अधुरी कहानी – भाग ०४
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
“अधुरी कहानी – लपवाछपवी”
“पहिला मान माझा कायम लक्षात ठेवायचं.” हाताच्या तर्जनीने त्याला इशारा करत तिने डोळे भरले अन् वाऱ्याच्या वेगात त्याला मिठी मारली. त्याने तिला कवेत घेतलं.
पाच सहा महिन्यांचा विरह त्याच्या उबदार मिठीत ती मिटवू लागली. मांजरीन पिल्लांवर चुंबनाचा मारा करावा तशी ती त्याच्यावर तुटून पडली.
“बास बास बास.. हे चांगलंय तुझं. आधी मार द्यायचा अन् मग मुका घ्यायचा..” तशी ती जोरात त्याच्या कानशिलात लगावलेल्या गालाला चावली.
“आ ऽ दुखतयं की बाई..” ती गालातच हसली.. त्याच गालावर चुंबन देत राहिली.
दोघेही एकमेकांना घट्ट मिठीत ओढू लागले. त्याने तिच्या मानेचं चुंबन घेतलं अन् तिच्या शरीरातून विजेचा संचार झाला. अंगावर रोमांच उभे राहिले अन् श्वासोच्छ्वासाची गती कमी जास्त होऊ लागली. ओठांवर ओठ टेकले गेले अन् श्वासात श्वास मिसळू लागला. नसानसातल रक्त सळसळलं अन् ऐन उमेदीतलं तारुण्य जोशात बाहेर येऊ लागलं.
एकमेकांच्या आवळलेल्या घट्ट मिठीत प्रेमाची नदी दुथडी भरून वाहिली अन् विरहाचा डोह पांढऱ्या शुभ्र दरीत नाहीसा झाला.. अंगातलं बळ हलकं झालं अन् ताठरलेली शरीर सैलावली..
तिने आपल्या नखांनी त्याच्या छातीवर जोर दिला..
“दुखतयं की गप..”
“दुखू दे की.. तुला बी कळू दे.. माझं दुःखन..”
त्याने तिला एकदमच स्वतः पासून विलग केलं..
“का..?”
तशी ती पुन्हा हसत त्याच्या छातीवर स्थिरावली.. नखांच्या ओरबड्यांना चुंबन देत त्याची क्षमा मागु लागली..
“असलं कसलं ग तुझं प्रेम.. प्रेम कमी नी व्हायलन्स जास्त..”
“प्रेम कमी नि व्हायलन्स जास्त.” ती त्याची नक्कल करत म्हणाली.. “लय शुध्द बोलून दावू नगो.. म्हाईत हाय मुंबईत ऱ्हातोस ते.. लय शाना हु नगो.. आम्हाला बी येतंय बोलता..”
तसा तो हसूंच लागला..
“हसतोस काय.. तू बी इथलाच हायस.. चार दिस तिकडं काय गेला.. शाणा झाला व्हय..”
“सात वर्ष..” तो शांत नजरेनेच म्हणाला..
“तीच.. चार काय सात काय.. म्हाईत हाय..” तसं ती त्याच्या गालावर पुन्हा चावत म्हणाली.. “व्हायलन्स म्हणं.. जरा नख नाय लागलं तर व्हायलन्स..”
“तर नख नाय लागलं.. बघ जरा.. किती ओरबाडलंस ते.. काय विचार काय आहे तुझा..?”
“ईचार व्हय.. असं वाटालंय तुझी छाती चीरून तुझ्यात शिरावं..”
“कशाला..?”
“तुझ्या काळजात राहायला..”
“अशानं मरेल मी.. नको ते विचार करत जाऊ नकोस..”
“मरेल म्हणं.. माझ्या संग नीट बोलायचं.. ती तुमची शुद्ध भाषा माझ्या म्होरं नगो.. आलं का ध्यानात..” तशी ती पुन्हा त्याच्या गालावर चावली.. “म्हण बगु..”
“होय बाई..”
“हां ऽ.. दावू काय परत..?”
“सॉरी.. व्हय बाई.. “
“आता कसं.. माझ्या बर परक्या वानी बोलायचं न्हाय.. ती शुध्द बिद्ध तिकडं.. समजलं काय..?” तशी ती बोलक्या नजरेने हसली अन् त्याच्या गालावर एक चुंबन देत म्हणाली, “अशी कशी मरून दिल तुला..?”
तो हसतच म्हणाला.. “काळजात राहावं म्हणं.. कुठनं शिकतेस गं असलं काय काय..?”
ती हसतच म्हणाली, “तूच शिकवतो मला..”
“मी कधी शिकवतो..?”
“सपणात.. ”
तसा तो हसला.. ती ही हसू लागली.. अन् हसूनच म्हणाली,
“आणि तू कुटनं शिकतोस..?”
“काय..?”
“काय.. सांगू का आता काय..” तशी ती त्याच्याकडे नजर तिरपी करुन बघु लागली..
“मला पण तूच शिकवतेस.. माझ्या स्वप्नात..”
“मी नाय जात कोणाच्या स्वप्नात..”
“मी तर कुठं जातो मग.. ”
“जात अश्शील कुणा कुणाच्या..”
तसा तो हलकासा गंभीर झाल्यासारखा झाला..
“मी फक्त माझ्या डार्लिंगच्या स्वप्नात जाते..” तसं ती त्याला बिलगली.. “खर सांग प्रत्येक वेळी इतकं चांगल कसं काय..?”
“तु सांग ना.. हेचं मी तुला बी इचारू शकतो..”
“तुझ्या विरहान.. तुझ्या विरहात मी तुझ्याकडे जास्त आकर्षित होते..” तुझ्या कडं काय उत्तर हाय.?”. ती त्याला एक भुवई वर करून विचारू लागली.
“विरहानं की वीर्यानं..?”
तसं तिने त्याला अडवलं अन् त्याच्या गालावर एक चापटी मारली.. “चावट.. काय पन बोलतोस.. विरह.. तुझा दुरावा म्हंत्या मी..”
तसा तो गालात हसू लागला.. ती ही हलके हलके त्याच्या गालावर चापट्या मारत हसू लागली..
“सांग की..”
“काय सांगु मला काय सुचंना आता..”
“सांग तरी बी..”
“काय सांगू.. आता होतंय.. मला माहिताय काय कसं.. तुझ्या कडणच मला कळणार ना.. माझं मला कसं कळणार..” तसा तो हसु लागला..
ती शांततेने त्याच्या कडे पाहू लागली..
“बर बाई एक काम कर.. माझ्या काळजात घुस अन् जाणुन घे..”
“नको राहु दे.. “
“का.. आता फाडल्यास तर घुस घुस..” तसा तो तिचा चेहरा छातीवर आपटू लागला..
ती हसू लागली..
“नको बाबा आता.. दुसऱ्या पोरींचा वास यायलाय..” ती एकदमच बोलून गेली..
तसा तो एकदमच शांत झाला.. तिच्यावरून नजर त्याने दुसरीकडे फिरवली..
तिने नाराजीच्या सुरात त्याची माफी मागितली..
“सॉरी की बाबा.. किती मनवायचं तुला..” तशी ती एकदमच त्याच्यावर रुसली..
“हे चांगलय तुझं.. मारायचं मला, बोलायचं मला आणि रुसायचं तू.. मोठी असल्याचा फायदा घेतेस व्हय.. ?”
तशी ती एकदमच त्याच्या पुन्हा जवळ जाऊन त्याला बिलगली..
“लगीच रुस्तोस बाबा..”
“तु घे की माझ्याव संशय..”
“असंच म्हटलं न्हवं..”
“त्याला पिन मर्यादा असत्या.. किती वेळा मला बोलून दाखवतेस तू..” तसा तो एकदम गंभीर झाला..
“सॉरी..” ती तोंड बारीक करत म्हणाली..
“सॉरी की बाबा..”
“अमु.. तुझा विश्वास नाही माझ्यावर..?”
“हाय की..”
“सॉरी की..”
“सॉरीचा प्रश्न नाय.. खरं हल्ली तू खूप वेळा बोलून दाखवलंस.. काय हाय काय तुझ्या मनात..?”
तशी ती एकदमच शांत झाली.. त्याच्यापासून नजर चोरू लागली.. त्याने तिच्या हनुवटीला धरत पुन्हा विचारलं.. “बोल की.. प्लीज..”
“भीती वाटाल्या आता..”
“कसली..?”
“..”
“बोल की..”
ती शांतच राहिली..
“मी सोडून जाईल ह्याची..?”
“..”
“का..?”
“नाय माहित.. उगाच मनात वाईट वाईट इचार येतात.. आदीच तू माझ्या पासनं लांब राहतोस.. कवा तर सां म्हयण्यातनं आपली भेट व्हती.. मग..”
“लांब जरी असलो तरी दिवसरात्र आपण बोलत असतो..”
“तरी पिन दुरावा हायच की..”
“मग काय करु मी..?”
“इथं इवून रहा की..”
“तुला माहितीये..”
“तुमच्या गावात नगों राहुस.. कोल्हापुरात रहा की.. माप नोकऱ्या हायत इथं पिन.. तुझा बा ऽ कशाला येतोय इथं..”
“त्यो हाय तवर मी काय इथं नाय राहत..”
“अन् माझं काय..?”
“तुला काय झालंय अचानक.. ?”
“मला आता राहवना तूझ्या बिगर..” ती त्याला जोरात मिठी मारत म्हणाली..
“असं करुन कसं चालंल..”
“मला नाय माहीत..”
तो क्षण भर शांतच राहिला..
“कसं तुला समजवायचं आता..”
“नको समजाऊस.. लय सोप्प हाय.. ”
“तुला वाटतंय.. माझा पण विचार कर की.. तुला काय वाटतं मला करमत असंल तुझ्या बिगर.. मला येत नाय इथली आठवण.. चार पैसे जमवण्यासाठीच करतोय ना सगळं.. जरा कड काड की.. एकदा सेटल झालो की करु आपण लग्न.. तुझं पण हुईल की तवर नर्सिंग..”
“एक बोलू..”
त्यानं नजरेनेच होकार दिला.. “जा समदं इसरून.. तुझं पिन आयुष्य लय सोप्प हुईल.. असं मर मर करायची काय गरज नाय तुला.. चाळीस एकर रान हाय.. जायदात हाय.. कुणाच्या पदरात घालंल तुझा बा ऽ.. त्याला तरी कोण हाय दुसरं.. झाली चूक म्हणायचं अन् द्यायचं सोडून..
तो तिच्याकडे गंभीर नजरेनेच पाहू लागला..
“एक पोरगी असून कसं बोलतेस गं असं.. मी जर समजा असं केलं तर.. दुसरी बायको करुन आणली तर..?”
“जीव घिन मी तुझा..”
“मग.. माझ्या बापाची कशी काय बाजू घेतेस..?”
“त्यांच्या जवळ कोन नाय आमऱ्या.. बाजू घ्यायचा सवाल नाय.. आई बाप नाय.. भाऊ बहीण नाय.. एकुलता एक माणूस.. बायको व्हती ती बी आजारात गेली.. माणसानं कुणाजवळ काळीज मोकळ करायचं..?”
“मी होतो ना..?”
“तुझं वेगळं.. मला सांग.. तुला माझ्या बिगर करमतं का..?”
“नाय..”
“का.. मी कोन हाय तूझी..?”
“जीव हायस..” तो तिच्या बोटांच चुंबन घेत म्हणाला..
“तु बी माझा जीव हायस.. कारण आपलं नात आत्म्यांच हाय.. तुला माझं, मला तुझं समदं ठाव हाय.. असं नातं नवरा बायकोचंच असू शकतंय.. मनानं मरत असलेल्याला नको का असा जीव..?”
“बघ बाबा.. मला नाय माहित.. तुमचं अजुन काय झालंय का नाय ते.. खरं मी माझा इचार सांगितला..”
“तुझं कधी कधी कळतंच नाय..”
“काय कळंणा तुला..?”
“मी काही न करतां तु माझ्यावर संशय पण घेतेस.. माझा बाप खुले आम आय्याशी करालाय तर त्याची तू बाजु पण घेतेस..”
“तुलाच कळंणा.”
“आणि तुला लय कळतंय..”
“दोन पावसाळं जादा बघितल्यात म्हणुन..”
“म्हणुन माझ्या वर हक्क बजावतेस.. वाट्टेल तसं मारतेस..”
“तिनं त्याच्या गालावर लाडाने मारलं अन् म्हणाली, “तू पण मार की मग..”
“मला नाय जमत असं.. तुलाच काय आनंद मिळतोय कुणास ठाऊक..?”
“माझा मार दिसतोय.. पिरेम दिसत नाय..”
“नाय..” तो नजर चुकवून बोलू लागला.
“नाय..” ती त्याची नजर धरण्याचा प्रयत्न करू लागली.
“नाय..”
“नाय..” तशी ती त्याच्या अंगावर बसून त्याच्या चेहऱ्यावर सर्वत्र चुंबन देऊ लागली..
“का.. नाय बोल की आता.. आता काय झालं..?”
तशी ती त्याला गुदगुल्या करु लागली.. तो तिला थांबवत थांबवत हसू लागला..
“गप गप छाती भरून आली माझी..” त्याने तिला स्वतः पासून दुर केलं..
त्याच्या अंगावरून उठत ती त्याला बिलगून झोपली..
“आमऱ्या तुला खरंच नाय आवडत..?”
“काय..?”
“तुला मारल्यालं..?”
“वेडी हायस काय.. असंच म्हटलं.. तुझा मार खायला तर येतो मी..” तो तिच्या नजरेला नजर देत म्हणाला.
“मी प्रेमानं मारते रागात नाय..”
“माहितीये मला चांगलंच.. मी पण तुझ्यावर प्रेम करतो.. मला माहितीये.. जे तूझ्या चेहऱ्यावर दिसतं ते मनात नसतं अन् जे मनात असतं ते तुझ्या डोळ्यांत दिसतं..” तस् तिने हलकंस त्यांच्या ओठांच चुंबन घेतलं..
“डोळ्यात दिसत म्हणं.. तुझी आस लागलेली दिसत नाय वाटतं.. म्हणून आधी मित्राला भेटायला गेलास.. माझ्या आधीच..”
“अगं आजोबा वारला त्याचा.. खास दोस्त माझा.. मग नको का जायला..?”
“मी आज्यारी हुते तवा कुठं आला नायस.. तवा तुला काम हुतं.. मी मेलो..” तसा त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला.
“काय पण काय बोलतेस गं.. कुठला विषय कुठ पण नेतेस.. आता तुला सर्दी झाली म्हणून माझा बॉस मला सुट्टी देईल काय..?”
“मागायची हुतीस..”
“आणि काय म्हणून घ्यायची सुट्टी..?”
“म्हणायचंस माझ्या होणाऱ्या बायकोला सर्दी झाल्या.. शेंबूड पुसाय जायाचंय..” तशी ती जोरजोरात हसू लागली. तोही जोरजोरात हसू लागला. “वाटल्यास माझा शेंबूड दिला असता म्या जरावाईच.. पुरावा म्हणून..” तशी ती आणखीनच हसू लागली. तोही हसू लागला. बराच वेळ दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन हसू लागले. काही वेळाने तो शांत झाला. तिच्या नजरेला नजर देत म्हणाला.
“अमू.. तुला खरंच वाटतं मी तुला फसविन म्हणून..?”
ती एकदमच शांत झाली. त्याच्या ओठांवर हात ठेवला अन् नकारार्थी मान हलवली..
“मग..”
“तस नाय.. पण आजूबाजूला बघितलं की भीती वाटते.. आपल्याला कोणाची नजर नको लागायला..”
“कोणाला माहित असेल तर ना.. तुला माहितीये ना आपण किती काळजी घेतो.. आपण रिलेशन मध्ये आहोत ते कोणालाच माहित नाहीये.. बाकीच्या कपल सारखं नाही आपण.. सगळ्यांना दाखवत सुटणारे..”
“माहितीये.. पण कधी कधी याचीच भीती वाटते.”
“बघ माझ्या बद्दल तुला सगळं माहीत आहे.. माझा स्वतःचा बाप कसाय हे पण माहितीये.. तुला जर असं वाटत असेल की बाप..” तिने त्याच्या ओठावर हात ठेवला.
“मी म्हटलं का असं..?”
“नाय पण गैरसमज होऊ शकतो कधी पुढे मागे.. फक्त इतकं लक्षात ठेव.. मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलंय.. तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होत ना पुण्यात तेव्हा पासुन मी तुझ्या प्रेमात आहे.. आणि माझा बाप जरी तसा असला ना तरी मी नाही तसला.. मी नाही फसवनार.. मला पटत नाय म्हणुन मी सगळ्या इस्टेटी वर पानी सोडलंय..
“माहीतीये मला.. तु नाय माझ्या शिवाय राहू शकणार.. आणि मी पण.. मला अशीच भिती होती..” ती शांततेतच म्हणाली..
“मुंबईच्या पोरी लय बाद हायत.. उगंच तुला जाळ्यात अडकवलं तर.. म्हणुन भीती वाटत्या..” ती जरा हसतच गंभीर वातावरण हसरं करू लागली.
तसा तो गालात हसू लागला.. ती ही हसु लागली..
“त्यांना गावाकडची पोरं नाय आवडत.. नको काळजी करु..”
“तुला कसं माहीत..?” तशी ती खुदकन गालात हसली…
तो तिच्याकडे हसुनच पाहू लागला.. “किती म्हंजे किती संशय..?”
“आरं संशय नाय.. असंच इचारलं.. कसं माहीत म्हणुन.. जनरल नॉलेज म्हणून..”
“माहिताय मला.. ऐकून..”
“बर.. चांगलय.. गावाकडच्या पोरी पिन कमी नस्त्यात माहिताय न्हवं ऐकुन..?”
तो नुसताच हसु लागला.. ती त्याच्या पोटाला चिमटे घेऊ लागली..
“गप बाई आता जरा.. जरा झोपू दे..”
“का संध्याकळन गाडीत काय जागरण करणार हायस होय..?”
“मॅडम मला उद्या मुंबईत जाऊन लगेच जॉबला जायचंय.. तुमच्या सारखं नाही.. तुम्ही काय निवांत हायसा..”
“असू दे.. उद्याचं उद्या.. आता झोपलास तर बघ..”
“बास की आता..”
“नाय..”
“काय करायचं मग..?”
“काय नाय.. असंच माझ्या डोळ्यांत डोळं घालून बघत रहा..”
“आणि काय..?”
“बघ.”
“काय बघू..?”
“नुसतं बघत राहा..”
“का..?”
“बघं म्हणत्या न्हवंं.. आता तोंड उघडलंस तर बघ.. बुक्काच घालीन पाठीत..”
तसा तो हसला. तीही हसु लागली..
“आय लव्ह यू..”
“आय लव्ह यू टू..”
एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून दोघेजन कधी एकमेकांत हरवले हे त्यांनाही कळालं नाही..
अधुरी कहानी – भाग ०५
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!