अधुरी कहानी – भाग ०८
“अधुरी कहानी” ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या लग्न मानसिकतेवर आधारित आहे. मुलगा असो वा मुलगी किंवा कोणीही अविवाहित व्यक्ती त्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी ही एक व्यथा आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी संबंधित नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

“अधुरी कहानी – पार्टनरचा शोध”
“दिदे..”
“शुद्धित आलीस का..?”
“व्हय..” तशी ती हसली. “दिदे, मी काय म्हणते.. एक मुलगा हाय.. भेट मग..”
“तो तयार आहे.. पैसे मागतोय..?”
“न्हाय तसं न्हाय.. म्हंजी सेक्ससाठी न्हाय..”
“मग..?”
“म्हंजी असंच.. भेट एकदा.. बोला.. तुम्हांला काय वाटतं बघा.. एकमेकांना आवडला तर चांगलंच हाय ना.”
“नाही नाही.. मला आता परत तेच तेच नाही करायचं.. मी आधीच वैतागलीए..”
“असं करून कसं चालेल दिदे..?”
“बघ तुला राग आला तरी चालेल.. पण नाही.. तो कोण आहे तो तयार आहे का सेक्ससाठी..”
“..”
“असेल तर बघ.. पैसे मागतोय का..? असेल तर सांग.. पण विश्वासातला हवा..”
“दिदे.”
“नाही अमृता.. मला लग्नाबद्दल आता काहीच ऐकायचं नाही, बोलायचं नाही. मी विसरण्याचा प्रयत्न करतेय.. वाटेल ते करावं लागलं तरी चालेल आता.. पण लग्न नाही..”
“..”
अमृता शांतच राहिली.
अनिकाने क्षणभर डोळे मिटले अन् म्हणाली, “अमृता सॉरी.. मला तुला दुखवायचं नाहीये पण कसं सांगू तुला..” तसं तिने ओठ चुचकारले..
“काय नको सांगू दिदे.. चालेल..”
“अमृता प्लीज तू नको रागवूस..”
“न्हाय मी न्हाय रागवले.. मला माहितीये तुझ्या मनाची काय अवस्था हाय ते.. चालेल.. मी विचारते तसं त्याला.. ठिऊ दिदे..?”
“हम्म ऽ..”
अमृताने निराशेनेच मोबाईल बेडवर टाकला तिची नजर घरभर फिरली. पसारा बघून तिलाच स्वतःचा खूप राग आला. तिने घड्याळाकडे पाहिलं अन् पसारा आवरायला घेतला..
आज्जीला औषध पाणी देऊन अनिकेत माळावर येऊन बसला. बराच वेळ प्रयत्न केल्यावर अमरचा फोन लागला.
“जेवलास..?”
“होय भावा.. तू..? आईला काय झालं अचानक..?”
“काय माहित.. ताप आला म्हणून चव्हाणाकडनं आणली.”
“आता बरंय..?”
“झोपल्या. बोल की काय म्हणाल्तास..?”
“एक मुलगी आहे..”
“नको आमऱ्या ही लडथड..”
“त्यासाठी नाही बोलत मी.. लग्नासाठी म्हणून..”
“लग्नासाठी पण नको.”
“नको.. लग्नासाठी पण नको..” अमर आश्चर्यचकित होत म्हणाला, “समोरून एक मुलगी चालून येतेय अन् तू आता नको म्हणतोयस.”
“एक लास्ट चान्स म्हणून विचार कर.”
अनिकेतनं निराशेनेच विचारलं, “कोण आहे..?”
“आहे एक.. भेटा अन् ठरवा..”
अनिकेत काहीच म्हणाला नाही.
“चालेल..?”
“बर.” तो शांततेनेच म्हणाला.
“चालेल.. बघतो मी तुमच्या भेटीच कुठे घडवायची ते.”
“कुठली हाय पुरगी..?”
“पुणे.”
पुण्याचं नाव ऐकताच अनिकेतने विषण्णपणे मान हलवली..
“चांगल्या घरातली आहे..?”
अमर हसला अन् म्हणाला, “तुला काय वाटतं.. मी तुझ्यासाठी कसली मुलगी शोधलीए..?”
“सांग की.”
“कसली असणार भावा..?”
“चांगल्या घरातली म्हंजी शिकलेली असणार.. त्यात पुण्यातली म्हटल्यावर नोकरीला असणार.. नोकरी म्हटल्यावर चांगला पगार असणार.. चांगला पगार म्हंजी लय शिकलेली असणार.. म्हंजी पुन्हा तेच.. मुलगा किती कमावतो.. घरदार.. जमीन जुमला.. सरकारी नोकरी.. भाऊ हाय का.. वेगळा राहील का.. नको आमऱ्या.. न्हाय म्हण तू..” अनिकेत एका दमातच बोलून गेला.. अमर त्याचं बोलणं गालात हसतच ऐकू लागला.
“भावा.. आता पटलं तुझं.. तुझा अनुभव आता लक्षात आला.. फक्त पुण्यावरून एवढ सगळं ओळखलं..?”
“आणि ऐकायचा हाय तर मग ऐक..”
अमर सुन्न झाला. “भावा”
“खरय न्हवं..?”
“..”
“आमऱ्या काय ऐकशील माझं.. बघ एक वेळ मी भेटाय हो म्हणीन.. खरं पुढं काय व्हणार मला माहित हाय.. माझ्या नोकरीवर, पगारावर, घरावर, माझ्या दिसण्यावर प्रश्न उठणार.. मला पुन्हा निराशाला सामोरं जावं लागणार.. त्यापेक्षा नकोच.. मी लय पुढं आलोय आता.. समदं नशिबावर सोडलंय..”
अमर शांतपणे त्याच ऐकून घेत होता. तो शांत झाल्यावर तो म्हणाला, “एक विचारू भावा..?”
“हां ऽ..”
“जर समज एखादी लग्न मोडलेली मुलगी असेल तर तुझं काय मत आहे तिच्याबद्दल..?”
“माझं काय असणार.. बघ.. कुणाचं तरी भांडं फुटलं असणार जुनं लफडं बाहेर आलं असणार त्यामुळे लग्न मोडलं..”
“अन् पोरीची चूक नसेल तर..”
“पोराची असणार.. पोरीनं लग्न मोडलं असणार.. लग्न मोडलेली म्हंजी काय तरी भानगड व्हती.. म्हणून लग्न व्हत नसणार..”
“म्हंजी पोरीची चूक नसू शकते असं मानतोस तू..?”
“बघ मला माहित न्हाय.. मी कोणाला ओळखत न्हाय.. कोणाबद्दल डायरेक्ट बोलणार न्हाय.. खरं टाळी एका हाताने वाजत नाय..”
अमरने समजुतीने मान हलवली अन् अनिकेतच्या बोलण्यातलं तथ्य त्याला कळालं.. “अशा परिस्थितीत तू काय करशील..?”
“आपण जर-तर वर चर्चाच करत न्हाय.. आधीच माझ्या मागं काय कमी व्याप नाय..”
“तरीपण एक उत्तर म्हणून तर सांग..”
“मला न्हाय माहित.”
“सांग की.. माझ्यासाठी म्हणून उत्तर दे..”
“बघ आमऱ्या.. मी अंथरून पाहून पाय पसरणार.. माझं लगीन होत नसलं तरी पण मी माझ्या ऐपती परमानं पुरगी बघणार..”
“ऐपतीचं नाही चारित्र्याच सांग.. तू त्या मुलीबद्दल काय विचार करशील..?”
अनिकेत क्षणभर विचारात पडला अन् म्हणाला, “आमऱ्या बघ चारित्र्यावर कोणाच्या बोलू नये.. खरं खोटं माहित असल्या बिगर.. चारित्र्यावर उठवलेला संशय माणसाला मारून टाकतो.. तू विचारालास म्हणून बोलतो.. बघ.. आता लग्न अरेंज मॅरेज जरी हुईत असलं तरी ती लव मॅरेजच असतंय.. पोरं पोरी घरातल्यांना सांगून ती अरेंज करत्यात..”
“गावासारखं शहरातल्या भागात लय जातीपाती बघित न्हायत.. खरं लव्ह मॅरेज हाय म्हटल्यावर मनात शंका तर कोणाच्या पण येणारच.. ईतकी वर्ष एकत्र म्हटल्यावर ते साहजिक हाय.. अन् मर्जीने लग्न करायचं हाय म्हटल्यावर तसलं काय झालं तरी त्यास्नी वाईट वाटत न्हाय.. असल्या गोष्टीचा त्रास लग्न मोडल्यावर होतो.. तेव्हा आपली चूक कळती..”
“म्हणजे तुझ्या मनात पण संशय येईल अशा मुलीबद्दल..?”
“साजिक हाय..”
अमर शांतच झाला. त्याला उत्तर अनपेक्षित होतं. पण तो बोलत असलेल्या गोष्टी सुद्धा तितक्याच पटत होत्या. तो शांतच राहिला.
“पोरीचं लगीन मोडलंय काय..?”
“..”
“अमऱ्या.”
“नाही तसं नाही.. लग्न मोडलेला विषय निघाला म्हणून.. बाकी काही नाही..”
“बर.. तुला न्हाय म्हणणार न्हाय मी.. तू माझ्यासाठी करालास.. न्हायतर कोण एवढ विचारत बसत न्हाय मला.. खरं माझा अनुभव मी सांगितला तुला..”
“खरंय भावा तुझं.. करतो मी तुला फोन..”
“चालतंय.. गुड नाईट..”
अमर गालातच हसला.
“गुड नाईट.”
“स्वीट ड्रीम्स.”
अमरला हसू आवरलं नाही.
“हे काय..?”
“पोरगी न्हाय भावाला तर स्वीट ड्रीम्स म्हणू शकतो का न्हाय..?” अनिकेतही हसू लागला.
“स्वीट ड्रीम्स भावा.. स्वीट ड्रीम..”
“चालतंय ठीऊ..?”
“हा चल बाय..” अमरने हसतच फोन कट केला अन् अनिकेतच्या विचारांवर गंभीर होऊ लागला..
अमरने कानात हेडफोन घातले अन् अमृताला फोन लावला खरं तिने फोन कट केला. त्याने हसतच मान डोलावली अन् म्हणाला, “हे चांगलंय मी कट केला असता तर दगडाने हाणलं असतं मला आता..” त्याने तशीच मान हलवली अन् समोरच्या भैय्याला आणखी एका फालूद्याची ऑर्डर दिली..
फालुद्याने भरलेला दुसरा ग्लास अमृताने हसत हसत हातात घेतला.. आपल्या मैत्रिणींचे किस्से मनमोकळ्या पणाने तिच्या आईला ती सांगत होती.. तिची आई तिचं निरीक्षण करत करत तिचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यात सामावून घेत होती. फालुदा संपवून त्या दोघेही पुन्हा घराच्या वाटेने चालू लागल्या..
“फालुदा खाताना वाजली नाही तुला थंडी..?” तिची आई हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली.
“व्हय की गं.. खाताना काय वाटलं न्हाय..” तशी ती हसू लागली..
“मम्मे एक विचारू काय..?”
“विचारा.”
“तुमच्या दवाखान्यात कसलं कसलं पेशंट येत्यात..?”
“तुला कसले पेशंट हवेत..?”
“म्हंजी असं कोण येतंय का ज्याचं लगीन होत न्हाय म्हणून लय वैतागलंय.”
“असतात बरेच.. अन् आता कॉमन झालंय.. हल्लीच्या मुला मुलींना होतात असले त्रास..”
“काय उपाय असत्यात मग..?”
“डिपेंड करतं कोण आहे. वय काय आहे.. कोणत्या स्टेजला आहे.. गोळ्या देऊन त्रास कमी होतोय का पाहतात.. थेरपी सेशन्स होतात.. बऱ्याच गोष्टी असतात..”
“नेमकं कशामुळं त्यांना त्रास होतोय..?”
“होतो आता त्रास.. काय म्हनणार.. भावना असतात प्रत्येकाच्या.. त्यांना कोणत्या तरी घटनेमुळे ठेच पोचली की मग मानसिक स्वास्थं बिघडतं.. असं काही सांगता येत नाही.. शेवटी मन आहे प्रत्येकाचं..”
“मग यावर सगळ्यात जालीम उपाय कोणता..?”
अमृताच्या आईने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं.
“मैत्रिणीसाठी.. लय टेन्शनमध्ये हाय म्हणून ईचारते..”
“माझ्याकडे घेऊन ये मग..”
“तरी काय तर असलंच की..?” अमृता शांत होत म्हणाली.
“जालीम असं सांगता येत नाही.. पण अशा लोकांना प्रेमाची गरज असते खूप.. विशेषतः ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय तो त्रास दूर करणारी व्यक्ती त्यांना हवी असते. त्यांचं प्रेम त्यांना हवं असतं.. प्रत्येक व्यक्तीनुसार या गोष्टी बदलत जातात.. असं नाही सांगता येत भूतकाळ जाणून घेतल्याशिवाय.. कोणता डॉक्टर असं काहीच बोलू शकत नाही..”
“आणि असं काय झालं न्हाय तर.. म्हंजी त्या व्यक्तीच्या आयुष्यात ती व्यक्ती आली न्हाय तर..?”
“जो त्रास आहे तो वाढत जातो.. चिडचिड होते.. माणसं नकोशी वाटतात.. इनडायरेक्टली ज्या गोष्टींचा त्रास आहे तेच आणखी करायला जातात त्या व्यक्ती..”
अमृता गंभीर झाली.
“कोण असेल तर तिला बोलवं वाटल्यास आपण बोलू तिच्याशी.”
“हा बघूया.. ते एवढं काय सिरीयस घेण्यासारखं काय न्हाय..”
“आपल्याला वाटतं तसं पण एखादी बारीक गोष्टच मन चिरत जाते. सुरुवातीला कळत नाही मग अचानक एके दिवशी स्फोट होतो. वाटल्यास माझा नंबर दे तिला मी बोलेन..”
“चालतंय.”
बोलत बोलत दोघीही घरापर्यंत पोहोचल्या.
“विभा ताई..” मागून अचानकच एका मुलीचा आवाज आला. दोघीही तिच्याकडे पाहू लागल्या.
“थोडं बोलायचं होतं तुमच्याशी.. मी प्रिया.. पाटील ताई आहेत ना..”
“हो हो.. आलं लक्षात.. पाटील ताई म्हणाल्या होत्या.. कधी आलात पुण्यावरून..”
“दुपारीच.. खरं तर तुमचीच वाट बघत होते.. काकू होत्या माझ्या सोबत.. पण मलाच जरा एकटीला बोलायचं होतं..” तशी ती अमृताकडे पाहू लागली.
“मम्मा मला जायचंय सकाळनं.. मी जाते पुढं.. तु ये निवांत..” तशी ती दोघांकडे पाहत म्हणाली अन् घराच्या दिशेने निघाली.
“विभा ताई खरं तर खूपच खाजगी गोष्ट आहे.. पण विश्वास ठेऊनच तुमच्याशी बोलायचंय..”
“बोला ना..”
जाता जाता त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज तिच्या कानांवर गेला. ती त्याकडे दुर्लक्ष करत घरात शिरली.
“एका पेशंटला गरज होती एका डॉक्टरची.”
“काय हुतंय..?”
“डोकं दुखतंय.. एखादं औषध मिळालं तर उपकार होतील.”
“उपकार कसले इलाज हाय आपल्याकडे..”
“बरं होईल केला तर.”
“एखादा चांगला धोंडा सकाळ-संध्याकाळ डोक्यावर दोन दोन टाईम हाणून घ्यायचा.. कायमचं बंद..”
“एवढा कठोर उपाय.. बापरे.. पेशंट जरा नाजूक आहे.. एखादा कोमल.. गोड.. मऊ मऊ उपाय सांगा की..
“गोड गोड पायजे.. पिवळा शिरा खावा मग..” तशी ती जोरजोरात हसायला लागली.. “चालेल काय..?” तिने हसतच विचारलं.. तो हसतच राहिला.. “कायमचंच बंद होतंय मग.. एखादं ड्रिंक सांगू काय..?” तशी ती आणखीनच जोरात हसली..
“नको राहू दे.. आमच्या हाताने डोस्क दाबून घेतो..”
“घ्या की लय जालीम हाय.”
“नको.. तुमचा उपाय तुमच्यापाशी ठेवा.. आमचं दुखणं आमच्यापाशी ठेवतो..”
तसे ते दोघेही हसू लागले.
“हम्म्म ऽ..”
ती गालातच हसू लागली.
“उम्म्हा ऽ..” तिने जोरात आवाज काढला.
“हालत बिघडायला लागली पेशंटची आता.. भास पण होतायत..”
“व्हय काय..? उम्म्हा ऽ..”
“आवाज पण ऐकू येतायत.”
“उम्म्हा ऽ..”
“पेशंटचं काय खरं नाय आता..”
“उम्म्हा ऽ उम्म्हा ऽ उम्म्हा ऽ..”
“वेड लागतंय वाटतं आता..” तसा तो गालातच हसू लागला.
“मला लय आठवण यालिया.”
“मला पण.”
“आय लव यू.”
“आय लव यु टू .. काय करत होती..?”
“मम्मी सोबत होते.. फालूदा खायला गेल्ते..”
“चांगलंय डॉक्टरने आईस्क्रीम खायचं अन् पेशंटला दगडं घालायची..”
तशी ती पुन्हा हसली अन् म्हणाली, “काय पायजे मग पेशंटला..?”
“अजून एक भास..”
“भास राहू दे.. खरोखरचं औषध देते.. “उम्म्हा ऽ उम्म्हा ऽ उम्म्हा ऽ..” तशी ती फोनवर त्याला चुंबन देऊ लागली..
“आता बरं वाटलं..?”
“हम्म ऽ.. काय मग दीदीला फोन केलेला.”
“व्हय.”
“काय बोलली मग ती..?”
“कसली..?”
“उगाच जीवाचं काय तर बरं वाईट नको करायला..”
“मला पण तेच वाटतंय.. तो म्हणतो मी कमी शिकलेला.. कमी पगार.. ती हुशार.. कमावणारी.. नाही जमणार..”
“एका अर्थाने बरोबरच हाय की.. कोणाला पण वाटणारंच.. नंतर जाऊन वेगळं होण्यापेक्षा जवळ न गेलेलंच बरं..”
“काय करायचं मग.. मला तर टेन्शन आलंय.. तुला सांगतो मला आता कळायचं बंद झालंय.. पोरीची बाजू ऐकली की तिचं बरोबर वाटतं.. पोराची बाजू ऐकली की त्याचं बरोबर वाटतं.. मी शिजतोय मधल्या मध्ये..”
“माझं पण असंच झालंय बघ.. खरं दीदीसाठी काय तर करावं लागणारच.. दिदी म्हणते की..”
“काय.?”
“सेक्ससाठी विचार म्हणून काय करायचं..”
“काय करणार.. काय बोलणार आपण तरी..”
“तुझा मित्र तयार होईल का..?”
“काय माहित प्रत्येक वेळी बोलताना त्याचा विचार बदललेला असतो.. दोघे किती समांतर आहेत.. त्या दोघांना याची कल्पना नाही.. त्यांचा विश्वास आपल्यावर.. तरीसुद्धा आपलं त्यांना पटत नाही..”
“व्हय.. अगदी खरंय..”
“करू दे त्यांना काय करायचं ते.. आपण तर किती डोक्याला त्रास देणार आपल्या..?”
“तेच की..”
“खरं तिला काहीच जाणून घ्यायचं नाही..?”
“न्हाय ती म्हणते माझा तुझ्यावर विश्वास हाय.. आणि मी तुझ्या भरोशावर हाय.. चांगला हाय नव्ह तो..?”
“मुलगा चांगला आहे.. लग्नामुळे टेन्शनमध्ये आहे.. शेवटी त्याला पण सेक्स करावा वाटणारंच की..”
“हम्म्म ऽ कळतंय मला बी.. आपलंच बघ ना..” तशी ती गालातच लाजली. अमरही लाजला.
“आपल्यालाच राहवत नाही एकमेकांशिवाय.. ही तर आपल्यापेक्षा मोठी.. कशी जगत असतील..?”
“त्रास तर होत असणार..”
“व्हय.. मम्मी म्हणाल्ती आमची.. ज्याला जो त्रास होतोय ना तो त्रास कमी करण्यासाठी तो कुणाला तरी शोधतोय अन् जर का न्हाय मिळाला तर त्या त्रासाच्या अधीन होत जातोय..”
“जरा तुझ्या भाषेत सांग ना बाळा..” तो मान हलवत म्हणाला.
“म्हंजी कसं हाय.. दीदीला त्या शब्दाचा लय त्रास होतोय.. ती म्हणत्या तिनं सगळं केलं खरं त्रास काय कमी हुईना अन् ती बरोबर तेच करायला लागल्या.. आता पुढे जाऊन ही वाढलं तर..”
“नाही तसं काही नाही होणार नको काळजी करू..”
“काय माहित बाबा.. तू तयार कर तुझ्या मित्राला.. करू दे ह्यांना सेक्स.. काय धुमाकूळ घालायचा हाय तो घालू दे.. पुढचं पुढे बघू..”
“मला पण तेच वाटतंय..”
“आता आपलं लग्न होत नाही म्हटल्यावर आपल्याला जे मिळेल ते स्वीकारायचं एवढं कसं कळत नाही यांना.. बरं असं पण नाही की कोणी वाईट आहे, काही चुकीच आहे.. चांगल असून यांचे नखरे..”
“आयुष्यभराचा सेक्स करायला मिळतोय ते बघायचं सोडून एका टायमापुरता ईचार करायला लागल्यात. नंतर काय करणार हायत.. एकदा केलं म्हंजी झालं काय.. एकदा केल्यानं भूक भागंल असं वाटतं यांना..” अमृता तावातावातच बोलून गेली..
अमर गालात हसला.
“काय हसायलास..?” अमृता हसत म्हणाली.
“मुद्याचं बोललीस..” तशी ती लाजलीच..
“खरं हाय का नाय.. आपलंच बघ की..” तसे दोघेही हसले.
“काय वेळ आलीया.. आम्ही लहान असून मोठ्यांना सांगावं लागतंय.. अन् ही मोठी असून त्यांचं कशात काय न्हाय.. अमर आपण नशीबवान म्हणायचो..”
“मी तर खूप नशीबवान..”
अमृता लाजू लागली.
“इतका की तुझं वर्णन करायला आता शब्द संपलेत माझ्याकडचे..”
ती लालेलाल झाली अन् म्हणाली,
“हम्म ऽ.. आणि काय..?”
“आणि काय सांगायचं तुला.. सुचायचं बंद झालंय आता.. आणि जेव्हा सुचायचं बंद होतं.. जे बोलायचं असतं ते सुध्दा बोलता येत नसतं तेव्हा..”
“तेव्हा भावना समजून घ्यायच्या असतात..” अमृताने त्याचं वाक्य पुर्ण केलं.
“तुझ्यासारख्या..”
तशी ती शांत झाली. फोन सुरूच राहिला. एकमेकांचा श्वास फोनच्या माध्यमातून एक होऊ लागला. वातावरणात गारवा वाढू लागला अन् एकमेकांना जवळ ओढून मिठित घ्यावं तसे दोघेही अंगावर ब्लँकेट ओढून शांतपणे झोपेच्या स्वाधीन झाले.
अधुरी कहानी – भाग ०९
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!