परफेक्ट पार्टनर – भाग १
अंतर्मना इतका उत्तम जोडीदार कोणी नाही.. आपलं मनच आपल्यासाठी “परफेक्ट पार्टनर” आहे.. आयुष्याच्या या मॅचमध्ये मनाइतका उत्तम जोडीदार कोणी नाही.. माणसाने मनाचंच ऐकावं.. मन म्हणेल तेच करावं..
“परफेक्ट पार्टनर”
वारा चांगलाच सुटला होता. सोबत थंडावाही होताच. पण मुंबईच्या त्या दमट वातावरणात इतकासा तो जाणवत नव्हता. लाटांचा आवाज मनाला आल्हाददायक वाटत होता. पण मरीन ड्राईव्हच्या रहदारीने तो आवाज कमी अन् गोंगाटच जास्त वाटत होता. समुद्राच्या लाटा जरी उसळ्या मारत असल्या, तरी विणूच्या मनातील विचार संथपणे वाहत होते. समुद्राच्या खोल गर्भात बुडत जाणाऱ्या मनाला तो डबडबलेल्या डोळ्यांनी पाहत होता. डोळ्यातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबाबरोबर तिची आठवण छातीत वेदनेची कळ देऊन जात होती.
मानसीला जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं होत. गेल्या वर्षभरातल्या घडामोडींनी त्याच मन पूर्णतः कोमेजून गेल होत. वेळ अशी झटक्यात बदलेल याची त्याला कल्पना नव्हती. योग्य वेळी लग्न करू म्हणता म्हणता, चांगली वेळ अशी वाईट काळ घेऊन येईल याची त्याला जाणीव नव्हती. त्याही परिस्थितीत दोघांनी लग्न केलं. पण मानसीच्या आजारामुळे त्यांचं लग्न वर्षभरही टिकलं नाही. याची जाणीव दोघांनाही होतीच. मानसीने विरोध केलाही. पण विणू त्याच्या खऱ्या प्रेमाला साजेसा वागला. मानसीसाठी तिचा शेवटचा काळ सुखाचा ठरला.
नकळत कोणीतरी येऊन आश्चर्याचा धक्का द्यावा तसा कॅन्सरचा रोग मानसीला जडला. विणूच्या प्रेमाने, मानसीच्या इच्छाशक्तीने त्याला शह देण्याचा प्रयत्न केला. पण चकवेगिरीत पटाईत असणाऱ्या त्या रोगाने बरोबर डाव साधला.
पुढच्या दोन महिन्यातच मानसीने जगाचा निरोप घेतला. एखादं टवटवीत रोपट पाण्याच्या अभावाने सुकून कोमेजून जावं तसं विणूच मन पूर्ण कोमेजून गेल होतं.
मानसीला जाऊन आज एक वर्ष झालंही. वेळ कशी निघून गेली त्याला कळालही नाही.
सात जन्म एकत्र राहण्याच खोट वचन देऊन मानसीन त्याची फसगत केली होती. नियतीने त्याला आयुष्याचा आरसा दाखवला होता. पण या सर्व गोष्टीसाठी तो तयार नव्हता. आयुष्यात आता काय करायचं, नवी सुरुवात कुठून करायची अश्या कुठल्याच विवंचनेत त्याच मन गुंतल नव्हतं. जणू काही त्याच्या मनाने संथपणे वाहण्याचाच निर्णय घेतला होता.
घरातून दुसरं लग्न करण्याचा सल्ला होताच. मानसीच्या घरातल्यांनीही त्याबाबतीत त्याची समजूत घातली होती. पण मानसीनंतर दुसरं कोणी त्याच्या मनात राहू शकत नव्हतं. त्याच्या मनानेही तसा कधी प्रयत्न केला नव्हता.
आयुष्यात आता जास्त काही न करता जे चाललंय तेच चालत राहू दे असाच विचार त्याने करुन ठेवला होता. आपण ठरवल्याप्रमाणे आयुष्य चालत नसत याची त्याला चांगलीच जाणीव होती. म्हणूनच की काय सर्व दैवाच्या हातात देऊन तो एक एक दिवस पुढे ढकलत होता.
एव्हाना बराच उशीर झाला होता. आईला आठपर्यंत घरी येतो म्हणून त्याने सांगितलं होतं. पण फूड डिलिव्हरीची शेवटची ऑर्डर पोहोचवून त्याच्या बाईकने मरीन ड्राइव्हचा रस्ता धरला होता. मानसीच्या आठवणीत वेळेच भान त्याला राहिलं नव्हतं.
दोघांनीही आयुष्यभराची स्वप्न रंगवताना इथे घालवलेला वेळ त्याच्या नजरेसमोर उभा होता. वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेसोबत मानसीची आठवण मनाला हळवी करुन जात होती. लाटांच्या आवाजात त्याच्या मनाचा उद्रेक एकरूप होत होता.
कसलीही चाहूल न लागता ती अलगद त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याच्या डबडबलेल्या डोळ्यांत तिने स्वतःला पाहिलं. नकळत तिचेही डोळे पाणावले. त्याच्या हातात हात देऊन तिने तिची मान त्याच्या खांद्यावर ठेवली.
स्वतःचही भान हरवलेल्या विणूच्या डोळ्यातून अश्रू समुद्राच्या गर्भात जाण्यासाठी त्याच्या गालावरुन ओघळू लागले.
ती सावरली. तिने स्वतःला त्याच्यापासून विलग केलं. हलकेसे त्याच्या खांद्याला धरत तिने त्याला आवाज दिला,
“विणू..”
तो शांत होता. एकटक समुद्राकडे पाहतच होता.
तिने पुन्हा त्याचा हात हातात घेत त्याला आवाज दिला.
“विणू.. कुठे हरवलास..? मी आलीय..”
भानावर येत मितालीला असं अचानक आलेलं पाहून तो एकदमच दचकला. ती शांत नजरेने त्याच्या डोळ्यात पाहत होती. त्यांची नजरानजर होताच त्याचा आसवांचा बांध तुटला अन् त्याला रडू कोसळल. तिच्या गळ्यात पडून त्याने आपल्या डोळ्यातला समुद्र रीता केला.
मितालीने त्याला धीर दिला. काही वेळाने तो शांत झाला. असं लहान मुलासारख स्वतःला रडताना पाहून त्याचं त्यालाच कसं तरी वाटू लागलं. स्वतःला सावरत तो म्हणाला,
“तू केव्हा आलीस.. आणि इथे कशी काय..?”
“केव्हाच आलेय मी. तुला आवाज दिलाही. पण तू भान हरवून बसला होतास. मी मग डिस्टर्ब नाही केलं तुला.” ती शांत नजरेने म्हणाली.
तो नुसताच नजर चुकवत खाली पाहू लागला.
“दिल्ली वरून कधी आलीस..?”
“दुपारीच.. केव्हाची तुझी वाट पाहत होते घरी.. काकी म्हणत होत्या लवकर येइल म्हणून.. पण मला वाटतच होत तू आज इथेच येशील.. म्हणून मग मीच आले इथे.. वर्ष झालं ना आज..?” ती जरा हलक्या आवाजातच बोलू लागली.
“ह्म्म ऽ” त्याने नुसताच हुंकार दिला.
“सॉरी विणू..”
“का..?” तो प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागला.
“मी आधीच भेटायला हवं होत तुला.” तसं म्हणताच तिचे डोळे पाणावले.
त्याने नुसतीच मान डोलावली अन् म्हणाला, “सोड कुठे घेऊन बसतेस या गोष्टी.”
“नाही बोलू दे मला.. खरं तर मी असायला हवं होते तुझ्या जवळ.. इतकी वाईट वेळ आली तुझ्यावर.. पण खरं सांगू, मी स्वतः इतकी शॉक होते की मला काहीच कळत नव्हतं. तुझी अवस्था काय झाली असेल हा विचार करूनच माझं पाणी पाणी होत होतं रे.. नाही झालं माझं धाडस.. नंतर तुझ्याशी बोलू म्हणत म्हणत वर्ष गेलं पण अजूनही तुला फेस करणं अवघड होतं रे मला.” तिने डोळे पाणावले अन् ती हमसून हमसून रडू लागली.
त्याने तिला धीर दिला. नकळत त्याचेही डोळे पाणावले. काही क्षण दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन रडू लागले.
काही वेळाने मग मितालीनेच बोलायला सुरुवात केली.
“असं अचानक काय झालं विणू..?”
त्याने स्वतःला सावरत बोलायला सुरूवात केली.
“मिता सर्व काही छान सुरु होतं गं आमच्या आयुष्यात.. मानसी खुश होती खूप.. तिच्या वडलांच्या होकारासाठीच आम्ही थांबलेलो.”
“त्यांचा नकार होता का..?”
“होय.. सुरवातीला नकारच होता. त्यांना पसंद नव्हतं हे आमचं असं..”
“मग..?”
“काही नाही.. तिची आई तयार होती.. त्यांच्या संमतीने आम्ही सर्व घरी गेलो त्यांच्या.. बोलणी केली.. सगळं जुळवलं.. वडील नाखूश होते पण शेवटी तयार झाले होते.. अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं आम्ही ठरवलं.. खूप खुश होतो आम्ही.. आमचं स्वप्न साकारत होत.. पण कोणाची नजर लागली कोण जाणे..? एकदमच आजारी पडली ती.. आजाराच निम्मित मात्र पण काहीतरी भलतच झालं..”
मिताली काही क्षण विचारातच गेली अन् शांत चित्ताने म्हणाली, “सांगितलं आईने.. आधी कधी तिला असं वाटलं नव्हतं..?”
“नाही ना.. कधीच नाही.. तिच्यासाठी पण हा मोठा धक्काच होता..”
“ह्म्म ऽ”
“मला तर काहीच कळत नव्हत.. आपण किती जरी काय केलं तरी काहीच होणार नव्हतं.. तिने नकार दिला. मला म्हणाली, आता सगळं विसर.. कसा विसरू मी मिता.. किती प्रेम होत माझं तिच्यावर..”
मिताली शांत चित्ताने सर्व ऐकुन घेत होती.
“सगळे नकार देत होते मला.. मी कोणालाच जुमानल नाही.. हटून लग्न केलं मी. खूप रडली ती. पण मी नाही रडलो तिच्या समोर. तिला जितक खुश ठेवता येईल तितकं खुश ठेवलं.. पण शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं..” विणूने एकदम निःश्वास सोडला.
काही काळ कोणी काहीच बोललं नाही. अचानक निर्माण झालेल्या शांततेत वारा वाहताना जाणवू लागला. लाटांचा आवाज कानी पडू लागला.
“सॉरी विणू..” मितालीच पुन्हा अपराधी भावनेने बोलू लागली. “मला खरच कल्पना नव्हती इतकं काही झालं असेल ते.”
“ह्म्म ऽ असू दे..” विणू समजावणीच्या सुरात बोलू लागला.. “तुझं कसं चाललंय.. आज अचानक कशी आलीस दिल्लीहून..?”
“आले.. बास झाली नोकरी आता..”
“म्हणजे..?”
“मी आता इथेच राहण्याचा निर्णय घेतलाय.”
“का आणि जॉब..?”
“च्च्च ऽ” तिने ओठ चुचकारले.
“अचानक काय झालं.. सर्व ठीक आहे ना..?”
“होय ठीक आहे.. विशेष असं काही नाही.. माझंच आता नोकरीत मन नाही.. स्वतःच काहीतरी करायचंय आता..”
“चांगलंय..” विणू चेहऱ्यावर मंद स्मित ठेवत म्हणाला.
“मिस यू विणू..” ती एकदमच त्याच्या खांद्यावर डोक ठेवत म्हणाली. “खुप मिस केलं मी तुम्हा लोकांना..”
“ह्म्म ऽ आम्ही पण.. पण तू अशी एकाकीच का गेलीस..? भेटली सुद्धा नाहीस.. बाकीच्यांच राहू दे.. निदान मला तरी..”
मितालीचे डोळे नकळत पाणावले. हाताच्या कडांनी डोळे पुसत ती म्हणाली,
“असंच.. तेव्हा खूप रडले असते ना मी म्हणून..”
“आता रडतेस तशी..”
विणू तिचा चेहरा सरळ करत म्हणाला. तिने डबडबलेल्या डोळ्यांनीच जोरजोरात मान हलवली अन् पुन्हा त्याच्या खांद्यावर मान टाकून रडू लागली.
विणू तिला धीर देऊ लागला. काही वेळाने ती शांत होताच बोलू लागली.
“तुला राग आला असेल ना तेव्हा खूप.. एवढी लहानपनापासूनची मैत्रीण आणि अशी एकदम बोलायची बंद झाली म्हणून.. इतकं सगळं आयुष्यात होऊनही भेटायला नाही आली.” मिताली त्याच्या नजरेला नजर देत बोलू लागली.
“खरं सांगायचं तर तेव्हा आलेला राग.. पण नंतर नंतर काही नाही वाटलं.. काही तरी विचार केला असशीलच म्हणून.”
“ह्म्म ऽ” तिने नुसताच हुंकार दिला.
“अजून बोल विणू बाकी सगळं कसं सुरूय.. खराब झालायस रे खूप.. काकी पण सांगत होत्या सतत आजारी पडतोयस..”
“ह्म्म ऽ”
“एक बोलू विणू रागावणार नसशील तर..”
“तुझ्यावर काय रागवायच.. बोल..”
“म्हणजे तू दु..?”
“नाही मिता..” तो तिला मध्येच अडवत म्हणाला. “खरं सांगायचं तर मी नाही विसरू शकत मानसीला.. आणि दुसऱ्या लग्नाचं म्हणशील तर आता काही उपयोग नाही त्याचा.”
“आत्ता तुला असं वाटत असेल.. वाटल्यास तू अजून थोडा वेळ घे.. पण निदान लग्नच नको असा विचार नको करू..”
तो शांतच राहिला.
“विणू मला माहित आहे तुझ्या मनाची काय अवस्था झालीय ते.. हे दुःख फार मोठ आहे.. पण हे सर्व विसरून पुढे तर यावं लागेल ना.. स्वतःसाठी नाही निदान घरच्यांसाठी तरी.. काकूंना बघ, तूझ्या काळजीत किती खराब झाल्यात त्या. त्यांना काय वाटत असेल..?”
“मिता हे सर्व मी केलंय का..?”
“तुला अजिबात दोष देत नाही मी विणू.. मी फक्त तुला आता हे दुःख विसर म्हणून सांगतेय इतकंच.”
“करतोय मी प्रयत्न.” तो शांततेतच बोलला.
“कळतंय मला. समजू शकते मी. माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहेस तू.. मी फक्त मैत्रीण म्हणून एक तुला सांगत होते इतकंच..”
“ह्म्म ऽ” तो शांतच राहिला.
“बाकी काय चाललय..?”
“बस हेच. फूड डिलिव्हरी दिवसभर. काम करू वाटलं की बाईक काढायची नाही वाटलं तर इथे येऊन बसायचं.”
“ह्म्म ऽ मला माहित होत तुझी आवडती जागा आहे ही.. म्हणून मीच निघाले सरळ इकडे यायला.”
दोघेही गालातच हसले.
“मला वाटलं विसरली असशील.”
“कसं विसरेन एक दोन वर्षांची मैत्री नाही आपली.”
“मला वाटलं, दिल्लीत गेल्यापासून गल्लीतले किस्से विसरली असशील.” विणू चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाला.
“विसरण्या इतपत साधी मस्ती केलीय का आपण..?” तिने ही त्याला तशीच प्रतिक्रिया दिली.
“छान होती ना कॉलेज लाइफ आपली..?”
“ह्म्म ऽ” तो पुन्हा जुन्या आठवणीत गेला.
“त्याच्याही आधी आपली स्कूल लाईफ हो ना विणू..?”
“खूप.. उगाच मोठे झालो असं वाटतंय.”
“खरंच.. खूप खुश होतो आपण त्या वेळेत.. किती मस्ती असायची आपली. रोज या ना त्या कारणावरून आपली भांडणं. तुझी आजी काय म्हणायची ना ते आपल्याला..?”
“तुझं माझं जमेना अन् तुझ्या विना करमेना..” विणू गालात हसत म्हणाला.
“हां तेच तेच.. आणि नंतर आपण एकत्र आल्यावर किती हसायचे ना आपल्या घरातले.”
“ह्म्म ऽ” त्याने हसूनच मान डोलावली.
“हेवन होतं आपलं बालपण. हो ना..?”
“हो.. तेव्हा वाटायचं कधी मोठं होणार आपण.. उगाचच वाटायचं..” विणू एकदमच गंभीर होत म्हणाला, “स्वर्ग सोडून नरक मागत होतो आपण.. देवाने तेच केलं.. नरक दिलं आपल्याला..”
ती एकदमच गंभीर झाली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, “असं नको बोलूस विणू..”
“खोट काय आहे यात.. प्रत्यक्षात जरी नसलं तरी मनाला होणाऱ्या यातना ह्या नरक यातनाच तर आहेत.”
ती शांतच राहिली. आपण किती जरी बोललो तरी सध्या विणूची मनस्थिती बदलू शकत नाही हे तिने मनोमन जाणलं. तिने आल्यापासून बराच प्रयत्न केला पण विणू पुन्हा पुन्हा दुःखाच्या सावलीत जात होता. किंबहुना त्याला आता तशी सवयच जडली होती. मिताली शांतच राहिली. चेहऱ्यावर मंद स्मित ठेऊन भोवतालच्या वातावरणात हरवून गेली. विणू पुन्हा आपल्या गंभीर मुद्रेत समुद्राच्या गर्भात जाण्याचा प्रयत्न करू लागला.
वारा वाहत होता. लाटा संथ होत्या. रहदारी कमी वाटत होती पण तसं नव्हतं. रात्रीच्या अंधारात चंद्राच्या प्रकाशात दिव्यांच्या रोषणाईत मायानगरी लखलखत होती.
सूर्याची कोवळी किरणे केव्हाच शिळी झाली होतीत. त्याची तापट किरणं जेव्हा खिडकीतून माथ्यावर आलीत तेव्हा कुठे मितालीचा डोळा उघडला. पहाटेच्या सुमारास दोघेही घरी आले. विणूने तिला घरी सोडलं. मिताली रूममध्ये आली ती सरळ झोपलीच. जवळजवळ काल तीन वर्षांनी ती विणूला भेटली होती.
हॉटेल मॅनेजमेंट नंतर ती नोकरीसाठी दिल्लीला गेली, ती पुन्हा लवकर आलीच नाही. किंवा तिला यावसं वाटलच नाही.
विणूची अन् तिची लहानपनापासूनची मैत्री. दोघंही एकाच कॉलनीतले, एकाच शाळेतले, एकाच वर्गातले अन् कॉलेजमधलेही.
त्यांची मैत्री सर्वज्ञात होती. एकमेकांच्या घरातल्यांचेही चांगले संबंध होते. लहानपणी मस्करी मस्करीत त्यांच्या लग्नाबद्दल त्यांना चिडवलं जायचं. मित्रांकडून एकमेकांची टिंगल केली जायची पण बाल्यावस्थेतल्या त्या चेष्टा त्यांना तेव्हा कळायच्या नाहीत. मोठे होत गेले तशी त्यांची मैत्री बळकट होत गेली. कुणीतरी सहजच केलेली चेष्टा त्यांना कळू लागली पण त्याबद्दल त्यांनी कधी मनात राग आणला नाही.
दोघांनाही तारुण्याचं महत्व कळत होतं. तरुण हातांचा स्पर्श चांगली चांगली नाती बिघडवतो याची जाणीव होण्या इतपत दोघेही जानते झाले होते. म्हणूनच दोघेही एकमेकांची अदब राखूनच वागत होते.
एकमेकांच्या प्रती असलेल्या भावना ह्या केवळ मित्र प्रेमाच्याच आहेत अशीच समजूत दोघांची होती. किमान विणूची तरी अशीच धारणा असावी असंच मितालीला वाटत होतं. अन् विणूच्या बाबतीतही तसंच काहीस होत. त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून एकंदरीत त्याच्या अचानक बदललेल्या स्वभावावरून दोघेही फक्त मित्र आहेत असंच दिसून येत होतं.
मितालीने किती जरी लपविण्याचा प्रयत्न केला तरी विणू बद्दल असलेलं प्रेम तिच्या डोळ्यात दिसत होतं. तिच्या मनालाही ते माहित होतं. पण विणू समोर या भावना व्यक्त करण्याची हिंमत ती करत नव्हती.
ती मनाला सतत समजावून सांगत होती. पण तिच मन नेमकं तिच्या विरुद्ध वागत होतं. तिचं मन सतत तिला हेच सांगत होतं की,
“ही मैत्री आता फक्त मैत्री उरली नाही. त्याचं रूपांतर प्रेमात झालं आहे. तुझं विणूवर जिवापाड प्रेम आहे. त्याला लग्नाबद्दल विचार.”
पण मितालीची या बाबतीत हिंमत होत नव्हती.
एकदा खूप हिमतीने तिच्या अंतर्मनाने तिची तयारी करुन घेतली. आपल्या या भावना विणूसमोर व्यक्त करण्याचा धाडसी निर्णय मितालीने घेतला.
दिवस ठरला. ठिकाण ठरलं. वेळ ठरली. विणू समोर येऊन उभा राहिलाही. पण मिताली मात्र फक्त ऐकतच राहिली.
“मिता मानसी प्रपोज्ड मी.”
मिताली सुन्न होऊन ऐकतच राहिली.
“काय करू मी.. सांग ना..?”
“मी काय सांगू म्हणजे..” मिताली खोट हसू चेहऱ्यावर ठेवत म्हणाली.
“म्हणजे हेच की मी काय करावं.. माझ्या मनात सतत एकच प्रश्न येतोय. खरंच ती माझ्यासाठी योग्य आहे का.. इज शी माय परफेक्ट पार्टनर..?”
“मी कसं सांगू विणू..?”
“तूच सांगू शकतेस मिता.. तूच मला पूर्ण ओळखतेस.. तुझ्या शिवाय मी दुसऱ्या कोणाला विचारणार..?” विणू काहीसा गंभीर नजरेनेच म्हणाला.
मितालीने चेहऱ्यावर मंद स्मित ठेवत त्याला विचारलं,
“एक विचारू रागावणार नसशील तर..?”
“कमाॅन मिता.. हे काय..?”
ती नुसतीच हसली अन् म्हणाली,
“तुझ्या मनाला खरंच वाटतं का की, शी इज परफेक्ट पार्टनर फॉर यू..? की याआधी जसे अफेअर्स झालेत त्या सारखच आहे हे..?”
“नाही माहित मिता.. खरं सांगायचं तर तिच माझी परफेक्ट पार्टनर आहे का हे मला नाही सांगता येत. पण प्रेमाच्या बाबतीत माझं मत बदललंय आता.. शाळा कॉलेजमध्ये आपण मजा म्हणून या गोष्टीकडे पाहत होतो.. पण आता तसं नाही.. काल परवा पर्यंतच प्रेम हे उनाड मनाने केलेलं.. समंजसपणा नव्हता कधी.. अल्लड वयातलं प्रेम होत ते..”
“आणि आता..?”
“आता ऽ..” विणू चेहऱ्यावर स्मित ठेवत म्हणाला,
“आता नकळत एक समंजसपणा निर्माण झालाय. प्रेम म्हणजे काय कळू लागलंय.. माणसाच मन कळू लागलंय.. भावना जाणवू लागल्यात.. त्यामुळे आता योग्य जोडीदार कोण हे ओळखण कठीण झालंय.. तूच मला नीट समजावू शकतेस.. पुढे जाऊन कोणालाही एकमेकांचा त्रास नको मिता म्हणून तुला विचारतोय.. सांग ना, मानसी आणि माझं पटेल.. वुई आर परफेक्ट फॉर इच अदर..?”
क्रमश :
हे देखील वाचा 👇
कर्करोग ठरतोय धोकादायक
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ॲप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!