प्रेमरंग

    प्रेम रंग पाहून नाही तर मन पाहून केल जात हे फार कमी लोकांना कळत. पण ज्यांना कळत त्यांना आयुष्यात सर्व काही मिळत. “प्रेमरंग” ही कथा अशाच काही प्रेमी युगुलांची.

Premrang is the image of a couple.

प्रेमरंग

    बऱ्याच दिवसांनी जुनी ट्रंक उघडली अन् एक फोटो नजरेस पडला.. मी, वैभ्या, अन् माझी ऐश्वर्या..

    तो किस्सा घडल्या घडल्या आम्ही स्टुडिओत गेलो अन् ही आठवण कैद केली.

    असं म्हणतात प्रेम केलं जात नाही ते होऊन जातं. मग ते कोणाशीही होईल, कधीही होईल. त्याला ना रंग, ना रुप, ना धर्म, ना जात. ते फक्त होऊन जातं.

    आता ते सत्यात उतरवायचं की सोडून द्यायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.

    आता पर्यंतचा इतिहास तरी प्रेमासाठी काहीही करण्यापर्यंतचा आहे.

    अगदी सवयी बदलण्यापासून ते युद्ध करण्यापर्यंत. प्रेम सर्व काही बदलवून टाकत. माझ्याही बाबतीत असंच झालं.

    दहावीला आलो आणि आमच्या वर्गात एक नवीन मुलगी आली.

    मला खूप आवडायची ती. एकटक मी तिच्याकडे बघत असायचो.

    गोरी गोरी पान. काळेभोर केस. पाणीदार डोळे. ती जेव्हा हसायची तेव्हा तिच्या दोन्ही गालावर खळी पडायची.

    तिची एक बट सारखी तिच्या खळीला डीवचायची. ती मग हलक्या हाताने ती बट कानामागे सारायची. पण ती बट काही एका जागी स्थिर राहत नसायची. माझ्या मनासारखी.

    ती बट सतत तिच्या गालाला गुदगुल्या करायची. ती पुन्हा बट कानामागे सारायची. तिला तसं पाहत राहणं माझ्यासाठी स्वर्गात राहण्यासारख होतं.

    पुस्तक नजरेसमोर ठेऊन मी तिलाच पाहत असायचो. कधी तरी मॅडमांना डाऊट यायचा अन मला एखादा प्रश्न विचारण्यासाठी उभं करायच्या.

    पण मी फार नशीबवान. वैभव सारखा मित्र होता मला. मॅडमनी उभ केलं की तो हळू आवाजात मला उत्तर सांगायचा.‌ चुकीचं. मुद्दाम.

    सगळा वर्ग मग हसायचा. एकदा मोरे मॅडमनी असाच एक प्रश्न विचारला. मोरे मॅडम विज्ञान शिकवायच्या.

    एकदा असच मी स्वर्गात गेलो होतो. माझी अप्सरा माझ्या समोर बसून गोड हसत होती. मी तिच्यात गुंतून गेलो होतो.

    मॅडमच लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी मला उभ राहायला सांगितलं. माझ्याकडे जरा रागात बघत त्यांनी मला प्रश्न विचारला.

    “सांग कोणता रंग..?”

    मला काहीच कळायला मार्ग नव्हता. माझ्या समोर प्रेमाचा रंग पसरला होता. तो प्रेमरंग उधळण्यात मी तल्लीन झालो होतो. मॅडम कोणता रंग विचारत होत्या ते मला नेमक कळत नव्हतं.

    मी वैभ्याकडे पाहिलं. तो जरा गंभीर नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी त्याला नजरेनेच विचारत होतो. तो माझ्या पँटच्या दिशेने मला खुणावत होता.

    मला काही कळत नव्हत. त्याचा इशारा मला कळत नव्हता. त्याने हळूच आवाजात मला सांगितलं..

    “काळ्या रंगाची बोल.”

    “काय ..?”

    “तू बोल फक्त… काळ्या रंगाची..”

    मॅडमनी पुन्हा आवाज दिला. “काय कुठला रंग.. आठवतोय का नाही..?” मी गडबडलो. या वेळी त्यांचा आवाज मोठा होता.

    मी पटकन म्हणालो “काळ्या रंगाची.”

    सगळा वर्ग हसायला लागला.

    “काय..?” मॅडमनी पुन्हा आश्चर्याने विचारल.

    “काळ्या रंगाची पँट घातली आहे मॅडम.”

    पूर्ण वर्ग हसू लागला. मॅडम माझ्याकडे रागाने पाहू लागल्या. त्यांना काय बोलावं ते सुचेना. मला काय करावं ते सुचेना.

    वैभव डोकं खाली ठेवून हसत होता. मला कळालं, याने नक्की काही तरी मस्ती केली आहे.

    “गेट आउट.. बाहेर जाऊन उभा रहा..” मॅडमनी रागात मला वर्गा बाहेर काढल. मी बाहेर जाईपर्यंत सगळा वर्ग हसत होता.

    मला हेच कळत नव्हतं. मॅडमचां नेमका प्रश्न काय होता. आणि मी काय उत्तर दिलं होतं.

हे देखील वाचा :

    वर्गाबाहेर काढलं याचं दुःख नव्हत. दिवसाआड आम्हांला अशा शिक्षा मिळतच होत्या. त्याची आता सवयच झाली होती. थोड्या वेळाने वैभव पण येईल अशी माझी खात्री होती.

    तसच झालं. मॅडमनी पुन्हा प्रश्न विचारला. यावेळी मी लक्ष देऊन ऐकू लागलो.

    “ए तू सांग रे.. लिटमसचा रंग कोणता असेल..?”

    मॅडमचा प्रश्न आत्ता माझ्या लक्षात आला.

    मी दिलेलं उत्तर आठवून माझं मलाच हसू आलं.

    पुढच्या क्षणात वैभव पण माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागलो.

    काही वेळाने पिरियड संपला. मॅडम आम्हाला न बघताच निघून गेल्या. आम्ही निर्लज्जा सारखे पुन्हा वर्गात जाऊन बसलो.

    पूर्ण वर्ग आमच्याकडे बघून हसत होता. आम्ही गालातल्या गालात हसत जागेवर जाऊन बसलो.

    मला काही क्षण तोंड वर करून बघू वाटेना. माझी इज्जत गेली होती. बॅड इंप्रेशन पडलं होतं. ती माझ्या बद्दल काय विचार करत असेल याच विचारात मी होतो.

    मी हळूच तिच्याकडे पाहिलं. ती माझ्याकडेच पाहत होती. हसऱ्या नजरेने मला न्याहाळत होती.

    मला काही कळेना. मी लगेच नजर चुकवली. तिला हसताना पाहून माझ्या मनात लाडू फुटत होते.

    मी काही वेळ तिच्याकडे पाहिलच नाही. काही वेळाने मी तिच्याकडे पुन्हा पाहिलं तर ती एकटक फक्त माझ्याकडेच बघून गालात हसत होती.

    मी पुन्हा नजर चुकवली. ती नेमकी अशी का बघत आहे. या बद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहीले. खूप विचार येऊ लागले.

    तो दिवस त्या विचारातच गेला. मी वैभवला याबद्दल सांगितलं. त्याने या गोष्टी मस्करीतच घेतल्या.

    तो इतकच म्हणाला, “भावा असा विचार पण करु नको.. पुन्हा कधी असा विचार मनात आला ना तर एकदा स्वतःचा हात डोळ्यासमोर घेऊन बघ.”

    मला त्याच्या अशा बोलण्याचा राग यायचा. पण तो काही क्षणापूर्ताच. पुढच्याच क्षणी काही तरी इलाॅजिकल बोलून तो पुन्हा मला हसवायचा.

    मला कळत होतं. मी तिच्या इतका सुंदर अजिबात नव्हतो. तिचा मित्र बनण्याइतपतही मी लायक नव्हतो.

    माझ्या पेक्षा कितीतरी सुंदर मुलांना ती फाट्यावर मारत होती. शाळेतला एक अन् एक मुलगा तिच्या मागे होता. पण ती कोणालाच भाव देत नव्हती.

    माझी अन् वैभ्याची मस्ती चालायची तर ती आम्हांला पाहत असायची. आमच्या प्रत्येक विनोदावर मन भरून हसायची.

Two children having fun in classroom

    ती आमच्या शेजारच्या बाकावर बसू लागली. मी खूप खुश झालो. सतत या ना त्या कारणाने तिच्याशी बोलण होऊ लागलं.

    हळूहळू आमची मैत्री वाढली. ती माझ्याशी मन भरून बोलू लागली. आमच्या विनोदावर हसू लागली. हसता हसता तिने दिलेल्या टाळीचा स्पर्श मला सुखावु लागला.

    तिचं असं माझ्याशी बोलण अनेकांना टोचू लागलं. वैभ्या एकदा म्हणाला, “तू किती पण प्रयत्न कर पण ती तुला पटणार नाही.”

    तो असं का म्हणत होता ते मला कळत होत. तो माझ्या रंगावरून मला जज करत होता.

    त्यांच म्हणणं क्लिअर होत. “तिच्या सारखी सुंदर गोरी पान मुलगी माझ्या सारख्या काळ्या मुलाच्या प्रेमात कधीच पडणार नाही.”

    “मुलींना सुंदर, उंच, मस्क्युलर मुल आवडतात. त्यात तू अजिबात बसत नाही.”

    “ती तुझ्याशी बोलते, तुझ्यासोबत हसते ते फक्त तिला बर वाटतं म्हणून तिचा टाईमपास होतो म्हणून.”

    “तू या गोष्टी मनावर नको घेऊ. पोरी फक्त चेहरा बघून प्रेम करतात. पैसा बघून लग्न करतात. नंतर तुला लय त्रास होईल..”

    त्यांचं असं बोलण माझ्या मनाला लागायचं. एका बाजूने पाहिलं तर तो खर तेच बोलत होता.

हे देखील वाचा :

    मला कोणी तरी पसंद करण्या इतपत मी देखणा, श्रीमंत किंवा पहिलवान नव्हतो.

    एक वेळ मी चांगली तब्येत केली असती, खूप शिकून श्रीमंत झालो असतो पण देखणा होणं अशक्य होत.

    माझा रंग मी बदलू शकणार नव्हतो. किती जरी प्रयत्न केले तरी ही एक गोष्ट कधीच बदलणार नव्हतो.

    अन् तरीही मी कळून पण न कळल्यासारखच वागत होतो.

    नेमकी हिच गोष्ट बदलण्यासाठी मी धडपडत होतो. मला तेव्हा कळत नव्हत. मला फक्त तिचं प्रेम हवं होत.

    अन् तिचं प्रेम मिळवण्यासाठी मला गोरं होण फार महत्वाचं होतं.

    शाळेच्या रस्त्यावर एक मेडिकल लागायचं. मी पैसे साठवून दर वेळी एक क्रीम विकत घ्यायचो.

    तिथल्या माणसाला माझा प्रॉब्लेम कळाला. त्याची अन् माझी चांगली गट्टी जमली.

    दर वेळी तो माझ्यावर एका नवीन क्रीमचा प्रयोग करायचा.

    काही क्रीम स्वस्त असायच्या काही महाग असायच्या. ज्या महाग असायच्या त्यांचे पैसे मी त्याला टप्प्या टप्प्याने द्यायचो.

    त्यामुळे त्याची अन् माझी मैत्री आणखी घट्ट झाली.

    दिवस जातील तसे माझ्या चेहऱ्यात फरक पडू लागला. चेहऱ्याचा काही भाग उजळू लागला.

    लोकं मला नोटीस करु लागले. माझ्या सारखे लोक कोणती क्रीम वापरतोस म्हणून मला विचारू लागले.

    मी फार खुश झालो.

    एकदा तिने देखील मला नोटीस केलं. मला स्पष्टच विचारलं, “अभी चेहऱ्यासाठी काही वापरतोस का..?”

    मी नाही म्हटल.

    मला तिला या गोष्टी सांगून स्वतः चा कमीपना दाखवायचा नव्हता.

    वैभ्या तर दर वेळी माझ्याकडे शंकेने बघत होता. एकदा तर त्याने सरळ विचारलंच, “त्या विश्र्ल्या मेडिकल वाल्याच्या नादाला लागला नाहीस ना.. शाणा नाही तो.. तुझ्याकडून नुसता पैसा काढून घेईल.. खर काय ते सांग..”

    मी त्यालाही नाहीच म्हणालो. माझ्यात होणारा बदल हा देवाच्या इच्छेने होतोय असच मी त्याला दाखवू लागलो.

    खरं देवाची इच्छा काय होती ते मला कळायला जास्त वेळ लागला नाही.

    जितक्या वेगाने पॉझिटिव्ह बदल माझ्यात झाला तितक्याच वेगाने निगेटिव्ह बदलही होऊ लागला.

    अचानक माझा चेहरा लाल होऊ लागला. माझी त्वचा लालसर होऊ लागली.

    काही काही ठिकाणी लाल डाग उमटू लागले. हे लपविण्यासाठी मी पुन्हा नवी क्रीम वापरली.

    प्रत्येक नव्या क्रीमचा नवा असर होऊ लागला. बघता बघता माझा चेहरा पूर्ण विद्रूप दिसू लागला.

    चेहऱ्यावर लाल लाल धब्बे उमटू लागले. मान लालसर दिसू लागली. बाकीचं शरीर काळं अन् चेहरा तेवढा अर्धवट गोरा, अर्धवट लालसर दिसू लागला. मी आधी काळा असलो तरी छान दिसत होतो पण आता तर पूर्ण विद्रुप दिसू लागलो.

    मला पाहणारे माझी चेष्टा उडवू लागले. गोरं होण्यासाठी मी काय केलं याची मस्करी उडवू लागले.

    मला स्वतःला ते पाहवेना. मी हळूहळू लोकांच्यात जाणं कमी केलं. शाळेला जाणं कमी केलं.

    वैभ्याने माझ्या नकळत खर काय ते बाहेर काढलं. विशाल मेडिकल वाल्याला एकट्याला धरुन चोप दिला.

    घरात सगळं माहित पडलं तेव्हा मार बसला तो बसला वर पैसे मिळायचे देखील बंद झाले.

    बाबांनी तर, “आता रहा असाच हीच तुझी शिक्षा” असं बोलून दाखवलं.

    मी तर पुरता कोसळून पडलो. हे असं राहण अशक्य होत. मी आधी जसा होतो तेच माझ्यासाठी बरोबर होतं असंच वाटू लागलं.

    प्रेम मिळवण्यासाठी मी हे काय करुन बसलो हे माझं मलाच कळेनास झालं.

    रात्र रात्र रडून काढल्या तेव्हा कूठे आईने बाबांची समजूत घातली. माझा रडून रडून सुजलेला चेहरा बघून एकदाची त्यांना दया आली.

    शेवटी चांगल्या त्वचा रोगतज्ञाकडे नेऊन मला दाखवलं. त्यांनी चांगली औषधं देऊन माझा उपचार सुरू केला.

    हळुहळू माझा चेहरा पूर्ववत होऊ लागला. मी आधी सारखा काळा झालो. लालसर त्वचा निघून गेली. लाल पांढरे धब्बे निघून गेले.

    आयुष्यात पहिल्यांदा मी माझा काळा रंग पाहून खूप खुश झालो.

    आई बाबांनी मी पुन्हा असं काही करणार नाही हे माझ्याकडून वदवून घेतलं.

    मी त्यांना शप्पथ घेऊन सांगितलं, “मी पुन्हा असं काही करणार नाही म्हणून.”

    प्रेमात स्वतः चा रंग बदलण्यासाठी निघालेलो मी आता मला प्रेमच नको असं म्हणू लागलो.

    जवळ जवळ महिन्याभराच्या अवकाशाने मी शाळेत गेलो. प्रत्येक जण माझ्याकडे चोरून पाहून हसत होता.

    माझ्या ते लक्षात येत होतं. ती सुद्धा माझ्याकडे पाहत आहे हे मला जाणवत होतं.

    पण आता तिच्यापासून दूर राहण्याचा मी निर्णय घेतला होता.

    मला कळून चुकल होतं प्रेम तर मिळणार नाहीच पण मी स्वतः ला कूठे तरी हरवून बसलो असतो.

    शाळा सुटली अन् घरी जाण्यासाठी निघालो. वैभ्या सोबतच होता. तो शांतच होता. दर वेळी वागतो तसा तो वागत नव्हता. माझ्या ते लक्षात आलं होतं. तरीही मी शांतच होतो.

    आंबेडकर मैदानाजवळ आलो अन् समोर ती उभी दिसली. तिला समोरा समोर पाहून थक्कच झालो. किती तरी दिवसांनी तिला पाहत होतो.

    कितीतरी बदल तिच्यात जाणवत होता. आधी पेक्षा ही जास्त ती सुंदर दिसत होती. कदाचित खऱ्या ऐश्वर्या राय पेक्षाही जास्त सुंदर. तीची एक बट पुन्हा तिच्या गालाशी खेळत होती. तिला पाहून माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं.

    ती सरळ माझ्या समोर येऊनच उभी राहीली. मी तिची नजर चुकवत शांत मानेने खाली बघू लागलो.

    “अभी.. प्रेम होत तर सांगायचं होतंस.. मी नाही म्हणाले नसते..”

    मी चकित होऊन तिच्याकडे पाहू लागलो. वैभ्याकडे पाहिलं तर तो गालातल्या गालात हसत होता.

    मला काही कळत नव्हतं. मी आश्चर्याने म्हणालो,

    “काय..?”

    “आता उगाच नाटक करू नकोस.. मला माहीत आहे.. तुझं प्रेम आहे माझ्यावर.. तुला काय वाटत मला कळत नव्हत का..?”

    मी शांतच होतो. क्षणभरासाठी ती मस्करी करतेय की खरं बोलतेय हे समजून घेण्यातच माझं मन गुंतून गेलं होत. ती पुढे बोलू लागली.

    “तुला काय वाटलं मी तुला नाही म्हणाले असते..? तू एकदा विचारून तरी पाहायचं होतस.. तू विचारलं नसतंस तरी मी स्वतः हून तुला प्रपोज केलं असतं.”

    मी तर डोळे मोठे करुन तिला पाहत होतो.

हे देखील वाचा :

    “होय.. खोटं वाटतंय ना तुला..?”

    मी होकारार्थी मान डोलावली.

    “अभी रंग पाहून प्रेमात पडणाऱ्या मुलींमधली नाही मी. मी नाही म्हणेल म्हणून तू स्वतः चा रंग बदलायला निघालास होय..?”

    “अभी प्रेम रंग पाहून करायचं नसतं मन पाहून करायचं असतं इतकं मला कळत.”

    “आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझ्या रंगावर नाही.”

    तिने असं म्हणताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वैभ्याच्या गळ्यात पडून मी रडू लागलो.

    हे खर की खोट हे कळायला मला वेळ लागला. काही वेळाने शुद्धीवर आलो. रडणं थांबवलं.

    ती मला पाहून हसू लागली. मी लाजू लागलो.

    मी लाजत लाजतच विचारलं..

Premrang is the image of a couple.

    “मीच का.. माझ्यासोबतच का..?”

    ती हसतच म्हणाली, “हेच मी तुला सुद्धा विचारू शकते.”

    मी गालाताच हसू लागलो. वैभ्याने पाठीत मारत मला माझ्या चुकीची शिक्षा दिली..

    “भावा नशीबवान निघालास..”

    “तू सांगितलस ना तिला सगळं..?”

    “मी फक्त तुझ्या क्रीमच सांगितलं.. तिनेच येऊन तुझ्यावर प्रेम असल्याचं कबूल केलं..”

    आम्ही तिघेही हसू लागलो..

    आज दहा वर्ष झालीत आमच्या लग्नाला. एक मुलगा, एक मुलगी अन् माझी ऐश्वर्या सुखात आहोत आम्ही.

    तेव्हा वाटलं होतं हे प्रेम जास्त वेळ टिकणार नाही. कदाचित पुढे मागे आमच्यात दुरावा येईल.

    पण तसं काही झालं नाही. ऐश्वर्याने दाखवून दिलं, प्रेम हे रंग पाहून नाही तर मन पाहून केलं जात.

    तिच्या प्रेमरंगात मलाही तिने सामावून घेतलं.

समाप्त

Leave a Comment