राजा राणी

    राजाच्या भुकेसाठी राणी तडफडत होती तर राणीच्या काळजीपोटी राजा बेचैन होत होता. “राजा राणी” फक्त राजवाड्यात राहत नाहीत. रस्त्यावरच्या झोपडीतसुद्धा पहायला मिळतात.  

Raja Rani is the story of An old man and an old woman sitting besides the road.

“राजा राणी – रस्त्यावरची प्रेमकहाणी”

    विषय अभ्यासा व्यतिरिक्त होता. पण या विषयाचा अभ्यास करणं फार महत्वाचं होत. कारण विषय प्रेमाचा होता. अन् आमचा भावनेचा अभ्यास अजिबातच नव्हता.

    राणीन पुन्हा “बा ऽ ला जाऊन सांगीन” म्हणून धमकावलं होतं. पुन्हा अपयश आलं होतं. सुर्ज्यान सांगितलं ते सर्व केलं होत.

    “लाईन देतीस का.. मैत्रीण हुतीस का.. माझं तुझ्याव लय प्रेम हाय” या सारखे आऊटडेटेड, सिनेमांत गावातल्या मुलांच्या तोंडी दाखवतात तसे डायलॉग अजिबात वापरले नव्हते. ( गावठी म्हटलेल आम्हांला खपत नाय )

    सिद्ध्या म्हणतो तसं, एकदम प्रोफेशनल वागण्याचा प्रयत्न करत होतो. तरी पुन्हा राणीन नकारच दिला. मी काय बोलणार आहे हे ऐकण्याआधीच तिचा नकार !

    मी जवळ गेलो अन् तिन नकार दिला. मनात म्हटलं “अग बाई ऐकून तर घे माझं” आधीच काय, “बा ऽ ला सांगीन, भावाला आणीन, जवळ आलास तर बघ..”

    मी कोणी गावगुंड होतो की कोणी दरोडेखोर होतो.. तुझ्याच वयाचा होतो ना.. तुझ्याच शाळेत शिकत होतो.. आठवीत शिकणारा एक गरीब सामान्य मुलगा. (आगाऊ)

    तुझ्याइतका सुंदर नसेन किंबहुना हुशारही नसेन पण निदान ऐकून तर घ्यायचं होतंस. काय लायकी राहिली माझी. माझेच मित्र माझ्यावर हसायला लागले.

    सुर्ज्या म्हटला, “ल्येका तुझ्या डोळ्यातच दिसतय. तुझ डोळं बघूनच न्हाई म्हटली ती.”

    “त्यात तुझी ही चौथी खेप..” सिद्ध्यानं सुर्ज्याला टाळी देत आठवण केली.

    “काय दिसतंय माझ्या डोळ्यात..?” मी रडवेल्या नजरेने विचारलं. ( खर तर नाटकी )

    “हवस..” मागून परव्यानं मीठ चोळलं. तसे तिघेही हसू लागले.

    मी पुन्हा तोंड पाडून बसलो. “हसा कडव्यांनो, उद्या तिला घेऊन फिरीन ना तवा मागणं धूर निघल तुमच्या.”

    “तुझ्या मागची आग ईजीव मग आमचा धूर काढ.” परव्या पुन्हा जोर जोरात हसू लागला.

    “तुझ्या तर आता..” मी त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागलो. तिघेही माझी मजा घेऊ लागले.

    “बास ए ऽ बास.. आवरा बेल हुईल आता.. राजा बास कर तुझं रडगाणं.. तासाचं काय ते बघा लेकांनो..” सूर्ज्यान आम्हांला अडवत पुन्हा मूळ मुद्यावर आणलं.

हे देखील वाचा :

    हे आमचं नेहेमीच होत. मधली सुट्टी झाली की डब्याची पिशवी घ्यायची अन् सरळ झाडाखाली जेवायला जायचं. जेवण झालं की प्रमेय सोडवत बसायचं. ही सुट्टी मोठी होती. अर्ध्या तासाची. त्यामुळे निवांत वेळ मिळायचा.

    पण सकाळी राणीनं दिलेला नकार अजून पचला नव्हता. त्यामुळेच मी उदास होतो. वरवर हसत खेळत वाटत असलो तरी मनावर खोल जखम झाली होती.

    कारण ही पहिली वेळ नव्हती. चौथ्यांदा राणीनं मला दूर सारलं होतं. तसा हा नकारही नव्हताच. मी राणीला माझ्या मनातलं सांगूच शकलो नव्हतो. मी जवळ येताच ती “नाय, बा ऽ कावील” करत माझ्यापासून लांब पळत होती.

    मला तिला प्रपोजच करायचं होत पण ती माझं म्हणनच ऐकून घेत नव्हती. एका बाजूला मला तिच्या अशा स्वभावाबद्दल बरंही वाटत होत अन् दुसऱ्या बाजूला निराशाही वाटत होती.

    तिचा चेहरा डोळ्यासमोर आणून मी पुन्हा स्वयंप्रेरीत होत होतो. मी हार माननार नव्हतो. कारण मी राजा होतो अन् राजा हारत नसतो तो लढत असतो. जिंकण्यासाठी. (लयच मोठं बोललो)

    पुन्हा लढण्यासाठी मी स्वतःला तयार केलं. अन् राणी पुराण काही वेळ बाजूला ठेवलं. सिद्ध्याकडं लक्ष देऊ लागलो. कारण की पुढचा तास भुमितीचा होता. अन् प्रमेय सोडवता आला नाही की पाटील मास्तर गरुड पुराणातल्या शिक्षा द्यायचा.

    तसा दिवसातला हा सातवा तास होता. (इंग्रजी भाषेत पिरेड) मधल्या सुट्टी नंतरचा तास. अन् नेमकं याच तासाला भरपूर झोप यायची. (गावरान भाषेत मायंदाळ).

    अन् आजच ह्यो पाटील मास्तर प्रमेय फळ्यावर लिहून घेणार होता. कळला तर अजिबात नव्हता. कुठलाच. त्यानं शिकवलेला. (पुढं बसणाऱ्या चार पाच होतकरू हुशार विद्यार्थ्यांना सोडून)

    त्याचीच रिविजन सिद्ध्या घेत होता. सिद्ध्या तसा गणितात हुशार. सूर्ज्या ही हुशार. मी अन् परव्या जरा कमी हुशार. ( म्हणजे ढ )

    खरं, टूटे दिल की बेचैनी में (जरा जरा फिल्मी भाषेत सांगायचं तर) अभ्यासात काही लक्ष लागत नव्हत.

    सिद्ध्यानं पुन्हा नव्याने सांगायला सुरुवात केली अन् तिकडं बेल वाजली. आम्हीं काय होणार ते ओळखून माना हलवल्या अन् वर्गात जायला निघालो. वर्गात जाऊन कुठली शिक्षा मास्तर देईल किंवा आज कुठल्या भाषेत आमचा उद्धार करील याचा अंदाज लावत बसलो.

    देवानंच धाऊन यावं तसा कोणी तरी माणूस पाटील मास्तर बरोबरच वर्गात आला.

    “बर ऐकारे, हे साहेब आपल्या केडीसी बँकेतले आहेत. काय म्हणतायत लक्ष देऊन ऐका जरा.”

    साहेब बोलू लागले.

    “कसंय मुलांनो, तुम्ही आता आठवीला आहात. म्हणजे तुम्हाला व्यवहाराची चांगली माहिती आहे. पण बँकेचा व्यवहार कसा चालतो याची माहिती असनंही गरजेचं आहे.”

    “आई बाबा पैसे देतात ते आपण खाऊन टाकतो.. कधी कधी साठवतो.. पण कुठे साठवतो, तर आपल्या गल्ल्यात. हीच सवय आपल्याला बदलायची आहे. तुम्हीं जे गल्ल्यात पैसे साठवता तेच तुम्ही बँकेत साठवायचे.”

    “याने काय होईल तुम्हाला बँकेतला व्यवहारही कळेल अन् तुमची रक्कमही वाढू लागेल. आणि बर का, तुम्हीं ती रक्कम काढू ही शकता.”

    “अगदी पाच रुपयांपासून कितीही रक्कम तुम्ही जमा करू शकता अन् काढू शकता.”

    सगळ्यांनी खोट्या टाळ्या वाजवल्या. (लक्षात आलंच असेल)

    साहेब पुढे बोलू लागले.

    “बँकेने खास तुमच्यासाठी ही सोय सुरू केली आहे. शाळकरी मुलांना लवकर बँकेचा व्यवहार कळावा म्हणून. अन् याची सुरवात आपल्या पाराशर हायस्कूल पासूनच आम्ही करणार आहोत. आजपासूनच.. अगदी आतापासून.. तुम्हीं चार चार जणांच्या ग्रुपने या अन् आपलं खात उघडा..”

    टाळ्यांचा कडकडाट झाला. ( ह्या टाळ्या खऱ्या होत्या हे सांगावं न लगे.)

    “आणि एक” पाटील मास्तर बोलू लागले, “काय पाच पन्नास पैसे असतील तर जमा करूनच या.. वेळ झाला तरी चालेल खरं बँकेचा व्यवहार आदी शिकून घ्या. काय लागलं तर सायब हायत तिथं.”

    “हो सर ऽ ऽ..” पूर्ण वर्गाचा आवाज. (आदराने अन् आनंदाने)

    पाटील मास्तर तोंडातल्या तोंडात हसून पाहू लागले अन् न राहवून म्हणाले.

    “बेट्यांनो, आज बँकेचा व्यवहार शिकून घ्या. उद्या तुमचा मी प्रमेयाचा व्यवहार तपासतो.” तसा वर्गात एकच हशा पिकला. पाटील मास्तरही आमच्या हास्यात मिसळून गेले.

हे देखील वाचा :

    पाऊण तासाने आमच्या चौघांचा नंबर आला. सपकाळ तसा आधी मी जाणार म्हणून परव्याशी नडत होता. खरं फोटो नसल्याचं लक्षात येताच तो तोंड पाडून बसला होता. (वेडा होता तो)

    तसा फोटो आमच्याकडे ही नव्हता पण आम्हीं त्याच्यासारखे वेडे नव्हतो. आम्हांला बाहेर जाण्याचं कारणच हवं होतं. अन् हे तर आपसूक आमच्याजवळ चालून आलं होतं. (आम्हीं सपकाळ सारखा वेडेपना करतोय होय )

    हसत खेळत बँकेत गेलो. केडीसी बँक अगदी शाळेजवळच होती. रस्त्याच्या ह्या बाजूला आमची शाळा अन् विरुद्ध बाजूला दोनशे मीटरच्या अंतरावर केडीसी बँक.

    आरामात बँकेत जाऊन बसलो. जरा इकडं तिकडं केलं. सायबांनी बोलवल्यावर गेलो. त्यांनी “फोटो तेवढा आणून उद्या पासबुकावर लावा अन् स्टॅम्प घ्या” म्हणत आम्हा चौघांना परत पाठवलं.

    आम्हीं पुन्हा हसत खेळत बाहेर पडलो. रस्त्याने चालू लागलो. तशी रहदारी कमी होती. रस्त्यालगत शाळा असूनही वाहने वेगात होतीत. (आरटीओचा बोर्ड फक्त नावाला असतो. बघत कोण नसतं.)

    एक आज्जी रस्ता क्रॉस करताना दिसली. ती रांगत रांगत रस्ता क्रॉस करत होती. तिच्या वाढलेल्या वयानं हातापायाची कार्यक्षमता संपली म्हणून केव्हाच सांगितलं होतं. म्हणूनच तिचा रांगत रांगत संघर्ष सुरू होता.

    ती बरोबर रस्त्याच्या मधोमध जाऊन थांबली. तिच्याच्याने काही हालचाल होईना. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे ती सुन्न होऊन पाहत राहिली.

    आम्हीं चौघांनीही तिला पाहिल. तिची परिस्थिती आमच्या लक्षात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने येत होतीत. पुढून भरधाव वेगात ट्रक येत होता तर पाठीमागून एसटी धुरळा उडवत येत होती.

    आम्ही क्षणाचाही विलंब न करता तिच्याजवळ गेलो. चौघांनीही तिला उचलून धरलं आणि रस्ता क्रॉस केला. दोन्ही वाहने सुसाट गेलीत. (रस्ता त्यांच्याच बापाचा होता)

    न राहून आमच्या चौघांच्याही तोंडातून कोल्हापुरातली रांगडी शिवी बाहेर पडली. ( कुठली ती सांगावे न लगे )

    “खुळ्या बोड्याच हाय का रं” परव्या.

    “तर मर्दा, म्हातारीला उडवली असती पार” सिद्ध्या.

    “आज्जे कशाला रस्त्याच्या मधनं जातीस. विमानं उडत्यात इथं. गप बसवत नाय व्हय एका जाग्याला.” सुर्ज्या.

    “म्हातारे आता गेली असतीस ढगात” मी खाली वाकत तिच्याजवळ बसत म्हणालो.

    “ए बाळा.. ए बाळा.. बरं झालं आलासां..” ती माझ्या हाताला धरत माझ्या हाताचं मुकं घेत बोलू लागली.

    “बाळांनू, बाळांनू..” तिला काय बोलावं सुचत नव्हतं. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. पण तिच्या भावना सरळ काळजात घुसत होत्या.

    तिचा एक एक मुका हृदयाला स्पर्श करत होता. माझ्या तर डोळ्यातच पाणी आलं. (खरंच)

    “राजा रं पायाला लागलय वाटतं” सिद्ध्या खाली बसत म्हणाला.

    त्यानं तसं म्हणताच तिन माझ्याकडे हसऱ्या नजरेन पाहिलं. दोन्ही हात माझ्या चेहऱ्याभोवती फिरवून माझी माया करु लागली.

    तिन माझ्या डोक्यावर हात ठेवला. मनभरून बघितल. तिच्या डोळ्यात पाणी होत की तिचे डोळेच तसे होते माहीत नाही.

    “आज्जे काय कराय चाललेलीस..? कुठं राहत्यास..? कुठं लागलंय बघू..?”

    “नाय नाय कुठं लागाय नाय” तीनं तिचं गाठोड माझ्याजवळ दिलं अन् बोलू लागली.

    “यात काय हाय..?”

    “ए सोन्या एवढं दे जा रं माझ्या राजाला.. तिकडं मारुती जवळ बसलाय..”

    “कोण हाय..?”

    “आं ऽ”

    “कोण हाय..?” मी पुन्हा म्हणालो. ( यावेळी जोरात )

    “राजा हाय माझा एवढं एक काम कर लेका.”

    “तू जा की.” ( होय मीच म्हणालो. ते तिघही असेच पाहू लागले )

    “आं ऽ..?”

    “तु का जाईत नायस..?” ( पुन्हा जोरात )

    “राजा मर्दा हळू.” ( तिघही एकत्र )

    “थांबा जरा..”

    “व्हय आज्जें तु का जाईत नायस ..?”

    “मी व्हय..”

    “व्हय..”

    तशी ती नाराज झाली. “दम लागलाया. पायानं जमंना.” तीनं पायाला हात लावला.

    “नाय जमत तर कशाला रस्त्याच्या मधी जायचं आज्जे. काय झालं असत म्हंजी..?”

    तशी ती एकदम गप्प झाली. गाठोडं स्वतः जवळ घेऊ लागली. हलक्या अंगाने मागे सरली. अन् जायला निघाली.

    “एकडं आण ती. रुसलीस व्हय..?” मी तिच्यासमोर जात बोलू लागलो.

    “नाय बाळा.. राजा उपाशी असंल.. मला जाया पायजे..” तिचे डोळे पाण्याने भरले होते. ( ते रडून रडून पाणीदार झाले होते. मला ते कळून चुकलं. )

    “एकड आण ती.. कुठ जायचं नायस.. पाय बघ ती कसं झाल्यात. आधी त्याला मलम पट्टी लाव.. सूरज्या उचला आधी दवाखान्यात न्हिवू या.”

    तिघांनीही तिला उचलत सरकारी दवाखान्यात नेलं. ( जवळच होता. पटायला अवघड जाईल पण सरकारी दवाखान्या समोरच हे सगळं झालं होत. )

    आजूबाजूचे बघतच होते. ( अर्थात कौतुकाने )

    पळत पळतच मारूती मंदिराजवळ गेलो. (जास्त लांब नव्हत मंदिर)

    राजा एका कोपऱ्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे हसत बसला होता. तोंड वेड वाकडं करत होता. मधूनच रस्त्याच्या कडेला पाहत होता. ( कुणाकडे हे सांगाव न लगे )

    त्याला क्षणात ओळखून मी त्याच्या बाजूला बसलो.

    “काय मग राजा भूक लागलीय का..?”

    तो नुसताच हसू लागला. हात वेडे वाकडे करुन हो म्हणू लागला.

    “ही धर बाबा तुझ्यासाठी आणलंय.”

    “राणी.. राणी..” गाठोड ओळखून तो हसला. माझ्या मागे पाहू लागला.

    “राणी होय.” मी हसलो. ( का ते सांगावं न लगे )

    “येत्या येत्या..”

    तो इकडं तिकडं पाहू लागला. हालचाल करु लागला.

    “बस बस.. काय नाय झालं.. येत्या..”

    “राणी.. राणी..” त्याला काही राहवेना. त्याच्या मनाची चलबिचल झाली. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करु लागलो. तो काही मला आवरेना. गाठोड त्यानं बाजूला ठेवलं. अन् त्याची नजर राणीला शोधू लागली

    मी तसाच बसून राहिलो. त्यांची वाट बघू लागलो. काही वेळाने ते सर्व आले..

    त्यांना येताना बघून राजानं राणीला ओळखलं. त्याची चलबिचल आणखी वाढली.

    तिघांनीही राजाच्या शेजारी आज्जीला व्यवस्थित बसवलं. पायाला मलम लावला होता. जखम मोठी नव्हती. ( देवाचं उपकार )

    दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडले. राजा काळजीने “राणी राणी” करत होता. आज्जी त्याला भावनेच्या भाषेत सांगत होती.

    “आज्जे”, मी तिच्या शेजारी बसत बोलू लागलो. “कुठं राहताय तुम्ही..?”

    “आम्ही व्हय,” ती डोळ्यात पाणी ठेऊन बोलू लागली. “जागा घावल तिथ ऱ्हातो बाबा.”

    “घर न्हाय तुमास्नी..?”

    “हिचं घर म्हणायचं.”

    “हीच होय.. पोरं काय करत्यात..?”

    तशी ती शांत झाली. तिच्या पाणीदार डोळ्यांनी उत्तर दिलं. “चार वरीस झालं, पोरगं परदेशात गेलं ती गेलं” ( माझ्या मनानी तिच्या पोरांना मन भरून शिव्या दिल्या )

    “तुमचं घर हाय कुठं खरं..?”

    “राजा, राजावाणी वागला काय कमी पडू दिलं नाय पुरग्याला.. पार घरादारा सकट इकुन टाकलं”

    “मग आता काय.. कुठं ऱ्हाणार..?”

    “राजा हाय न्हवं.”

    “राजा संगच म्हणालोय कुठं ऱ्हाणार..?”

    “बंगल्यात..” तशी ती मन भरून हसली.. आम्ही भरलेल्या डोळ्यांनीच दोघांकडे पाहू लागलो..

    “राजाला काय झालं. का पोरांमुळ..?”

    “नशीबाम्होरं काय चालणार.. हुईल ती हुईल..” तशी ती शांतच झाली. तिचं गाठोडं उघडून त्यातली भाकर त्याला चारू लागली.

    आम्हीं चौघही डोळ्यात पाणी ठेऊन त्यांना पाहत होतो.

    “अवघड हाय लका..” सिद्ध्या.

    “अशी कशी वागू शकत्यात रं..?” सुर्ज्या

    “आता काय म्हाईत..? आपण काय बोलणार.” मला तर काहीच सुचत नव्हत. काही वेळ आम्हीं शांतच राहिलो.

    आम्हीं चौघही डोळ्यात पाणी ठेऊन त्यांना पाहत होतो.

    “ती न्हवं,” सिध्यानच मग बोलायला सुरवात केली. “राजा राणी व्हय..” माझ्या खांद्याला खांदा मारत मला डीवचलं. तसे तिघंही हसू लागले.    

    “राजा काय वाटतय..?” सुर्ज्या..

    “काय वाटणार.. मर्दा, अशी जीव लावणारी राणी पायजे. नको त्या महालातली. नको ती लावण्यवती.. नको ती सुंदरा..” ( माहित आहे टोन बदललाय.. पण भावना महत्वाच्या )

    “राजं राजवाड्यातन झोपड्यात या..” परव्या. पुन्हा तिघे हसले. (दुसरं येतं काय यांना)

    मी नाक मुरडत बोलू लागलो. “एवढच बोलायचंय की बघा, असं पायजे प्रेम. अशी पायजे साथ. आताच्या पिढीला नाय जमणार ही. ( यात मी सुद्धा आहे )

    “मर्दा माझी राणी कशी असंल माहीत नाय खरं तिन अशी साथ दिली तर तिचा राजा व्हायला मी तयार हाय.”

    “बघू या की..” तिघही एकत्र जोर जोरात माना हलवत बोलले. ( खरंच मित्रांचा विश्वास बसनं लय अवघड )

    शाळा सुटली. घंटा वाजली होती. आमची पंचाईत झाली होती. इतका वेळ या गोष्टीत गेला ते आमच्या ध्यानीमनी आलं नाही.

    “आता रं..?” परव्याचा मूर्ख प्रश्न.

    “आता काय, मोरे मास्तर हाणतोय उद्याच्याला धरून. आधीच शाळेतनं पोरं पळून जात्यात म्हणून बोंबाबोंब हाय. आयतं घावलो त्यांच्या तावडीत आता.” सुर्ज्या.

    चौघही नाराज झालो. खरं राजा राणीच प्रेम बघून आमचं दुःख विसरून गेलो.

    या जगात देव आहे हे त्या दिवशी कळालं. एका सुद्धा मास्तरन आम्हाला हाणलं नव्हत. ज्या मोरे मास्तरची भीती होती. त्यानंच आम्हाला आज्जीला उचलून नेताना पाहिलं होतं.

हे देखील वाचा :

    आजपर्यंतचा इतिहास आहे स्टेजवर फक्त मार खायलाच गेलो होतो. पण त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर सत्कार झाला होता. अभ्यासाच्या विषयात पहिला आलो नव्हतो. पण ज्यासाठी सत्कार केला त्या कामाचा अभिमान वाटत होता.

    शाळेच्या बाहेरही बरंच काही शिकायला मिळतं हे तेव्हाच आमच्या लक्षात आलं होत. ( खर तर बाहेरची दुनियाच खरी शाळा शिकवते – अनुभवावरून )

    रस्त्यावरच्या राजा राणीचा धडा आम्हाला बरंच काही शिकवून गेला होता.

    पुढे ते कधी दिसतील तेव्हा आम्हीं काही ना काही त्यांना खायला देत होतो. आमच्याकडून होईल ती मदत करत होतो.

    कधी तरी त्यांच्यासोबत बसत होतो. एकदा राणीनं आम्हांला त्यांच्यासोबत पाहिलं होत. परव्यानच तिला बघताना पाहिलं होत. तशी ती लाजली होती. ( माझा आपला भाबडा समज )

    परव्या म्हटला, “आईशप्पथ तुलाच बघत होती.” मी लाजलो.. ( का ते सांगावे न लगे )

    पुढे बोलू लागला, “खरं हसून बघत होती का बघून हसत होती ते म्हाईत नाय.” तसे तिघही हसू लागले. ( मित्र.. शेवटी कसे असतात तुम्हाला माहीत आहे )

    त्यानंतर पाचव्यांदा मी पुन्हा प्रयत्न केला होता. ( काय झालं असेल ते सांगावे न लगे )

समाप्त

कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. या कथेतील कोणताही भाग लेखकाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही लिखित किंवा दृकश्राव्य माध्यमात प्रसारित करता येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

    नवनवीन मराठी कथा, कादंबरी वाचण्यासाठी “अक्षय खजिना” या वेबसाईटला फॉलो करा.
    धन्यवाद.

Kindly Share it With Your Friends!

2 thoughts on “”

Leave a Comment