अधुरी कहानी – भाग ०७

“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

“अधुरी कहानी – रुसवा-फुगवा”

 

    अनिकेत येणार म्हणून अमरचा बंदोबस्त सुरू होता. थोड्याफार पैशांची जमवाजमव झाली होती. कमी पडायला नकोत म्हणून त्याने आपल्या सेविंगच्या पैशांना हात लावला होता. गरज पडल्यास आणखी पैसा उभा करण्याची त्याची तयारी होती. त्याच्याकडून जेवढं होईल तेवढं त्याने केलं होतं. आता फक्त एकच प्रश्न होता. मुलीचा.. मुलीला कुठून आणणार.. अन् तेही सेक्ससाठी.. या एकाच प्रश्नावर तो बराच वेळ विचार करत होता. त्याने जोशाजोशात अनिकेतला मदत करण्याचं सांगितलं होतं. पण आपण वास्तवतः कशा संदर्भात बोलून गेलोय या गोष्टीची जाणीव त्याला आत्ता होत होती. त्याच्यासाठी हे काही रोजचं काम नव्हतं.
 

    चुकून यासंदर्भात कोणाला कळालं असतं तर प्रश्न त्याच्या सुद्धा चारित्र्यावर निर्माण होणार होता. बाप तसा बेटा असे टोमणे लोकांकडून ऐकून घ्यावे लागले असते. समाजात मान खाली घालावी लागली असती. वरवर पाहिलं तर तशी सोपी वाटणारी गोष्ट. मुंबईत आणायचं. रेड लाईट एरियात न्यायचं. पैसे देऊन आपली भूक भागवायची. हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही याची जाणीव त्याला आत्ता होत होती.

    या कामासाठी कोणाला संपर्क करायचा. सोय कुठे करायची. अन् महत्त्वाचं म्हणजे अंदाजे कितपत खर्च होऊ शकतो या सर्व गोष्टींची जाणीव त्याला आत्ता होत होती. त्याने बऱ्याच मित्रांना फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शरमेनेच त्याने कोणाला काहीच विचारलं नाही. स्वतः रेड लाईट एरिया बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु फायद्यापेक्षा नुकसानाचीच माहिती त्याला मिळत होती.

    देव न करो आपण त्या ठिकाणी गेलो अन् चुकून पोलिसांनीच आपल्याला पकडलं तर.. अन् समजा असं काही झालं नाही.. ठरलेलं काम पूर्ण झालं.. पण कोणता आजार होणार नाही याची काय गॅरंटी.. अनिकेतला झालेला एड्स.. त्यातून त्याचा मृत्यू या विचारानेच अमरला घाम फुटला.. या सगळ्यात त्याच्या आयुष्याची कशी वाट लागू शकते ही सर्व चित्र त्याच्या नजरेसमोरून दौडू लागलीत.

    “नाही नाही.. आपल्याला नाही जमणार.. मला नाही जमणार.. मला यात पडायचं नाही..” जोर जोरात मान हलवत तो स्वतःशीच बोलू लागला..

    अनिकेतच्या परिस्थितीची त्याला जाणीव होती. मित्र म्हणून त्याच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. परंतु त्याच्या जीवाशी खेळण्याची त्याची हिंमत होत नव्हती. ही फार मोठी जोखीम होती. त्याच्या जीवासोबतच त्याच्या अब्रूचाही हा प्रश्न होता.

    डोक्याला हात लावूनच तो खाली बसला अन् काय करता येईल याचा विचार करू लागला. उशीजवळ सायलेंट मोडवर असणारा मोबाईल बराच वेळ अमृताचे मिस कॉल त्याच्या स्क्रीनवर दर्शवत होता.

    त्याने अनिकेतला नकार देण्याचा पक्का विचार केला अन् त्याला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. अमृताचे पंचवीस मिस कॉल्स पाहून त्याने गंभीर चेहरा केला अन् तिला फोन लावण्यासाठी कॉल बॅक बटनावर क्लिक करणार तेवढ्यात अनिकेतचाच फोन आला.
 
    “हा बोल की.”
 

    “आमऱ्या.”

    “बोलकी.”

    “..”

    “आता काय झालं..?”

    “नाय म्हंजी मी म्हणत हुतो नको असलं काय कराय..”

    “काय झालं काय अचानक..?”

    “वाटतं तेवढं सोप्प न्हाय मर्दा हे समदं.. उगाच माझ्यापायी तू नको अडचणीत यायला..”

    “तसं काही नाही होणार.”

    “नको तरी बी.. मनाला काय बरं वाटत न्हाय.. लय ईचार केला म्या.. यायचं म्हणून बॅग पिन भरली.. खरं नकोच.. काय व्हायचं ते होऊ दे.. पुढचं पुढं बघता ईल..”

    “मी काय बोलणार आता.. जसं तुला बरं वाटेल तसं.. तू म्हणशील तसं..”

    “हा बघू..”

    “ठीक आहे.”

    “अमऱ्या.”

    “बोलकी.”

    “..”

    “बोल भावा मनात असेल ते बोल असा शांत नको राहूस.”

    “अमऱ्या.”

    “हा ऽ”

    “थँक्यू मर्दा ऽ..” अनिकेतचा आवाज तुटू लागला.. तो भरलेल्या डोळ्याने बोलू लागला..

    “भावा काय हे”

    “थँक्यू मर्दा ऽ.. मी म्हणंल ती ऐकतोस.. दुखवत न्हायस मर्दा ऽ कधी.. कितीबी चांगलं असू दे वाईट असू दे.. मर्दा ऽ माझ्यासाठी करायला तयार होतोस.. खरंच थँक्यू मर्दा ऽ.. मनापासून थँक्यू..”

    अमरने जोरात डोळे मिचकावले अन् शांतच राहिला.. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब गालावर ओघळला…

    “असं नको बोलूस भावा मित्र म्हणून वाढलो असलो तरी भाऊ बनून जगलोय आपण.. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव.. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, तरी मी कायम तुझ्या सोबत आहे..”

    “व्हय.”

    “हम्म्म ऽ.. नको आता लय विचार करूस काढू काहीतरी मार्ग आपण..”

    अनिकेतन नकारार्थीच मान हलवली..

    “जेवलास..?”

    “न्हाय अजून.”

    “जा जेव जा आधी.. जेवणावर नाराज व्हायचं बंद कर.. बोलूया परत चल..”

    “हम्म्म ऽ.. करतो तुला फोन.”

    “हा चल बाय.”

    अमर पाण्याची बॉटल घेऊन खाली बसला अन् गट गट आवाज करत पाणी पिऊ लागला. जोरात एक नि:श्वास सोडला. एकटक जमिनीच्या दिशेने पाहू लागला. त्याने देवाचे आभार मानले. मोबाईलवर अमृताचा नंबर डायल केला. रिंग वाजतच राहिली. अमरने मोबाईल सायलेंट मोड वरून काढला अन् तसाच नजर शून्यात ठेवून अंथरुणात पडून राहिला..

    अनिकेतनं हसत हसतच राजाला टाळी दिली अन् त्याच्या खांद्यावर हात फिरवत घराच्या दिशेने चालू लागला. दारातच उभ्या असणाऱ्या आज्जीनं अनिकेतकडे प्रेमाने पाहिलं अन् त्याच्या तोंडावरून दोन्ही हात फिरवत त्याची नजर काढली. अनिकेत आतल्या खोलीत आला. खुट्टीवर टांगलेली चरी हातात घेतली अन् पाठीवरची बॅग खुट्टीवर टांगली. चरीचा गुंता सोडला. जर्मनच्या पिठाचा डबा पायाखाली ठेवून चरीचा एक भाग वाशावर अडकवला.. दुसरा भाग गळ्याभोवती अडकवून पायानेच डबा बाजूला सारला. डब्याचं झाकण उघडून सगळं पीठ जमिनीवर पडलं. फास आपोआप आवळत गेला अन् डोळे पांढरे पडू लागले. हाता पायाची झटपट सुरू झाली. श्वास गुदमरल्याचा आवाज बाहेरपर्यंत गेला. आज्जीनं दार ठोठावलं.. किंकाळ्या फोडत माणसं गोळा केलीत. माणसांच्या जमावाला बाजूला सारत अमरनं दारावर लाथ मारली.. उशीर झाला होता.. घामाने ओलाचिंब झालेला अनिकेतचा मृतदेह डोळ्यासमोर पाहून अमरची किंकाळी आसमंतात गरजली..

 
    जोरजोरात श्वास घेत अन् डोळे मोठे करतच अमर झोपेतून जागा झाला. त्याने पाण्याची बाटली घेतली अन् एका दमात पाणी प्यायला. अंगावरचं टी-शर्ट काढून टी-शर्टनेच घाम पुसू लागला. मोबाईल हातात घेऊन अनिकेतला फोन लावला. शेवटच्या रिंगेला फोन उचलला गेला अन् अनिकेतचा आवाज त्याच्या कानावर पडला.
 
    “आमऱ्या का रं ऽ..?”
 

    अमरने जोरात नि:श्वास सोडला.

    “आमऱ्या ?”

    “काही नाही.. असाच केला.. जेवलास ?”

    “व्हय का रं ऽ..?”

    “काही नाही. आवाज कसला..?”

    “गाडी हाय बोल की.”

    “कुणीकडे निघालास..?”

    “इथं चव्हाणाच्यात.. का रं ऽ आमऱ्या बोल की..”

    “का काय झालं..?”

    “म्हातारी तापल्या रातच्यानं दावून आणतो जरा..”

    “बर.. ये जाऊन.. करतो फोन परत..”

    “बोल की बोल काय झालं..?”

    फोन कट झालेला. अनिकेतन चेहरा गंभीर करत ओठ खाली पाडलेत अन् मोबाईल खिशात ठेवून पुन्हा स्प्लेंडरला किक मारली.

    अमर डोक्याला हात लावत तसाच चिंतेत बसून राहिला. तोंडावरून हात फिरवत तो वॉशरूमला गेला. फ्रेश होऊन बाहेर आला अन् गॅसवर सकाळचा चहा गरम करायला ठेवला. मोबाईलची रिंग होताच त्याने मोबाईल जवळ घेतला. अमृताचा फोन होता..

    “बोल की.”

    “कुटाइस.”

    “रूममध्ये.”

    “काय करालास..?”

    “चहा बनवतोय फ्रेश झालो आता..”

    “मोबाईल बघितलास..?”

    “हा मी बघितलं.. तुला केलेला मी फोन परत.. तू काय उचलला नाहीस..”

    “मी उचलला नाय.. किती वेळा केलास असा फोन.. ती जरा रागातच म्हणाली.. ?”

    “..”

    “कानात काय गेलंय काय.. चा ऽ वत जरा उकळून इल ऐकू..”

    “एकदाच केला खरं झोप..” फोन कट झालेला. तिने रागा रागातच फोन कट केला.. अमरने नाक मुरडलं अन् नुसतीच मान हलवली.. अमृताच्या हट्टी स्वभावाची अन् रागाची त्याला चांगलीच कल्पना होती. त्याने खरकटा पेला पाण्याने खळबळला अन् पेलाभर चहा घेऊन खोलीतल्या खिडकीजवळ मोबाईल घेऊन बसला..

    अमृता गाल फुगवून बसली होती. तिच्या पुढ्यातच गादीवर मोबाईल वाजत होता. तिने बाजूच बटन दाबून आवाज बंद केला. अमरचा हा तेवीसावा मिस कॉल होता.. मिस कॉल्स वाढतील तसे तिचे गाल आणखीनच लाल होत होते. ती तोंडातच काय काय पुटपुटत होती. हातातल्या स्मायली बॉल वर सगळा राग काढत होती.. जणू काही तो स्मायली चेहरा अमरचाच आहे असं भासवून ती तिच्या हाताच्या नखांनी त्याचा गळा घोटत होती..
 

    शेवटची रिंग बंद होताच तिने बॉलचा चेंदामेंदा केला. स्पंज बॉलचे बारीक बारीक तुकडे करून सर्वत्र रूममध्ये पसरवले. बेडच्या बाजूला असणाऱ्या ड्रॉवरमध्ये हात घालून नवा स्मायली बॉल घेतला अन् पुन्हा अमरचा गळा घोटू लागली..

    “अमु..” तिला आवाज देत रूममध्ये अचानक आलेल्या आईला पाहून ती बिथरली..

    रूम मधल्या पसाऱ्यावर नजर फिरवत तिच्या आईने तिच्याकडे शांत नजरेने पाहिलं. तिच्याजवळ जात तिच्या माथ्यावर उलटा हात ठेवला..

    “गोळ्या घेतलेल्या ना..?”

    अमृताने फक्त मान डोलावली..

    “कौन्सिलिंग साठी जाऊया पुन्हा आज.. वाटल्यास नाही जात मी क्लिनिकला..?”

    “बरी हाय मी.. जरा अभ्यासाचं टेन्शन होतं..” अमृताने हातातला स्मायली बॉल खाली टाकला अन् म्हणाली ..

    “फिरून येऊ या बाहेर.. बरं वाटेल..”

    “संध्याकाळनं जाऊया.. ये लवकर..”

    अमृताच्या आईने गालात हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला अन् तिच्या कपाळावर ओठ टेकवले..

    “बरं येते लवकर.. घरातलं आवरून जाऊया मग..”

    अमृताने गालात हसत मान डोलावली. अमृताची आई बाहेर जाताच तिने चादरी खालचा मोबाईल हातात घेतला.. मोबाईलच्या स्क्रीनवर अमर नावापुढे सत्तावीसचा आकडा लाल गडद झाला होता.. शेवटचा मिस कॉल पाच मिनिटांपूर्वीचा होता.. तिने पुन्हा चेहऱ्यावर नाराजीचे भाव आणले.. कॉल बॅक बटनावर क्लिक केलं अन् लगेचच कॉल कट केला.. पुन्हा आपले ओठ दाबत तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागली..

    दोन-तीन क्षणात पुन्हा मोबाईल वाजू लागला.. तिने हसतच मोबाईल हातात घेतला.. काही काळ रिंग होऊ दिली अन् कॉल एकदाचा रिसीव केला.. अमरने एक नि:श्वास सोडला.. क्षण दोन क्षण कोणी काहीच बोललं नाही..
 
    “आज्जा आमचा लयच साधा माणूस.. एकदम भोळा सांब.. आज्जीचा आमच्या आज्जावर लय जीव.. चहाची लय तलप त्याला.. एकदा दिवसाला पंचवीस कप चहा झाला.. तरी त्याला आनि एक कप हवा होता.. आज्जी नाही म्हटली.. त्याला काय ऐकू गेलं नाही.. तो आपला चहा मागायला लागला अन् रागातच आज्जीला त्यानं एक शिवी घातली. आज्जी चवताळली अन् तिने उकळलेला चहा आज्जाच्या कानात ओतला..” अमृता हसू लागली.. तिने पटकन आपलं तोंड बंद केलं. अमरलाही तिच्या हसण्याचा आवाज आला. तो पुढे बोलू लागला.. “आज्याला तवापासून कमीच ऐकू यायचं.. आज्जी आपली इशाऱ्यातच बोलायची..” अमृता गालातल्या गालातच हसू लागली तिने एक जोरात श्वास घेतला. अमर पर्यंत इशारा पोहोचला. तोही गालातल्या गालात हसत पुढे बोलू लागला.
 

    “आज्जा आमचा एकदा लय आजारी होता.. आज्जीला त्याची लय काळजी.. गावाकडच्या गोळ्या कमी पडल्या म्हणून मुंबईतला दवाखाना गाठला. पाहुण्यांकडे सोय वगैरे झाली.. फिरण्यासाठी कधी वेळ न मिळालेली म्हातारा म्हातारी पहिल्यांदाच मुंबईला आले… मोठ्या मोठ्या इमारती बघून त्यांचे डोळे पांढरे झाले.. रस्त्यावर धावणाऱ्या मोठमोठ्या गाड्या बघून घाबरू लागले.. मुंबईतल्या चांगल्या दवाखान्यात आज्याला तपासायला नेलं.. डॉक्टरन फुल बॉडी चेक अप करायचा सल्ला दिला.. रक्त लघवी तपासासाठी सॅम्पल आणायला सांगितल.. पाहुण्यानं म्हातारा म्हातारीला त्यांच्या भाषेत समजावल..”

    “मामी, डॉक्टरांनी सगळ्या बॉडीचा इलाज करायला सांगितलाय.. रक्ताचा लघवीचा तपास करणार आहेत..”

    आज्जीनं डॉक्टरांकडे डोळे मोठे करून पाहिलं अन् म्हणाली , “ही तपासणार हायत..?”

    “होय.” डॉक्टरांनी हसून मान डोलावली.

    “सवता ऽ.””

    “होय होय.. पाहुणा बोलू लागला. लय मोठे डॉक्टर आहेत ते.. उद्याच्याला बोलावलंय.. बर का मामा उद्या यायचं परत..”

    डॉक्टरांनी हसत हसत तिघांना निरोप दिला.. दुसऱ्या दिवशी म्हातारा म्हातारी दवाखान्यात गेले.. आज्जीने सोबत एक पिशवी घेतली.. दोघेही दवाखान्यात पोचले. डॉक्टरांसमोर बसले.. आज्जीने आपल्या सोबतची पिशवी टेबलावर ठेवली अन् तीन ताळ्याचा डबा अन् एक बॉटल पिशवीतून काढली.

    काकवीच्या रंगाची बॉटल पाहून डॉक्टर आनंदला. बऱ्याच दिवसानं गावकडची अस्सल काकवी प्यायला मिळणार म्हणून तो बाटलीकडं पाहू लागला.

    डॉक्टरांनी हसूनच दोघांकडे पाहिलं अन् पाहुण्याला म्हणाला, “बघा जुनी माणसं ती जुनी माणसं.. आपल्या नवऱ्याचा तपास करणार म्हणून किती प्रेमाने माझ्यासाठी गावावरून काकवी आणली.. हातानं जेवण करून आणलंय.. शिऱ्याचा वास येतोय मामी.. डब्यात गावाकडचा सांजा आहे की काय.. तसा तो हसूनच त्यांच्याकडे पाहू लागला.”

    पाहुणा चकित होऊनच दोघांकडे पाहू लागला.. यांच्यासाठी एवढं करतोय खरं माझ्यासाठी काही आणलं नाही अन् डॉक्टर साठी काय काय आणलं असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.

    त्याने खोटं हसू चेहऱ्यावर आणलं अन् नुसतीच मान हलवली..

    दोघांचा मान ठेवण्यासाठी डॉक्टरने आज्जी काही बोलण्याआधीच टेबलावरची बाटली उचलली अन् झाकण उघडून सरळ तोंडाला लावली. आज्जीने तीन ताळ्याचा डबा उघडून डॉक्टरांसमोर ठेवला.. पाहुणा हडबडून उठला.. डॉक्टरनं काकवी समजून तोंडाला लावलेली बाटली फेकली अन् खुर्चीवरनं उडालाच..

    “छी छी छी छी छी.. अहो लघवी आहे ही..”

    “ही पिन तपासा..” आज्जींन डबा उघडत डॉक्टरांसमोर ठेवला..

    पाहुणा येडबाडला त्याला काय करायचं ते सुचेना..

    “मामी काय आहे ?”

    “लघवी तपासणार हुतत ना सायेब..?”

    “अहो म्हणून बाटली भरून आणलीसा..?”

    “हागलेलं पिन आणलंय ती पिन तपासा.. खरं म्हाताऱ्याला काय झालंय ती हुडकून काढा..”

    डॉक्टरचे डोळे पांढरे झाले. त्याला वाटलं मोठा डॉक्टर इलाज करणार म्हणून आज्जीने गावावरून काकवी आणली.. डब्यातून सांजा आणला.. खरं आज्याच्या काकवीने अन् सांजाच्या वासाने डॉक्टर गार झाला..

    अमृता खळखळून हसू लागली.. अमरही जोर जोरात हसू लागला.. हसून हसून अमृताच्या डोळ्यातून पाणी आलं.. अमृताला हसताना पाहून अमर खुश झाला.. बऱ्याच वेळाने दोघेही थांबले.. अमृता तरीही हसतच होती मग अमरच म्हणाला..

    “म्हटलं एखाद्या डॉक्टरच्या कानावर घालावं तेवढाच त्यांना अनुभव..”
 

    अमृता नुसतीच खळखळून हसू लागली. अमर पूर्ण शांत झाला अन् म्हणाला..

    “अमृता मला खरंच माहीत नव्हतं तुझा फोन येतोय ते. मी जागा होतो. जरा विचारात होतो. फोन सायलेंटवर होता. तुझा फोन येतोय हे खरंच माहीत नव्हतं मला. जेव्हा बघितलं तेव्हा लगेच तुला फोन केला. तू काय फोन उचलला नाहीस. मग नंतर मला झोप लागली..”

    अमर एका दमातच बोलून गेला..

    “सॉरी, प्लीज राग सोडून दे..”

    अमृता एकदम शांत झाली अन् म्हणाली, “डॉक्टरकी सोडली असंल डॉक्टरनं हाय ना..” तशी ती जोरजोरात हसू लागली.

    “आयुष्यात पुन्हा कधी शिरा खाल्ला नसंल.. काकवीची चव त्याच्या तोंडातनं काय गेली नसंल..” ती आणखीनच जोरात हसू लागली.. “आपली लघवी सुद्धा बघितली नसंल त्यानं जनमभर..” ती हसता हसता बोलतेय की बोलता बोलता हसतेय हेच अमरला कळत नव्हतं.. ती नुसती जोरजोरात हसत होती.. अमर शांत होऊन तिच्या बोलण्याचा, तिच्या हसण्याचा आनंद घेत होता..

    अमृता शांत झाली अन् म्हणाली, “ऐकू येईना वाटतं उकळलेला चा ऽ वतू काय कानात..” तसा अमर खुदकन हसला. अमृताही हसली..

    “सॉरी.”

    “पंचवीस वेळा.”

    “पन्नास फोन केले असतील मी.”

    “आता पन्नास वेळा.”

    “अगं ऽ..”

    “पन्नास वेळा सॉरी..”

    “बरं बाई.. सॉरी.. सॉरी.. सॉरी.. अमर हळूहळू एक दोनच्या क्रमवारीत सॉरी बोलू लागला. अमृता त्याची मजा घेऊ लागली..

    “आता तरी राग गेला का..?”

    “नाय.”

    “अजून.”

    “हां ऽ.”

    “आता काय करू म्हणजे राग जाईल..?”

    “पप्पी पायजे मला.”

    “ठीक आहे.. उम्हा ऽ.. ”

    अमृता लाजली.

    “अजून.”

    “उम्हाहा ऽ”

    “अजून.”

    “उम्हाहा ऽ उम्हाहा ऽ.. आता तरी खुश..”

    “पन्नास वेळा.”

    तसा तो पुन्हा “उम्हाहा ऽ उम्हाहा ऽ” असं करत एक दोनच्या क्रमवारीत तिला चुंबन देऊ लागला.

    “आता तरी मॅडमचं समाधान झालं का नाही..?”

    अमृता हसली. “ठीक आहे केलं माफ..”

   अमरने सुस्कारा सोडण्याचं नाटक केलं..
 

    “खूप खूप आभारी आहे तुमचा.”

    “पुढच्या वेळी लक्षात असू दे..”

    “तुमचा राग.. तुमचा हट्ट.. तुमचा रुसवा..”

    “माझा राग दिसतो प्रेम न्हाय दिसत.”

    “दिसतं ना.. मी कुठे नाही म्हणालो.. मागच्या वेळी पाहिलं तुमचं प्रेम किती वाढलंय ते..”

    “गप..” अमृता लाजत म्हणाली .

    “माझ्या नसान्नसा दुखत आहेत..”

    “घाणेरडा.. गप म्हटलं ना आता..” तशी अमृता भरपूर लाजली..

    “मानेच्या म्हणतोय मी..”

    “गप..”

    “किती चावावं.. किती ओरबडावं.. कीती त्या पप्प्या घ्याव्या.. ओठ दुखायला लागले..”

    “गप ना बावळट..”

    “का का.. आता का..? उघडा बसायची पंचायत रूमवर.. लव बाईट्स अशा अशा ठिकाणी.. आणि तू दिलेला..”

    “गप ना बावळट.. पागल.. कुत्रा.. गप.. गप.. गप म्हणत्यालं कळंत न्हाय तुला..”

    अमर हसू लागला.. ती लाजू लागली.. “आता काही बोललास तर बघ.. फोनच उचलणार न्हाय..”

    “बर बर ठीक आहे.. जाऊ दे सगळं आता.. मला सांग काय झालं इतका का फोन करत होतीस..?”

    “मला बोलायचं होतं थोडं.”

    “बोल ना.”

    “सिरीयस हाय.”

    “घरी कळालं काय..?”

    “आपल्याबद्दल न्हाय रे.”

    “मग..?”

    “एक ताई हाय माझी.”

    “कोण..?”

    “हाय एक आमच्या इथेच.. तुला नसंल माहित.. लहानपणापासूनच आमची चांगली मैत्री हाय.. तिच्याबद्दलच बोलायचं व्हतं..”

    “बरं बोल ऐकतोय मी.”

    अमृताने अनिकाबद्दल सर्व काही सांगितलं.. लग्न, साखरपुडा ऑफिसमधला छळ, डिप्रेशन अन् सेक्सची ईच्छा.. सर्व काही.. अमर तिचं बोलणं ऐकतच राहिला. तिच्याबद्दल ऐकताना अनिकेतचा चेहरा सतत त्याच्या नजरेसमोर येत होता..

    “असं हाय सगळं इस्कटलेलं.. काय करू आता बोल.. काय करता ईल.. ऐकालास न्हवं..?”

    “..”

    “अमऱ्या..?”

    “हा ऽ होय ऐकालोय.. एक विचारू..”

    “बोलकी.”

    “तिच्या काय अपेक्षा आहेत.?”

    “तसं काय बोलाय न्हाय ती.. तिला फकस्त सेक्स करायचा हाय..”

    “तसं नाही गं.”

    “मग.”

    “लग्नाच्या असतात त्या..”

    “आता कसल्या अपेक्षा..?”

    “असणारच की तरीपण.”

    “मला कळतंय तेवढं सांगते.. तिला बघ समजून घेणारा पायजे.. तिच्या भूतकाळाचा तिच्यावर लय परिणाम झालाय.. तिच्या चारित्र्यावर शंका घेणारं न्हाय तिच्यावर मनापासून प्रेम करणारं पायजे. एवढी अपेक्षा हाय बघ तिची..”

    “नक्की एवढीच हाय का..?”
 

    “आणि काय असणार..?”

    “नाही, तू विचार तिला.”

    “काय विचारायचं.. तिला लग्न नकोच.. नशिबावर सोडलंय तिनं.”

    “नशिबावर सोडलंय तर मग नशिबाने एक संधी आणलीय तिच्या आयुष्यात.”

    “काय कळाय न्हाय मला..?”

    “अमृता, अनिका जशी तुझी मैत्रीण आहे तसाच माझा एक मित्र आहे.. अनिकेत.. जसं तुझं तिच्याशी नातं आहे तसंच आमच्या दोघांच नातं आहे.. तुला पटणार नाही खरं तू सांगत असलेली एक्झॅक्ट सेम सिच्युएशन माझ्या मित्राची आहे..”

    “लग्न होईना..?”

    “होय.”

    “त्याचा पण साखरपुडा मोडलाय..?”

    “नाही त्याचं असं काहीच नाही.. सुरुवातच नाही कशाची. नुसतीच शोधा शोध अन् वाट्याला नकार .. तुझ्या मैत्रिणीची जी सेक्सची इच्छा आहे तीच इच्छा माझ्या मित्राची पण आहे.. त्याच्याच टेन्शनमध्ये होतो..”

    “मग जमलं की.. दोघांना भेटवूया..”

    “होय तेच म्हणायचंय मला.. म्हणून विचारतोय तिची आणखी काय अपेक्षा आहे काय.. वाटल्यास तू विचार.. वेळ घे..”

    “कशाला थांब कॉन्फरन्स वर घेते.”

    “नको तू वैयक्तिक विचार.”

    “आता काय विचारायचं.. डायरेक्ट भेटवूया.. त्यांना काय करायचं ते करू दे..”

    अमरने डोळे मिचकावले. “मला काय बोलायचंय तुला कळलेलं दिसत नाही.”

    “व्हय.. शुध्द भाषेत बोलालास न्हवं.. कसं कळणार.. आम्ही गौंढळ..”

    “तसं नाही बाई..” ‌अमर हसतच म्हणाला. ती ही गालातल्या गालात हसू लागली..

    “म्हंजी फकस्त सेक्ससाठी भेटवूया असं म्हणत न्हाय मी..”

    तशी ती हसू लागली अन् म्हणाली, “मंग कशाला..?”

    “बघ माझा मित्र चांगलाय. वाया गेलेला नाही. तुझी मैत्रीण चांगलीय. अफवेने तिचं आयुष्य खराब केलंय. पण दोघांच्याही आयुष्यात तोच प्रॉब्लेम आहे.. लग्न.. करू दे ना त्यांना लग्न.. करू दे नव्या आयुष्याची सुरुवात..”

    “खरं दीदी नाय म्हणत्या लग्नाला..”

    “तू विचारायच्या आधीच..?”

    “मी कवापासून तिला म्हणालोय, दिदे समदं इसर चांगला मुलगा घावल. खरं ती लग्नच न्हाय म्हणते.. ती म्हणते मला लय त्रास व्हायलाय. डोक्यात नुसता एकच आवाज घुमतोय. ते विसरायला तिने समदं करून बघितलं. आता फक्त सेक्स तेवढा राहिलाय.”

    “फक्त विसरण्यासाठी सेक्स..?”

    “काय माहित तिला वाटत असंल.”

    “सेक्सबद्दल असं काही वाटत नाही.”

    “मला पण आधी डाऊट होता खरं तसं काय न्हाय.. नॉर्मल हाय ती.. ती म्हणते ऑफिसमधल्या लोकांना मारल्याशिवाय चैन मिळणार न्हाय.. मी सुपारी घेतल्या त्या लोकांची..”

    अमर हसला अन् म्हणाला, “काय..?”

    “व्हय.”

    “तू मारणार..?”

    “मी काय बी करू शकत्या.. तुला बघायचं हाय काय.. मी तुला बी मारू शकत्या..” तशी ती गालातच हसली.

    “मला मारणार तू..?”

    “मला त्रास दिलास तर.”

    “अशी तर तू मला मारतेसच.. आधी हाताने मग तोंडाने..”

    “गप नालायक..” तसे ते दोघेही हसले.

    “आमचा मामा पोलीस हाय पुण्यातच. मामाला सांगेन त्यांच्याबद्दल आणि काय.”

    “अच्छा.. आपल्याबद्दल पण..?”

    “तू मला छळलंस तर सांगेन..”

    “बापरे घाबरायला पाहिजे मग तुला..?”

    “जसा की घाबरत न्हायसच मला.?”

    “व्हय तर बाई.. तुलाच फक्त घाबरतो मी.. आयुष्यात दुसरं आहे तरी कोण तुझ्याशिवाय.. तुलाच घाबरणार तुझ्यावरच प्रेम करणार..”

    “बास बास.. नको मस्का लावूस.”

    “ह्म्म ऽ..”

    “काय करायचं ठरव.”

    “ठरव काय.. बघ.. तू एकदा परत विचार तिला.. मी पण माझ्या मित्राला विचारतो.. त्यांना भेटायचं असेल तर भेटू दे.. न्हायतर दुसरा ऑप्शन आहेच..”

    “चालतंय मी विचारते.”

    “चालेल.”

    “बर.”

    “डार्लिंग.”

    “काय..?”

    तसा अमर हसला.
 

    “त्या दिवशीचं कमी पडलं काय..?”

    “ते तर भरून निघालं.. आजचं ? मी तुला पन्नास वेळा.. तू मला एकदा पण नाही..”

    “शिक्षा समज तुझी..” तसं तिने हसत फोन कट केला. अमर गालातच हसत राहिला..  

 
क्रमश:
 

अधुरी कहानी – भाग ०८

नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे देखील पहा :

एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम

बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना

चतकोर भाकरी

शिक्षा

    नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

Leave a Comment