अधुरी कहानी – भाग ०६

“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

“अधुरी कहानी – तडफड”

 

    खटखट खटखट आवाजाने अनिकेतचं डोकं उठलं होतं.. पलीकडच्या घरातून येणाऱ्या आवाजाने अनिकेत आता हैराण होत होता. राजाचा जागरण गोंधळ झाला होता.. अन् आता राजा स्वतः जागून गोंधळ घालत होता. अनिकेतच्या घराच्या पाठीमागच्याच बाजूला राजाचं घर होतं. अनिकेतच्या खोलीत स्पष्ट आवाज येत होता. अनिकेतची आज्जी बाहेर सोप्यात डाराडूर झोपली होती. संपूर्ण गल्लीत शांतता होती. दूरवरून कुठून तरी किर्र ऽ आवाज येत होता. खरं खाटेच्या आवाजा पुढे तो आवाज फिका पडत होता.

    मधूनच येणारा कन्हण्याचा आवाज अनिकेतच काळीज चिरून जात होता. हातापायाची तडफड होत होती. या कुशीवरून त्या कुशीवर.. पुन्हा त्या कुशीवर.. असं करून करून अनिकेत भेंडाळला होता. दोन्ही कान उशीच्या साह्याने दाबून ठेवत होता. खरं त्याचा काही परिणाम होत नव्हता.

    संपूर्ण अंगावर लाल मुंग्या चावत सुटाव्या तसं अंग अंग चावत होतं. एखादी गोम शरीरावर धावत सुटावी अन् तिला धरायला हाताची तडफड व्हावी तशी अनिकेतची अवस्था होत होती. ती गोम कधी या अंगाला तर कधी त्या अंगाला जात होती. मधूनच कानात शिरत होती.. तर नाका तोंडातून बाहेर येत होती.. तळपायाला गुदगुल्या करत होती तर पोटऱ्यांवरच्या केसात अडखळत होती. वरवर येत मांड्यांवरच्या कुरळ्या केसांवर गोल गोल फिरत होती अन् संपूर्ण शरीराला झटके देत होती.. चिमणीन केलेल्या पिंजऱ्याच्या घरट्यात कोणीतरी अडकावं तशी ती जाळ्यात अडकली अन् जाळ्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली.. तिच्या इवल्या इवल्या पायांमुळे होणाऱ्या गुदगुल्या संपूर्ण शरीराला झटका देऊ लागल्या होत्या. अनिकेत त्या गोमीला शोधायचा प्रयत्न करत होता परंतु ती गोम त्याच्या हाताला लागत नव्हती. त्याच्या शरीराची तडफड होत होती हातापायाची झटपट सुरू होती.

    “अन्या रं ऽ .. ए अन्या..” सोप्यातून आज्जींन आवाज दिला..

    अनिकेतला शुद्ध नव्हती. संपूर्ण शरीर घामानं लथपथलेलं. आज्जींन उठून लाईट लावली अन् अनिकेत जवळ आली.

    अनिकेत हरबडून जागा झाला.. स्वतःच उघडं अंग चादरीत झाकू लागला.

    “अन्या रं ऽ.”

    “हा ऽ..”

    “असा का तडफडालास.. सपान पडलं काय..”

    “हा ऽ न्हाय.. व्हय सपान..”

    “व्हय का न्हाय..?”

    “व्हय. ”

    “उठ जरा वाईच पाणी मार तोंडाव उठ..”

    “जा तू.”

    “उठ की.”

    “जा म्हटलंय नव्ह.. ऐकत जा की..”

    आज्जी हात झाडून पुन्हा सोप्यात आली.. “इळभर काय बाय वंगाळ खायाचं अन् रातभर असं तडपडायचं.. म्हाताऱ्या माणसाला जरासुदीक आराम नाय.”

    “झोप की गप.”

    “झोपतो बाबा.”

    अनिकेत तोंड पुसत पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागला. खटखट आवाज आता बंद झाला होता.. आता फक्त कीर्र ऽ आवाज कानापर्यंत येत होता.. त्याच आवाजाची सवय असलेला अनिकेत हळूहळू झोपी गेला.

 
    दोन्ही कानांत इयरफोन घालून देखील तिला एक आवाज सतत छळत होता. तिने गाण्याचा आवाज पूर्ण वाढवला खरं तो शब्द सर्व आवाजांना चिरून तिच्या मेंदूवर वार करत होता. तोच एक शब्द तिच्या डोक्यातून बाहेर जात नव्हता.. हत्तीच्या कानात मुंगी शिरावी अन् त्यानं तांडव करावा अशी अवस्था अनिकाची होत होती. मन विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी आजवर तिने करून पाहिल्या पण कोणताच उपाय गुणकारी ठरत नव्हता.
 

    तिने दोन्ही कानातून इयरफोन काढले अन् दोन्ही कान उषांमध्ये दाबू लागली. हातपाय झटकू लागली अन् शरीराची तडफड थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. दोन्ही हातात डोकं धरून खोलीतून फेऱ्या मारू लागली. टेबलावर पडलेल्या ब्लेड कडे तिचं लक्ष गेलं अन् ती वेगात तिकडे गेली. उजव्या हातात ब्लेड धरून डाव्या हाताचं मनगट वर केलं अन् एकटक ब्लेडकडे पाहत तशीच स्तब्ध उभी राहिली.. एका क्षणाचा विलंब होणार तेवढ्यात दार ठोठावण्याचा आवाज तिच्या कानांवर पडला. तिने हातातलं ब्लेड खाली टाकलं अन् दारावर नजर रोखून उभी राहिली.

    दार ठोठावण्याचा आवाज वाढला. ती एक एक पाय टाकत दाराजवळ गेली. दार उघडलं. दारात प्रियांश होता. तिने भुवया वर उंचावून काय हवय म्हणून विचारल.

    “मम्माने पातवलय.”

    “का ?”

    “लक्त तेवायला.”

    “कुणावर ?”

    प्रियांशने त्याच्या नाजूक भूवया उंचावून उत्तर दिलं.

    “माझ्यावर. ”

    त्याने मान डोलावली.

    “का मी काय पळून जाणार आहे ?”

    त्याने जोरजोरात मान डोलावली.

    “कोणासोबत ?“

    “माकदातोबत..” तसा तो खुदकन आपल्या पडलेल्या दातांना दाखवत हसू लागला. समोरचे वरच्या बाजूचे पडलेले दात अन् बाजूचे किडलेले दात दाखवत हसणाऱ्या प्रियांशला पाहून अनिकालाही हसू आलं.

    तिने हलक्या हाताने प्रियांशाच्या डोक्यावर मारलं.

    “मावती.”

    “काय..?” म्हणत ती गुडघ्यांवर खाली बसली.

    प्रियांशने आपल्या बंद हाताची मुठी तिच्यासमोर धरली.

    “माझ्यासाठी.”

    त्याने हलकसं स्मित करत जोरजोरात मान डोलावली.

    “वाव.. तो त्वीत..” अनिका त्याच्याच भाषेत त्याच्या हनुवटीला धरत म्हणाली .

    प्रियांशने मुठ उघडली अन् खोटं असणारं लहान मुलांच्या खेळण्यातलं झुरळ अनिकाच्या अंगावर फेकलं. अनिका जोर जोरात ओरडू लागली अन् प्रियांश हसत हसत “माकदीन दाबरली” म्हणत तिच्या बेडवर जाऊन नाचू लागला. अनिका त्याच्या मागोमाग गेली अन् त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागली.

    त्याला बेडवर खाली पाडत “माकडा मला घाबरवतोस होय” म्हणत त्याच्या पोटावर गुदगुल्या करू लागली.

    प्रियांश जोरजोरात हसू लागला. ती तशीच त्याच्या बाजूला झोपली.

    “मला माकडीन म्हणतोस होय ?”

    प्रियांश जोरजोरात मान हलवू लागला.

    “तुझ्या एवढी आहे होय मी ?”

    प्रियांश आणखीनच दात काढत जोरजोरात मान हलवू लागला. अनिकाही त्याच्यासोबत जोरजोरात हसू लागली. हसत खेळतच एकमेकांना चिडवत ते कधी झोपले हे त्यांनाही कळालं नाही.

   सकाळ होताच अनिकेतने अमरला फोन केला.
 

    “अमऱ्या.”

    “बोलकी काय झालं..?”

    “..”

    “भावा काही झालं का ?”

    “मर्दा रातभर झोप ईत नाय.. भेंडाळलोय लका.. काय सूदरना आता.. लय दिस झालं तुला सांगायचं म्हणतोय.” तसा तो शांतच झाला.

    “ऐकतोय मी बोल.”

    “सेक्स करू वाटालाय मर्दा.. काय बी कळंना.. रातभर नुसता तडपडालोय.. काय तर कर लका..”

    अमर क्षणभर काहीच बोलला नाही..

    “आता ऱ्हावणां आमऱ्या.”

    “हम्म्म ऽ .. येतंय लक्षात माझ्या.”

    “काय करायचं लका..?”

    “रागावणार नसशील तर बोलू.?”

    “बोलकी.”

    “एकदा हातानं..”

    “नाय नाय.. फलकं म्हणून न्हाय जगायचं.. मर्द हाय.. मर्दा सारखंच करायचंय..” अनिकेत त्याचं वाक्य तोडत म्हणाला.
 

    “चुकीच समजतोस भावा तसं काही नसतं. फिलिंग असते ती.. ती काय वाईट गोष्ट नाही..”

    “ती कंची बी गोष्ट असू दे चांगली न्हाय वाईट माझ्याकडण न्हाय व्हणार..”

    “मग भावा एकच उपाय.. लक्ष्मीपुरीतनं ये एकदा जाऊन.”

    “कामावली तिथंच असत्यात तिथं नको.”

    “मग मिरजंला जा.”

    “तुला सांगलीचा चुलता म्हाईत हाय का आमचा..?”

    “तो ढोल्या.”

    “व्हय.”

    “त्याचं काय..?”

    “त्यो तिथंच आय घालत असतोय आपली.”

    “भावा.. ती जागाच अशी आहे की कोण ना कोण ओळखीचं दिसू शकतंय.. पुण्यात जातोस..

    “नाय नाय नको.. पेठंत नको.. तिथं आणि कोण वळखीच दिसलं की झालंच मंग..”

    “मुंबईत येतोस मग.. इथं कोण नाही ना..?”

    “नाय..”

    “ये मग.”

    “..”

    “काय झालं..?”

    “अं ऽ..”

    “तू ये फक्त बाकीचं मी बघतो.. पैशाची काळजी करू नको.. ठेवू..? ”

    “बर.. फोन करतो तुला.”

    “बर चल..”

    अनिकेतन फोन कट केला अन् रिकामी बॅग शोधण्यासाठी नजर घरभर फिरवू लागला..

    डोळे चोळतच अमृताने मोबाईलकडे पाहिलं.. “ताईसाहेब” नाव बघून तिने मोबाईल कानाला लावला..

    “ताईसाहेब गरीबाची आज आठवण झाली व्हय..?” अमृता झोपेच्या आवाजातच बोलू लागली..

    “अजून झोपलीयेस..?”

    “हम्म्म ऽ व्हय..” अमृता आळस देत म्हणाली.

    “बरं झोप करते परत.”

    “नाय बोल ऊठल्या मी..”

    “..”

    शांतता पाहून अमृता थोडी धीर गंभीर झाली.. “काय झालंय काय दिदे..?”

    “नाही म्हणजे.”

    “जे असेल ते बोल.. आपण इथं खंबीर हाय.. पायजे तेवढी पोरं आणू शकत्या मी.. तू बोल फक्त.”

    “पोरं कशाला..?”

    “मारायला..”

    “कुणाला..?”

    “तुला माहित..?”

    “अगं एवढं काय नाही झालं.”

    “मग बोल की दिदे घडाघडा इथं माझा बीपी वाडालाय..”

    अनिका गालातच हसली अन् क्षणात धीर गंभीर होत म्हणाली ,

    “आम्रे रात्रभर झोप येत नाही.. काय करू काय नको असं होतंय.. एकटी राहिली की जीव द्यावासा वाटतो..”

    अमृता शांत होऊन ऐकू लागली अन् म्हणाली ,

    “आणि काय वाटतं..?”

    “जीव द्यावासा वाटणं कमी आहे काय ?”

    “न्हाय म्हंजी अजून काय वाटतंय का ?”

    “नाही.”

    “एवढंच ?”

    “एवढंच ?”

    “म्हंजी जीव द्यावा वाटतोय ?”
 

    “होय.”

    अमृता शांतच झाली तिला काय बोलावं ते सुचेना.

    “हॅलो ऽ”

    “हा ऽ ऐकालोय.”

    “गप्प झालीस एकदम.

    “न्हाय काय न्हाय.. कशामुळे वाटतं असं दिदे..?”

    “तुला माहित आहे ना सगळं..?”

    “व्हय तरीपण नेमकं कुठल्या कारणामुळे..?”

    “एकच शब्द कानात भिनभिणतोय.. डोक्याला शॉक लागल्यासारखं होतंय..”

    “आलं लक्षात त्याला मारायचं का धरून ?”

    “त्याला कुठे शोधू आता.?”

    “ऑफिसमध्ये असेलंच की.. बाहेर आला की मारू.. आपल्याकडे पोरं हायत.. तू फक्त पैशाची काळजी घे..”

    “नको मी अडकले तर ?”

    “तुझा काय संबंध.. तू यात न्हाईस.. जबाबदारी माझी.. तू फक्त व्हय म्हण..”

    “चालेल.. तू कर तयारी.”

    “ठरलं तर मग गोट्याच कपाळात आणते बघ त्याच्या.”

    “आम्रे.”

    “बोल की दिदे.”

    “अजून एक बोलायचं होतं.”

    “बोल की ऐकालोय”

    “सेक्स पण करावासा वाटतोय गं.”

    अमृताचा चेहरा खुलला अन् ती हसऱ्या चेहऱ्यानेच म्हणाली,

    “खरंच दिदे सेक्स करू वाटालाय..?”

    “तू काय एवढी खुश झालीस..?”

    “न्हाय कुठं काय.. विचारालोय तुला.. म्हंजी सेक्स करू वाटतंय का..?”

    “होय.”

    “हाय म्हंजी समदं एवस्थित..” ती तोंडातच पुटपुटली.

    “काय..?”

    “नाय म्हंजी समदं एवस्थित हुईल नको काळजी करूस.”

    “तुला आश्चर्य वाटत नाही माझं..?”

    “नाय आश्चर्य कसलं दिदे. नॅचरल गोष्ट हाय.. समद्यांना वाटतं मला पण वाटतं.. आता तुला पण वाटालंय.. चांगलंय..”

    “काय करू मग मी..?”

    “काय करू.. हम्म ऽ.. काय करणार, काय करणार.. दीदे एक विचारू..?”

    “बोल.”

    “बॉयफ्रेंड..” अमृता हळुवार उच्चार करत विचारू लागली..

    “बॉयफ्रेंड असता तर ही वेळ असती का अमृता माझी..?”

    “व्हय ते तर हाय म्हणा.. काय करायचं आता काय करायचं..?” अमृता विचार करत करतच बोलू लागली.

    “माझ्यासाठी एक सेक्स पार्टनर शोधशील..?”

    अमृताचे डोळे पांढरे पडले. आपण काय ऐकलं याचा तिला विश्वास बसत नव्हता..

    “दिदे.. ?”

    “होय.. सेक्स पार्टनर..”

    “मी म्हंजी दिदे..?”

    “काय झालं..?”

    “म्हंजी मी कसं काय यात.. मला काहीच कळंना सध्या..?”

    “कळायचं काय अमृता मोठी आहेस तू आता..”

    “व्हय बरोबर हाय.. खरं पोरं पोरी शोधतात गं.. पोरीनं पोरगा शोधणं ही जरा अवघडच न्हाय का..?”

    “हम्म्म ऽ..” अनिका विषण्णपणेच हसली अन् म्हणाली, “तेही बरोबर आहे म्हणा..”

    “तू नको काळजी करू दिदे.. सध्या तू टेन्शन फ्री रहा.. तुला सेक्स करू वाटालंय ही चांगली गोष्ट हाय.. म्हंजी तू नॉर्मल हायस.. ही लय मोठी गोष्ट हाय.. तू सध्या यावरच फोकस कर दिदे.. ऐकतेस न्हवं..?”

    “हो हो अमृता. माहित आहे मला. मी नॉर्मल आहे ते .”

    “हा ऽ ते ”

    “अमृता एक काम कर तू तुझी झोप पूर्ण कर. आपण आरामात बोलू.. तुझं आवरून मला कॉल कर. ठीक आहे..?”

    “हो दिदे करते मी तुला फोन..”

    “बाय.”

    “बाय-बाय.”

    अमृताने फोन कट केला अन् अंथरुणातच उड्या मारू लागली.

    “हे देवा तुझं लय लय उपकार.. माझी दीदी नॉर्मल हाय.. लय आभार.. तुला आज नारळ..” म्हणत ती पुन्हा अंथरुणात पडली.

 
 
क्रमश:
 

अधुरी कहानी – भाग ०७

नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे देखील पहा :

एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम

बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना

चतकोर भाकरी

शिक्षा

    नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment