परफेक्ट पार्टनर – भाग २
अंतर्मना इतका उत्तम जोडीदार कोणी नाही.. आपलं मनच आपल्यासाठी “परफेक्ट पार्टनर” आहे.. आयुष्याच्या या मॅचमध्ये मनाइतका उत्तम जोडीदार कोणी नाही.. माणसाने मनाचंच ऐकावं.. मन म्हणेल तेच करावं..
“परफेक्ट पार्टनर”
मिता स्तब्धच होती. तिच्या मनाने केव्हाच हंबरडा फोडला होता.
“काय झालं एकदम का शांत झालीस..?”
“काही नाही.. मी पण गोंधळलेय.. तुझा निर्णय तू मला घ्यायला सांगतोयस..”
“निर्णय नाही.. मत विचारतोय मी तुला.. मी काय करावं, मानसीला होकार द्यावा की, आणखी कोणा चांगल्या व्यक्तीची वाट पहावी.. जी मला चांगल्या प्रकारे ओळखत असेल.. मी तिला ओळखत असेल..” विणू मितालीच्या डोळ्यात डोळे घालून गंभीरतेने बोलू लागला.
मिताली त्याच्याकडे पाहतच राहिली. एका क्षणासाठी तिला, मनातल्या गोष्टी व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे असं वाटू लागलं पण तरीही ती शांतच राहिली. तिने एकवटलेली हिंमत ऐन वेळी कोसळून पडली.
“तुझ्या बद्दल काय काय माहित आहे तिला..?” ती शांत नजरेनेच बोलून गेली.
“विशेष असं नाही. पण मी तिला काही गोष्टी क्लिअर केल्यात. इन फॅक्ट, मी माझा पास्ट सांगितलाय तिला. तिला म्हणालो, माझे दोन तीन तरी अफेअर्स झालेत पण फक्त अफेअर्स. त्या पलीकडे काही नाही. ती का टिकली नाहीत याची कारण मला माहित नाहीत आणि ते डिस्कस ही करायचं नाही. फक्त तुझ्यापासून काही लपवून ठेवायचं नाही म्हणून तुला सांगतोय.. सगळं खरं.. या पलिकडे माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही..”
“मग..?”
“काही नाही.. तिनेच प्रपोज केलेलं. मी फक्त तिला माझ्याबद्दल सांगितलं. तिला फक्त इतकंच म्हटलं की, मला थोडा वेळ हवाय. म्हणून तर तुला विचारतोय बोल ना काय करू..?”
“मी काय बोलणार विणू.. सगळ साफ आहे.. तिला सगळं कबूल आहे.. इथेच सर्व क्लिअर आहे..”
विणूची नजर मितालीवर खिळूनच होती.
“ओके.. बघू.. करतो मी विचार.” तसं म्हणत विणू गालातच हसू लागला. मिताली मनातच रडू लागली.
“तुला पण काही तरी सांगायचं होत ना.. काय ते.. गडबडीने बोलवून घेतलस.. ऑल गुड..?”
“काही नाही अरे.. जॉयनिंग लेटर आलंय माझं..”
“काय ऽ ग्रेट..” विणू उत्साहाने ओरडला..
“आणि..”
“आणि काय..?”
“बाबांनी एक स्थळ देखील पाहिलंय.”
“काय ऽ.. ग्रेट..” विणू हसऱ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला.
मिताली त्याचा हसरा चेहरा निरखून पाहू लागली.
“ग्रेट ग्रेट.. चांगली बातमी दिलीस. मग कधी करणार आहेस जॉईन.. आणि बोलनी..” विणू जरा तिला चिडवतच बोलू लागला..
“नेक्स्ट मंथ..” तिने लाजत उत्तर दिलं.
“कूल.. पार्टी व्हायला पाहिजे मग मिता.. खूप मोठी गोष्ट आहे ही तुझ्यासाठी.. काका काकी खूश असतील ना खूप..”
“खूपच..”
“असणारच.. तू पहिलीच असशील जिने एवढी मोठी झेप घेतलीय.. हो ना..?”
तिने नुसतेच डोळे मिचकावले..
“उद्याच.. उद्याच सर्व फिक्स करू.. मी सर्वांना कळवतो.. मानसीला पण घेऊ आता आपल्यात.. दणक्यात सेलिब्रेशन करू.. आणि आणि..”
विणू आनंदाने बोलू लागला. त्याला बोलताना पाहून मिताली त्याच्यात हरवून गेली. त्याच्या नियोजनाला ती उपस्थित राहणार नव्हती हे तिने मनोमन ठरवलं होतं. इतकचं काय आता लवकरात लवकर इथून निघून जाण्याचा निर्णय तिने घेतला होता. अन् ती गेलीही.
तिच्या असं अचानक जाण्याने विणू रागावला होता. तिच्याशी बोलून त्याने तो राग व्यक्त केला होता. तिच्या आठवणीत त्याचा रागही नमुन गेला होता. जस जसे दिवस जात गेले तस तसे दोघ एकमेकांना विसरू लागले. दोघांचा संपर्क कमी होऊ लागला. कधी तरी मितालीची आठवण त्याला येत होती. तो संपर्क करत होता पण मितालीच त्याच्या पासून दूर जात होती. नकळत विणूलाही ते जाणवलं पण त्याने ते दुर्लक्षित केलं.
मानसीची बातमी कळताच तिलाही दुःख झालं. विणूला सर्व माहित असताना त्याने केलेल्या कृत्याने तिचा ऊर भरूनही आला. पण तितकंच त्याच्यासाठी तिला वाईट ही वाटलं. बऱ्याचदा त्याच्याशी बोलण्याचा तिने प्रयत्न केला. पण त्याला सामोरं जाण्याची हिंमत ती एकवटू शकली नाही.
काल तीन वर्षांनी ती जेव्हा त्याला भेटली तेव्हा तिचं मन हलकं झालं. विणूच्या वेदनेने तिचा ऊर भरून आला. घरात येताच तिला रडू कोसळल अन् ती तशीच झोपी गेली.
सकाळी जाग येताच तिने विणूला भेटूया म्हणून मेसेज केला. विणूने सरळ तिला त्याच्या शॉप मध्येच बोलावून घेतलं.
“छान आहे रे हे..”
“ह्म्म ऽ होय ..”
“कसं वर्क करतं हे क्लाउड किचन.. सगळीकडे आता हेच सुरूय ना..?”
“ह्म्म ऽ हो.. काही नाही इझी आहे.. इन्व्हेस्टमेंट करावी लागते थोडी.. आपल्या स्किल नुसार मेन्यू तयार करायचे. थोडी मार्केटिंग करावी लागते. पण एकदा लोकांना आवडू लागलं की माऊथ पब्लिसिटीनेच ऑर्डर येतात.”
“आणि पेमेंट..?”
“होते तशी कमाई.. ऑनलाईन ऑर्डर येतात.. काही डीरेक्टली कॉल करतात..”
“दिवस सगळा इथेच जात असेल ना तुझा..?”
“ह्म्म ऽ जायचा.. आता नाही करत मी हे जास्त..”
“मग..?”
“वर्ष झालं बंदच आहे.. कधी छोट्या मोठ्या बिर्याणीच्या वगैरे ऑर्डर आल्या की घेतो..”
“मग आता कर ना सुरू..”
“ह्म्म ऽ बघू..
“कधी..?”
“खरं सांगायचं तर माझी इच्छाच नाहीये आता मिता. असंच छोटं मोठ काम करुन मिळतात थोडे फार पैसे. आणि तसंही जास्त कमवून तरी काय करायचंय.”
“असं का बोलतोयस विणू..? तुला आधी पासून हेच करायचं होतं ना.. स्वतःच काहीतरी.. व्यवसाय करायचा म्हणून तू नोकरी केली नाहीस. आणि आता एवढ सगळं उभं करुन असं म्हणतोयस.”
विणू शांतच राहिला. मिताली एकटक त्याच्याकडे बघत होती.. विणूचं दुःख तिला कळत होतं. त्याचा एकटेपणा तिला जाणवत होता. कधी काळी आपलंही विणूवर प्रेम होतं. आजही आहे. आणि कायम असणार हे सांगण्याची योग्य वेळ हीच होती. तिला सर्व काही विणूला सांगायचं होतं. तिचं प्रेम व्यक्त करायचं होतं. तिचा त्याग सांगायचा होता. तिने गमावलेली हिंमत पुन्हा एकवटली अन् बोलू लागली.
“विणू..”
“ह्म्म ऽ”
“ ”
ती शांतच राहिली..
“काय झालं..?”
तिने नुसतीच नकारार्थी मान डुलवली.
“काय झालं मिता काही प्रॉब्लेम आहे का..?”
ती एकटक त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती.
त्याने नजरेनेच तिला काय झालं म्हणून पुन्हा विचारलं.
“विणू..”
“ह्म्म ऽ बोल ना..”
“विणू खूप प्रेम करते मी तुझ्यावर. मला नाही माहित तुला काय वाटत असेल आता माझ्याबद्दल. पण खरंच.”
विणू शांतच राहिला. त्याने त्याची नजर जमिनीच्या दिशेनेच ठेवली.
“राग आलाय का माझा..?” ती काहीश्या दबक्या आवाजात विचारू लागली.
तो शांतच राहीला. त्याने मान नकारार्थी हलवत उत्तर दिलं.
“विणू खूप आधीपासून मी तुझ्यावर प्रेम करते. खरंच.. तुला याआधीच मला सर्व सांगायच होतं..”
“मी नकार दिला नसता मिताली.”
मिताली एकदमच दचकली. आपण ऐकलं ते खरं की खोट, स्वप्न की वास्तव हेच तिला कळेना. तिने एकदमच डोळे भरले अन् बोलू लागली.
“मग मला का निवडलं नाहीस विणू..? असं का वागलास माझ्यासोबत..?”
“काय करणार होतो मी मिताली.. कसं सांगणार होतो तुला.. मलाच कळत नव्हत हे प्रेम आहे की आणखी काय.. दर वेळी मनात ठरवत होतो तुला आज सांगायचं.. पण कधीच हिंमत झाली नाही.. दर वेळी तुझ्या पासून लांब होण्याचा प्रयत्न केला पण कधीच होऊ शकलो नाही.. मन सांगत होतं हे प्रेमच आहे पण कधीच हिंमत करू शकलो नाही.”
मिताली सुन्नच होती. तिच्या मनाची अवस्था विणू स्पष्ट करत होता.
“एकदा बोलायचं होतं विणू.. काय झालं असतं जास्तीत जास्त..?”
“भीती होती मिता.. तुला गमवायचं नव्हतं.. लहानपणापासूनची मैत्री गमवायची नव्हती.. तुझी सवय झालेली मला.. बायको म्हणून जरी आयुष्यात नसलीस तरी मैत्रीण म्हणून कायम हवी होतीस मला..” विणूने एकदमच डोळे भरले..
मितालीला रडू कोसळलं. विणू जागीच शांत बसून राहिला. तिला धीर देण्यासाठी तिच्या जवळ त्याला जावंस वाटलं पण तो तसाच बसून राहिला. मिताली डोळे पुसत पुसत बोलू लागली.
“माझीही हीच अवस्था होती विणू.. काहीच वेगळं नाही यात.. जस तुझं मन तुला सांगत होतं तसंच माझं मनही मला सांगत होतं.. विणू, एकदा हिंमत करून तुला सांगण्याचा मी प्रयत्न करणार होते.. पण..”
“पण काय मिता..?”
“तू मानसीबद्दल सांगितलंस. तिने प्रपोज केल्याचं सांगितलंस.. मी काय बोलणार होते विणू..?”
विणू एकदमच शांत झाला. मिताली शांत नजरेने त्याच्याकडे पाहू लागली.
“विणू, जे झालं ते झालं..”
“मिता,” विणू तिला अडवत म्हणाला, “मी मानसीला होकार देणार नव्हतो.”
“मग..?”
“मला तुझं मत जाणून घ्यायचं होत.. मला सारखं वाटत होतं की तुझ्या मनातल जाणून घेण्यासाठी कदाचित दुसऱ्या कोणाचा तरी आधार घ्यावा.. म्हणून मुद्दाम मानसीचा विषय काढला होता मी.”
मिताली त्याच्याकडे पाहतच राहिली.
“मला वाटलं कदाचित तू तुझ्या मनातल सांगशील. काहीतरी बोलशील.. म्हणून..” विणू एकदमच शांत बसला.
मितालीच्या सर्व गोष्टी लक्ष्यात येऊ लागल्या.
“विणू तू डिरेक्टली का विचारलं नाहीस मला.. छोटीशी तर गोष्ट होती..”
“हेच मी तुलाही विचारू शकतो मिता.. का विचारलं नाहीस..? एकदा बोलायचं होतंस.. माझं प्रेम आहे तुझ्यावर..”
दोघेही काही काळ शांतच बसले. एका छोट्याशा गोष्टीमुळे झालेला गोंधळ त्यांच्या लक्ष्यात येत होता.. पण हा गोंधळच मुळात त्यांनी निर्माण केला होता.. एकमेकांवर असलेलं प्रेम फक्त मैत्री तुटू न देण्यासाठी ते व्यक्तच केलं नव्हत. यात नेमका दोष तरी कोणाचा होता..?
“पुढे काय झालं मग..?” मितालीने दबक्या आवाजात विचारलं.
“तू गेलीस न सांगताच.. एकटा पडलो मी.. माझं प्रेम तर तुझ्यावर होतंच पण तुझ्या मनात माझ्याबद्दल तसं काही नाही हे समजून मी..”
“मानसीला होकार दिलास..”
“हो.”
मिताली शांतच राहिली..
“तू का लग्न केलं नाहीस मिता..?”
ती शांत नजरेनेच त्याच्याकडे पाहू लागली.. तीची गंभीर नजर त्याला उत्तर देऊन गेली.
“म्हणजे कोणी नव्हतंच..”
तिने होकारार्थी मान डुलवली.
“माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर तूच होतास विणू.. तुझ्याविना मी कधी कोणाचा विचार केला नाही.. तू लग्न केलंस.. खरं तर मी तुला विसरून जायला हवं होतं.. पण का माहित का माझ्या मनाला ते जमलंच नाही.. मला जेव्हा मानसी बद्दल कळालं तेव्हा विणू मी खूप रडले.. मला वाटू लागलं की, माझीच नजर लागलीय तुमच्या संसाराला..” तशी ती हुंदके देऊन रडू लागली.
“सॉरी विणू पण खरंच, मी कधीच तुमच्या बद्दल वाईट विचार केला नाही.. मनोमन तुमच्या आनंदासाठीच प्रार्थना केली.. मानसी बद्दल कधीच वाईट विचार केला नाही..” तशी ती आणखीनच रडू लागली..
विणू एकदमच तिच्या जवळ गेला.. मिताली तसं म्हणताच तो कळवळला. काल बोलता बोलता आपण काय बोलून गेलेलो हे अचानक त्याच्या नजरेसमोर आलं. तिला धीर देत तो बोलू लागला,
“असं नको बोलूस मिता.. काल मला, तुझीच नजर लागलीय असं म्हणायचं नव्हत. बोलता बोलता चूकून माझ्या तोंडातून निघून गेलं ते.. पण यात तुझा काय कोणाचाच दोष नाही..”
“तुला तसं म्हणायची गरज नाही विणू.. तू तसं चूकून बोलून ही गेला असशील. पण मला कळाल्यापासून तरी सतत माझ्या मनात सारखं तेच येतंय की माझीच नजर लागली तुमच्या संसाराला..” तशी मिताली आणखीनच रडू लागली..
“गप मिता असा नको विचार करुस.. तुझी काय, यात कोणाचीच चूक नाही.. मानसीच आयुष्यच तेवढं होतं.. आपण काय करणार त्याला.. त्यासाठी तू असा विचार करू नकोस..” विणू तिला धीर देत बोलू लागला..
डोळे पुसत पुसत मिताली शांत झाली.
“विणू.. मी आता आले ते फक्त तुझ्यासाठी..” मिताली बोलू लागली.
“मला काकूंचा फोन आलेला.. खूप रडत होत्या.. तुझी अवस्था त्यांना बघवत नव्हती.. तु दुसऱ्या लग्नाबद्दल पण तयार होत नव्हतास.. काकू म्हणाल्या, “मला तर भीती वाटतेय हा जिवाचं काही बर वाईट तर करणार नाही ना म्हणून..” म्हणून मी आले विणू.. नाही तर माझी तुझ्यासमोर उभी राहण्याची हिंमतच होत नव्हती.. मी तर हेच समजत होते की माझीच नजर लागली तुमच्या संसाराला..”
विणूने तिच्या तोंडावर हात ठेवला..
“असं नाहीये.. असं नको बोलूस..”
“मला खरं तर विणू माहित नव्हतं.. मानसीला कॅन्सर होता ते.. आणि हे माहित असून तू तिच्याशी लग्न केलंस हे देखील माहित नव्हतं.. जेव्हा तिचं असं झालंय हे कळाल तेव्हा मला या गोष्टी कळाल्या.”
विणू शांतच होता..
“विणू..”
“ह्म्म ऽ..” त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं.
“मला माफ कर..”
“का.. असं का बोलतेस..?”
“मला नाही माहित.. बस माफ कर..”
“मिता तुझी यात काहीच चुक नाही.”
“मी तुला विचारायला हवं होतं.”
“ही चूक तर माझी पण आहे. मी तसा वेडेपणा केला नसता तर कदाचित..” तसा विणू एकदमच शांत झाला.
“पण विणू मला तुझा खूप अभिमान वाटला जेव्हा मला कळालं की, तुला मानसीसोबत असं झालंय हे माहित असून तू तिच्याशी लग्न केलंस.. तिला शेवटपर्यंत साथ दिलीस.. खरा पुरुषार्थ दाखवलास.. खरंच विणू..”
“ह्म्म ऽ.. काय करणार मिता.. तू गेलीस.. मला वाटू लागलं मी तुझ्या योग्य नाही.. कदाचित तू माझ्याबद्दल तसाच विचार करत असशील.. या पाठीमागेही माझे अफेअर्स होते.. कदाचित मानसी सोबत ही तसंच काहीस असेल.. पण मानसीच माझ्यावर प्रेम होत मिता.. खरं प्रेम.. कदाचित प्रेमाहुनही काहीतरी जास्त.. मला ते जाणवलं.. म्हणूनच मी बाकीच्या गोष्टी विसरू शकलो.. तुला विसरू शकलो..” विणू काहीसा गंभीर होतच म्हणाला, “मानसीत इतका गुंतलोय की आता बाहेर पडण अवघड आहे मिता..”
मिताली शांत होती. ती एकदम सुन्न झाली..
“होय मिता.. आपलं प्रेम होतं.. आणि ते कायम राहिल.. पण ते पूर्ण होऊ शकणार नाही..”
“का विणू.. ?”
“काही प्रश्नांची उत्तरं वेळे कडूनच मिळतात. तुलाही मिळेल.. लवकरच.. आता उशीर नाही होणार..”
“विणू ऽ” तशी ती एकदमच गंभीर होत किंचाळली अन् एकाएकीच रडू लागली..
“नाही विणू.. खोटंय हे.. बोल खोटंय हे.. नाही नाही नाही..” तशी ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या वेदनांचा हंबरडा त्याच्या मनात खोलवर जाऊन गडगडाटू लागला..
“आपण चांगल्या डॉक्टरला दाखवू विणू..”
“मृत्यूपेक्षा चांगला डॉक्टर दुसरा कोणी नाही मिता..”
“नाही नाही असं नको बोलू विणू.. होईल काही तरी.. काही तरी उपाय निघेल..”
“नकीच निघेल.. आणि आशा आहे लवकर निघावेत.. पण तोपर्यंत मी नसेन मिता.. उशीर झालाय खूप आपल्याला.. कदाचित आपण एक होऊ शकलो असतो.. पण काही हरकत नाही.. आपण मनाने एकच होतो..”
मिताली रडू लागली.. विणू तिला जवळ घेऊन तिला धीर देऊ लागला..
“का विणू.. असं का..?”
“नाही माहित मिता.. असं एकाएकीच त्याने माझी निवड का केली माहित नाही.. माझ्या मानसीलाही माहित नव्हतं.. तिच्या सारख्या कित्येक जणींना माहित नव्हतं.. माझ्या सारख्या कित्येक जणांना माहित नाही.. बस जे वाट्याला आलंय ते स्वीकारायच आणि चालत राहायचं..” विणू एकदमच शांत झाला..
जे मानसी सोबत झालं तेच आपल्यासोबत होणार या विचारानेच विणू उदासीन झाला होता. कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही तरी आपण त्याच्या जाळ्यात कसे काय फसले गेलो हे विणूला देखील कळालं नाही. कदाचित विणूसारख्या, मानसीसारख्या कित्येकांना कळालं नव्हत. अजून ही कळत नाहीये. कदाचित आपलं प्रेमच आपल्याला बोलवतंय या विचारानेच विणू संथ गतीने चालू लागला. आपल्या शेवटच्या क्षणाची वाट पाहू लागला. काही काळ दोघेही शांतच होते. मितालीसाठी हा मानसिक आघात होता. तिला हळहळताना पाहून विणू म्हणाला,
“मिता.. एका प्रश्नाच उत्तर देशील..?”
“हां ऽ” मिताली त्याचा हात जवळ घेत म्हणाली..
“हू इज अवर परफेक्ट पार्टनर..?”
मितालीचे डोळे पाण्याने भरले.. त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देण्या इतपत तीच डोक आता काम करेनासं झाल होतं..
“हु मिता..?”
तिने मानेनेच नकार दिला अन् त्याचा हात आपल्या गालाजवळ घेऊन रडू लागली.. विणू एकटक तिच्याकडे फक्त पाहतच राहिला..
तिला मिठीत घेऊन तो पुटपुटला,
“मन मिता.. आपलं अंतर्मन.. अंतर्मना इतका उत्तम जोडीदार कोणी नाही.. आपलं मनच आपल्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे.. आयुष्याच्या या मॅचमध्ये मनाइतका उत्तम जोडीदार कोणी नाही.. कोणी नाही.. माणसाने मनाचंच ऐकावं.. मन म्हणेल तेच करावं.. काय सांगाव कधी कोण कसा चकवा देऊन जाईल ते..”
डोळ्यातून अश्रू वाहत राहीले.. हातातले हात घट्ट होऊ लागले.. मनातल्या वेदना ठणकू लागल्या. काळ त्याच्या गतीने दौडू लागला. नियतीचा फेरा न चुकता पूर्ण झाला..
समाप्त
हे देखील वाचा 👇
Men Health: पुरूषांनो..अगदी शांतपणे शरीरात पसरतो हा कॅन्सर
नवनवीन कथांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ॲप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे देखील पहा :
वास्तविकतेला भिडलेली एक कहानी : अधुरी कहानी
एका अव्यक्त प्रेमाची रहस्यमय कथा : आरशातलं प्रेम
बाप मनाची वेदना : अदृश्य वेदना
नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
धन्यवाद.
Kindly Share it With Your Friends!