बरोबर.. आणि हीच आहे आपली वास्तविकता.. तुझी, माझी सर्व तरुण मुला मुलींची.. समस्या तीच फक्त माणसं वेगळी.. प्रश्न तेच फक्त उत्तरं वेगळी..”
“भावा आपला महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो. संत-महात्म्यांची, सुधारकांची भूमी म्हणून ओळखला जातो. शिक्षण प्रसाराचं समाजकार्य करणाऱ्या महात्मा फुलेंना त्यांच्या अर्धांगिणीची सावित्रीबाईंची साथ होती. त्यांच्या नव्हत्या काय अपेक्षा. होत्या. पण फरक होता. त्यांच्या अपेक्षा विचारांच्या होत्या ना की पगाराच्या.”
“भाऊराव पाटलांच्या पत्नीनं लक्ष्मीबाईंनी गरीब पोरांच्या शिक्षणासाठी भरल्या ताटावर गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून अडीअडचणीत उभ्या राहिल्या. इथं कोणतीच अपेक्षा नव्हती. इथं फक्त अन् फक्त साथ होती अन् ती पण शेवटपर्यंत.”
“अशा महाराष्ट्रात आपण वाढलो. शिकलो. त्याच महाराष्ट्रात आज तरूणांची लग्न एका “क दर्जाच्या” विचारामुळे होत नाहीयेत याचं वाईट वाटतंय. भावा ही फक्त तुझी व्यथा नाहीय. ही आजच्या सर्व तरूण पिढीची व्यथा आहे. यात मुलं अन् मुली दोन्ही सामील आहेत. अन् ह्याला जबाबदार फक्त एक विचार आहे जो चुकीच्या पद्धतीने तरूणांच्या मनात घर करून बसलाय. तू भावा कोणताच चुकीचा विचार मनात आणू नकोस. व्यसन लावून घेऊ नकोस.”
“काय करणार अमऱ्या. तुला माहिताय मी कसा होतो. ही समदं टेंशननं झालंय. दारुची, गुटख्याची सवय लागल्यापासनं तर पाकंच संपलय.”
“सोड मग भावा हे सर्व. बघ कदाचित एखादी मुलगी येईल तुझ्या आयुष्यात जी स्वभाव बघेल. माणूस बघेल. पण जर का तुला व्यसन असेल तर ती कशी हो म्हणेल. तीच काय कुठल्याच मुलीला व्यसनाच्या अधीन गेलेला मुलगा नको असतो.”
“असतात ना. भावा जशी सगळी मुलं वाईट नसतात तश्याच सगळ्या मुली सुद्धा वाईट नसतात.”
“अश्या मुली कुठं मिळतात अमऱ्या.. कशा मिळतात ?”
तो नुसताच हसला. क्षणभरासाठी त्यालाही काय बोलायचं ते सुचलंच नाही. मग मंद स्मित करत तो म्हणाला,
“भावा सितेसारखी अर्धांगिणी मिळायला आपण रामासारखं नको का व्हायला सांग बघू. फक्त पोरांनीच तेवढं चांगली मुलगी मिळू दे म्हणायचं का. पोरींना पण वाटतं ना एखादा निर्व्यसनी, समजूतदार, चारित्र्यवान नवरा मिळावा. तुला जशी बायको पाहिजे असेल ना तसं तु अगोदर हो भावा. आज ना उद्या नक्की मिळेल.”
“खरंच ?”
“होय. चांगलं होण्यासाठी चांगला वेळ द्यावा लागतो. तेव्हा कुठे मनासारख्या गोष्टी घडू लागतात. बघ विचार कर. अन् हो.. तू आत्ता चुकीचा वागतोयस किंवा वाईट आहे असं नाही. पण बघ बदलत्या समाजासोबत आपण पण बदललं पाहिजे. थोड्या फार गोष्टी आपण पण बदलल्या पाहिजेत. समजूतदार पणा अंगी भिनवला पाहिजे. जुळवून घेता आलं पाहिजे. एकदुसऱ्याचा मानसन्मान ठेवता आला पाहिजे.”
“एकदा बायको मिळू दे मग बघ की.”
“मिळाल्यावर नाही भावा. आतापासूनच अश्या गोष्टी अंगी असायला पाहिजे. तु कसा आहेस यावरून ठरणार आहे. तु कसा होशील यावरून नाही.”
अनिकेतने समजुतीने मान हलविली अन् म्हणाला,
“अमऱ्या तुझं कसं काय चाललंय मुंबईत ? तुझं कुठं जुळलंय का नाय ?”
“माझं म्हणशील तर तीच परिस्थिती आहे रे. धड नीट नोकरी नाही. पगार नाही. मुंबईत असलो तरी दगदग आहे रे. स्वप्न पुर्ण करण्याच्या नादात प्रेमासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. अन् जर वेळ मिळाला तर आम्हांलाही कोणी पसंद करत नाही.” तो हसतच म्हणाला.
“तिचं काय झालं अमऱ्या..?”
“कोण..?”
“पुण्यात भेटल्याली की.. तुला लाईन द्यालती.. गडांव गेलतास कुठं.. सांगाल्तस न्हवं..?”
“हां ऽ हां ऽ.. ती होय..” तसा तो हसला.
“परत काय नाय.. ?”
“कुठलं रे.. तेवढ्यापूरतं होतं ती.. “
“नंबर हुता नव्हं.. बोलायचंस की पुढं..”
“काय नाय रे.. हे सगळं तेवढ्यापुरतं असतं.. तिला तेव्हा कोण नव्हतं बोलायला म्हणून बोलत होती. परत कसलं काय.. स्ट्रगलर समजून बंद झाली बोलायची.”
“लय अपेक्षा लका पुरींच्या कुठं पिन जावा ?”
“आपल्या पार्टनरकडून अपेक्षा हव्याच भावा. पण त्याही आधी पार्टनर कसा असायला हवा हे बघितलं तर चांगल. एवढंच वाटतं.”
“भावा बघ जी तुझी परिस्थिती आहे ती माझी पण आहे. कदाचित बऱ्याच जणांची असेल. लहाण्यांची मोठ्यांची. हा तरूणपणीचा काळंच मोठा संघर्षमयी असतो. पण म्हणून असं उदास राहून आयुष्याला वैतागुण कसं चालेल. आयुष्यात जर संघर्षच नसला तर त्यात काय मजा आहे सांग. आपण लढू शकतोय आपल्यात ही ताकद हाय म्हणून आपल्या संग असं होतंय असं समज. असा खचून जाऊ नकोस. बघ फक्त लग्न म्हणजेच आयुष्य नसतं.”
“म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की स्वत:च्या प्रगतीकडे आधी लक्ष दे. आपल्यासाठी जो उचित साथीदार असेल तो येईलच. त्याला यायचं आहे तेव्हाच येईल. ना वेळेच्या आधी ना नंतर. उचित वेळी उचित साथीदार. त्याची अशी वाट बघणं फक्त सोडून दे. तो वेळ ती उर्जा स्वत:च्या प्रगतीसाठी वापर. त्यातच भलं आहे. सर्वांचं.”
“आता कसं आधी सारखा झालास.”
“तु समजूत घातली म्हणून.”
“तु समजून घेतलंस म्हणून.”
तो नुसताच हसला अन् म्हणाला, “जी हुईल जसं हुईल तसं मंजूर हाय आता.”
काही क्षण शांततेतच गेले.. मग अनिकेतनच बोलायला सुरुवात केली.
“अमऱ्या नाथाभाऊ संग बोलाय न्हायस..?”
तो शांतच राहिला.
“लका इसरून जा आता.. किती वरीस असं राग धरून बसणार.. त्येस्नी तर कोण हाय..?”
“का आहे ना आता नवी बायको..”
“ती बी लका पळून गेली..”
“काय..”
“व्हय.. तुला म्हाईत नसंल..”
“नाही..”
“कवाच पळून गेली लका.. पैसं पिन न्हेलंत वाटतं..”
“जाऊ दे तसं पण काय कमी आहे..”
“तुझी कमी हाय लका.. पोरगा हायस तू.. एवढी इस्टेट तुझीच हाय नव्हं..?”
अमरने नकारार्थीच मान हलवली अन् म्हणाला, “बाप असून कधी प्रेम देऊ शकला नाही.. इस्टेट घेऊन काय करू मी.. काय नको मला त्याच. मी काय त्याचा पैसा उडवायला जन्माला आलो नाही.. माझं मी करीन काय तर आयुष्यात.. आणि तसंही माझी आई मेली तेव्हाच बाप पन मेला.. मी एकटाच बरा..”
“अमऱ्या बग चुका समद्यांकडनं हुत्यात..”
“भावा ही चुक नाही. एकदा होते ती चूक. सारखी सारखी जाणून बुजून होते ती सवय. या माणसाच्या सवयीला औषध नाही. बायको असताना, मुलगा असताना ह्यांची बाहेर लफडी. कसं वाटतं सांग ना.. कुणाला बरं वाटेल.. आणि तुला तर चांगल माहित आहे.. तुलाच काय सगळ्या गावाला माहित आहे म्हणा.. यांच्यामुळेच आई गेलीय माझी. त्यांना ह्याचं काही नाही. त्यांना जसं जगायचंय तसं जगू दे..”
“बग बाबा.. खरं मला तर वाटालय तू आता समदं इसरून जावं.. नाथाभाऊला असंल जरा बायकांचा नाद..”
“जरा..” त्याने विषण्णपणे मान हलविली.
“खरं अमऱ्या नाथाभाऊ माणूस म्हणून एक नंबर हाय. तुला पिन ठाव हाय. जिथ कोण नाय तिथ नाथाभाऊ असतंय. अन् तसं बी.. एकट्या माणसाला नगो का कुणाची साथ. आता नशिबात त्यांच्या बायकोच प्रेम न्हाय तर ती तर काय करणार.. झाली असंल चूक..”
“माझ्या आईकडं लक्ष ठेवलं असतं तर मिळालं नसतं का प्रेम.. आजारी बायकोला सोडून हा माणूस अय्याशी करत बसला.. माझ्याकडे माफी नाही.. कधीच नाही मिळणार.. काही झालं तरी नाही..
त्याची नजर समोर गेली. कोणी काहीच बोललं नाही मग. क्षणात तिथ शांतता पसरली. चांदण्या अंधाराची चादर ओढून सर्व काही एकटक निरखत होत्या. मनातली शांतता भोवतालच्या वातावरणाशी एकरूप झालेली. समोर पसरलेल्या अंधारात चंद्र हळूहळू जमिनीवर येताना दिसत होता. जणू काही तो सर्व माहिती असल्याचं खुणावत होता.
अधुरी कहानी भाग ०४
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!