चतकोर भाकरी
ज्या आईने आपल्याला जन्म दिला, लहानपणापासून वाढवलं, आपलं हागमूत काढलं आज तिच आई म्हातारपणात लहान मुलासारखी वागू लागल्यावर आपल्याला तिची सेवा करण्यात कशाबद्दल घाण वाटावी..?
ज्या आईने मायेने दूध पाजलं त्या आईला म्हातारपणात “चतकोर भाकरी” ही न मिळावी..?
“चतकोर भाकरी – भुकेल्या आईची कथा”
आज बरोबर आठ दिवस झाले मला घरी येऊन. मागच्या बुधवारी एकाएकी रात्रीचं पोटात दुखायला लागलं अन् आता मरणारच मी असंच वाटू लागलं. मित्रांनी तातडीने जवळच्या इस्पितळात नेलं अन् उपचार सुरू झाले. मध्यरात्री पर्यंत कळ जरा कमी आली. अचानक काय झालं ते मलाही कळेना. असं एकाएकी आलेलं दुखणं मनाला चटका लावण्यासारखं होतं. कारण असं कधीच झालं नव्हतं. सतत बाहेरचं खाणं झाल्यामुळे असेल असा डॉक्टरांचा कयास होता. “आता बाहेरचं खाणं बंद करा आणि दोन चार दिवस जरा हलकंच जेवणं घ्या” असं त्यांनी बजावलं. मित्रांनी तर “तू आधी घरी जा आणि चांगलं चेकअप करून ठणठणीत बरा होऊनच पुण्याला ये” म्हणून दुसऱ्या दिवशीच मला घरी पाठवलं.
घरी आल्याबरोबर कुटूंबाने काळजी दाखवली पण जेवण सोडून बाहेरचं खाणं जास्त खातो म्हणूनच आजारी पडलास असं सुनावूनही दाखवलं. विशेषत: आईने. तिच्यापासून काय लपणार. मुलगा लांब जरी राहत असला तरी जेवला की नाही हे माझ्या आवाजावरूनच तिला कळत होत.
दुसऱ्या दिवशी घरी आल्याबरोबर वडिलांनी सोनोग्राफीतेन करूनच घेऊ म्हणून चांगल्या दवाखान्यात नेलं. तेही रिपोर्ट नॉर्मल आले. सर्व काही नॉर्मल असताना नेमकं एकाएकी कशामुळे पोटात दुखायला लागलं तेच मला कळेना. त्या दिवसभरात मी काय काय खाल्लं हे बसल्या बसल्या मी सारखं आठवण्याचा प्रयत्न करत होतो. पण विशेष काही खाल्याचं मला आठवत नव्हतं.
सकाळी फ्रेंड्स मधल्या तीन-चार वड्यांवर ताव मारला होता. मेसच्या डब्यात कोबीची भाजी अन् बिनाडाळीचं गार पाणी बघून भरलेला डबा तसाच पुन्हा हौदाजवळच्या गटारात रिकामा केला होता. नेहमीप्रमाणे अशोकवरच अंडाकरी अन् तीनच रोट्या खाल्या होत्या. संध्याकाळच्या सुमारास पण चहा-पोहे इतकंच अन् पुन्हा रात्री मेसवर जाऊन बिनाडाळीचं गरम पाणी अन् काळ्या वाटाण्याची भाजी इतकंच काय ते. नेमकं काय झालं अन् पोटात दुखायला लागलं हे मला काही कळेना. विचार करून करून डोकं आता ठणकत होतं. रिकामं घरी देखील बसू वाटत नव्हतं. बाहेर जावावं तर आईचे डोळे गरगर फिरत असल्याचे दिसत होते. तिला माहित होतं हा बाहेर गेला की पुन्हा काहीतरी अचरट खाणारचं. म्हणून तिने स्वत:ची शपथच मला खाऊ घातली होती. तिचं यावरूनच रागावणं असायचं की, “बाहेर हु ऽ म्हणून खायचं अन् घरी केलेलं काय मग टाकून द्यायचं.” तिच्या टाकून द्यायचं या वाक्याबरोबर ती असं काही माझ्याकडे बघायची की मला एकदम धस्स ऽ व्हायचं.
रोजरोज मेसचा डबा टाकून देतो हे चुकून आईला कळालं की काय, मला असंच वाटायचं. पण या गोष्टी तिला सांगणारं असं कोण तिच्या संपर्कात नव्हतं. मुळात मी दिवसभरात काय काय करतो हे देखील तिला माहित असणं शक्य नव्हतं. कोणाचचं माझ्यावर लक्ष्य नव्हतं. तरी देखील नकळत माझ्याही मनात हा विचार येऊनच जायचा की, “कदाचित अन्नाची नासाडी करतो म्हणून तर माझ्या पोटात दुखायला लागलं नाही ना ?” पण मी तसल्या सर्व शक्यता नाकारून माझ्या मनाला जे बरं वाटेल तेच स्वत:ला सांगत राहायचो.
बराच वेळ काही खाल्लं नाही म्हणून स्वैपाकघरात काही खायला दिसतंय का म्हणून गेलो अन् पाठीमागच्या आळीतून जोरजोरात कोणी तरी भांडत असल्याचा आवाज येऊ लागला. मी आधी खिडकीतूनच कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. बरांच वेळ ऐकल्यानंतर कोणी तरी माणूस ओरडून ओरडून काय काय बोलत होता. नेमकं कोणाला बोलत होता माहित नाही पण त्याच्या एकट्याचाच मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. ओरडणं कसलं. नुसत्या आईबहिणीवरून शिव्याच होत्या. काय चालंलय हे जवळ जाऊन पाहूया असं मन म्हणत होतं खरं आईचे भिरभिरणारे डोळे पायांना अडवत होते. मी खिडकीजवळ उभा राहूनच पलीकडील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
बऱ्याच वेळाने शिव्यांचा पाऊस ओसरला. एकदमच शांतता झाली. कदाचित आता मिटलं असेल म्हणून मी पुन्हा आमच्या सोप्यात यायला निघालो तोच काही तरी आदळण्याचा आवाज आला. मी जागीच थांबलो. खिडकीतून काही दिसतंय का ते पाहू लागलो.
आमच्या घराच्या पाठीमागच्या एका घरात हा सर्व प्रकार सुरू होता. यापूर्वी असं काही झाल्याचं मला आठवत नव्हतं. त्यामुळेच नक्की काय झालंय हे जाणून घ्यायला मी बेचैन होत होतो. आवाज आला म्हणून पाहिलं तर कोणीतरी जर्मनची ताटी रस्त्यावर फेकून दिली होती अन् त्या ताटीतलं दुधं रस्त्यावर सांडलं होतं. असं जेवणाचं ताट सरळ रस्त्यावर फेकून देण्याइतपत काय झालं असावं हे जाणण्याकरिता मी आणखीनच बेचैन होऊ लागलो. दार बंद करण्याचा आवाज आमच्या स्वैपाकघरापर्यंत आला. मी ते सर्व पाहत होतो.
माझी नजर एका सावलीवर खिळून होती. एक सावली. एक वृद्ध सावली. त्या वृद्ध स्त्रीची पाठमोरी बाजू मला दिसत होती. ती सोनाक्का होती. आमच्या पाठीमागच्या घरात राहणाऱ्या आबाची ती आई होती. आबानं असा रागराग करणं, जोरजोरात ओरडणं अन् शिव्या देऊन असं सोनाक्काला बाहेर काढण्याइतपत काय झालं असावं असे बरेच प्रश्न माझ्या मनात उभे होत होते.
मी काहीच नाही केलं. तसाच कायकाय होतय ते पाहत राहिलो. सोनाक्का बसल्या बसल्याच पुढे पुढे येत होती. तिचा सुरकुतलेला चेहरा तिची नव्वदी सांगत होता. आमच्या घरापासून त्या घरापर्यंत जाण्यासाठी एक बारीकशी पाऊल वाट होती. मोठमोठी दगडं अन् काट्याकुट्या टाकून ती वाट बंद करण्याचा प्रयत्न केला होता तरी ती काही बंद झाली नव्हती. मागच्या आळीत जाण्यासाठी बारकीसारकी पोरं हमखास तिथूनच जात होतीत. सोनाक्का हातात जर्मनची ताटी घेऊन कशीबशी रांगत रांगत मोठ्या दगडापाशी येऊन सावलीत बसली. रस्त्यावर सांडलेल्या दुधभाकरीच्या तुकड्यांवर तिची नजर खिळून राहिली होती.
मला काय करावं तेच कळेना. तिची लगेच जाऊन विचारपूस करावी तर ती वेळ योग्य नव्हती. ती ज्या घरात राहत होती ती माणसं माझ्या चांगली ओळखीची होती. पण आबानं दिलेली त्यांची ही आजची ओळख माझ्यासाठी नवी होती. त्यांना मी असं कधीच पाहिलं नव्हतं. ते ही सोनाक्काशी, त्यांच्या स्वत:च्या आईशी असं शिवराळ भाषेत बोलताना, रागवताना, ओरडताना.
सोनाक्का ज्या अर्थी सर्व ऐकून घेत होती किंवा गप्प होती त्यावरून तरी मला तिचीच चूक असावी असं एका अर्थी वाटत होत. पण तरीही तिच्यासाठी वाईट वाटत होतं. ती एकटक हातातल्या ताटाकडे टक लावून पाहत होती. वाळत चाललेलं दूध बोटावर घेण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या बोटाला काहीच लागत नव्हत.
मला एकदमच कसंतरी झालं. मी बुटीत काही आहे का ते पाहिलं. चतकोरच भाकरी होती. मी तीचे पटकन तुकडे केले अन् कोमट दूधात भाकरी कुसकरली. स्वैपाकघराचं दार लावून सरळ तिच्या दिशेने चालत गेलो.
मी तिच्या जवळ गेलो तरी तिला शुद्ध नव्हती. मी त्या घराच्या दिशेने कोणी नसल्याची चाहूल घेतली अन् पलीकडे गेलो. तिच्याजवळच बसलो. हातातलं ताट तिच्यासमोर धरलं.
ती क्षणात शुद्धीवर आली. तिच्या बुबूळांची वेगाने हालचाल झाली अन् हातानं वेग धरला. थरथरतेल्या हाताने ती एक एक घास खाऊ लागली. दुधाचे ओघळ तिच्या तोंडातून हनुवटीपर्यंत येत होते. ती तशीच हाताने पुन्हा ते तोंडात घालत होती. तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. समोर कोण आहे कोण नाही हे मुळी तिला जाणूनही घ्यायचं नव्हतं. तिच्या भुकेल्या देहाने संपूर्ण जोर त्या थरथरतेल्या हातांना दिलेला. जणू तिच्या पोटाची भूक तिच्याकडून सर्व काही करून घेत होती. अन्नासाठी होणारा तिचा थरकाप तिच्या भूकेची जाणीव करून देत होता.
मी फक्त पाहत होतो. मला काही सुचत नव्हतं. तिच्या हालचालींवरून ती किती दिवसांची उपाशी आहे याचा कयास लावण्यात माझं मन गुंतलं होतं.
तिने काही मिनिटांत सर्व फस्त केलं. तोंडावरचा ओघळ पुन्हा हाताने पुसून घेतला. बारकी पोरं आपला आवडीचा पदार्थ जसा बोटं चाटून पुसून खातात तशी ती थरथरत्या हाताने एक एक बोट ताटाला पुसून तोंडात घालत होती. मग एकाएकीच ती थांबली. जणू काही तिला कशाची तरी चाहूल लागली. घाबऱ्याघुबऱ्या नजरेने तिने माझ्याकडे पाहिलं अन् जा जा म्हणून मला इशारा करू लागली.
ती माझ्या गालाला हात लावून मला सतत तिथून जा म्हणून खुणवून सांगू लागली. मी पाणावलेल्या डोळ्यानेच तिथून वेगात आमच्या घरात आलो. दार लावून घेतलं. अन् खिडकीतून पाहू लागलो.
ती पुन्हा आधी बसली होती तशीच शुन्यात पाहत बसून राहिली. चंद्राक्का दार उघडून आली अन् मागच्या दारात झाडलोट करू लागली. तिची त्रासिक नजर अधून मधून सोनाक्कावर जात होती. ती बराच वेळ तिथ काय काय काम करत राहिली. मग मी तो विषय तात्पुरता सोडून दिला अन आमच्या सोप्यात येऊन बसलो.
बरेच प्रश्न मनात उभे राहिले होते. सोनाक्काचं असं काय चुकलं असावं म्हणून तिच्यावर इतका राग यावा अन् तिला असं उपाशी ठेवण्याइतपत असं झालं तरी काय असावं अन् त्याउपरही कालपरवापर्यंत साधीभोळी वाटणारी माणसं अशी राक्षसासमान का वागावीत हा सवाल स्वस्थ बसू देत नव्हता.
बाहेरून आई घरी येताच मी तिला सोनाक्काबद्दल विचारणा केली. गेल्या वर्षभरात तिची तब्येत फारच खालावली होती. अधूनमधून ती सतत आजारी पडत होती. डॉक्टरांनाही तिच्या आजाराच निदान काही मिळत नव्हतं. तिच्या सततच्या आजारपणाने चंद्राक्का अन् आबाही कंटाळले होते. वयोमानानुसार तब्येत साथ देत नसणार असंच बोलणं माणसांतून ऐकायला मिळत होतं.
तरी न राहवून मी आईला तो प्रश्न विचारलांच.
“खरं मम्मे, आपल्याच आईला आबा उपाशी का ठेवल आणि नको नको तसल्या शिव्या का दिल काय तर चुकलं असणारच की सोनाक्काच.?”
“चुकलंय की, त्या आब्याला जन्म देऊनच चुकलंय म्हातारीच. वाटलं नव्हतं असं असंल म्हणून. म्हातारं माणूस हाय म्हणून जरावाईच तरी समजून घ्यायचं.. माणूस म्हणायचां का हैवाण”
“मी काय विचारालोय ते आधी सांग की ?” मी आईला मध्येच अडवत म्हणालो.
“काय सांगू तुला आता ?”
“जी झालंय ती सांग उगाच लांबड लावू नगस. तिला उपाशी का ठेवत्यात ते सांग ?”
“आता काय सांगायच तुला.. माणूस म्हातारं झाल्यावर असंच हाल असत्यात बाबा.. प्वॉट बिघडलं म्हणून पाताळातच म्हातारीन हागून ठेवलं. ठेवलं ती ठेवलं, हागलेल्या पाताळातनं सगळ्या घरभर फिरली. कमी म्हणून की काय त्यात म्हातारीन त्या हुबलाकाच्या इजारीनंच पुसून घ्यावी का समदी घाण.. त्यो माणूस आलां कुठनं हुंदडून.. इवून बघतो तर काय, सगळ्या घरात म्हातारीन हागून ठेवलंय.. मग काय बाबा, बदड बदड बदडली की म्हातारीला.”
“एवढ्यावरनं तीच ही हाल होय.”
“व्हय तर. तवापासनं बग खायालाच दित न्हाईत तिला.”
“का ?”
“असंच की.. खाल्लं की सगळ्या घरात हागून ठिवतीया बया.”
“मग तिला संडासात का बसवत नाय ?”
“कोण काढणार तिचं हागमूत. कुणाला टाइम हाय तिथं. ह्यो आमदारलवड्याचा पडला नाय का. मारली किक की गेला डुगडुग करत.. अन् ती चिचुंद्र्या तोंडाची टवळी, तिला नको का टाइम चांभारचौकश्यातनं. दिसत्यात तशी नाय बाबा. म्हणायला तेवढी सुशिक्षित हायत. खर किती आतल्या गाठीची हायत तुला न्हाय म्हाईत.”
“मग तिला खायला कोण देतय ?”
“कोण देणार. मी कवा कवा तर अधनंमधनं दित हुतो खरं त्यासनी नाय पटत. शिव्या घालत्यात घाणघाण.”
“तुला कोण काय बोललं काय ?”
“मला कशाला कोण बोलाय येतंय. त्यांच्या माघारीच दित हुतो तिला खायला. खरं तरीबी शिव्या घालत्या ती चिचुंद्री दारात उभी राहून. अन् आता तर तिथं जायचां सवालच ईत न्हाय. त्या भाड्यानं वाटंच बंद केल्या.”
क्षणभर मी शांतच राहिलो.
“तू का मधीच तिच्याबद्दल विचारायला लागलास ?”
“काय नाय आवाज याल्ता मागनं म्हणून बघत होतो. सोनाक्का दिसली दगडाच्या आडोशाला बसलेली.”
“तू काय जाऊ नको तिथं. त्यो बाबा नाय शाणा. उगं काय तरी पाट् दिशी म्हणल. उगं भांडणाला कार नको.”
“मी आलो कवाच जाऊन.” मी चोरट्या नजरेनेच म्हणालो.
“कवा ?”
“मगाशीच”
“का गेल्तास ?”
“सोनाक्का बसल्याली रडत. आबानं ताट दिल्त फेकून रस्त्यावर. दूध भाकरी कुसकरली अन् गपचिप आलो दिवून.”
आई शांत नजरेनेच पाहू लागली अन् म्हणाली,
“आता दिलंस तेवढं बास झालं परत काय जाऊ नको. ती माणसं न्हाईत श्याणी. वाट्टंल तसं बोलत्यात. तुझ्या बापाला ती काय खपायचं न्हाय. उगं भांडणाला त्वांड नको फुटाय.”
“असू दे. चतकोर भाकरीन काय हुईत नाय. त्यासनी जड असंल तर आम्ही घालतो म्हणाव खायला. बगू काय करत्यात.”
“ए बाबा.. ऐेक जरा सांगत्यालं.”
“असू दे.”
“आत्ता ऽ“
“तिच्या जागी तुझी आय असती तर ?”
“आरं कळतंय की मला. मी पिण दित हुतो की खायाला. खरं म्हातारी आल्या आता घाईला. जरा वाईच काय खाल्लं कि पाताळ घाण करत्या. मारत्यात रं तिला लय. नाय ऐकू वाटंत त्या शिव्या.”
“असं का करत्यात खरं. मधनंच काय झालं त्यासनी असं वागाय ?”
“भागलं ना आता समदं. आयबापाकडनं मिळालं समदं. आता काय उपयोग हाय त्यांचा. असंच असतंय बाळा, म्हातारपण लय वाईट.”
मी शांत बसूनच शून्यात पाहत राहिलो. आई आतल्या खोलीत केव्हा उठून गेली मला कळालं सुध्दा नाही. कालपरवापर्यंत सोनाक्का चांगली हसत खेळत असायची. मी कधी सुट्टीला घरी आलो की मुकं घेऊन घेऊन माझी चौकशी करायची. रानातनं आणलेलं एखाद दुसरं कणीस मला खाऊ घालायची. “पोरा लगिन तेवढं कर बाबा आता” म्हणून सारखी माझ्या मागे लागायची. मला फार बरं वाटायचं. ती परकी असल्याची भावना मला कधी शिवली नव्हती. खरं असं अचानक तिच्या वाटेला आलेल्या दु:खानं मी तर येडबडून गेलो होतो. तिला अश्या अवस्थेत पाहून माझं मला कळायचं बंद झालं होतं. आबाच्या शिव्या अजून कानात घुमत होत्या. त्यानं फेकलेलं ताट अजून डोळ्यासमोर गोलगोल फिरताना दिसत होतं. सोनाक्काचा भुकेला चेहरा माझ्या काळजाला रडवत होता.
मला हे खरं तर बघवत नव्हतं. जाऊन आबाला दोन खडे बोल सुनवावे असंच वाटत होतं. पण आबाचं वय आड येत होतं. लहानतोंडी मोठा घास घेण्याचं धाडस होत नव्हतं. मी आमच्या घरच्यांना आबाला जाऊन समजवा म्हणून सतत सांगत होतो. खरं त्यांच एकच म्हणणं होतं, “आम्ही बाबा सांगून सांगून दमलो, त्यो काय ऐकणाऱ्यातला माणूस न्हाय. आता म्हातारीचं नशीबच फाटकं म्हणायचं.”
मला हे अजिबात पटत नव्हतं. पण बाकीच्या लोकांचं पण बरोबरच होतं. ज्याने त्याने गोडीगुलाबीने आपआपल्या परिने आबाला समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्यात काही सुधारणा होत नव्हती. मी नको ते धाडस न करण्याचा आमच्या घरच्यांचा दबाव होता. अन् तसंही मीही काहीच करू शकत नव्हतो.
अधून मधून मी आमच्या पाठीमागच्या दारात जाऊन सोनाक्का दिसते का ते पाहत होतो. ती तिथेच दगडाच्या आडोश्याला बसलेली असायची. मी दिसलो की मला कळवळलेल्या चेहऱ्यानेच बोलवायची. पाची बोटं तोंडाजवळ घेऊन “मला भूक लागल्या” म्हणून खुणवायची. तिची ती अवस्था बघून मन व्याकूळ व्हायचं.
कोणी नाही ते बघून मी अधून मधून सोनाक्काला दूध भाकरी देत होतो. दोन-पाच मिनिटं तिच्या जवळ बसत होतो. पण तिच्यासोबत मन भरून बोलणंच होत नव्हतं. जरा कोणाची चाहूल लागली कि ती जा जा म्हणून मला पाठवून द्यायची. घाबरलेल्या त्या स्थितित तिची वाचा सुद्धा निघायची नाही. हातपाय भितीने थरथरू लागायचे. तिची ती अवस्था पाहण्यासारखी नसायची.
म्हातारपणातल्या शरीराने तिची साथ देणं सोडून दिलं होतं. अंगावर मांस म्हणून काही राहिलं नव्हतं की कुठल्या अवयवात त्राण राहिला नव्हता. हातपाय नुसते थरथरत होते. डोळ्यांची बुबूळं नुसती खोलखोल जात होतीत. मधूनच येणारी पोटातली कळ तिचं पाताळ पिवळभडक करत होती. तिच्या आजारावर औषधपाण्याचा गुणंही येत नव्हता. जिथं तिचं मनच मेलेलं तिथं तिच्या शरीरावर तरी कशाचा उपाय होणार होता.
कित्येक दिवस कोणाच्यातच कोणताच बदल होत नव्हता. सोनाक्कांच शरीर साथ देत नव्हतं की आबाच्या शिव्या कमी होत नव्हत्या. जे चालंलय तसंच चालत होतं.
सोनाक्काला पाहिल्यापासून माझ्या पोटातली कळ छातीत येऊन बसली होती. त्या दिवसापासून मला अन्नाची खरी किंमत जाणवली होती. एका अदृश्य शक्तीने दिलेला इशारा माझ्या चांगलाच जिव्हारी बसला होता. आता माझ्या पोटाचं दुखणं बंद झालं होतं. अन् माझे सर्व रिपोर्टही नॉर्मल आले होते. आता आजारपणासाठी थांबून चालणार नव्हतं. नोकरीधंद्याच्या माणसाला आजारपण मिरवून चालत नसतं. जास्तीत जास्त आठ दिवसच मला गावी राहता आलं होतं.
उद्या सकाळी माझी पुण्यासाठी बस होती. खरं मला जाऊ वाटत नव्हतं. आपण गेलो की सोनाक्काच काय अशी सारखी चुणचूण लागत होती. मी कळवळून आईकडं पाहिलं, तिनं नजरेनंच “दिन मी तिला अधनमधनं खायाला” म्हणून उत्तर दिलं होतं.
शरीर पुण्याला पोहोचलं होतं पण मन सोनाक्का जवळच घुटमळत होतं. इथं आल्यापासून आईजवळ सतत तिची चौकशी करत होतो. फक्त एकदाच मला ऐकायचं होतं की सोनाक्का आता बरीय म्हणून. खरं दरवेळी तिच्या खालावलेल्या तब्येतीची बातमीच कानी पडत होती.
पुढच्या चार दिवसातच आईने ती गेल्याची बातमी कळवली. ऐकून मन कळवळलं. पण एकाअर्थी तिची सुटका झाली म्हणून बरंही वाटलं. नंतर एके दिवशी न राहवून आई बोलून गेली, “मातीदिशी कावळ्यानं काय घास शिवला नाय बाबा, तात्याची गय आणली अन् तिनं चतकोर भाकरी तेवढी खाल्ली.”
समाप्त
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हांला फॉलो करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!